इकडे शितल शशीकला बरोबर घरात आली . भला मोठा दिवाणखाणा पाहून तिचे डोळे विस्फारले . सोफ्यावरचे गालीचे मऊमऊ लागत होते . शोकेस मधली आकर्षक खेळण्या आणि त्यांच्या मधोमध चांदीचा कृष्ण तिला खूप आवडला . शशीकला म्हणली , " शितल , चल जेवायला ये . ते नंतर बघ . " घराच्या मोठ्या मोठ्या खोल्या मधून फिरायला तिला मजा वाटू लागली . जेवणासाठी ती स्वयंपाक खोलीत गेली . तिकडे सहा खुर्च्यांचा मध्यम आकाराचा असा जेवणाचा टेबल होता . जेवणाला एक म्हातारी बाई बसली होती . तिने कण्हत कण्हत " शशीकला , मला थोडसं पाणी दें . " असे म्हणाली . तिने शितलला पटकन वाढले नि बाहेर गेली . ते बघून शितलने " आजी , हे घ्या पाणी . मला वाटते मालकीणने बहुतेक ऐकलं नसावं . " असे म्हणून पाणी दिले .
" नाही बाळ , ती माझ्याशी अशीच वागते . अन्न - पाणी मला व्यवस्थित देत नाही . " आजी हळू आवाजात म्हणाली .
ते ऐकून शितलचे मन कळवळले . मनात विचार करू लागली . ' अशी आजी मला मिळाली असती तर किती बरे झाले असते . आणि या मालकीणला माझी आजी मिळाली असती तर बरोबर झाले असते . पण देव सगळच बिघडवून ठेवतो . आता या मालकीणला मी बरोबर करते . '
तिकडे शशीकला ( मालकीण ) बाहेर चंद्रकान्त ( साहेब ) बसला होता . तिथे गेली आणि म्हणाली , " मुलगी एकदम झकास आहे . लिलाबाईला जर ही दिली तर आम्हाला भरपूर पैसे मिळतील . " चंद्रकान्त ऐकून खुष झाला . एवढे बोलून ती आतमध्ये आली . ती म्हातारी आजी जेवून पाठीमागच्या दारात निघून गेली . शितलने तिकडे फारसे लक्ष दिले नाही . ती जेवून बाहेर गेली .
तिकडे चंद्रकान्त बरोबर अन्य काही मंडळी बसली होती . त्या प्रत्येकाकडे तिने निरखून पाहीले . सगळेजण दारू पिऊन अगदी तरतरीत झाले होते . त्यातला एकजण डोळे मोठे करून शितलला बघू लागला . हिनेही त्याला डोळे मोठे करून बघीतले . तो दचकून चंद्रकान्तला म्हणाला , " ए ... ए ... ए चंद्रकान्त ... ए .. ही पोर ही पोर कुणाची रे ? आणि इथे .... इथे काय करते ? "
चंद्रकान्त हसून म्हणाला , " ही पोर अरे ही तर आपला वसंत आहे ना त्याची पोर . तिला काही दिवसासाठी इकडे ठेवलय ."
" पोर तर एकदम झकास आहे रं ... " असे म्हणून सगळे हसायला लागले . शितलला कसेसेच वाटले . ती लगेच धावत धावत आत आली आणि झोपली . तिला भितीचे स्वप्न पडले . ती मध्यरात्री स्वप्नातून उठून रडू लागली . पण तिला जवळ घेणारं कोण नव्हत . तशीच उठून काळोखात आपल्या आई - बाबांना शोधू लागली . हिच्या रडण्याचा आवाज ऐकून ती म्हातारी आजी आली . लाईट पेटवून तिने शितलला जवळ घेतले आणि शांत केले . " उद्या तुझ्या आई बाबांना बोलावून घेते हं . आता झोप बघू . " असे म्हणून तिने शितलला झोपविले . आपण पाठच्या दारातून निघून गेली .