अलिकडच्या या लॉक डाऊनच्या काळात आपल्याला स्वत:मध्ये डोकावून पाहण्याची जशी एक प्रचंड मोठी संधी मिळाली; तशीच स्वत:सोबत इतरांना समजून घेण्याची ही!
छोट्याशा घरात आम्ही पाच जण अगदी एक दिवसही अनावश्यक कारणासाठी कुठेही न जाता घरातच राहून आनंदी राहण्याचे वेगवेगळे मार्ग शोधत रोज नवीन उमेद अन् नवीन काहीतरी करीत राहीलो. 1 BHK असलं तरी माझ्यासाठी आमचं घर म्हणजे एक जन्नत आहे!सुंदर अशी बाग तयार करून त्या बागेत या लॉक डाऊनमधला बराच काळ आम्ही रमलो. या सर्वांत एक सुंदर गोष्ट किंवा एका छोट्याशा शब्दाचा भला मोठा अर्थ आणि त्याचे महत्त्व लक्षात आले. त्याची इतकी तीव्र जाणीव झाली की, मला जे समजलं ते तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवणं आणि तुम्हाला आनंदी राहण्यास मदत करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि 'माणूस' म्हणून माझं ते कर्तव्य आहे असं मी समजते.
मी गेली ३-४ महिने रोज आमच्या गॅलरीत झाडं, फुलं, पानं, पक्षी, ऊन, वारा, पाऊस या सर्व निसर्गातील वैविध्यपूर्ण गोष्टींची गंमत पाहत आहे. ती अशी की,
१) झाडांना रोज सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान पाणी दिलं, की ते गटकन सगळं पाणी पिऊन घेतात, पण तेच त्यांना सकाळी चार वाजता दिलं तर ते हळूहळू पाणी पितात. माझ्या समजुतीनुसार दिवसभर ऊन अंगावर घेतल्यावर सायंकाळी चार वाजता झाडांना तहान लागते मात्र तीच तहान रात्रीच्या गारव्यानंतर सकाळी चारला राहत नाही म्हणून सकाळी चारला पाणी दिलं की ते मातीत न झिरपता साचून तसंच राहतं.
मात्र या सर्वात झाडांना सायंकाळी चार वाजता पाणी देण्याचा माझा उद्देश हा थोडासा स्वार्थी स्वरुपाचा आहे. तो असा की, मला तापलेल्या मातीमध्ये पाणी पडल्यावर येणारा सुगंध प्रचंड आवडतो, इतका की माझ्यासाठी तो जणूकाही स्वर्गच! यातून हे समजतं की झाडांना मी पाणी देते जेव्हा त्यांना तहान असते आणि त्यातून मला आनंदलेल्या मातीचा सुगंध मिळतो.
२) झाडांना मोठं होण्यासाठी अनेक गोष्टींची आवश्यकता असते जसे की सूर्यप्रकाश, पाणी वेळच्यावेळी काटणी, छाटणी, खुरपणी आणि बरंच काही! म्हणजेच झाडं हीअनेक घटकांवर अवलंबून असतात. जर त्यांना हे सर्व योग्य वेळेत, योग्य प्रमाणात मिळालं नाही तर त्यांची वाढ खुंटते आणि कालांतराने ते झाड संपते.
३) झाडांची प्रजनन प्रक्रिया मोठ्या प्रमाणात पक्षांवर अवलंबून असते. पक्षांच्या विष्टेतून बीजांची पेरणी होत असते. जरी आपण वृक्षारोपण करीत असलो तरी पक्षीच हे काम मोठ्या प्रमाणात करीत असतात. हेच पक्षी घरटं बांधायला सावलीसाठी,ऊन वाऱ्यातून संरक्षणासाठी याच झाडांचा, वृक्षांचा आधार घेत असतात.
४) आपण भूगोलात शिकलो की, जलचक्र काय असतं? पाऊस पडतो. पाणी साचतं. त्या पाण्याचं बाष्पीभवन होतं. त्या बाष्पाचे ढग बनतात. अन पुन्हा पाऊस पडतो. या निसर्गाच्या किमयेने पाण्याची निर्मिती केली ज्यावर संपूर्ण जीवसृष्टी अवलंबून आहे, हे पाणी वरुन खाली पडले नाही तर बाष्पीभवन होणार कशाचं? आणि पुन्हा ढग बनणार कशाचे?
५) आमच्या बागेतील अजून एक गोष्ट म्हणजे गॅलरीतील ग्रीलवर ठेवायला पुरेशी जागा नसल्याने एका रोपाची कुंडी मी खाली ठेवली होती. कदाचित त्यामुळे रोपाला एकटेपणाची वागणूक मिळाली. जसा माणूस वाळीत टाकला की खचतो अगदी तसंच त्याचंही झालं. काही काळाने पुरेसे ऊन मिळाले नाही म्हणून त्या झाडाने आपली मान टाकली. फक्त पाणी देऊन उपयोग नाही हे समजलं. म्हणजे ते रोपही अनेक गोष्टींवर, घटकांवर अवलंबून होतं.
६) माणसाला जगण्यासाठी जसे अनेक घटक आवश्यक असतात तसेच जगातील प्रत्येक सजीवाला काही घटक गरजेचे असतात.
७) अल्बर्ट आईन्स्टाईन नावाच्या एका प्रसिद्ध शास्त्रज्ञाने त्याच्या संशोधनातून असं सांगितलं की जोपर्यंत 'मधमाशी' या जगात अस्तित्वात आहे तोपर्यंत या जगाचा अंत होऊ शकत नाही. कारण मधमाशी या जगातील सर्व प्रकारच्या झाडां-फुलांचं 'परागीकरण' करण्याचं काम करते. त्यामुळ झाडं फळा-फुलांनी बहरतात अन् याच सदाबहार झाडांमुळे आपणास अन्न, प्राणवायू अशा अनेक जीवनावश्यक गोष्टी मिळण्यास मदत होते. अर्थात ही एक अखंड साखळी आहे जी एकमेकांवर अवलंबून आहे.
८) इतकेच काय तर नागरिक शास्त्रात देखील आपल्याला असे शिकवले जाते की, कोणताही एकटादेश स्वतंत्ररित्या बलवान असु शकत नाही, एका देशाला दुसऱ्या देशावर अवलंबून राहावेच लागते त्याशिवाय तो देश प्रगती करू शकत नाही.
९) आई बाळाला जन्म देते म्हणून एक जीव निर्माण होतो आणि तो जीव निर्माण होतो म्हणूनच ती स्त्री 'आई' पदाला पात्र ठरते.
आतापर्यंतच्या या सर्व उदाहरणांमधून आपण निसर्गातील काही गोष्टींच्या आधारे कोण, कसं आणि किती तीव्रतेने अवलंबून असतं हे पाहिलं.. अशी निसर्गात अगणित उदाहरणं आहेत जी तुम्हीही अनुभवलेली असतील. परंतु 'मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे' हे आपण नेहमीच सगळीकडे ऐकतो मात्र मनुष्य हा एक 'प्राणी' आहे हेच आधी माणसाला मान्य आहे का? हा माझा प्रश्न आहे. माणूसही या निसर्गाचाच एक घटक आहे असं त्याला खरंच वाटतं का? की तो स्वतःला या निसर्गापेक्षा वेगळं काहीतरी समजतो? जर समजत असेल तर इथे धोका संभवतो!
माणूस हा निसर्गाचा एक अविभाज्य घटक आहे आणि निसर्गाचे स्वतःचे असे काही नियम आहेत आणि मनुष्य सोडता या जगातील इतर सर्व सजीव ते नियम अचूकपणे पाळतात! मनुष्याने बुद्धीच्या नावाखाली या नैसर्गिक नियमांचा पार कचरा करून टाकला आणि स्वतःच्या सुंदर आणि रम्य आयुष्याची वाट लावून टाकली. मनुष्याला बुद्धी दिली म्हणजे त्याने निसर्गाचे नियम तोडावेत म्हणून नाही, तर त्याला बुद्धीच्या जोरावर हे जग अजुन सुंदर करता यावं यासाठी!
माणूस स्वतःला असं समजू लागला की जणू काही तो सर्वशक्तिशाली आणि सर्वसंपन्न आहे; आणि मग त्यातून द्वेष, राग, लोभ, विचित्र वृत्ती, स्पर्धा, मोठेपणा, गर्व या संज्ञांचा जन्म झाला.
माणसांनो! एक लक्षात ठेवा, निसर्गाला तुम्ही जे देता तेच तो तुम्हाला अनेक पटीने परत देतो. त्यामुळे तुम्ही त्याला 'काय' देता हे फार महत्त्वाचं आहे. निसर्ग कधीच भेदभाव करीत नाही, आज तो गरिबाला जे 'ऊन' देतो तेच श्रीमंतालाही देतं! एखादं झाड जी सावली समाजसेवकाला देतो तीच सावली गुंड प्रवृत्तीच्या माणसाला ही देतं!
एखादे झाड मी पक्षाच्या विष्टेतून जन्म घेतला याचा कमीपणा वाटून घेत नाही आणि तसेच कोणताही पक्षी माझ्यामुळेच आज हे वृक्ष बनले असा अहंकार बाळगत नाहीत. अगदी तसंच एखाद्या माणसाला कुणाची तरी मदत घ्यावी लागली किंवा त्यावर अवलंबून रहावं लागलं तर त्यात कमीपणा वाटून घेण्याचं काहीही कारण नाही; किंवा एखाद्या माणसाने कुणाला मदत केली किंवा कुणी तुमच्यावर अवलंबून आहे म्हणून मोठेपणा वाटून घेण्याचं ही काहीच कारण नाही.
हा विषय जितका उलगडू तितका उलगडला जाईल, त्याची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. निसर्ग हा परस्परावलंबनाचे तत्व पाळतो. हे दाखवून देणारी अगणित उदाहरणं पहायला मिळतील.
गरजेचं इतकंच आहे की हे माणसानं वेळीच ओळखून परस्परावलंबनाचा लवकरात लवकर स्वीकार करुन स्वतःच आयुष्य सुखकर बनवावं, आपला आनंद द्विगुणीत करावा! या सृष्टीत असंख्य गोष्टी नकळत त्यांचं काम करीत असतात आणि त्यांचं आयुष्य जगत असतात. एकदा का तुम्हाला परस्परावलंबन गवसलं तर तुम्हाला हे जाणवेल की यत्र तत्र सर्वत्र ही परस्परांवर अवलंबून असण्याची कधीही न संपणारी प्रक्रिया सतत सुरू असते. आपण केवळ त्याचा एक भाग आहोत. त्यामुळे गर्व, माज, क्रोध, संताप इ. बाळगणाऱ्या समस्त मानव जातीने हे लक्षात घ्यावं, की हे सर्व व्यर्थ आहे! दुसऱ्याला आनंदी करण्याचा प्रयत्न केलात की स्वतः आपोआप आनंदी व्हाल!
शेवटी इतकंच म्हणेन,
एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ ||
©️ प्रांजल अनिल उदावंत.
संपर्क: 8788710150