कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आलेल्या लॉक डाऊनमूळे आपण सगळे आपापल्या घरात बंदिस्त झालो. आपला वेळ कसा घालवायचा हा मोठा प्रश्न सर्वांच्या समोर असताना ऑनलाईन कंबाईनने खेळांचा पर्याय लोकप्रिय होणं स्वाभाविकच होतं. पाहाता पाहाता पबजी, कॅरम,रमी आणि लुडो हे खेळ क्रिकेटपेक्षाही अधिक लोकप्रिय झाले. यातला लुडो हा खेळ मला खूपच आवडला. कोणत्याही वयाचा माणूस हा खेळ खेळून मनमुराद आनंद लुटू शकतो. मी स्वतः या लॉक डाऊनमध्ये हा खेळ माझे आई, वडील, भाऊ, मित्र, मैत्रिणी, भावंडं अशा अनेकांसोबत खेळली आहे व अजुनही खेळत आहे. काल -परवा हा खेळ खेळता खेळता माझ्या मनात काही विचार घेर घालू लागले. मीही त्या विचारांसोबत थोडासा फेर धरला आणि माझ्या मनात विचारांचा नवाच खेळ सुरु झाला. माझ्या मनातील विचारांच्या खेळाचा परिपाक म्हणजे हा लेख आहे.

लुडो या खेळाचा आपल्या जगण्याशी खूपच जवळचा संबंध आहे असं म्हणण्याचं धाडस किंवा तेवढा आत्मविश्वास मला या वैचारिक खेळानं मिळवून दिला. त्यातून मला मोठी प्रेरणा मिळाली. तुम्हालाही तशी प्रेरणा मिळू शकते या हेतूनं मी ही मांडणी करीत आहे.

मूळ मुद्द्याकडे जाण्यासाठी आपणास लुडो खेळाचे नियम समजून घेणे आवश्यक आहे. अर्थात आपणापैकी बहुतेकांना ते नियम माहित असतीलच. ज्यांना माहित नाहीत त्यांच्यासाठी हे नियम संक्षिप्त रुपात पुढीलप्रमाणे -

१) सहाचे दान पडल्याशिवाय खेळाडूला त्याचा खेळ सुरु करता येत नाही. म्हणजे त्यालाआपल्या घरातून बाहेर पडता येत नाही.

२) खेळाच्या प्रवासात एखाद्या प्रतिस्पर्धी खेळाडूची सोंगटी तुम्ही बाद केली तर अशा वेळी तुम्हाला खेळण्याची आणखी एक संधी मिळते.

३) खेळताना आपणास सहाचे दान मिळाले तर पुन्हा खेळण्याची आणखी एक संधी मिळते.

४) वाटचालीतले अडथळे दूर करीत कधी सावधपणे तर कधी रिस्क उचलून खेळत खेळत प्रतिस्पर्धी खेळाडूच्या आधी आपल्या चारही सोंगट्या मध्यवर्ती घरात सुरक्षित पोहोचल्या तर आपण जिंकतो.

मित्रहो,लुडो खेळाचे हे नियम आपल्या रोजच्या जगण्याला तंतोतंत जुळतात, लागू पडतात. कसे ते आपण आता बघुया..

१) खेळाच्या पहिल्या नियमानुसार आपल्याला खेळ सुरु करण्यासाठी सहाचं दान मिळणं आवश्यक असतं. तसंच जीवन जगताना आपण जगाच्या व्यवहारी जगरहाटीत पाऊल टाकण्यापूर्ण वय वर्षे १८ पूर्ण व्हायला हवे असते. म्हणजे कायद्यानं आपण सज्ञान असायला हवं.

२) सोंगटी खेळायला आपण घराबाहेर पडल्यावर सुद्धा आपल्याला चांगलं, हवं तसं दान मिळत गेलं तर आपल्या सोंगटीचा मध्यवर्ती घराकडचा प्रवास वेगाने होतो.

म्हणजेच आपण १८ वर्ष पूर्ण झाल्यावर जगाच्या बाजारात उभं राहील्यावर आपला परफॉर्मन्स नेहमी चांगला, आपल्याला हवा तसा होणं आवश्यक आहे. तरच आपला आपल्या ध्येयाकडील किंवा स्वप्नाच्या दिशेनं करायचा प्रवास आपण वेगानं करु शकतो.

३)लूडोच्या खेळात आपल्या सोंगटीचा प्रवास अतिशय सावधपणे आणि प्रसंगी धोका पत्करुन करावा लागतो.

अगदी तसंच आयुष्याच्या वळणदार वाटेवरच्या प्रवासात अनेकदा प्रतिस्पर्धकाच्या डोक्यावर पाय ठेवून म्हणजे चांगल्या परफॉर्मन्सच्या आधाराने मात करुनच पुढे जावं लागतं. अर्थात जीवनाच्या वाटेवरसुद्धा खेळातल्या सारखी काही सुरक्षित ठिकाणंही असतात. त्यांचा योग्य वापर करीत स्वतःला सुरक्षित ठेवावं लागतं.

खेळातल्या नियमांसारखंच आपल्या वैयक्तिक जगण्यातही नियम पाळूनच आपल्या स्वप्नांचा झेंडा थाटात फडकवायचा असतो.

थोडक्यात काय तर आपल्या जीवनात आपली ध्येयं, आपली स्वप्नं साकार करण्यासाठी आपल्याला काही संधी नक्कीच उपलब्ध असतात. त्याच वेळी आपल्या वाटेवर अडचणींचे काटे किंवा अडथळेही असतात. आपल्याला हवं तसं दान मिळेपर्यंत न थकता आपण अखेरपर्यंत खेळत राहायचं आणि आपल्या अंतिम गंतव्या पर्यंत पोहोचायचं असतं !

अर्थात या खेळाच्या प्रवासात दरवेळी प्रतिस्पर्धकाला बाजूला करण्याची किंवा त्याच्या डोक्यावर पाय देऊन पुढं जाण्यापेक्षा बुद्धिमत्ता, चातुर्य, भावना, इच्छा, संयम यांच्या आधारे परिस्थितीचे उत्तम भान राखूनही पुढे निघून जाता येतं. अशा रितीनं केलेली वाटचाल आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत वेगानं पोहोचण्यासाठी उपयोगी ठरते. दरवेळी समोरच्याचा घात करणं कधीतरी आपल्यासाठीही घातक ठरु शकते याचा विसर पडतो पडणं उपयोगी ठरणार नाही.

आयुष्यात आपली स्वप्नं साकार करण्यासाठी काही संधी अन् काही अडचणी अशा दोन्हींचा लेख आधीच तयार असतो..या पृथ्वीवर आपण फक्त ठोकळा फिरवायचा अन् नियतीच्या भरवशावर, नशिबाच्या जोरावर स्वप्नपूर्ती करण्याचा उत्साहाने प्रयत्न करायचा..तो ही शेवटपर्यंत!

प्रत्येक वेळी आपणास कम्फर्ट झोनमध्ये राहाता येत नाही. कधी कधी पुढं जाण्यासाठी थोडा -फार धोकाही उचलावा लागतो. ही आणखी एक महत्वाची शिकवण या खेळातून मिळते ती अशी की,

खेळणाऱ्या खेळाडूच्या खेळामधून त्याची वृत्ती व प्रवृत्ती कळते. त्यांची वृत्ती व प्रवृत्ती चांगली असेल, तुमच्याकडे पुरेसा संयम असेल, तुम्ही धोका ओळखून सावध पावलं उचलू शकला किंवा धोका स्वीकारु शकला तर तुम्ही या खेळात आणि रोजच्या जगण्याच्या खेळातही नक्कीच जिंकणार आहात !

प्रांजल अनिल उदावंत

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel