गाढ झोपेतून श्रीकांत जागा झाला तो बाहेर बागेत कोणीतरी झाडत असल्याच्या आवाजाने. त्याने उठून अंगाला आळोखे पिळोखे दिले. बेडवरुन उठताने त्याला आपल्या बेडवर पडलेले त्याचे पांघरून दिसले. त्याने पांघरून हातात घेत आठवायचा प्रयत्न केला कि आपण हे पांघरून कपाटातून कधी काढले. पण त्याला काही आठवत नव्हते. कदाचित कालच्या ड्रिंक्सचा परिणाम असावा असे त्याला वाटले. त्याने पांघरुणाची घडी घालून ते पुन्हा कपाटात ठेवले आणि अंगावर टी शर्ट अडकवत तो बाहेरचा दरवाजा उघडून व्हरांड्यात आला. बागेत तर कोणीही नव्हते. मनाशी आश्चर्य करत त्याने संपूर्ण बंगल्याला एक चक्कर मारली. कोणीही दिसले नाही पण बागेतला पालापाचोळा मात्र स्वच्छ केलेला दिसत होता. मघाशी आपण ऐकला तो आवाज झाडलोट करण्याचाच होता हेही त्याला खात्रीने वाटत होते. पण हे केले कोणी हे मात्र कळत नव्हते. कदाचित अल्ताफभाईंनीच बागेची साफसफाई करण्यासाठी कोणी माणूस ठेवलेला असेल आणि आपण उठेपर्यंत तो सफाई उरकून निघून गेला असेल अशी मनाची समजूत घालत तो पुन्हा आत आला. एवढ्या वेळात त्याचे घड्याळाकडे लक्षच गेले नव्हते. चांगले आठ वाजले होते. मग मात्र तो घाईघाईने बाथरूम मध्ये शिरला आणि भराभरा आवरत बँकेत जायला तयार झाला. हॉलमध्ये येताच मात्र त्याच्या लक्षात ना आलेली एक गोष्ट दिसली. आपण रात्री झोपायला जाताने सगळे साहित्य, तसेच टेबलवर सोडल्याचे त्याला पक्के आठवत होते. पण आता मात्र ते सगळे आवरून ठेवलेले होते. सगळे खरकटे डबे गायब होते. त्याची ब्लेंडर्सची बाटली व्यवस्थित बंद करून एका कडेला ठेवलेली होती. आतामात्र श्रीकांतला विचार करावासा वाटला. आपल्याव्यतिरिक्त या घरात कोणीतरी वावरतंय अशी शंका यायला लागली, पण तेवढ्यात पुन्हा त्याचे घड्याळाकडे लक्ष गेले आणि 'बघू संध्याकाळी' असे मनाला बजावत आणि आपली पाठीवरची सॅक हातात घेत तो बाहेर पडला. बाहेर येऊन त्याने कुलूप लावले आणि काय वाटले कोणास ठाऊक, पण संपूर्ण बंगल्याला एक चक्कर मारत आत जायला दुसरी कुठली जागा आहे का हे बघितले. किचनच्या बाहेर वॉशिंग प्लेस मध्ये उघडणारा एक दरवाजा होता. तो त्याने आतून बंद असल्याचे पहिले होते. त्याने तो दरवाजा बाहेरून ढकलून पाहीला पण तो आतूनच घट्ट बंद होता. मग मात्र वेळ न दवडता गेट बंद करून घेत तो रस्त्याला लागला. रस्त्यावर आल्यावर मात्र त्याला जाणवले कि आपल्याला वाहनाची काहीतरी सोय करावी लागेल. रोज हे चौकापर्यंत पायी जाणे शक्य नाही. तशी त्याची जुनी सँट्रो पुण्यात होती. आईबाबांना त्यांची वेगळी गाडी असल्याने सँट्रो तो घेऊन येऊ शकत होता. पण किमान हा आठवडा तरी त्याला काहीतरी ऍडजेस्टमेंट करावी लागणार होती. अल्ताफभाई शी बोलून त्यांनाच तात्पुरती गाडीची व्यवस्था करायला सांगायचे असे त्याने मनाशी ठरवले.

नरवीर तानाजी चौकात यायलाच त्याला १० मिनिटे लागली. कोकण-किनारा मध्ये त्याने गरमागरम पोह्यांचा नाश्ता केला. काउंटरवर २२-२३ वर्षांचा एक तरुण बसलेला होता. बिल देताने त्याने काऊंटरवरील त्या तरुणाला विचारले,

'काल इथे होते, ते मालक कुठे आहेत?

''ते माझे वडील, दुपारनंतर असतात इथे, सकाळी मी असतो. काही प्रॉब्लेम आहे का साहेब? तरुणाने आर्जवाने विचारले.  

''नाही हो, सहज विचारले' असे म्ह्नत श्रीकांत बाहेर पडला. बाहेर येऊन त्याने रिक्षा पकडली आणि बँक गाठली. बँक उघडलेली दिसत होती. पण अजून ग्राहकांसाठी प्रवेश सुरु झालेला नव्हता त्यामुळे दारातील शिपायाने श्रीकांतला आडवले.

'मी श्रीकांत साठे, इथे ब्रँच मॅनेजर म्हणून आलोयं' श्रीकांतने त्याला सांगितले.

शिपायाने त्याला सलाम ठोकत अदबीने दरवाजा उघडला आणि म्हणाला

'माफी करा साहेब, मी ओळखले नाही तुम्हाला' त्याचा ओशाळलेला चेहरा बघून श्रीकांतच म्हणाला

'अरे काही हरकत नाही, तू तुझे काम अगदी योग्य केलंस. मी पहिल्यांदाच आलोय तर तू कसा ओळखणार?  

असा शिपायाला दिलासा देत श्रीकांत आत आला. बरीचशी स्टाफची माणसे आलेली दिसत होती. सर्वांना 'गुड मॉर्निंग' म्हणत तो ब्रँच मॅनेजर असे लिहिलेल्या केबिन मध्ये गेला. एकदा त्याने केबिन व्यवस्थित बघून घेतली आणि मनाशी समाधान मानत समोरचा कॉम्प्युटर सुरु केला. पण पासवर्ड ला मात्र अडचण आली. बेल दाबून श्रीकांत शिपायाला बोलावणार तेवढ्यात एक गृहस्थ दरवाजा ढकलून ''आत येऊ का सर? असे म्हणाले. श्रीकांतने त्यांना आत बोलावले, त्यांच्या मागोमाग सगळाच स्टाफ आत आला. त्यातील एकाच्या हातात मोठा बुके होता. सर्वांनी श्रीकांतचे स्वागत करत त्याला बुके दिला आणि सर्वांच्या ओळखी करून दिल्या. श्रीकांतनेही सर्वांशी हसत बोलत आपल्या स्वभावाची ओळख करून दिली. सगळेजण बाहेर पडत असतानेच श्रीकांत म्हणाला 'अहो गोखले, जरा याचा पासवर्ड सांगा'...... गोखल्यांनी सांगण्याऐवजी एका कागदावर तो लिहिला आणि रोज त्यात कसे बदल होतात त्याचा क्रम सांगितला. त्यांचे आभार मानत श्रीकांत कामाला लागला. नंतर श्रीकांत कामात एवढा गढून गेला कि तो बंगलाही विसरला आणि अल्ताफभाईंना फोन करण्याचंही विसरून गेला. पण साडेदहाला अल्ताफभाईंनीच फोन केला. ''नमस्कार साठे साहेब, मी अल्ताफ. कशी काय गेली बंगल्यातील पहिली रात्र?

त्यांच्या बोलण्याचा रोख ओळखत  श्रीकांत म्हणाला

''अगदी मस्त! काहीही अडचण नाही. माझ्यासाठी एक फक्त कराल का? चार-पाच दिवसांसाठी एखादी टू व्हीलर मिळतेय का बघा भाड्याने. जायला यायला अडचण होतेय. रिक्षावाले चौकाच्या पुढे येत नाहीत. असे किनारा हॉटेलवाले काणे म्हणाले''

''बरोबर, त्यांना व्यवस्थित कल्पना असेल. पण तुम्ही काही काळजी करू नका, माझ्याकडेच एक्सट्रा गाडी आहे मुलाची. तीच देतो तुम्हाला काही दिवस'....  अल्ताफने सांगितले.

'अरे मग काय मस्तच, काम झाले. शनिवार रविवार पुण्याला गेलो कि माझी सँट्रो घेऊनच येतो' श्रीकांत म्हणाला.

''अल्ताफभाई तुमचे खरंच खूप खूप आभार बरं का? आणि तेवढा तो सकाळचा झाडलोट करणारा माणूस तुम्ही ठेवलाय ना त्याला मला भेटून जायला सांगा.'

श्रीकांत असे म्हणल्यावर काही काळ फोनवर शांतता पसरली. श्रीकांतने दोन तीन वेळा हॅलो हॅलो केल्यावर अल्ताफभाईंचा आवाज आला.

''श्रीकांत साहेब, पण मी काय म्हणतोय, तुम्ही गावातीलच जागा बघितली तर बरे होईल, जायचा यायलाही त्रास होणार नाही' काल काहीतरी घडलंय याचा अंदाज बांधत अल्ताफभाई म्हणाले.    

''पण का, कशासाठी?एवढी चांगली जागा का सोडायची? मला तर आवडलाय बंगला' श्रीकांत ठामपणे म्हणाला.

''साहेब, स्पष्ट सांगतो. मी कुठलाही माणूस सफाईला ठेवलेला नाही. आणि तो बंगलाही वर्ष-दोन वर्ष बंद होता. काल एवढा चकाचक बघितल्यावर मी पण हादरून गेलो होतो.' अखेर अल्ताफने सरळ सांगून टाकले.

त्यांचे ऐकून श्रीकांतही जरा विचारात पडला आणि काल रात्रींचे छोटे छोटे प्रसंग त्याला आठवले. पण तरीही ठाम निर्धाराने तो म्हणाला 'भाई, तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका. काय असेल ते मी बघतो, तुम्ही फक्त गाडीची व्यवस्था बघा. जमल्यास आजच आणून द्या'....... असे म्हणत त्याने फोन बंद केला. पण कामात म्हणावे असे लक्ष काही लागत नव्हते. अर्थात तो काही घाबरला नव्हता, पण मनात एक कुतूहल जागे झाले होते कि नक्की काय असेल, खरंच भूत असेल?

लंच टाइम झाल्यानंतर त्याने शिपायाला सांगून कँटिनमधून जेवण मागवले आणि जेवण उरकून पुन्हा कामात लक्ष गुंतवले. थोड्या वेळाने अल्ताफभाई स्वतःच दरवाजा ढकलून आत आले. नमस्कार चमत्कार झाल्यावर अल्ताफभाईंनी परत एकदा श्रीकांतचे मन वळवण्याचा प्रयत्न केला पण श्रीकांत काही बधला नाही. मग त्यांनी खिशातून स्प्लेंडरची चावी काढून टेबलवर ठेवली. आणि म्हणाले 'बाहेर स्प्लेंडर ३३६६ उभी आहे. येतानेच पेट्रोल टाकलंय, हवे तेवढे दिवस वापरा.' श्रीकांतने पाकीट काढून म्हटले ''भाई तुमचे पुन्हा एकदा आभार. मला अगदी परफेक्ट सर्व्हिस देताय तुम्ही. बरं पेट्रोलचे आणि गाडी भाड्याचे किती पैसे द्यायचे?

'राहू द्या हो श्रीकांत साहेब, एवढेशे काय पैसे घ्यायचे? आणि तुम्ही परके थोडेच आहात? असे हसून म्हणत अल्ताफभाई बाहेर पडले.

पाच वाजता श्रीकांतने कॉम्प्युटर बंद केला आणि सॅक घेऊन बाहेर पडला. बाकीचा स्टाफही निघण्याच्या तयारीतच होता. सगळ्यांना बाय करत श्रीकांत बाहेर पडणार तेवढ्यात गोखलेंनी त्याला थांबवले.

'साहेब सकाळी विचारायचेच राहून गेले पण अल्ताफ येऊन गेला तेंव्हाच कळले कि तुम्ही राहण्याची सोय केलेली दिसते. कुठे राहिला आहात?

'कोंढवा रोडला 'अनुग्रह' बंगला आहे तोच भाड्याने घेतलाय' श्रीकांत म्हणाला.

तसे गोखल्यानी चमकून त्याच्याकडे बघितलं.

''साहेब, माफ करा पण गावातही तुम्हाला जागा मिळेल. त्या बंगल्याबद्दल फार चांगले बोलले जात नाही'

गोखले काळजीने म्हणाले. पण यावर श्रीकांत हसत म्हणाला ,

'असे काही नसते हो, मला बंगला फार आवडलाय. अगदी मस्त, निवांत आहे आणि सर्व सोयीसुविधाही आहेत तिथे' काही काळजी करू नका'

असे म्हणत श्रीकांत बाहेर पडला. बाहेर येऊन त्याने बघितले तर ३३६६ नंबरची स्प्लेंडर समोरच उभी होती. सॅक पाठीवर लावत त्याने गाडी स्टार्ट करून गेटच्या बाहेर काढली व घराकडे निघाला. श्रीकांत जाताच स्टाफ मधील लोक आपापसात चर्चा करत, साहेबांच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करू लागले.

श्रीकांत नरवीर तानाजी चौकात आला आणि गाडी लावत 'कोकण-किनारा' हॉटेलमध्ये शिरला. काउंटरवर मालक 'काणे' बसलेले दिसले. त्यांनी श्रीकांतचे हसून स्वागत केलं आणि पोऱ्याला हाक मारत साहेबांना काय हवे ते बघ म्हणून सांगितले. श्रीकांतने फक्त चहा घेतला आणि काउंटरवर आला. ''काय साहेब, कसा गेला कालचा आणि आजचा दिवस? काही अडचण नाही ना? असे आपुलकीने विचारले.

'एकदम छान काका, काही प्रॉब्लेम नाही. जायची यायचीही सोय झालीये. आठ-साडेआठला येतो जेवायला' श्रीकांतने त्यांना काका म्हटलेले काणेंना आवडले.

'काळजी घ्या साहेब, काही लागल्यास हक्काने सांगा' असे म्हणत जाता जाता काणेंनी आपुलकी दाखवली.

श्रीकांत बंगल्याजवळ आला. गेट उघडून गाडी आत घेतली. सॅक मधून चावी काढून दाराला लावली पण दार न उघडता तो पुन्हा व्हरांड्यातून खाली आला आणि बागेतून चालत बंगल्याभोवती चक्कर मारली. बाग फार मोठी नसली तरी अगदी व्यवस्थित राखलेली दिसत होती. पण तरीही काहीतरी खटकत होते. विचार केल्यावर त्याच्या लक्षात आले कि कालपासून सगळ्या बंगल्यात मोगऱ्याचा सुंदर वास येतोय पण बागेत मात्र मोगऱ्याचे झाड कुठंही नाही. त्याने गेट उघडून बाहेर येत आजूबाजूलाही बघितले. ही बाग सोडली तर मुख्य रस्त्यापर्यंत कुठेलेही झाड नव्हते. आश्चर्य करत त्याने दरवाजा उघडला आणि काही क्षण दारातच उभे राहून अंदाज घेतला. पण आत एकदम शान्तता होती. मोगऱ्याचा वास मात्र आत्ताच स्प्रे मारल्यासारखा येत होता. आत आला तर किचनच्या दरवाजावरचा पडदा अगदी त्याच्यासमोर हलला जसे काही कुणीतरी पडदा सरकवून आत गेले किंवा बाहेर आले असावे. त्याने सॅक समोरच्या सोफ्यावर टाकली आणि सर्व घर फिरून बघितले. हॉल मधूनच एक जिना वर जात होता, त्या जिन्याने तो वर आला. वर एक अटॅचड टॉयलेटसह बेडरूम होते. समोरचा दरवाजा बाहेर टेरेस वर उघडत होता. टेरेसवर उभे राहून त्याने सर्वदूर नज़र फिरवली. दक्षिणेकडे शहर दिसत होते, पश्चिमेला डोंगरांची रांग होती. उत्तरेलाही दूरवर डोंगर होते आणि त्याच्या पोटाशी एक छोटीशी वस्ती दिसत होती. कालपासून घडणाऱ्या छोट्या छोट्या घटना सोडल्या तर तो संपूर्ण बंगला अगदी आदर्श होता.

श्रीकांत पुन्हा खाली आला. सोफ्यावरील सॅक उचलून बेडरूमच्या कपाटात ठेवली आणि कपडे बदलत बाथरूममध्ये घुसला. हातपाय धुऊन त्याने सकाळी बारवर वाळत टाकलेला टॉवेल घेण्यासाठी हात वर केला आणि थबकला. बारवर ना त्याचा टॉवेल होता ना बनियान-अंडरवेअर. आता मात्र त्याच्या मनात अनेक शंका उत्पन्न होऊ लागल्या. तसेच ओल्या अंगाने बाहेर येत त्याने किचन शेजारचा बाहेर वॉशिंग प्लेस मध्ये जाणारा दरवाजा उघडला आणि जागेवर स्तब्ध उभा राहिला. तिथल्या दोरीवर त्याचे कपडे वाळत होते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे टॉवेलसकट ते व्यवस्थित धुऊन टाकलेले होते. त्याने टॉवेल काढून घेतला आणि हातपाय पुसून परत तिथेच वाळत टाकला व तो हॉल मध्ये आला.

समोर सोफ्यावर बसत त्याने समोर किचनकडे बघत खणखणीत आवाजात हाक मारली.

'कोण आहे आत, असा लपाछपीचा खेळ खेळण्यापेक्षा माझ्या समोर या.'

पण काहीही हालचाल दिसली नाही.

'हे बघा, माझ्या अपरोक्ष तुम्ही इथे राहत आहात हे मला कळलंय. मला घाबरवून मी इथून निघून जाईल असे तुम्हाला वाटत असेल तर ते होणार नाही. मी कशालाही भीत नाही' श्रीकांत चांगलाच दरडावून बोलला.

एवढे बोलूनही काहीच आवाज नाही. श्रीकांतला कळेना कि जे घडतंय ते खरंच आहे कि आपल्यालाच भास होताहेत. त्याने थोडावेळ वाट पाहून टीव्ही सुरु केला आणि त्यात रमून गेला. एक कान मात्र कुठे काही आवाज येतात का हे ऐकण्यात गुंतलेला होता. एव्हाना बाहेर अंधार दाटून आला होता. थोड्या वेळाने त्याने कालची ब्लेंडर्सची बाटली आणि ग्लास काढला. किचनमधल्या फ्रिजमधून एक थंड पाण्याची बाटली आणली. त्याने एक पेग भरला आणि किचनकडे बघत 'चिअर्स' असे खणखणीत आवाजात म्हणत ग्लास ओठाला लावला. दोन घोट घेतल्यावर त्याला वाटले कि काहीतरी खायला आणायला पाहिजे होते. फ्रिजमध्ये पाण्याच्या बाटल्यांशिवाय काही नाही हे त्याने मघाशीच बघितले होते. आणि तेवढ्यात किचनमधून कालसारखाच पातेले पडल्याचा आवाज आला. धावतपळत तो किचन मध्ये आला. कालच्यासारखेच तेच पातेले पडलेले होते. त्याने ते उचलून जागेवर ठेवले आणि परत येताने त्याचे लक्ष डायनिंग टेबलवर गेले. आणि त्याला धक्काच बसला. त्या टेबलवर दोन डिश ठेवलेल्या होत्या आणि त्यात खारवलेले काजू आणि वेफर्स होते. हे पदार्थ काही क्षणापुर्वी इथे नव्हते हे त्याला पक्के ठाऊक होते. आत्ताच कोणीतरी ते टेबलवर ठेवले होते आणि हेही त्याच्या लक्षात आले कि आताचे पातेले पडणे हे त्याला घाबरवण्यासाठी नसून किचनमध्ये बोलावण्यासाठीच होते. त्याने अगदी बारकाईने किचनच्या सर्व भिंती तपासल्या. कपाट उघडून आत बघितले. बाहेरचा दरवाजा बंद होता तोही उघडून बाहेर कोणी आहे का ते बघितले, पण कुठेही कोणी नव्हते. त्या डिश घेऊन तो पुन्हा सोफ्यावर येऊन बसला. पण मनात मात्र विचारांची मालिका सुरु झाली होती. भुताखेतांवर त्याचा विश्वास नव्हता. त्यामुळे इथे जे काही घडतंय ते कोना माणसाचेच काम आहे असे त्याला वाटत होते. पण कसे ते काही कळत नव्हते. मग त्याच्या मनात काल पासूनच्या घटना एक एक करून समोर यायला लागल्या. आणि जसजसा तो विचार करत गेला तसतसे त्याला वाटू लागले कि हे काही मानवी काम नाही. दोन वर्षे मोकळा पडून असलेला बंगला इतका चांगल्या स्वरूपात कसा? अल्ताफभाईने भाडयाने द्यायच्या अगोदर सफाई करून घेतली असेल असे मानले तरी बाहेरची बाग इतकी जिवंत कशी? केबल कनेक्शन, सोलर हिटर या वस्तू चालू अवस्थेतल्या कशा? बिल्कुलही वारा येत नाही तरी पडदा हालतोय, एकच पातेले परत परत खाली कसे पडतेय? आज पहाटे आपल्या अंगावर पांघरून कसे आले? आपले ओले कपडे धुऊन बाहेर कोणी वाळत घातले? आणि तो या निर्णयावर येऊन पोहोचला ''काहीतरी आहे इथे''....................

आज एकच पेग झाल्यावर मात्र त्याने पिणे बंद केले आणि जेवायला जावे म्हणून आवरायला घेतले. रिकाम्या डिश ठेवायला म्हणून तो किचनमध्ये गेला. सगळेकाही ठीकठाक दिसत होते. कपडे आवरून तो हॉलमध्ये आला खरा पण खरेतर एवढ्या लांब जेवायला जायचा त्याला कंटाळा आला. सकाळी जे अंतर त्याने आरामात चालत पार केले तेच त्याला आता गाडी असूनही खूप लांब वाटायला लागले. काहीक्षण श्रीकांत तसाच विचार करत उभा राहिला आणि जाऊ द्या नको जेवायला जायला असे म्हणून तो कपडे बदलायला वळणार तेवढ्यात किचनमधून तोच चिरपरिचित आवाज आला आणि श्रीकांत किचनकडे पळाला. मागच्यावेळेप्रमाणेच कोणीही दिसले नाही पण टेबलवर मात्र बरेच काही ठेवलेलं होतं. कालच्यासारख्याच दोन रोटी, पनीर कढई, जिरा राईस आणि कालचीच आईस्क्रीम सुद्धा. यावेळी मात्र श्रीकांत नखशिखांत हादरला. त्याला अचानक खूप थंडी वाजून आल्यासारखे वाटले. आतापर्यंत जी भीती त्याला कधीच मनाला शिवली नव्हती त्या भीतीने त्याचे अंग अगदी शहारून गेले. त्या पदार्थांना स्पर्श करण्याऐवजी तो धडपडत हॉल मध्ये आला आणि बाटलीतून एक पेग ग्लासात ओतून घेत त्याने ते पेय घशाखाली ढकलले. त्या जळजळीत पेयाने त्याच्या अंगात एकदम उब आली. तो धपकन सोफ्यावर कोसळला आणि आपल्या भरकटलेल्या मनाला ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करू लागला. विचार करता करता तो एका ठाम निर्णयाशी येऊन पोहोचला कि इथे, या घरात आत्म्याचे अस्तित्व आहे. पण जे काही आहे ते त्याला त्रास देणारे नाही तर मदत करणारेच आहे. घाबरून जाण्यासारखे अजून काहीही घडलेले नाही.

श्रीकांत असाच आडवे तिडवे विचार करत असताने अचानक तोच पडदा पुन्हा हलला. ते पाहून श्रीकांत अगदी ताठ होऊन बसला. मोगऱ्याचा वास अगदी जवळून येऊ लागला आणि आपल्या जवळ कोणीतरी उभे असल्याचे त्याला जाणवले. नाही म्हणलं तरी त्याला मनातून पुन्हा भीती वाटलीच. त्याने आजूबाजूला नजर फिरवून बघितले पण काहीही दिसले नाही. आणि अचानक त्याला स्वताच्याच मनातून आवाज आल्यासारखे वाटले 'येताय ना जेवायला? श्रीकांत तटकन उभा राहिला आणि कान देऊन ऐकू लागला कि कोणी बोलतय का? पण नाही सगळी कडे चिडीचूप शांतता होती. त्याच्या डोक्यात मात्र काही आवाज घोंगावत होते. श्रीकांतची आई, किंवा शोभा मावशी स्वयंपाक घरात काम करत असताने जसे आवाज येतात तसे त्याला मनातून ऐकू येत होते. श्रीकांतने एकदा जोरजोरात डोके हलवून ते आवाज बंद करायचा प्रयत्न केले. सोफ्याच्या पाठीवर डोके टेकवून त्याने क्षणभर डोळे मिटून घेतले आणि पुन्हा तो आवाज आला. ''उपाशी झोपणे बरे नाही, चला ना जेवायला' यावेळी त्याला अगदी स्पष्ट आवाज ऐकू आला. आणि मन भरकटण्याऐवजी एकदम शांत झाले. स्वताच्याही नकळत तो उठला आणि किचनकडे चालू लागला. अगदी प्रसन्न मनाने त्याने जेवायला सुरुवात केली. त्याचे मन चेतन अवचेतन पातळीवर दोलायमान होत होतं. जे काही चाललंय ते खरे नाही आणि बरेही नाही हे त्याला कळत होते आणि त्याचवेळी अवचेतन मन मात्र सगळं आनंदाने एन्जॉय करत होते.

सर्व जेवण संपवून त्याने आईस्क्रीमचा कोण हातात घेतला आणि तो चघळत पुन्हा सोफ्यावर येऊन बसला. त्याचे शरीर अतिशय हलके हलके झालेले होते पण त्याचवेळी डोळ्यावर एक सुस्ती पसरत चालली होती. आईस्क्रीमचा कोण त्याने कसाबसा संपवला आणि अगदी जड पावलांनी बेडपर्यंत पोहोचला. अंगावर पांघरुणंही न घेता अंगावरच्या बाहेर जायच्या कपड्यासकट तो गाढ झोपून गेला.

कालच्यासारखीच त्याला आजही जाग आली ती बाहेर बागेत कोणीतरी झाडलोट करत असल्याचा आवाज ऐकून. तो जागा झाल्यानंतर मात्र आवाज लगेच थांबला. श्रीकांत बेडवर उठून बसला आणि त्याला दिसले कि आपण अंगावर व्यवस्थित नाईट ड्रेस घालून झोपलेले होतो. बेडवर बसल्या बसल्याच डोळे बंद करून घेत त्याने कालचे सगळे प्रसंग आठवण्याचा प्रयत्न केला. सगळेकाही स्वच्छ आठवत होते. तो बाहेर जायला निघाल्यापासून चा सगळा प्रसंग त्याच्या डोळ्या  समोरून तरळून गेला. कुणाच्यातरी आवाजाने आपण किचनमध्ये गेलो, जेवलॊ, आईस्क्रीम खाल्ले आणि सुस्ती आली म्हणून कपडे न बदलताच झोपून गेलो हे त्याला पक्के आठवत होते.

श्रीकांत उठून बाहेर आला. बाहेर बागेत चक्कर मारली. काल संध्याकाळी थोडा पालापाचोळा पडलेला दिसला होता पण आतामात्र सर्व स्वच्छ दिसत होते. आणि नुकतेच बागेला पाणी घातलेलंही दिसत होते. ओल्या मातीचा सुगंध येत होता. आत येत श्रीकांतने सर्व घरभर चक्कर मारली. काल रात्रीचा पसारा आवरलेला होता. भांडी स्वच्छ केलेली होती. टेबल रिकामे होते.

अंघोळ करावी म्हणून तो कालचे वाळत घातलेले कपडे आणण्यासाठी किचनचा बाहेरचा दरवाजा उघडून बाहेर आला पण दोरीवर कपडे दिसले नाही. अगदी सवयीचे असल्यासारखा तो बाथरूममध्ये आला तर आतल्या बारवर कपडे आणि टॉवेल व्यवस्थित घडी घालून ठेवलेले त्याला दिसले. मनातल्या मनात हसत त्याने अंघोळ उरकली. ओले कपडे आणि कालचा ड्रेसही तसाच मुद्दाम बाथरूम मध्ये टाकत तो बेडरूम मध्ये आला. कपाटातून दुसरा ड्रेस काढून त्याने तो अंगावर चढवला आणि सॅक घेत बाहेर आला. आता तो बाहेर पडणार तेवढ्यात किचनमध्ये काही आवाज ऐकून तो आत गेला तर टेबलवर गरम गरम पोह्यांची डिश ठेवलेली दिसली. अगदी सरावल्यासारखा त्याने निवांतपणे नाश्ता उरकला आणि बाहेर पडला. बंगल्याचे कुलूप आठवणीने बंद करत त्याने गाडी गेटबाहेर काढली. पुन्हा उतरून गेट बंद केले आणि बँकेत जायला निघाला.

बँकेत अजून कोणी फारसे आलेले नव्हते. शिपायाने त्याला केबिन उघडून दिली आणि मनातला सर्व कोलाहल बंद करत तो कामात गढून गेला. लोक येत होते, जात होते, कामे चालू होती. मधेच अल्ताफभाईंचा फोन आला. त्यांनी कालच्याप्रमाणेच त्याची सारे काही ठीक आहे ना? म्हणून चौकशी केली. अगदी आश्वस्तपणे श्रीकांतने त्यांना सांगितले कि 'सर्व काही ठीक आहे, काहीही काळजी करण्याची गरज नाही'. थोड्यावेळाने त्यालाच वाटले कि आपण किमान अल्ताफभाईंशी कालच्या प्रसंगाबद्दल बोलायला पाहिजे होते का? पण नकोच, आपण जे काही सांगू त्यावर कुणाचा विश्वास तर बसणार नाहीच. उलट काळजीपोटी भलतेच काही समोर यायचे. नकोच ते, आपले गुपित आपल्यापाशीच ठेऊया. थोड्या थोड्या वेळाने गोखले आत येऊन जात होते. त्यांना काहीतरी बोलायचे होते. तिसऱ्यांदा आल्यावर मात्र श्रीकांतनेच त्यांना थांबवले.

'गोखले बसा, काही बोलायचे आहे का?

'माफ करा साहेब, बँकेच्या कामाचे नाही पण कालचे तुमचे 'अनुग्रह' बंगल्यात राहताहात हे ऐकून जरा काळजी वाटतेय' चाचरत गोखले म्हणाले.

''गोखले साहेब, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. तुम्ही माझ्या काळजीपोटीच हे विचारताय हे मला कळतंय. पण खरोखर त्या बंगल्यात असे काहीही नाही. तुम्ही माझी बिलकुल चिंता करू नका' असे श्रीकांतने सांगितले. ते ऐकून गोखले जरा आश्वस्त झाले.

'साहेब, तसे काही नसलं तर चांगलच आहे, पण काही वाटलं तर मला लगेच कळवा, येतो मी' असे म्हणत गोखले आपल्या कामाला गेले. त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा आत डोकावले नाही.

दिवसभराचे काम संपवल्यानंतर मात्र श्रीकांतच्या मनात कालच्या घटना पुन्हा तरळू लागल्या. पण विशेष म्हणजे त्यात त्याला काही चुकीचे वाटण्या ऐवजी कधी एकदा घरी पोहोचतो असे झाले. नरवीर तानाजी चौकात त्याचे लक्ष कोकण-किनारा हॉटेल कडे गेले. त्याला पाहून काणेंनी हात हलवला. पण श्रीकांत आत न जाता तसाच वळून आपल्या रस्त्याला लागला. घरापाशी पोहोचताच आपल्या मनात त्याला एक अनामिक हुरहूर जाणवली. त्याने गाडी आत घेऊन स्टॅण्डवर लावली आणि कुलूप उघडून आत आला. अगदी आठवणीने त्याचे लक्ष किचनच्या दाराकडे गेले, तिथला पडदा हालत होताच. फारसा विचार न करता त्याने बेडरूम गाठले. ऑफिसचे कपडे बदलून तो फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये आला. अपेक्षेप्रमाणे तिथे धुऊन घडी करून ठेवलेला टॉवेल सोडून एकही कपडा नव्हता. फ्रेश होऊन तो हॉल मध्ये आला तर संकेत दिल्याप्रमाणे किचन मधून आवाज आला आणि चहाचा मंद दरवळ जाणवला. त्याने किचन मध्ये प्रवेश केला तर टेबलवर वाफाळता चहा आणि बिस्किटे ठेवलेली दिसली. मनातल्या मनात हसत त्याने चहा घेतला आणि बाहेर येऊन व्हरांड्यातल्या आराम खुर्चीवर बसला. त्याच्या व्हरांड्यातून बाहेरचा मुख्य रस्ता अगदी स्पष्ट दिसत होता. गावाकडून दोन माणसे आणि एक स्त्री येत होते. त्यातील एकाच्या हातात सायकल होती, तिच्या कॅरियर वर काही गाठोडे बांधलेले होते. ती माणसे लांबूनच त्याच्या बंगल्याकडे पाहत पाहत येत होती. बंगल्याला यायला जिथे रस्ता वळतो तिथे ती येऊन थांबली आणि बंगल्याकडे बघत आपापसात बोलू लागली. आल्यापासून पहिल्यांदाच श्रीकांतला कुना माणसाची वर्दळ या भागात जाणवली होती. श्रीकांत पायऱ्या उतरून खाली आला. क्षणभर गेट जवळ उभा राहून त्यांच्याकडे बघू लागला. पण जसा तो गेट उघडून बाहेर रस्त्यावर आला तशी मात्र ती माणसे आणि स्त्रीही अगदी घाईने चालती झाली. श्रीकांतने त्यांना हातही केला पण त्याच्याकडे दुर्लक्ष करत ती जवळ जवळ पळतच तिथून पुढे गेली. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वस्तीवरची ती माणसे असावीत. श्रीकांत पुन्हा आत आला. थोडावेळ पुन्हा व्हरांड्यात बसला पण जरा अंधारून यायला लागल्यावर आत आला आणि सोफ्यावर बसत त्याने टीव्ही सुरु केला. आणि सहज त्याचे लक्ष सोफ्याच्या कडेला असलेल्या साईड टेबलवर गेले. तिथे त्याची आवडती ब्लेंडर्सची बाटली, ग्लास, पाण्याचा जग, खारे काजू आणि ग्रीन सॅलड ठेवलेले दिसले. ते बघून त्याचे विचारचक्र पुन्हा सुरु झाले. जे काही चाललंय ते फारच चांगले चाललंय पण जे काही आहे ते अमानवी आहे हेही त्याला कळत होते. त्यामुळे कसे रियॅक्ट व्हावे हे त्याला ठरवता येत नव्हते. एकही रुपया खर्च न करता त्याला अगदी उत्कृष्ट सेवा घर बसल्या मिळत होती. आपण या मोहात अडकत चाललोय का? असा प्रश्न त्याला पडला.

शेवटी मोहाने विचारांवर विजय मिळवला आणि त्याने साईड टेबल समोर ओढला. एक पेग भरून घेत निवांत घोट घेत, बरोबरीला स्नॅक्स चाखत तो टीव्ही बघू लागला. नॉर्मल कंडिशनला हे म्हणजे 'सुख म्हणजे यापेक्षा दुसरे काय असते' असे म्हणावेसे वाटले असते पण या परिस्थितीत मात्र त्याचे मन बऱ्यावाईटाच्या सीमारेषेवर दोलायमान होत होतं. त्याचा हा राष्ट्रीय कार्यक्रम संपता संपता किचनकडून काही आवाज येऊ लागले. समोरचे टेबल बाजूला सारून तो उठला आणि हात धुऊन किचन मध्ये गेला. अपेक्षिल्या प्रमाणे टेबलवर ताट मांडून ठेवले होते. त्याने भांडी उघडून बघितली तर आज मात्र शुद्ध घरगुती बेत होता. वरण भात, पोळी, बटाट्याची भाजी हे पाहून त्याला अगदी घरच्यासारखं वाटले. आणि त्याला आपल्या आईची तीव्रतेने आठवण झाली. त्याने ताटात वाढून घेतले आणि पहिला घास घेणार तर तो सहज एक प्रयोग म्हणून मोकळ्या किचन कट्ट्याकडे बघत म्हणाला 'तू पण बस ना जेवायला' पण काही प्रतिसाद आला नाही. हातातील बांगड्यांची एक नाजूक किणकिण मात्र ऐकू आल्यासारखे त्याला वाटले. त्याने आजूबाजूला रोखून पाहिले पण इतर कुठेही काहीच हालचाल दिसत नव्हती. थोडावेळ वाट पाहून त्याने जेवायला सुरुवात केली. पहिला घास घेताच त्याला स्पष्टपणे आपल्या आईच्या हातच्या जेवणासारखीच चव लागली. ना जाणो का पण त्याचे डोळे थोडेसे ओले झाले. त्याने शांतपणे जेवण संपवले आणि हात धुवायला उठताने म्हणाला

'आईच्या हातची चव चाखायला दिल्याबद्दल खूप खूप आभार. अन्नपूर्णा सुखी भव.' पुन्हा एकदा तीच बांगड्यांची किणकिण ऐकायला आली पण बाकी काही हालचाल नव्हती. श्रीकांत बाहेर आला आणि हात धुऊन पुन्हा सोफ्यावर येऊन बसला. थोड्यावेळाने तो उठला आणि चप्पल घालत बाहेर निघाला. जाता जाता दरवाज्यात थांबून म्हणाला 'येतेस फिरायला, जरा चक्कर मारून येंऊं' काही प्रतिसाद मिळाला नाही.

बाहेर पडून तो रस्त्याला लागला. दरवाजा त्याने फक्त ओढून घेतला होता. पौर्णिमा जवळ आलेली असावी. बाहेर मस्तपैकी चांदणे पडलेले होते. दूरवर शहराच्या लाईट्स दिसत होत्या. डोंगराच्या बाजूलाही एक दिवा मिणमिणताना दिसत होता. जे काही घडतंय त्या घटनांचा विचार करत तो चांगला लांबपर्यंत चक्कर मारून आला. घरात येऊन त्याने साईड टेबलाकडे आणि नंतर किचनमध्ये नजर टाकली. सर्वकाही आवरून ठेवलेले दिसत होते. जाताने चालू असलेला टीव्ही ही बंद केलेला दिसत होता. त्याने मोकळ्या घरात नजर टाकत 'गुड नाईट' म्हटले आणि बेडरूम मध्ये आला. बेडवर त्याचे गरम पांघरून पायथ्याशी ठेवलेले होते, उशी जागेवर ठेवलेली होती. मनातल्या मनात पसंतीची पावती देत तो बेडवर लवंडला आणि काही क्षणातच अगदी गाढ झोपून गेला.

सकाळी श्रीकांत अगदी प्रसन्न मनाने उठला. कालच्यासारख्याच आजही सर्व गोष्टी जिथल्या तिथे हजर होत्या. एक अद्भुत, अनाकलनीय, अदृश्य शक्ती त्याची मन लावून सेवा करत होती. आंघोळ, नाश्ता करून तो बाहेर जाण्यासाठी तयार झाला. सॅक पाठीला लावत किचनकडे बघत म्हणाला 'येतो मी' अपेक्षेप्रमाणे पडद्याची सळसळ आणि बांगड्यांचा किणकिण आवाज आला. हसतच तो बाहेर पडला. बँकेत पोहोचून कामाला लागला कामाच्या गडबडीत दिवस कसा संपला हेही कळले नाही. परत येताने त्याचे लक्ष 'हॉटेल कोकण किनारा' कडे गेले. काउंटरवर हॉटेलमालक काणे बसलेले होतेच. आज मात्र श्रीकांत दिसताच त्यांनी आवर्जून त्याला हाक मारली. श्रीकांत नाईलाजाने थांबला. आत जाताना 'आता यांना काय सांगायचे' याचा मनाशी विचार करत होता.

'या श्रीकांत साहेब, तुम्ही तर पहिल्या दिवसानंतर गायबच झालात' काणे आदराने तक्रार करत म्हणाले.

'तसे काही नाही काका, पण आमच्या बँकेतील शिपाई मला घरगुती जेवण आणून देतोय, त्यामुळे येणे जमले नाही' श्रीकांतने आपल्या परीने थाप ठोकली.

' मग चांगलंच झाले कि. पण चहा पाण्याला येत जावा कधी मधी' असे म्हणत त्यांनी पोऱ्याला चहा आणायला सांगितले. काणेबुवांचा श्रीकांतशी गप्पा मारण्याचा मूड दिसत होता. पण श्रीकांत मात्र तेवढ्यास तेवढे बोलत होता. एकदाचा चहा आला आणि तो संपवून श्रीकांत उठला. काणेंनी आग्रह केला पण कामाचे निमित्त करून श्रीकांत तिथून सटकला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel