एका आतुर ओढीने तो घरी पोहोचला. कुलूप उघडून आत येत त्याने किचनकडे नजर टाकली. पडद्याने नेहमीप्रमाणे सळसळत त्याच्या आल्याची दखल घेतली. तो आवरण्यासाठी बाथरूम कडे निघाला पण जाता जाता थबकून म्हणाला 'माझा चहा झालाय हॉटेल मध्ये' आवरून तो सोफ्यावर येऊन बसला. थोड्यावेळाने उठून बाहेरून एक लांब चक्कर टाकून आला. येईपर्यंत त्याचा सगळा सरंजाम तयार होता. सवयीचे झाल्यासारखे त्याने पेग भरला. आज तो आल्यापासून पडद्याकडे बघत काहींना काही बोलत होता. घरात आपल्याव्यतिरिक्त दिसत नसले तरी कोणीतरी आहे आणि ते आपले काळजी करणारे आहे हे त्याने मान्य करूनच टाकले होते. जेवण करून तो झोपला आणि सकाळी उठला. आवरून बाहेर पडताने त्याच्या हातात नेहमीच्या सॅक बरोबरच छोटी प्रवाशी बॅगही होती. ती घेऊन तो हॉल मध्ये आला आणि समोर कोणीतरी आहे असे समजूनच म्हणाला.
'आज संध्याकाळी मी परत येणार नाही. दोन दिवसांसाठी पुण्याला जातोय. सोमवारी परत येईन' असे म्हणून तो बाहेर पडणार तर कुणाचा तरी हुंदका ऐकू आला.
'काळजी करू नकोस, नक्की येतो मी सोमवारी' असे आश्वासन देत तो बाहेर पडला. पडद्याने नेहमीप्रमाणे सळसळ करून त्याला निरोप दिला.
बँकेत गेल्यावर त्याने शिपायाला पाठवून संध्याकाळच्या गाडीने पुण्याला जायचे बुकिंग करवून घेतले. काम संपवून निघताने गोखलेंना बोलावून 'मी सोमवारी सुट्टीवर आहे. जरा पुण्याला घरी जाऊन येतो.' असे सांगितले. मोटारसायकल बँकेच्याच आवारात लावून त्याने रिक्षाने एस.टी. स्टॅन्ड गाठले.
पहाटे पहाटे श्रीकांत घरी पोहोचला. त्याच्या आईवडिलांना खूप आनंद झाला. एक आठवडाच झाला असला तरी खूप दिवसांनी आपला मुलगा घरी आलाय असेच लतिकाबाईंना आणि निळकंठरावांनाही वाटत होते. त्यांना खूप बोलायचे होते. पण श्रीकांत म्हणाला
'रात्री गाडीत काही झोप झालेली नाही, मी जरा दोन तास पडतो. मग आपण छान गप्पा मारूयांत'
दोन तास म्हणत त्याने चांगले चार तास झोप काढली. उठल्यावर मात्र तो एकदम फ्रेश झाला होता. लतिकाबाईंच्या हातचे पोहे खात त्यांच्या गप्पा चाललेल्या होत्या.
'खाण्यापिण्याचे काय करतोस? हा प्रश्न आईने विचारताच त्याने ठरवून ठेवल्याप्रमाणे सांगितले.
'अगं आमच्या बँकेच्या शिपायाची बायको खानावळ चालवते. तो रोज घरी डबा आणून देतो. चहापाणी मी स्वतःच घरी करतो' यावर लतिकाबाई प्रेमळपणे हसत म्हणाल्या.
'तू आणि चहा घरी करतोस? इथे होतास तेंव्हा कधी पाण्याचा ग्लास पण भरून घेतला नाहीस'
श्रीकांतने हसून सोडून दिले.
'मी सँट्रो घेऊन जाणार आहे, जरा बघून येतो' असे म्हणत श्रीकांत बाहेर पडला. आईबाबांशी बोलत होता तोपर्यंत त्याचे मन रमले होते पण जसा बाहेर पडला तशा त्याला भरतपूरच्या बंगल्यातील घटना आठवायला लागल्या. तो आवाज, पडद्याची सळसळ, बांगड्यांचे किणकिणने, तो मोगऱ्याचा सुगंध त्याला खुणावू लागला. दुपारी आईच्या हातचे छान जेवण करून तो पुन्हा झोपला. पण डोळ्यापुढून बंगला काही जात नव्हता. त्याच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार तो खरेतर सोमवारी परत जायला निघणार होता, त्याने बँकेत रजाही टाकली होती. पण आता मात्र त्याला कधी एकदा परत जातो असे झाले. शरीराने तो पुण्यात होता खरा पण मन मात्र भरतपूरमध्येच रेंगाळत होते. संध्याकाळ होईतो तो एका ठाम निर्णयाप्रत आला. रात्रीचे जेवण चालू असताने श्रीकांतने विषय काढला.
''बाबा, मी उद्याच निघतोय'
''अरे तू तर म्हणालास ना सोमवारी जाणार म्हणून हे काय अचानक. आलास तर राहा दोन दिवस' लतिकाबाई म्हणाल्या.
'हो रे मीही तेच म्हणतोय, जा ना सोमवारी' निळकंठरावांनीही लतिकाबाईंच्या सुरात सूर मिसळला.
'हो मी म्हणालो होतो पण दुपारी मला आठवले कि हेडऑफीसचे काही लोक मंगळवारी माझ्या ब्रँचला भेट द्यायला येणार आहेत. त्यासाठी मला जरा तयारी करायला पाहिजे. अजून सगळे समजावून घ्यायला वेळच मिळाला नाही' श्रीकांतने सांगितले.
'पण राहिला असतास उद्याच्या दिवस तर आम्हाला बरे वाटले असते' लतिकाबाईंनी जरा नाराजीनेच म्हटले.
'अगं आई, मी १५ दिवसांनी परत येईल ना, पण उद्या जाणे महत्वाचे आहे प्लिज' श्रीकांतने आईची समजूत घालायचा प्रयत्न केला.
'जाऊ दे ग त्याला, नवीनच रुजू झालाय, कामाचा व्याप असेल. बरं कधी निघणारा आहेस? निळकंठरावांनी विचारले.
'सकाळी लवकरच निघेन, गाडी घेऊन जातोय आणि घाट रस्ते आहेत, लवकर पोहोचलेले बरं' श्रीकांत म्हणाला.
लतिकाबाईंना काही हा निर्णय पसंत नव्हता पण श्रीकांतचा स्वभाव त्यांना माहित होता. एकदा त्याने ठरवले म्हणजे त्यात काही बदल होणार नाही. जेवणे होताच त्यांनी टेबल आवरायला मावशींना हाक मारली. आपण आईबाबांना नाराज करतोय हे श्रीकांतला कळत होते पण भरतपूरची ओढ त्याला असे करायला भाग पाडत होती.
श्रीकांतला स्वस्थ झोप अशी लागलीच नाही. पहाटे पहाटे त्याला जाग आली. घड्याळाकडे लक्ष टाकत त्याने अंगावरचे पांघरून झुगारून दिले आणि बाथरूम गाठले. त्याच्या आवाजाने लतिकाबाईंनाही जाग आली. त्यांनी श्रीकांतला आवाज देत 'खायला काही करू का? म्हणून विचारले. बाथरूममधूनच श्रीकांत म्हणाला
'आई, इतक्या सकाळी खाणे होणार नाही, मी रस्त्यात खाईन काहीतरी. चहा कर फक्त'
आंघोळ उरकून श्रीकांत किचनमध्ये आला. आईला मिठी मारत म्हणाला 'नाराज होऊ नकोस गं, लवकरच परत येतो मी.' त्याने आईची नाराजी दूर करायचा प्रयत्न केला.
'बरं बरं आता मस्का नको मारू. चहा घे. तुझे सगळे कपडे वैगरे घेतलेस का बघ' लतिकाबाई म्हणाल्या.
चहा संपवून श्रीकांतने बॅग बाहेर आणली. तोपर्यंत निकंठराव सुद्धा जागे होऊन बाहेर आलेले होते. आईने तेवढ्यात रव्याच्या लाडूचा एक डबा श्रीकांतच्या बॅगेत टाकला. रात्री जागून त्यांनी लाडू केले होते. आईबाबांना नमस्कार करून श्रीकांतने गाडी बाहेर काढली तेंव्हा पूर्वेकडे पहाटेची आभा दिसत होती. रस्त्यावरचे लाईट अजून चालूच होते. कात्रज घाटात पोहोचेतो सूर्योदय झाला होता.
एवढ्या सकाळी निघाल्याचा श्रीकांतला चांगलाच फायदा झाला. वातावरण अतिशय सुंदर होतं. ट्रॅफिकही नव्हतं एखाद्या कॉलेजकुमाराप्रमाणे मस्त गुणगुणत श्रीकांत गाडी पळवत होता. सातारा सोडल्यावर हायवेवरच्या एका हॉटेलवर त्याने नाश्ता केला आणि पुन्हा प्रवास सुरु झाला. एस.टी. ला जरी आठ-नऊ तास लागत असले तरी स्वतःच्या गाडीने तो सहा तासातच रत्नागिरीला पोहोचला. जेवणाला अजून उशीर आहे असे मनाशी म्हणत तो भरतपूर कडे निघाला. जसजसे भरतपूर जवळ येत होते तसतशी त्याच्या मनातील ओढ वाढत होती. हे आपल्याला काय झालंय? एका आत्म्याच्या भेटीसाठी का आपण एवढे उतावीळ कसे झालोय? हे चुकीचे आहे हेही त्याला जाणवत होते पण मन मात्र उंचावरून पडणाऱ्या धबधब्याच्या पाण्याच्या वेगाने बंगल्याकडे धावत होते.
शहरात कुठेही न थांबता श्रीकांत घरी पोहोचला. गाडी बाहेर थांबवून त्याने हॉर्न वाजवला, जसे काही कोणी गेट उघडायला येणार होते. मग स्वतःच उतरून त्याने गेट उघडले. गाडीत बसताने त्याचे लक्ष हॉलच्या खिडकीकडे गेले. तिथला पडदा कोणीतरी हातात धरून बाहेर बघतय असा दिसत होता. श्रीकांतचे लक्ष जाताच पडदा पुन्हा जागेवर आला. मनामध्ये हसत त्याने गाडी आत घेतली. बॅग काढून घेऊन कुलूप उघडत तो आत आला. घरात अगदी प्रसन्न वातावरण वाटत होतं. मोगऱ्याचा सुंगंध दरवळत होता. आणि त्याच बरोबर खमंग नॉनव्हेज जेवणाचा सुगंधही दरवळत होता. श्रीकांतने बॅग सोफ्यावर टाकली आणि तो किचनमध्ये गेला. किचनमध्ये अर्थातच कोणी दिसले नाही. पण डायनिंग टेबलवर साग्रसंगीत जेवण तयार होते. त्याने आजूबाजूला बघत विचारले
''कोण आहेस तू? हा स्वयंपाक कोणी केलाय? प्रतिसादाबद्दल बांगड्यांची किणकिण तेवढी ऐकू आली. कोणीच काही बोलत नाही असे बघून श्रीकांत रागाने बाहेर पडला.
'मला तुझ्या हातचे जेवायचे नाही' असे म्हणत बॅग उचलून तो बेडरूम मध्ये गेला. प्रवासातील कपडे बदलून तो बाथरूम मध्ये गेला. हातपाय धुताने मात्र त्याचे विचारचक्र चालू झाले. आपण खरेतर आज न येता उद्या येणार होतो. पण अचानक येऊनही 'तिला' आपण येणार हे तर कळलेले होतेच. पण आपण जेवायलाच येणार आहोत हेही कळले होते. आज रविवार म्हणून खास नॉनव्हेज जेवण सुद्धा तयार ठेवलेय. पुण्यात सुद्धा रविवारी त्यांच्याकडे मटण असायचे. बाकीचे सर्व राधा मावशींनी केलेले असले तरी मटण मात्र श्रीकांतच्या आई लतिकाबाई स्वतः करायच्या. बाहेर मघाशी येताने त्याला जो जेवनाचा सुगंध आला होता तोही अगदी घरच्यासारखाच होता.
'कोण आहे ही बाई?' आत्मा असूनही ती आपल्याशी एवढ्या आपुलकीने का वागतेय?
हातपाय धुऊन झाल्यावर श्रीकांत सोफ्यावर येऊन बसला. किचनच्या पडद्याआड कोणीतरी उभे असल्यासारखा तो पडदा हालचाल करत होता. मधेच पडदा बाजूला सरकवून कोणीतरी बाहेर आल्या सारखे वाटत होते, पुन्हा आत गेल्यासारखे वाटत होते. 'तिचि' घालमेल त्याला अस्वस्थ करत होती पण तरीही तो हट्टाने तसाच बसून राहिला. अखेर स्वयंपाक घरातुन आवाज आला 'चला ना जेवायला' यावेळी काहीही गडबड नाही, अगदी सुस्पष्ट गोड, थोडासा आर्जवी आवाज होता. श्रीकांतने चमकून किचनकडे बघितले. पडदा अगदी कोणी हातात धरून ठेवल्यासारखा एका बाजूला कललेला होता. प्रत्यक्ष कोणी दिसत नाही एवढे सोडले तर 'तिचा' अगदी सहजपणे घरभर वावर होत होता.
''हे बघ, तू कोण आहेस हे कळल्याशिवाय मी जेवणार नाही' श्रीकांत म्हणाला आणि काय प्रतिक्रिया होतेय हे बघू लागला. पण बांगड्यांची नाजूक सळसळ सोडली तर बाकी सर्व शांत होतं. हे बघून श्रीकांत उठला आणि निर्धाराने म्हणाला
'ठीक आहे, मग मी दुसरीकडे राहायला जातो आजपासून' असे म्हणून तो बेडरूमकडे जायला निघणार तेवढ्यात बेडरूमचा दरवाजा बंद झाला. आणि मघाचाच आर्त आवाज पुन्हा आला.
'नका ना जाऊ, अनेक वर्षांनी कोणाची तरी सोबत लाभलीय'
'तू कोण आहेस हे समजल्याशिवाय मी इथे थांबणार नाही' श्रीकांतने पुन्हा ठामपणे सांगितले. काही वेळाने आवाज आला,
'मी अनुराधा'
'कोण अनुराधा? श्रीकांतने सावरून बसत विचारले.
'अनुराधा, या बंगल्याची मालकिन'
'पण माझ्या माहितीप्रमाणे इथल्या मालक-मालकिणीने आत्महत्या केली होतीं'
'तिच मी दुर्दैवी अनु. माझ्या नेभळट नवऱ्याने आत्महत्या केली असेल पण माझी इच्छा नसताने मलाही त्याने आपल्यासोबत नेलं, म्हणजे माझा खुनच झाला नां?........ती अगदी पोटतिडीकेने म्हणाली
'मला सर्व काही सांग. काय झाले होते? तू या अवस्थेत इथे कशी?.... श्रीकांत सोफ्यावर बसत म्हणाला.
'सर्व सांगते, ती एक मोठी कहाणी आहे, पण अगोदर जेवून घ्या, मग निवांत बोलू' तिने आर्जवाने म्हटले. अधिक ताणून न धरता श्रीकांत आत आला, टेबलवर बसला. तो पुढे होऊन पातेले उचलणार तेवढ्यात त्या पातेल्यावरचे झाकण आपॊआप उघडले. आतली वाफ बाहेर आली. एक डाव आपोआप हलला आणि त्याने श्रीकांतच्या ताटात भाजी वाढली. अशाच प्रकारे सर्व पदार्थ ताटात वाढले गेले. वस्तूंच्या हलण्यावरून श्रीकांतने अंदाज केला कि आपली डाव्या बाजूला टेबलासमोर कोणीतरी उभे आहे. तीच हे सर्व करत होती पण दिसत मात्र नव्हती. श्रीकांतने तिकडे बघत म्हटले
'तू ही बस ना जेवायला' अंधारातून नुसताच एक दुखरा हुंकार आला आणि पाठीमागून शब्द आले
''आमच्या नशिबात आता हे काहीच नाही, ती माझी गरज कधीच संपली' ती म्हणाली. मग श्रीकांतने जेवायला सुरुवात केली. तोंडात पहिला घास घेतल्याबरोबर त्याला आईच्या हातची चव जाणवली.
'वा! मस्त, अगदी आईने केलेलं वाटतंय. तुला हे कसे जमते? श्रीकांतने विचारले.
'मला अजूनही बरंच काही जमतं, तुम्ही जेवा मग मी सगळं सांगते' मग मात्र श्रीकांत न बोलता जेऊ लागला. त्याला कडकडून भूक लागली होती. आणि जेवणही अतिशय रुचकर होते. जेवण संपवून तो बाहेर आला. भरपेट जेवण त्याच्या अगदी अंगावर आले होते. तिची कहाणी ऐकायची या उत्सुकतेने तो सोफ्यावर बसला खरा, पण थोड्याच वेळात त्याचा डोळा लागला आणि त्या सोफ्यावरच तो आडवा झाला आणि काही क्षणातच गाढ झोपून गेला.
श्रीकांतला जाग आली तेंव्हा बाहेर अगदी अंधारून आले होते. तो धडपडून उठून बसला आणि इकडेतिकडे बघू लागला. हवेतून आवाज आला 'मी इथेच आहे'
'फसवलास ना मला, तुझी कहाणी सांगण्याऐवजी मला झोपवून टाकलंस' श्रीकांत खोट्या रागाने म्हणाला.
'मी नाही फसवले, तुम्हाला तुमच्या झोपेने फसवले' हसत ती म्हणाली. मग श्रीकांतच्या लक्षात आले. काल इकडे यायचे या ओढीने रात्रभर चांगली झोप आली नाही. पहाटेही तो लवकरच उठला होता. नंतर एवढा दूर अंतर ड्रायव्हिंग करत आल्यामुळे थकलेले शरीर आणि वरून पोटभर छान जेवण यामुळे तो गाढ झोपून गेला होता. मनात तोच ओशाळला. 'बरं चल, माझीच चूक होती. सांग आता काय घडले ते' श्रीकांत सोफयावर मांडी घालून बसत म्हणाला.
'अहो एवढी काय घाई आहे, तुम्ही तोंड धुऊन फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी चहा करते, तो घ्या, आणि मग सांगते' ती म्हणाली. श्रीकांतला खूप गम्मत वाटली. च्यायला ही अगदी आपली बायको असल्यासारखी आपल्यावर हक्क गाजवतेय आणि मनापासून आपली सेवाही करतेय. शिवाय सगळं काहीं जागेवर मिळतंय आणि तेही फुकट. चांगला संसार आहे आपला. पण संसाराचा विचार डोक्यात येताच मात्र तो चमकला. काय विचार करतोय आपण? एका आत्म्याबरोबर संसाराची स्वप्ने? नाही, आपण यात फार गुंतायचं नाही. आपण फक्त तिची कहाणी ऐकून घेऊ. मग बघू पुढे काय करायचे ते. असे मनाशी म्हणत तो बाथरुमकडे गेला. घाईघाईत आवरून बाहेर आला. किचनमधून चहाचा सुगंध येत होता. किचनमध्ये जाण्याऐवजी तो मुद्दाम सोफ्यावरच बसला. आणि पुढे काय घडतेय हे पाहू लागला. पडदा हलला आणि काही क्षणात त्याच्या समोरच्या टीपॉयवर चहाचा ट्रे, बाजूला खायला बिस्किटे असा सरंजाम समोर आला. त्याने एकदा स्पर्श करून खरेपणाची खात्री करून घेतले.
'मजा आहे एका माणसाची' असे म्हणत त्याने चहाचा कप तोंडाला लावला. शेजारच्याच सोफ्यावरून खुद्कन हसल्याचा आवाज आला. त्याने चहा संपवला. पोट भरलेले असल्याने बिस्किटे काही खाल्ली नाहीत. कप खाली ठेवत तो शेजारच्या सोफ्याकडे पाहत म्हणाला,
'आता बाकी काहीही बहाणा नाही. तू मला सांग तुझ्या आयुष्यात काय घडलंय ते'
थोडावेळ तशीच शांतता राहिली, सोफ्याची हालचाल झाली आणि तिचे शब्द कानी आले.
'मी अनुराधा दळवी. अनाथाश्रमात वाढले. त्यामुळे आईबापांचे, कुटुंबाचे सुख कधी अनुभवलेच नाही. तसा हा आश्रम हेच एक मोठे कुटुंब आहे. अनघा ताई आणि जनार्दन दादा दळवी हा अनाथाश्रम चालवतात. आम्ही सर्व त्यांना दादा आणि वहिनी म्हणत असू. या कुटुंबामुळेच मला आडनाव मिळाले. याच आश्रमात राजाराम सुद्धा होता. माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा. अतिशय लाजाळू, शामळू, अबोल. राजाराम माझ्याकडे अनेकदा चोरून बघत असतो हे मला माहित होते. पण माझ्या स्वप्नातल्या राजकुमाराचा एकही गुण या राजाराम मध्ये नव्हता. त्यामुळे मी त्याला कधी भाव दिला नाही. आश्रमात राहून आम्हाला बाहेर शालेय शिक्षणही मिळायचे. बारावीनंतर राजाराम डी.एड. ला गेला. मलाही बारावीला चांगले मार्क मिळाले आणि दादा वहिनीच्या सांगण्यावरून मीही डी.एड.ला ऍडमिशन घेतले. मी प्रवेश घेतला तेंव्हाच राजारामचे डी.एड. पूर्ण झाले होते. आणि त्याच्या नशिबाने त्याला जिल्हा परिषद शाळेत नोकरीही लागली. आश्रमाच्या नियमानुसार त्याला आश्रम सोडावा लागला. तिथून जवळच असलेल्या केंजळ गावी त्याने एक खोली भाड्याने घेतली आणि तो तिथे राहू लागला.
आश्रम सोडून गेला असला तरी त्याची दर रविवारची आश्रमाला भेट कधी चुकली नाही. त्याचा येण्याचा उद्देश मला भेटणे हाच असायचा. दादा आणि वहिनींचा तो लाडका होता त्यामुळे ते त्याला काही बोलायचे नाहीत. मी मात्र तो येण्याच्या वेळी मुद्दाम कुठेतरी निघून जायची किंवा अभ्यासाचे निमित्त करून त्याच्यापासून दूर राहायची. आणि एकदा त्याने मला न विचारता दादा-वहिनींकडे मला लग्नासाठी मागणी घातली. त्यांनाही आनंद झाला. आपल्या आश्रमात वाढलेले दोन जीव एकत्र सुखाने नांदणार असतील तर त्यांना हवेच होते. दादांनी मला बोलावून घेतले आणि राजाराम बद्दल विचारले. तोपर्यंत मी लग्नाचा काही विचार केलाच नव्हता. मला बोलावून घेऊन दादा म्हणाले.
'हे बघ अनुराधा, पूढील वर्षी तुझे शिक्षण संपले कि नियमानुसार तुला आश्रम सोडावा लागेल. तू एकटी मुलगी कोठे राहणार? राजाराम तसा चांगला मुलगा आहे. त्याला नोकरीही आहे. तुम्ही दोघेही आमचे लाडके आहात. त्यामुळे दोघे जर एकत्र आलात तर मला आणि अनघाला खूप आनंद होईल'.
त्यांच्या या बोलण्याने मला जमिनीवर आणले. आपल्यासारख्या अनाथ मुलीला कोण राजकुमार भेटणार? भविष्याचा विचार आणि दादा-वहिनींचा आग्रह यामुळे मी इच्छा नसताना लग्नाला तयार झाले. पुढच्याच आठवड्यात आश्रमातच छोट्या समारंभात आमचे लग्न झाले. आश्रम सोडताने नाही म्हटले तरी खूप वाईट वाटले. वहिनींच्या गळ्यात पडून मी खूप रडले.
राजारामने त्याच्या नोकरीच्या गावातच दोन खोल्यांची एक जागा भाड्याने बघितली होती. दादा-वहिंनींनी आम्हाला लग्नाचा आहेर म्हणून संसार उपयोगी वस्तू दिल्या होत्या. आमचा संसार सुरु झाला. मला अजून नोकरी लागली नव्हती. आणि एकेदिवशी आश्रमातून आम्हाला दोघांनाही बोलावणे आले. आम्ही रविवार गाठून आश्रमात गेलो. दादा-वहिनींनी आमचे खूप आनंदाने स्वागत केले. वहिनींनी माझ्या अंगावरून मीठ-मोहऱ्या ओवाळून टाकून माझी दृष्ट काढली. 'पायगुणांची गं बाय माझी' असे म्हणत मला जवळ घेतले. आमची चौकशी करून झाल्यावर दादांनी बोलायला सुरुवात केली.
''आश्रमाला एक मोठी देणगी मिळतेय तब्बल एक कोटी रुपयांची' पण देणगीदाराच्या दोन अटी आहेत. एक म्हणजे यातील ५० लाख रक्कम राजारामच्या नावावर करायची आणि दुसरी म्हणजे हि देणगी कोणी दिलीय हे शोधायचा प्रयत्न करायचा नाही'.... एवढे बोलून दादा आमची प्रतिक्रिया बघत थांबले. राजारामला एवढी रक्कम आपल्याला मिळणार हे ऐकून हर्षवायू झाला. माझ्या मनात मात्र पहिला हा विचार आला कि हि देणगी कोणी दिली असेल? नक्कीच हि देणगी देणारे राजारामचे वडील किंवा आई असणार. आईच बहुतेक. आपल्या अनौरस मुलाला आश्रमात सोडून दिले असेल आणि आता आपल्या पापाची उतराई म्हणून हि देणगी देण्याचा प्रयत्न असेल. मला हा कुणाचा फुकटचा पैसा नको होता. पण राजाराम मात्र हुरळून गेला होता. त्याच्या चेहऱ्यावरून तो आनंद लपत नव्हता. माझी नाराजी बघून दादा म्हणाले ''काय गं अनु, तुला हे पसंत नाही का?
'हो दादा, देणगीदारांची चौकशी करायची नाही अशी अट असली तर ही देणगी कुठल्या भावनेने दिली जातेय हे स्पष्ट दिसतंय. असा पैसा आम्हाला नको.' यावर दादा काही बोलायच्या आताच राजारामच रागाने माझ्याकडं बघत म्हणाला.
'हे काय अनु, अशी लक्ष्मी हाती येतेय तिला तू नाही म्हणतेस? अगं आपली सगळी स्वप्न पूर्ण करता येतील एवढ्या पैशात.' त्याची नाराजी त्याच्या आवाजातून दिसत होती. यावर दादाच म्हणाले.
'अनु, तुझ्या भावना मला कळतात. पण पैसे कोण देतंय यापेक्षा त्याचा वापर कसा होणार हे तू बघ ना. या पैशातून तुमचेही भले होईल आणि आश्रमासाठी अजून एक इमारत बांधता येईल. आम्हाला स्वतःसाठी काहीही नकोय पण तुमच्यासारखी अजून किती मुले आम्ही सांभाळू शकू याचा विचार कर ना'
त्यांचे मला पटले त्यामुळे मी होकार भरला. राजारामचा तर प्रश्नच नव्हता. दादा-वहिनींनी आम्हाला निरोप दिला.
आठच दिवसात राजारामच्या खात्यात ५० लाख जमा झाले. पैसे आल्यापासून राजारामला काय करू आणि काय नको असे झाले होते. मी मग त्याला जमिनीवर आणले. आपण या पैशातून एखादे घर बांधूया असे सांगितले. माझी ही कल्पना त्यालाही आवडली. जन्मापासून अनाथाश्रमात राहिल्यामुळे स्वतःचे घर असणे हे आमच्या दोघांच्या दृष्टीने किती मोठे स्वप्न होते याची कोणाला कल्पना येणार नाही.
आता आपण आहोत तो प्लॉट राजारामने १० लाखात खरेदी केला. कोना एका बिल्डरने हे प्लॉट पाडले होते. प्लॉट घेताने मी शहरापासून फार दूर आहे म्हणून विरोध केला होता. पण राजाराम जरासा एकलकोंडाच होता. त्यामुळे त्याला आपले घर गोंगाटापासून दूर हवे होते. प्लॉट घेतल्यानंतर मात्र सर्व गोष्टी मी ताब्यात घेतल्या. मला एक चांगला उद्योग मिळाला होता. एक आर्किटेक्ट शोधून प्लॅन तयार करून घेतला आणि त्यांच्याच ओळखीने एका काँट्रॅक्टरला काम सुद्धा दिले. यात राजारामचा सहभाग अतिशय कमी होता. काही महिन्यापूर्वीच आम्ही केंजळ येथील खोली सोडून शहरात राहायला आलो होतो. राजारामने मोटारसायकल घेतली होती त्यामुळे त्याला शाळेवर जाता येत होते.
हे घर कामगारांनी जरी बांधले असले तरी त्यातील विट अन विट माझ्या डोळ्याखालून गेलीय. माझा दिवसातला बहुतांशी वेळ इथेच जायचा. पैशाची चिंता नसल्याने अगदी सहाच महिन्यात आमचे हे घर तयार झाले. मग घर सजवण्यासाठी एकेक वस्तू घ्यायला सुरुवात केली. राजारामला मी किती वेळा माझ्या बरोबर यायचा आग्रह केला पण त्याने मात्र कामाचे निमित्त काढून कायम टाळाटाळ केली. त्यामुळे या बंगल्यातील चमचापासून तर सोफ्यापर्यंत प्रत्येक वस्तू माझ्या पसंतीची आहे. आणि यामुळेच या बंगल्याबद्दल माझ्या भावना फार तीव्र आहेत. खऱ्या अर्थाने हे 'माझे घर' आहे. लग्न होऊन तीन वर्षे होऊनही आम्हाला मुल झाले नव्हते ही रुखरुख सुद्धा या घरामुळे मनातून कमी झाली.
आमचे घर बांधून तयार झाले तरी आजूबाजूला कोणीच बांधकामाला सुरुवात केली नव्हती. एकट्याच कुटुंबाने एवढ्या गावा बाहेर राहायचे हा मुद्दा होता. पण राजारामला एकांत आवडत होता आणि मला या घराबद्दल इतकी आपुलकी निर्माण झाली होती कि कधी एकदा राहायला जातोय असे मला झाले होते. आमचे दोघांचेही तसे कोणी नातेवाईक नव्हते आणि दादा-वाहिनी त्यावेळी नेमके महिनाभर कुठल्या तीर्थयात्रेला गेले होते. मला एवढे दिवस धीर धरवत नव्हता. मग गावातले एक गुरुजी बोलावून आम्ही दोघांनीच घरात एक छोटी पूजा घातली. आणि एकमेकांच्या साक्षीने गृहप्रवेश केला. लवकरच मलाही इथे भरतपूर मधेच एका खाजगी शाळेत नोकरी मिळाली. राजाराम आणि मी सकाळी साडेआठला बाहेर पडायचे. तो मला शहरात सोडून पुढे त्याच्या शाळेला जायचा. नर्सरी असल्याने बाराला माझी शाळा सुटायची आणि मी साडेबारापर्यंत घरी यायची. घरात आले कि मला एकदम प्रसन्न वाटायचे. घराची बागेची निगा राखणे हे माझे आवडते काम. बागेत एखादे वाळलेले पान किंवा घरात धुळीचा एक कनसुद्धा कधी दिसू द्यायची नाही मी. संध्याकाळी साडेपाचला राजाराम यायचा. तो आला तरी आमच्यात बोलणे असे फार व्हायचे नाहीच. पसंत नसताने केलेले लग्न आणि तीन वर्ष होऊनही मुलं न होणे ही खंत कधीमधी डोके वर काढायचीच. माझ्या दृष्टीने राजाराम हा त्या घरातला पेइंग गेस्ट होता, आणि ते संपूर्ण घर माझं, 'फक्त माझं' होतं. राजारामच्या बाबतीत नाराजी असली तरी बाकी सर्व खूप छान चालले होते. आमच्या शाळेतही माझा वेळ चांगला जायचा आणि घरातही मजेत जायचा. या घरात आल्यानंतर मला कधीही एकटेपण जाणवले नाही. घरातल्या प्रत्येक वस्तूशी मी बोलायची, त्यांची काळजी घ्यायची. एखादा कप चुकून फुटला तरी मला गलबलून यायचं. माझ्या परीने तरी खूप सुखात दिवस जात होते माझे.
आणि या सुखाला एकदा नजर लागली. मी लहानपणापासून तशी देखणीच आहे. आश्रमात राहिल्यामुळे मला तशी बाह्य जगाची झळ कधी बसली नाही पण आता मात्र हे जाणवायला लागले. शाळेतील अनेक शिक्षक अगदी वयस्कर सुद्धा मुद्दामहून माझ्याकडे कटाक्ष टाकायचे, बोलायचा प्रयत्न करायचे. पण मी कधीच मर्यादा ओलांडली नाही. सगळ्यांशी हसून खेळून पण मर्यादा सांभाळून मी वागायचे. हे सर्व मी ग्राह्य धरलेलेच होते पण शाळेतून बाहेर पडून घराकडे येताने एक नवीनच त्रास सुरु झाला होता. नरवीर तानाजी चौकातच चार-पाच तरुणांचे टोळके बसलेले असायचे. मी येताने दिसले कि त्यांचे अचकट विचकट बोलणे सुरु व्हायचे. कधी कधी मी रागावून त्यांच्याकडे बघायची किंवा आजूबाजूच्या लोकांकडे मदतीच्या अपेक्षेने बघायची पण ते तरुण गावावर ओवाळून टाकलेलेच होते. त्यांच्या नादाला कोणी लागायचे नाही.
हळूहळू त्यांची मजल वाढत गेली. माझ्या मागोमाग ते यायला लागले. तसा हा भाग निर्जनच. रहदारी अशी नव्हतीच. त्यामुळे मी भीत भीत कशीतरी घरी यायचे आणि घरत येऊन दरवाजाला आतून कुलूप लावून घ्यायचे. एका संध्याकाळी मी राजारामला हे सांगितले पण त्याने उलट मलाच लेक्चर देत त्यांच्या नादी लागू नको म्हणून सांगितले. मला राजारामचा प्रचंड राग आला. दुसऱ्या दिवसापासून मला शाळेवर जायचे म्हणजे शिक्षा वाटायला लागली. एकेदिवशी राजाराम आणि मी जात असताने त्या टवाळखोरांनी घाणेरड्या कमेंट केल्या. आतातरी राजाराम त्यांना काहीतरी जाब विचारेल असे वाटले. पण त्या मुलांकडे दुर्लक्ष करून तो सरळ मला सोडून निघून गेला. राजारामच्या या कचखाऊ वृत्तीमुळे त्या मुलांचे अजूनच धाडस वाढले. त्या दुपारी ती मुले माझ्या मागोमाग आली. एरव्ही मी आतल्या रस्त्याला वळले कि ते निघून जायचे पण आज मात्र ते बंगल्यापर्यंत आले. मी पटकन गेट उघडून आत गेले आणि घरात जाऊन दरवाजा बंद करून घेतला. माझा जीव कितीतरी वेळ धडधडत होता. संध्याकाळी राजाराम आल्यावर मी त्याला आजचा प्रसंग सांगितला. पण त्याने अगतिकपणे मलाच विचारले 'आपण यावर काय करू शकतो, सहन करायचे'
''आपण पोलिसांकडे तक्रार केली तर? मी पर्याय सुचवला. पण पोलिसांचे नाव ऐकून त्या गुंडांच्या अगोदर राजारामच घाबरला. मी रागावून त्याच्याशी बोलणे टाकले.
दोन दिवसानंतर नेहमीप्रमाणे मी आणि राजाराम गाडीवरून जात होतो. आम्ही येताने पाहून ती मुलं मुद्दामहून रस्त्यात येऊन थांबली. राजारामला गाडी काढता येत नव्हती. त्याने हॉर्न वाजवत कडेने गाडी घेण्याचा प्रयत्न केला. त्या मुलांपैकी एकजण मुद्दाम गाडीच्या जवळ आला आणि गाडीचा धक्का लागताच त्याने गाडीचे हॅण्डल पकडले. राजाराम त्यांना सॉरी म्हणाला. पण त्या गुंडाने राजारामची कॉलर पकडली. आणि अर्वाच्य भाषेत आम्हाला शिव्या देत राजारामच्या तोंडात मारली. मी उतरून त्यांची विनवणी केली. 'दादा का आम्हाला त्रास देताय? आम्ही काय नुकसान केलाय तुमचे? असे आर्जवाने म्हणाले.
त्यावर फिदीफिदी हसत त्यातला एकजण म्हणाला 'ये रघ्या तुला दादा म्हणतीय बघ' आपण नाही असे ऐकून घेणार, आपली डार्लिंग आहे ती'
मला मेल्याहून मेल्यासारखे होत होते. राजारामची तर बोबडीच वळली होती. तो फक्त सॉरी सॉरी एवढेच म्हणत होता. आजूबाजूला लोक गोळा व्हायला लागल्यावर मात्र त्या गुंडाने राजारामला ढकलून दिले आणि 'रस्त्याने नीट गाडी चालवत जा, आज सोडतोय तुला' असे म्हणत सोडून दिले. राजाराम गाडीवरून पडता पडता वाचला. जमलेल्या लोकांनी उलट आम्हालाच 'कशाला त्या गुंडाच्या नादी लागताय? म्हणून तत्वज्ञान शिकवले. राजाराम निघून गेला आणि मीही शाळेत गेले.
साडेबाराला घरी येताने मला धास्तीच पडली होती कि आता हे टवाळखोर काय करणार? पण सुदैवाने चौकात त्यांच्यापैकी कोणीही नव्हते. मी रस्त्याने येताने हाच विचार केला कि उद्या काहीही झाले तरी राजारामला घेऊन पोलीस स्टेशनला जायचे आणि या गुंडांविरुद्ध तक्रार करायची. हा निर्णय घेतल्यानंतर मात्र मन जरा स्थिर झाले. संध्याकाळी राजाराम आला पण त्याचा चेहरा अतिशय पडलेला होता. त्याच्या चेहऱ्यावरून तो किती खचलाय हे दिसत होते. मी त्याला चहा-पाणी दिले. आणि नंतर त्याला म्हणाले.
'हे बघ राजाराम, आता पाणी डोक्याच्यावर जायला लागलंय. आपण या गुंडांची तक्रार पोलीसांकडे करू'
'नको ग, ते फारच भयानक आहेत. आपले काय करून टाकतील याचीच मला भीती वाटतेय' त्याचा हा दुबळा स्वभाव मला अत्यंत चीड आणत होता. माझाही तोल सुटला आणि मीही त्याला लागेल असे बोलले. पण याचा परिणाम म्हणून राजाराम म्हणाला 'ठीक आहे, उद्या जाऊया आपण पोलिसांकडे.' आता स्वयंपाक कर मला भूक लागलीय, आणि मी हे आईस्क्रीम आणलेय ते फ्रिजमध्ये ठेव.'
आज पाहिल्यान्दाच राजारामने स्वतःहून काहीतरी आणले होते. मला फार आश्चर्य वाटले. पण कदाचित सकाळच्या प्रसंगाने सैरभैर झाल्याने आणले असेल असे मी समजले. मी ते आईस्क्रीमचे कोण डीप फ्रिजमध्ये ठेवले आणि स्वयंपाकाला लागले. स्वयंपाक झाल्यावर आम्ही जेवण केले. जेवताने मी पुन्हा बजावून राजारामला सांगितले कि उद्या आपल्याला पोलीस स्टेशनला जायचे आहे. तोही 'हो नक्की जाऊ' म्हणाला. जेवण झाल्यावर मी आईस्क्रीम चे कोण आणले. खरेतर मला आईस्क्रीम नको होते पण राजारामने एवढे आणलेय तर त्याला नाराज करायला नको म्हणून मी आईस्क्रीम खायला लागले. आईस्क्रीमची चव जरा कडवट लागत होती. पण कुठलाही खाद्यपदार्थ शिल्लक टाकायचा नाही ही आश्रमाची शिस्त अंगात भिनलेली होती. आम्ही दोघांनीही ते आईस्क्रीम संपवले आणि थोड्याच वेळात मला गरगरायला लागले. राजारामाची अवस्थाही काहीशी तशीच होती. मग मात्र मला शंका आली. 'राजाराम काय केलंयस तू? काय घातले होते आईस्क्रीममध्ये'
'अनु, आपल्या सर्व चिंता आता संपून जातील, आता कोणीही आपल्याला त्रास देऊ शकणार नाही' असे म्हणत राजाराम गडाबडा लोळू लागला. मीही खाली पडले.'
'राजाराम मला फसवलेस तू. मला मरायचे नव्हते रे.' असे मी तिरस्काराने त्याला म्हणाले.
आणि काही क्षणातच सगळं काही शांत झाले. राजाराम मला सॉरी सॉरी म्हणत असल्याची माझी शेवटची जाणीव. मला गाढ झोप लागून गेली.
मला जाग आली ती वेगळ्याच विश्वात. माझे स्वतःचे आणि राजारामचेही मृत शरीर समोर पडलेले मला दिसत होते. मी हवेत तरंगत होते. माझे मानवी जीवित अस्तित्व संपलेले होते. राजारामने अतिशय भ्याडपणे स्वतःला आणि मलाही संपवून टाकले होते. मला सगळे काही दिसत होते, कळत होते पण मला शरीरच नव्हते. राजारामचा आत्मा काही दिसत नव्हता. आणि त्यादिवसापासून आजतागायत मी असेच आयुष्य जगतेय. या घरावर माझे मनापासून प्रेम होते, त्यामुळे मृत्यूनंतरही मला या घराचा मोह सुटत नव्हता.
दोन-तीन दिवसांनी ते चार पाच जणांचे टोळके आले. बाहेरून त्यांचे अचकट विचकट बोलणे ऐकू येत होते. काहीवेळाने त्यांनी गेटवरून उड्या मारून आत प्रवेश केला. आणि खिडकीतून डोकावून बघितले. आमची शरीरे बघून ते घाबरले. मी अतिशय चिडले होते आणि मी बाहेर जायचा प्रयत्न केला आणि काय आश्चर्य, दरवाजा न उघडताही मी बाहेर जाऊ शकत होते. मी बाहेर जाताच एका गुंडाच्या तोंडात मारली. आजूबाजूला कोणी दिसत नसताने आपल्याला कोणी मारले हे तो बघू लागला. मी पुन्हा एक मारली आणि मग मारतच सुटले. बाकीचे चौघे त्याला ओढत होते, मी त्यांनाही मारत सुटले. आणि मग ते भूत भूत म्हणत ओरडत पळत सुटले. मला खूप आनंद झाला. या रूपात का होईना पण मी माझा काहीप्रमाणात बदला घेतला होता. ते शहरात पोहोचल्यावर त्यांच्या अवस्थेमुळे लोकांना कळले कि बंगल्यात काहीतरी घडलंय आणि लोकांची रीघ लागली. पोलिसही आले. सर्व सोपस्कार झाल्यानंतर सगळे काही संपले आणि मी या बंगल्यात एकटी राहिले.
राजारामच्या खिशात पोलीसांना एक पत्र मिळाले. त्यात 'आम्ही गुंडांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहोत' असा मजकूर होता. दुसऱ्या एका पत्रात हा बंगला आश्रमाला दान केला होता. पहिल्या पत्रावरून पोलिसांनी त्या पाचही गुंडांना अटक केली आणि त्यांची रवानगी जेल मध्ये झाली. वर्षभर हा बंगला तसाच पडून होता. मग दादा-वहिनींनी हा बंगला भाड्याने देण्यासाठी म्हणून एका इस्टेट एजंटला सांगितले. त्याने काही दिवसांनी एक भाडेकरू आणले. एक मद्रासी कुटुंब होते. ते जेंव्हा घर बघत होते त्यावेळी मी रागावून एक पातेले खाली टाकले. त्याचा आवाज ऐकताच ते सर्वजण आणि तो एजंटही पळून गेले. मग काय मला हा बंगला सांभाळायची ट्रीकच मिळाली. यानंतरही एकदोनदा हा बंगला बघायला भाडेकरू यायचे पण काही ना काही करून मी माझे अस्तित्व दाखवून द्यायची. यामुळे हा बंगला भुताटकीने पछाडलेला आहे हे सर्वांनाच माहित झाले आणि इकडे कोणीही यायचे बंद झाले. माझ्या दहशतीमुळे आजूबाजूच्या प्लॉट मध्ये सुद्धा कोणी बांधकाम करायचा प्रयत्न केला नाही. बस! हा बंगला, हा परिसर माझा आहे, माझ्या एकटीचा आहे.'
एवढे बोलून अनुराधा गप्प झाली. पण मधूनच तिचे हुंदके आणि सुस्कारे ऐकू येत होते. तिची हकीकत ऐकून मीही एकदम दिग्मूढ होऊन गेलो होतो. 'ती' एक अमानवी स्त्री होती हेही मी विसरून गेलो होतो. तिला कसा दिलासा देता येईल याचाच श्रीकांत विचार करत होता. अन अचानक त्याच्या लक्षात आले कि हिने आतापर्यंत सर्वांना इथून पळवून लावले पण मग आपल्यालाच ही एवढी मदत का करतेय? तिच्या या कृतीचा अर्थ लक्षात यायला त्याला वेळ लागला नाही.
तिला धीर द्यायच्या उद्देशाने श्रीकांत म्हणाला 'हे बघ अनु, जे झाले ते नक्कीच फार वाईट घडले. राजारामने खरे तर तुझा खूनच केलाय हे मला अगदी मान्य आहे. पण आता तू अशी किती दिवस अतृप्त घोटाळत राहणार?
यावर ती विषन्न हस्त म्हणाली 'बस आता या भूत योनीतुन सुटका होईपर्यंत अशीच या घरात रेंगाळत राहणार मी.
यावर श्रीकांत पटकन म्हणाला 'मला एक सांग अनु, आतापर्यंत तू सर्वांना इथून पिटाळून लावत होतीस, मग माझ्याबाबतीतच एवढी मेहेरबान का झालीस? यावर ती काही बोलली नाही. बराच वेळ काहीच उत्तर येत नाही असे पाहून मी पुन्हा म्हणालो.
'सांग ना, मला या घरातून पिटाळून का लावले नाहीस, उलट तू माझी एवढी बडदास्त का ठेवते आहेस?
'सांगायलाच हवं का?....... तिने विचारले. 'हो' सांग' मला जाणून घ्यायचे आहे'!
'श्रीकांत, राजाराम बरोबरचं माझं लग्न ही मनात नसताने त्यावेळी केलेली तडजोड होती. लग्नानंतर मी पूर्णपणे त्याच्यात विसर्जित होऊन जाण्याचा प्रयत्नदेखील केला. पण आम्ही मनाने कधी एक झालोच नाही. त्यातूनही त्याचा अल्पसंतुष्ट स्वभाव, भेकड वागणं याची मला जबरदस्त चीड यायची. आम्हाला मूल झालं असतं तर कदाचित आमच्यातील हे अंतर संपलं असतं, पण तिथेही राजाराम पूर्णत्वाला नाही जाऊ शकला. मला मुलांची हौस होती, म्हणून एका वर्षातच मी स्वतःची डॉक्टरकडून टेस्ट करून घेतली होती. माझ्यात काही दोष नव्हता. राजाराम मात्र अशी टेस्ट करून घेण्याला तयार नव्हता. त्यामुळे तो माझ्या मनापासून अजून अजून दूरच होत गेला' अनुराधा स्वगत बोलल्यासारखी म्हणाली. काहीवेळ थांबून ती पुन्हा बोलू लागली. यावेळचा तिचा स्वर अगदी स्वप्नाळू वाटत होता.
'श्रीकांत, तुमचा विश्वास बसणार नाही पण मी मघाशी तुम्हाला माझे स्वप्न सांगितले ना, त्या माझ्या स्वप्नात जो राजकुमार यायचा तो अगदी तुमच्यासारखाच होता. पण माझे दुर्दैव बघा, ज्याची मी वाट पाहत होते तो मला जिवंत असताने नाही मिळाला, तर अशावेळी मिळालाय कि मनात आणलं तरी तो माझा होऊ शकत नाही' अनुराधा विषादाने म्हणाली.
'का नाही होऊ शकत' अभावितपणे श्रीकांतच्या तोंडून प्रश्न गेला आणि तो लगेच ताळ्यावरही आलो. अरे काय विचार करतोय आपण? एका भुताबरोबर आयुष्याचं स्वप्न बघतोय आपण. त्याच्या अचानक स्तब्ध होण्याने तिला त्याच्या मनातले विचार कळले असावेत.
'आलं ना लक्षात, माझ्या मनातला राजकुमार मला का मिळू शकत नाही म्हणून' तिच्या शब्दातला निराशाजनक विषाद श्रीकांतला जाणवत होता. किचनचा पडदा हलला तेंव्हा त्याला जाणवले कि ती आत निघून गेलीय म्हणून. श्रीकांतचे डोकं अगदी भन्न झालं होतं. काही न बोलता तो उठला आणि बेडरूममध्ये गेला. त्याने बेडवर अंग टाकले पण विचारांनी डोक्यात थैमान मांडले होते. काय चाललंय तेच कळत नव्हते. आपण कशात अडकलोय? भुताने पछाडणे म्हणतात ते हेच का? आतापर्यंत भुताच्या ऐकलेल्या गोष्टींमध्ये भूत हे खूप वाईट असते असेच ऐकले होते. पण हे भूत तर खूप चांगलं आहे. एखादी घरंदाज स्त्री काय आपल्या पतीची सेवा करेल इतक्या आपुलकीने ती माझी सेवा करत होती. एका अमानवी, अशरिरी अस्तित्वाने आपल्यावर प्रेम करावं हे बुद्धीला पटत नव्हते. अशाच आडव्या तिडव्या विचारातच कधीतरी त्याला झोप लागून गेली.
सकाळी जेंव्हा मला श्रीकांतला जाग आली तेंव्हा तो मंद मोगऱ्याचा वास अगदी आपल्या जवळच येत असल्याचे त्याला स्पष्ट जाणवले. आतापर्यंत ती कधी त्याच्या बेडरूम मध्ये आली नव्हती. त्याने आळस देत अन थोडेसे हसून 'गुड मॉर्निंग' म्हटलं. अंधारातून आवाज आला 'झाली का झोप?, उठा आता. मी चहा टाकते' असे म्हणत तो आवाज त्याच्या पासून दूर झाला. श्रीकांत उठला आणि बाथरुमकडे गेला. बाथरूममध्ये त्याचे टॉवेल व इतर कपडे व्यवस्थित ठेवलेले होते. काळ संपत आलेल्या साबणाचा नवीन पॅक सोफ केस मध्ये दिसत होता. त्याने आंघोळ उरकली. ओले कपडे तसेच बाथरूममध्येच सोडून तो किचनमध्ये आला. आज उपमा केलेला दिसत होता. त्याने नाश्ता आणि वरून गरम गरम चहा घेतला आणि तो आपल्या बेडरूममध्ये आला. कपडे करून तो हॉलमध्ये आला. किचनकडे पाहत 'येतो मी' म्हणत बाहेर पडला. तिचे प्रत्यक्ष दिसणे आणि शरीर स्पर्श सोडला तर अगदी एखाद्या नवविवाहित जोडप्याने वागावे असे दोघांचेही चालले होते.
बँकेत गेल्यावर नेहमीप्रमाणे गोखलेंनी त्यांची काजीने चोकशी केली. श्रीकांतने जरा तिरसट आवाजाताच त्यांना म्हटले
'हे बघा गोखले, तुमची काळजी मला कळते. पण असे रोज रोज घरगुती गोष्टी बोललेल्या मला आवडत नाहीत. तेंव्हा यापुढे फक्त कामाचे बोलत जा. आणि हो, सगळ्या स्टाफला एकदा ही कल्पना द्या!.
त्याच्या या बोलण्याने गोखले चांगलेच दुखावले. काही न बोलता ते बाहेर आले. पडेल चेहऱ्याने त्यांना बाहेर येताने पाहून शेजारच्या टेबलवरील स्मिता वागळेने विचारलेच. मनात नव्हते पण एकदाचे सांगायचे आहेच म्हणून गोखलेंनी तिला श्रीकांत काय बोलला ते सांगितले. आता या वागळे कडून सर्व स्टाफला कळणारच होते.
दिवसभरात काही विशेष न घडता श्रीकांत संध्याकाळी घरी आला. सवयीने आवरून चहापाणी झाल्यावर तो निवांत टीव्ही बघत बसला. 'ती' आजूबाजूला वावरत होतीच. एव्हाना बाहेर अंधार झाला होता. थोडयावेळाने घड्याळाकडे बघत त्याने शेजारच्या टीपॉय वरून ग्लास आणि ब्लेंडर्सची बाटली उचलून घेतली. त्याबरोबर तिकडे पडद्याची सळसळ झाली. काही क्षणात स्नॅक्सच्या डिश समोर हजर झाल्या. एक पेग झाल्यावर त्याच्या मेंदूवर ती हवीहवीशी वाटणारी तरलता पसरली. त्याला काय वाटले काय माहित पण ही जी कोण आहे तिला आपण प्रत्यक्ष पाहायला हवं असं त्याला वाटलं. मनात विचार येताच त्याने ग्लास बाजूला ठेवला.
'अनु, मला तुला पहायचं आहे' अचानक श्रीकांत म्हणाला. यावर तिच्याकडून काहीही प्रतिक्रिया झालेली दिसली नाही. त्याने पुन्हा हट्टाने तेच शब्द उच्चारले तरी पण काहीच घडले नाही. मग एखादया लहान मुलासारखा फुरंगटून जात तो म्हणाला 'ठीक आहे, तू जोपर्यंत मला दिसणार नाहीस तोपर्यंत मी जेवणार नाही' असे म्हणत त्याने पुन्हा एक पेग भरून घेतला आणि रुसल्यासारखा टीव्हीकडे बघत बसला. असाच खूप वेळ गेला. स्वयंपाक घरात येणाऱ्या आवाजांवरून आत ताट वाढले आहे हे त्याला कळत होते. पण तो उठला नाही.
'चला ना जेवायला' तिचे शब्द फक्त ऐकू आले. तरीही त्याने बिलकूलही दखल घेतली नाही.
'अहो असा काय हट्ट करताय? भूत कोणाला दिसत नाही हे तुम्हाला माहित असेलच ना' 'तिने' म्हटले.
'सामान्य भूत असते तर हे मान्य झाले असते, पण तुझ्या करामती पाहता तू नक्कीच मला दिसू शकशील.' श्रीकांत तार्किक मुद्दा मांडत म्हणाला. बराच वेळ गेल्यानंतर तिचा आवाज आला.
'ठीक आहे, मी तुमच्यासमोर येऊ शकेल, पण ते फक्त दिवस मावळल्यानंतर आणि तो पुन्हा उगवेपर्यंत' अनुराधा म्हणाली. तसा श्रीकांत सरसावून बसत म्हणाला 'चालेल मला' पण यावर अंधारातून शब्द आले 'श्रीकांत, इतके सोपे नाही ते, यात एक रिस्क आहे. जर तुम्ही मला स्पर्श केला किंवा माझा चुकून तुम्हाला स्पर्श झाला तर तर....तर'...... एवढे बोलून ती थांबली.
'तर्रर्रर्र काय?..... श्रीकांत आतुरतेने म्हणाला.
'तर जे काही घडेल ते फार वाईट असेल' म्हणून मी तुम्हाला विनंती करते कि तुम्ही हा हट्ट सोडा. माझे इथे तुमच्या आजूबाजूला असणे तुम्हाला पुरेसे नाही का? तिने पुन्हा एकदा त्याचे मन वळवायचा प्रयत्न केला.
'समजा स्पर्श झाला तर काय घडेल? श्रीकांतने विचारले. काहीवेळाने तिचे शब्द ऐकू आले.
'ज्याक्षणी तुम्ही मला स्पर्श कराल, त्याच क्षणी माझ्या सर्व शक्ती निष्प्रभ होतील, आणि .... आणि त्याच क्षणी तुम्ही हे मानवी शरीर सोडून पिशाच्च योनीत याल, तुमचा मृत्यू ओढवेल' एवढे बोलून ती हुंदके देऊन देऊन रडू लागली. यावर श्रीकांत चांगलाच हादरला. पण थोड्यावेळाने त्याला एक मार्ग सापडला.