आपल्यापैकी बहुतेकांचे जीवन प्रयत्नांवर आधारित आहे .वासनांवर आधारित आहे .पण प्रयत्न म्हणजे काय ? वासना म्हणजे काय? याचा कधी आपण विचार केला आहे का?वासना व प्रयत्न यावर आपले जीवन उभारलेले असल्यामुळे , किंबहुना वासना व प्रयत्न म्हणजेच आपले जीवन अशी आपली धारणा असल्यामुळे, वासना विरहित,प्रयत्न विरहित, कर्माची; कल्पनाही आपण करू शकत नाही.आपले सामाजिक राजकीय आर्थिक व तथाकथित अध्यात्मिक जीवन, म्हणजे निरनिराळ्या फल प्राप्तीच्या इच्छेने केलेल्या प्रयत्नांची, एक मालिका आहे.प्रयत्न आवश्यक आहे, जरूरीचा आहे, अशी आपली विचारसरणी आहे .
आपण प्रयत्न कां करतो? सोप्या व मोजक्या शब्दात ,सांगावयाचे झाले, तर फलप्राप्तीसाठीच, ध्येयप्राप्तीसाठीच, आपले प्रयत्न चाललेले नसतात काय?आपली विचारसरणी अशी आहे की जर आपण प्रयत्न केले नाहीत तर आपण मृतवत होऊ.चेतनाहीन होऊ.आपल्याला कांहीतरी ध्येय आहे व त्याच्या प्राप्तीसाठी आपली अविश्रांत धडपड चाललेली आहे .जर आपल्याला स्वतःमध्ये विलक्षण मूलगामी सर्वांगीण बदल घडवून आणायचा असेल, तर आपण जुन्या सवयी काढून टाकण्याचा, परिस्थितीनुरूप प्राप्त झालेल्या सवयी दाबून टाकण्याचा, विरोध करण्याचा ,नवीन सवयी आत्मसात करण्याचा, भगीरथ प्रयत्न करतो .कांहीतरी प्राप्त करण्यासाठी ,जगण्यासाठी, आपण अशा तर्हेच्या प्रयत्न मालिकेला सरावलेले आहोत. हे सर्व प्रयत्न "मी"चे कार्य नाही काय?हे सर्व प्रयत्न स्वयंकेंद्रित नाहीत काय?
स्वयंकेंद्रित प्रयत्नातून जास्त विरोध, जास्त झगडे, जास्त गोंधळ, जास्त क्लेश, जास्त दु:खे, याहून आणखी काय बरे निर्माण होणार ?आणि असे असूनही आपण एका मागून एक अविरत प्रयत्न करीतच असतो .स्वयंकेंद्रित प्रयत्न, कुठलेही प्रश्न सोडवण्याला, स्पष्ट करण्याला, कधीही मदत करीत नाहीत;हे आपल्यापैकी फारच थोड्या जणांच्या लक्षात येते .उलट असे प्रयत्न आपली दुःखे व गोंधळ वाढवण्याला मदतच करतात .हे सर्व जाणूनही आपण प्रयत्न चालूच ठेवतो .आशा करतो की या ना त्या कुठल्या ना कुठल्या प्रयत्नातून ही स्वयंकेंद्रित क्रिया संपुष्टात येईल .स्वयंकेंद्रित क्रिया असता कामा नये हेही कांही जणांच्या पूर्ण लक्षात आलेले असते .परंतु ही प्रयत्नांनीच संपुष्टात येईल अशी प्रामाणिक समजूत असते . प्रयत्न करणे म्हणजे काय ?हे जर आपल्याला समजेल तर जीवनाचे महत्त्व आपल्या लक्षात येईल असे मला वाटते.
आनंद प्रयत्नातून मिळतो काय?प्रयत्नातून आनंद निर्मिती होते काय?प्रयत्न करून आनंदी राहता येथे काय?नाही नाही नाही त्रिवार नाही, तुम्ही आनंद मिळवण्याची धडपड करता, आणि तुम्हाला आढळून येते की आनंद दूरच आहे .शिस्त त्याग मानसिक गुंगी व मानसिक कैफ यातून आनंद निर्माण होत नसतो. तुम्ही वैचारिक कैफात राहाल, पण शेवटी कटुता शिल्लक राहिल.तुम्ही कशाचा ना कशाचा त्याग कराल,काही दूर साराल, शिस्त पालन कराल, पण गुप्त झगडा चालूच राहील. प्रयत्न आनंदनिर्मिती करीत नाही .शिस्त, त्याग, वैचारिक कैफ ,यातून आनंद निर्माण होत नाही.
आणि तरीही आपले जीवन ही, शिस्त त्याग वैचारिक कैफ यांची एक मालिकाच आहे .हे धर, ते टाक, ते मिळवण्याचा प्रयत्न कर, असे सारखे चाललेले असते .आपल्या वासना, भावना, अधाशीपणा, मूर्खपणा, यांना दाबून टाकण्याचा त्यावर विजय मिळवण्याचा सारखा प्रयत्न चाललेला असतो .आनंद, शांती, प्रेम,यांच्या प्राप्तीसाठी,आपली सदैव धडपड खटपट चाललेली असते.प्रेम व समज ही कधी धडपड खटपट यांतून प्राप्त होतात काय?
प्रयत्न धडपड खटपट म्हणजे काय?हे समजणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे मला वाटते . जे नाही,जे व्हावे असे आपल्याला वाटते, जे झाले तर आपल्याला आवडेल,त्याच्यात-जे आहे त्याचे- परिवर्तन करण्यासाठी धडपड, म्हणजेच प्रयत्न नाही काय?म्हणजेच जे आहे,त्याला टाळणे, त्याला तोंड न देणे, त्याच्यापासून पलायन करणे, त्याच्यात बदल करण्याचा प्रयत्न करणे,त्याच्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करणे, याशिवाय आपल्या प्रयत्नांमध्ये दुसरे काय असते ?जो मनुष्य जे आहे ते समजावून घेतो व त्याला योग्य महत्त्व देतो तोच खरा समाधानी,तीच खरी समाधानावस्था.कमी मालमत्ता किंवा जास्त मालमत्ता, त्याग किंवा विलासीपणा, यांच्याशी तिचा संबंध नाही.जे आहे ते बदलण्याचा व सुधारण्याचा प्रयत्न करून नव्हे,तर जे आहे ते ओळखून समजून घेउन, त्याबद्दल सदैव जागृत राहून ,खरी समाधान वृत्ती प्राप्त होत असते . अश्या तर्हेने जे आहे त्याची,जे तुम्हाला आवडेल त्याच्यात, रूपांतर करण्यासाठी केलेली धडपड, म्हणजेच प्रयत्न हे आपण पाहिले .
मी फक्त मानसिक धडपड खटपट झगडा यांच्या बद्दल बोलत आहे .एखाद्या यांत्रिक किंवा तांत्रिक खटपटी बद्दल मी बोलत नाही.माहीत असलेले शास्त्रीय व तांत्रिक ज्ञान वापरून, विलक्षण काळजीपूर्वक, तुम्ही एकमेवाद्वितीयम् अशी समाजरचना उभारालही, परंतु ती उभारताना अस्तित्वात आलेला मानसिक झगडा, मानसिक विरोध, मानसिक क्लेश, मानसिक आर्त किंकाळय़ा, तुम्हाला समजणार नाहीत. जोपर्यंत त्या थांबणार नाहीत तो पर्यंत कितीही काळजीपूर्वक रचलेल्या अत्याकर्षक समाजाचेही विघटन व मोडतोड अपरिहार्य आहे .आजतागायत पुन: पुन: जगात अनेकवार हे घडून आलेले आहे . प्रयत्न म्हणजे जे आहे त्याची ओढाताण .प्रयत्न म्हणजे जे आहे त्याची फरपट .जे आहे त्याचा मी ज्याक्षणी जसाच्यातसा स्वीकार करतो, त्याच क्षणी झगडयाला व फरपटीला पूर्णविराम मिळतो .कोणत्याही प्रकारचा झगडा धडपड खटपट म्हणजे जे आहे त्याची फरफट आणि जोपर्यंत, जे आहे त्याची, जे नाही त्यात, परिवर्तन करण्याची माझी इच्छा आहे, तोपर्यंत फरपट म्हणजे प्रयत्नही अपरिहार्य आहेत .
आनंद व समाधान हे प्रयत्नातून निर्माण होत नसतात .हे प्रथम आपल्या लक्षात आले पाहिजे .निर्मिती प्रयत्नातून होते कि जेव्हा सर्व प्रयत्न थांबतात तेव्हा निर्मिती होते?तुम्ही केव्हा गाता?तुम्ही कविता किंवा लेख केव्हा लिहिता? तुम्ही चित्र केव्हा रंगविता?तुम्ही खरी निर्मिती केव्हा करता ? तुम्ही सृजनशील केव्हा असता?जेव्हा तुम्ही पूर्ण एकाग्र असता ,जेव्हा तुमचे मन उघडे असते, जेव्हा सर्व पातळीवर तुम्ही संपूर्ण संलग्न असता, तेव्हाच खरी निर्मिती होत नाही क़ाय ?अशा निर्मितीत स्वयंभू आनंद उसळत असतो . मग तुम्ही स्वर गुणगुणण्याला, चित्र रंगविण्याला, किंवा कविता लिहिण्याला, सुरुवात करता.निर्मिती क्षण, झगडा धडपड खटपट फरपट प्रयत्न यातून निर्माण होत नाही . प्रयत्न म्हणजे काय, हे आपल्याला निर्मिती म्हणजे काय, हे समजावून घेवून कळू शकेल ,असे मला वाटते .निर्मिती प्रयत्नातून होते काय?ज्यावेळी निर्मिती होत असते त्या वेळी आपण जागृत असतो काय ?जेव्हा मी स्वतःला संपूर्णपणे विसरलेला असतो, ज्या वेळी कोणताही झगडा नसतो, जेव्हा आपल्या विचारांच्या हालचालींबद्दल आपण जागृत नसतो, जेव्हा अापल्याला अपूर्णता वाटत नसते ,तर उलट श्रेष्ठता पूर्णता प्रसन्नता वाटत असते ,त्याच वेळेला खरी निर्मिती होत नसते काय ?अशी स्थिती झगडा धडपड खटपट फरफट यातून निर्माण झालेली असते काय?जेव्हा तुम्ही सहजतेने चपळतेने एखादी गोष्ट करीत असता त्यावेळी प्रयत्न नसतो .ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की नाही याबद्दल मी साशंक आहे .
आपले जीवन ही युद्धे झगडे खटपट फरपट धडपड विरोध भांडणे प्रयत्न यांची एक मालिका आहे .प्रयत्न विरोध झगडा जिथे पूर्णपणे थांबतो, अभावानेच असतो, अशा तर्हेच्या एका स्थितीची आपण कल्पनाही करू शकत नाही. झगड्याविना अस्तित्व,सृजनशील अस्तित्व, ही स्थिती आकलन होण्यासाठी आपल्याला प्रयत्न म्हणजे काय याची संपूर्ण चौकशी केली पाहिजे .प्रयत्न म्हणजे पूर्णतेची ओढ .प्रयत्न म्हणजे जे मी नाही ते होण्यासाठी केलेली धडपड .मी असा आहे आणि मला तसे व्हायचे आहे .मी तसा नाही आणि मला तसे बनायचे आहे .ही खटपट म्हणजे प्रयत्न नाही काय?हे काहीतरी बनण्यामध्ये झगडा खटपट दुःख क्लेश विरोध आहे.या झगड्यात कसल्या तरी प्राप्तीशी मग ती व्यक्ती वस्तू कल्पना काहीही असो आपण निगडीत असतो.आपण पूर्णता कसल्या ना कसल्या प्राप्तीत शोधत असतो . यातूनच सर्व खटपटीचा प्रादुर्भाव होतो .
प्रयत्न अपरिहार्य आहे, आवश्यक आहे ,अशी आपली समजूत आहे .कांहीतरी बनणे, त्यासाठी खटपट करणे, हे आवश्यक का आहे ,हेच मला कळत नाही.हा झगडा कां आहे?जोपर्यंत पूर्णतेची ओढ आहे, तोपर्यंत झगडा आहे.तुमची पूर्णतेची कल्पना कुठलीही, कोणत्याही पातळीवरची, कसल्याही प्राप्तीची असो .तुम्ही छोटे वा बडे, गरीब वा श्रीमंत, मूर्ख वा पंडित, कसेही असा पूर्णतेची ओढ ही प्रयत्ना मागची प्रेरणा आहे . जोपर्यंत तुम्हाला काहीतरी बनण्याची होण्याची इच्छा आहे तोपर्यंत झगडा असणारच. पूर्णतेची ओढ आपल्याला कां बरे आहे ?आपल्या अपूर्णतेबद्दल आपण जागृत आहोत, आपल्याला अपूर्णतेची जाणीव आहे, आणि आपल्याला अपूर्णता नको आहे, म्हणून पूर्णतेची ओढ आहे .अपूर्णतेबद्दल आपण जेव्हा जागृत होतो, तेव्हाच आपल्याला पूर्णतेची ओढ निर्माण होते.मी पोकळ आहे, अपूर्ण आहे, मी रिकामा आहे, मी दुःखी आहे, मी मत्सरीआहे, मी हलकट आहे, मी गरीब आहे, मी अपुरा आहे, याबद्दल आपण जागृत होतो .व्यक्ती वस्तू वा कल्पना यांच्या प्राप्तीत आपल्याला पूर्णता मिळेल,अशी आपली कल्पना असते, आणि मग त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न सुरू होतात.ज्याच्या त्याच्या धारणेप्रमाणे ,कल्पनेप्रमाणे, जे नाही ते आणणे ,नाही व आहे त्यामधील दरी सांधण्याचा प्रयत्न करणे, पोकळपणा आपल्या भरीवतेच्या कल्पनेप्रमाणे भरून काढणे ,म्हणजेच आपले दैनंदिन अस्तित्व नाही काय?
आपण दुर्गुणी आहोत ,दरिद्री आहोत, पोकळ आहोत, याबद्दल आपण जागृत असल्यामुळेच, सद्गुण अंगी बाणवण्याचा, पोकळपणा भरून काढण्याचा, मालमत्ता संपादन करण्याचा, मानासिक श्रीमंती कमावण्याचा, आपण प्रयत्न करतो .समोरासमोर पोकळपणाला तोंड न देता, अंतर्यामी जाणवणाऱ्या पोकळपणा पासून पलायनाची, आपली धडपड, म्हणजेच प्रयत्न होय.कर्म करणें,विचार करणे, विजय मिळवण्याचा प्रयत्न करणे, शक्ती संपन्न होण्याचा प्रयत्न करणे, इत्यादिमार्फत प्रत्यक्षातील वस्तुस्थितीवर बुरखा पांघरून हे पलायन होत असते . हेच आपले दैनंदिन अस्तित्व .माझी अपूर्णता मला कळली आहे .माझा अपुरेपणा मला जाणवत आहे .मी त्यापासून पळण्याचा तरी प्रयत्न करतो, किंवा तो भरून काढण्याचा तरी प्रयत्न करतो .हे पलायन ही टाळाटाळ हा पोकळपणा भरून काढण्याचा प्रयत्न म्हणजेच धडपड खटपट फरपट व प्रयत्न नाही काय? एखाद्याने पलायनाचा प्रयत्न केला नाही तर काय होते ?त्याला एकाकीपणा रिकामेपणा पोकळपणा यांच्यात राहावे लागेल .अशा एकाकीपणाचा, निवडशून्य स्वीकार केल्यावर, त्याला असे आढळून येईल, कि जिला धडपड खटपट यांच्याशी कांहीही कर्तव्य नाही ,अशी सृजनशीलता आपल्य़ाला प्राप्त झालेली आहे.आपण धडपडत असतो तोपर्यंतच प्रयत्न असतो .जर तुम्ही त्या एकाकीपणाला सरळ तोंड दिले,त्याला चुकविण्याचा घालविण्याचा प्रयत्न केला नाहीं,त्याचे निरीक्षण केले ,त्याचे विश्लेषण केले,त्याला टाळण्याची धडपड केल्याशिवाय, निवडशून्य स्वीकार केला, तर अशी एक स्थिती प्राप्त होते ,कि जिथे सर्व धडपडीला विराम मिळतो .ती स्थिती म्हणजेच सृजनशीलता .ही स्थिती प्रयत्नांचे फल नसते .
जे कांही आहे ते, म्हणजेच रिकामेपणा, पोकळपणा, अपूर्णता, असुरक्षितता, सुरक्षित असण्याची वासना, त्यासाठी श्रद्धा व ज्ञान यांच्या तटबंद्या, धडपड खटपट प्रयत्न फरफट हे सर्व जेव्हा समजावून घेतले जातात, व ज्या वेळेला त्या अपूर्णतेचा ,आपण झगड्या शिवाय ,निवड रहित, स्वीकार करतो, तिला पूर्ण समजावून घेतो, तिचे साक्षित्व करतो ,त्याच वेळेला सृजनशील सत्य, सृजनशील बुद्धी, यांचा उदय होतो. यास्थितीत फक्त आनंद असतो.
जिला आपण क्रिया म्हणतो ती खरी प्रतिक्रिया आहे .ती अखंड कांहीतरी होण्याची बनण्याची धडपड आहे .कांहीतरी होण्याची खटपट, म्हणजेच जे आहे ते नाकारणे, तिला टाळणे, समोरासमोर तोंड न देणे, तिचा निवड रहित स्वीकार न करणे, या रिकामपणाची पूर्णत्वाने, निवड रहित, धि:कार रहित ,समर्थन रहित, सदैव, अखंड, साक्षीत्व; म्हणजेच खरी समज होय.जे आहे ते समजणे, हीच खरी क्रिया आहे .ही क्रिया म्हणजेच सृजनशील अस्तित्व, कर्म करीत असताना, जर तुम्ही अखंड जागृत असाल, तर मी काय म्हणतो ते तुम्हाला सहज कळेल.प्रत्येक बारीक सारीक हालचालींचेही निरीक्षण करा. केवळ बाह्य हालचालींचे नव्हे तर तुमचे विचार, तुमच्या भावना, तुमच्या कल्पना, यांच्या सूक्ष्म हालचालीचे ,अखंड संपूर्ण साक्षित्व करा.तुम्ही या हालचालींबद्दल जागृत असाल, तर तुम्हाला असे आढळून येईल कि ,विचारप्रक्रिया म्हणजेच भावना व कर्म यांची हालचाल, कांहीतरी बनण्यावर आधारित आहे .कांहीतरी बनावे ही कल्पना असुरक्षिततेच्या जाणिवेतून निर्माण होते .ही असुरक्षिततेची जाणीव आपण पोकळ रिकामे अपुरे असल्याबद्दलच्या जाणिवेतून निर्माण होते .जर तुम्ही विचार व भावना यांचे साक्षित्व कराल ,त्यांच्या हालचालींबद्दल जागृत असाल,तर तुम्हांला असे आढळणून येइल कि, अंतर्यामी सतत युद्ध चाललेले आहे.जे कांही आहे ते बदलण्याचा, दुरुस्त करण्याचा, सुधारण्याचा, उलथून टाकण्याचा, अखंड प्रयत्न चाललेला आहे.कांहीतरी बनणे म्हणजेच प्रयत्न . प्रयत्न म्हणजेच जे आहे ते टाळणे.स्वज्ञानातून, अखंड जागृततेतून, निवडरहित साक्षित्वातून, तुम्हांला असे आढळून येईल, कि हे दुःख हा झगडा हा विरोध,यांची परिणती दुःख, क्लेश व अज्ञान यांत होत असते.जर तुम्ही आपल्या अपूर्णतेबद्दल जागृत असाल,आणि त्या अपूर्णतेत ती टाळण्याचा प्रयत्न न करता, तिचा संपूर्ण यथातथ्य स्वीकार करून रहाल,तर असामान्य, अवर्णनीय, शब्दातीत, जी कशाने बनवलेली नाही, जी कसली बेरीज वा वजाबाकी नाही, जी कुठच्याही प्रयत्नाचे फल नाही, आणि जी फक्त जे कांही आहे त्याच्या समजूतीतूनच निर्माण झालेली आहे, अशी निस्तरंगतता आपल्यारला प्राप्त झाली आहे असे तुम्हाला आढळून येईल. तेच सृजनशील सत्य. तीच सृजनशील बुद्धी.