प्रकरण१५ - विचार करणारा आणि विचार
जीवन हा एक अनुभव आहे.जीवन ही एक अनुभव मालिका आहे.असणे म्हणजेच संबंधरूप असणे.सर्व अनुभवात,पाहणारा अनुभवणारा कांही अनुभवत असतो ,कांही जमा करीत असतो, कांही नाकारीत असतो, कांही उणे करीत असतो .असे सर्वकाळ चाललेले असते.ही प्रक्रियाच चुकीची नाही काय ?जोपर्यंत अनुभवणारा व अनुभव अशा दोन प्रक्रिया आहेत तोपर्यंत सृजनशीलता कशी अस्तित्त्वात येणार ? जर ही प्रक्रिया चुकीची असेल तर ती आपण टाकून देऊ शकू काय ?हिच्या पासून आपण मुक्त होऊ काय ?मी विचार करणारा अनुभवतो असे न होता केवळ अनुभवच घेतो असे झाले पाहिजे.
विचार करणारा व विचार या दोन वेगवेगळ्या प्रक्रिया नसून, केवळ एकच प्रक्रिया आहे, याबद्दल मी जर अनुभव घेतला तर या चुकीच्या प्रक्रियेपासून मी स्वतंत्र होईन. मी या चुकीच्या प्रक्रियेबद्दल जागृत झालो पाहिजे.जोपर्यंत मी अनुभव घेत आहे तोपर्यंत मी कांहीतरी बनत आहे .तोपर्यंत द्वैत अपरिहार्य आहे .विचार करणारा व विचार हे अलग भासणारच.हे दोन वेगवेगळे घटक अस्तित्वात राहणारच.त्यांचे ऐक्य होऊ शकत नाही.
कर्म इच्छेने प्रेरित झालेले केंद्र ,असावे का नसावे अशा विरोधात सापडलेले केंद्र, कार्यरत राहणारच.हे द्वैत ही प्रक्रिया अस्तित्वात असणार. जोपर्यंत अनुभवणारा व अनुभव यात प्रयत्न विभागलेला आहे ,तोपर्यंत वस्तुस्थितीचा विपर्यास अपरिहार्य आहे .जेव्हा विचार करणारा हा पाहणारा(विचार करणारा ) नाही असे होइल ,विचार व विचार करणारा एकच आहे अशी अनुभूती येईल, तेव्हाच ऐक्य शक्य होईल .तूर्त विचार करणारा व विचार आणि अनुभवणारा व अनुभव अशा दोन स्थिती अस्तित्वात आहेत . आपला प्रयत्न यांना सांधण्याचा आहे.
कर्म करण्याची इच्छा द्वैत निर्माण करते .या कर्म इच्छेच्या पलीकडे जाऊन जिथे द्वैत नाही, जिथे दुभंगवणारी प्रक्रिया ऩाही,अशी स्थिती शोधून काढणे शक्य होईल काय?जेव्हा आपण विचार करणारा व विचार हे एकच आहेत असा प्रत्यक्ष अनुभव घेऊ तेव्हांच ती स्थिती सापडेल .आपली अशी कल्पना आहे की विचार करणारा व विचार ही दोन आहेत, परंतु प्रत्यक्ष स्थिती तशी आहे काय ?ती दोन आहेत अशी कल्पना करणे आपल्याला आवडते .तसे असेल तर विचार करणारा विचारातून स्पष्टीकरण देऊ शकेल .विचार करण्याचा प्रयत्न कांहीतरी जास्त बनणे किंवा कांहीतरी कमी बनणे असा असतो.तो कांहीतरी स्वीकारीत असतो किंवा कांहीतरी नाकारीत असतो.तो सारखा कांहीतरी बनत असतो.या बनण्यामध्ये,या झगड्यामध्ये,या विरोधामध्ये,या कर्म-इच्छेमध्ये, नेहमी वस्तुस्थितीचा विपर्यास असतो .आपण अत्यंत चुकीची प्रक्रिया अवलंबित आहोत .सत्य-प्रक्रिया ही नाही.विचार करणारा व विचार हे वेगवेगळे आहेत काय?ते निरनिराळे नाहीत .ते वेगळे आहेत असे समजून आपण जे जे कांही करतो ते फुकट जात आहे. वस्तुस्थितीचा विपर्यास केला जात आहे.आपले प्रयत्न फुकट जात आहेत .
मला जेव्हा आढळून येते की मी हांवरट आहे, वखवखलेला आहे,अधाशी आहे, क्रूर आहे, तेव्हा मी यांतील कांहीही असता कामा नये अशी इच्छा करतो .अगोदरचा विचार बदलण्याचा प्रयत्न केला जातो.
कांहीतरी निराळे बनण्यासाठी विचार केला जातो.विचार करणारा व विचार या दोन प्रक्रिया प्रत्यक्षात नसतानाही त्या तशा आहेत अशा माझ्या कल्पनेमुळे मी मृगजळाच्या पाठीमागे धावत असतो.विपर्यासाचे कारण चुकीच्या मूळ समजामध्ये आहे असे मला वाटते .
जिथे फक्त एकच स्थिती आहे, जिथे विचार करणारा व विचार हे दोन नाहीत अशी स्थिती , प्रत्यक्ष अनुभवणे शक्य आहे काय ?अशी स्थिती जेव्हा आपण अनुभवू तेव्हाच सृजनशीलता म्हणजे काय ते आपल्याला कळेल.अशा स्थितीत मनुष्याचा प्रयत्न विपर्यास करणारा नासविणारा विनाश करणारा नसतो.
मी अधाशी आहे .मी व अधाशीपणा या दोन वस्तू नाहीत,त्या एकच आहेत,ती म्हणजे अधाशीपणा हे कळेल तर काय होईल ?आपला संपूर्ण दृष्टिकोनच बदलून जाईल.जेव्हां मी अधाशी आहे असे मला वाटते तेव्हा मी सामाजिक धार्मिक राजकीय कारणांसाठी अधाशी नसण्याचा प्रयत्न करतो .हा प्रयत्न नेहमीच वर्तुळातील असतो.या वर्तुळाची कक्षा कितीही वाढू शकेल परंतु शेवटी तिला कक्षा असतेच.यामुळे विपर्यासाचे कारण तिथेच असते.मी जेव्हा जास्त खोल व जास्त सूक्ष्म पाहतो, तेव्हा मला असे आढळून येते, कि प्रयत्न करणारा हा अधाशीपणाचे कारण नाही,तोच स्वतः अधाशीपणा आहे.या दोन वस्तू नसून मीच अधाशीपणा आहे असे मला आढळून येते .दोन्ही एकच आहेत असे जेव्हां आढळून येते तेव्हा समस्येचे स्वरूपच बदलून जाते .आपला जबाब सर्वस्वी वेगळा येतो आपला प्रयत्न विनाशकारक असत नाही.
जेव्हा तुमचे सर्व अस्तित्व व अधाशीपणा हे दोन नाहीत असे तुम्हाला आढळून येईल, प्रत्येक सूक्ष्म हालचाल अधाशीपणा आहे असे तुम्हाला आढळून येईल, तेव्हां काय होते ?दुर्देैवे करून आपण अशा प्रकारे कधी विचारच करीत नाही.नेहमी हा "मी" ही उच्च वस्तू, हा नियमन करणारा,हा ताबा ठेवणारा, अस्तित्वात असतो .मला ही प्रक्रिया चुकीची, नासविणारी,विनाशकारी, वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी वाटते. हे मृगजळ आहे.हा भास आहे.ही वस्तुस्थिती नाही.असे आपण कां करतो ते आपल्याला माहीत आहे .मी स्वतःला उच्च नीच अशा दोन स्थितीमध्ये दुभंगवितो याचे कारण सूत्रता टिकावी हे असते.जर फक्त अधाशीपणा असेल, अधाशीपणावर काम करणारा कुणी नसेल,मीच जर संपूर्ण अधाशीपणा असेन, तर मग काय होते ?या क्षणीच एक सर्वस्वी वेगळी प्रक्रिया चालू होते.एक वेगळीच समस्या अस्तित्वात येते. ही समस्याच सृजनशील असते. येथे "मी" ची जाणीव नसते .हा ताबा चालविणारा,हा हुकूम करणारा, हा जोरा चालविणारा,हा काहीतरी बनणारा नसतो.
जर आपण सृजनशील व्हायचे असेल तर ती स्थिती प्राप्त करून घेतली पाहिजे.त्या स्थितीत प्रयत्न करणारा नसतो .शब्दात रेखाटण्यासारखी ती स्थिती नाही.ती स्थिती काय आहे ते शोधून सापडण्यासारखे नाही.जर या दिशेने प्रयत्न कराल तर फक्त निष्फळता हाती येईल.शोधून प्रयत्न करुन ती स्थिती सापडण्यासारखी नाही .प्रयत्न करणारा व ज्या दिशेने प्रयत्न चालले आहेत ते दोन एकच आहेत हे समजले पाहिजे. हे समजणे महत्त्वाचे आहे. आपले मन उच्च व नीच अशा दोन स्थितींमध्ये स्वतःला कसे दुभंगविते, उच्च म्हणजे सुरक्षितता अमरत्व कसे असते .कितीही उच्च झाली तरी ती विचारप्रक्रिया कालातील असते .कालातीत व कालरहित नसते .हे सर्व समजण्यासाठी पराकोटीची तरल तत्पर जागृत समजशीलता लागते.जर तुम्ही हे सर्व प्रत्यक्ष अनुभवाने समजू शकला तर एक वेगळीच घटना अस्तित्वात येइल .