जेव्हा तुम्ही मनाचे निरीक्षण करीत असता, तेव्हा फक्त  तथाकथित वरच्या थराचेच निरीक्षण करीत नसून, तुम्ही सुप्त खोल थरांचेही निरीक्षण करीत असता.मन काय करीत असते ते तुम्ही पाहात असता.तुम्ही हेच करीत नसता काय?चवकशी करण्याचा संशोधन करण्याचा फक्त हाच एक मार्ग आहे .मनाने काय विचार केला पाहिजे, ते कसे असावे किंवा ते कसे असू नये, त्याने काय करावे किंवा काय करू नये,या गोष्टी तुम्ही मनाचे संशोधन करीत असताना मध्ये आणू नका.त्या मनावर लादू नका .या दृष्टिकोनातून मनाकडे पाहू नका .अशा दृष्टिकोनामुळे खरी चौकशी,खरी पाहणी, खरे संशोधन, खरा विचार, थांबविला जातो .त्याचप्रमाणे बुद्ध ख्रिस्त किंवा अ ब क ड  काय म्हणतो तेही मध्ये आणू नका .त्यामुळे खरी चौकशी खरा विचार खरे संशोधन थांबविले जाते. 
                    
श्रेष्ठता व श्रेष्ठता पूजा यापासून सावध राहिले पाहिजे .जर तुम्हाला या "मी"ची माझ्याबरोबर चौकशी करायची असेल, जर "मी"चे संशोधन करायचे असेल, तर या सर्व चकव्यापासून आपण सावध राहिले पाहिजे.         
                  
मनाचे कार्य काय ?हे शोधून काढण्यासाठी आपण सतत मन काय करीत असते ते अखंड पाहिले पाहिजे .तुमचे मन नेहमी काय करीत असते ? ते स्वत: विचार करीत नसते काय?विचार जाणून बुजून केलेला असेल किंवा अजाणता सहज केलेला असेल .परंतु विचार नाही तर मन नाही अशी स्थिती नाही काय ?जोपर्यंत मन विचार करीत नसते तोपर्यंत जाणीव नाही अशी स्थिती नसते काय ?जे मन आपण दैनंदिन जीवनात वापरीत असतो, व ज्या मनाबद्दल आपल्यापैकी बरेचजण जागृत नाहीत(सुप्त मन) असे मन, नेहमी सर्व समस्यांबद्दल काय करीत असते, ते पहिले पाहिजे. ते जसे असणे आपल्याला आवडेल तसे नव्हे.              जे मन आपल्याला माहीत आहे(प्रगट व सुप्त ),जे मन नेहमी  कार्यमग्न असते ते काय आहे ? मनाची प्रत्येक हालचाल स्वयंकेंद्रित वेगळी पाडणारी नसते काय ?मुळात विचार हा वेगळा पाडणारा नसतो काय?विचार हा धारणेनुरूप म्हणूनच एकांगी व वेगळा पाडणारा,तरीही संघटनेची,सगळ्यांना एकत्र आणण्याची इच्छा बाळगणारा, असा नसतो काय?जर तुम्ही  स्व-विचार-प्रक्रिया पाहाल तर तुम्हाला असे आढळून येईल कि ती नेहमीच एकांगी,कोंडी करणारी, कोंडी वाढवणारी, कोंडी राखणारी, असते .विचार ही एक प्रतिक्रिया आहे किंवा प्रतिक्रियेनुसार तुम्ही विचार करता असे म्हणता येईल.
                    
प्रतिक्रिया ही संस्कार, स्मरण, श्रद्धा, अनुभव,ज्ञान, थोडक्यात तुमची धारणा, तुमची पार्श्वभूमी, यावर अवलंबून असते .या बरहुकूम तुमची प्रतिक्रिया नसते काय?यापेक्षा वेगळा जबाब कधीतरी असणे शक्य आहे काय?मूलगामी क्रांती पाहिजे असे मी म्हटले तर तुम्ही लगेच एक जबाब देता .जर तुमच्याजवळ आत्मिक किंवा इतर काही उत्तम  गुंतवणूक असेल तर तुम्ही क्रांती या शब्दाला लगेच विरोध करता .क्रांती म्हणजे तुम्हाला खून खराबा वगैरे वाटतो.अशाप्रकारे तुमची प्रतिक्रिया,तुमच्या श्रद्धा,तुमचे ज्ञान, तुमचे पूर्वग्रह, तुमचे अनुभव,यावर अवलंबून असते.ही अगदी उघडउघड व सहज समजणारी स्थिती आहे. प्रतिक्रिया निरनिराळ्या प्रकारच्या असतात.तुम्ही म्हणता "मला बंधुभावाने वागले पाहिजे""मला लोकांशी सख्य केले पाहिजे"."मला लोकांवर प्रेम करता आले पाहिजे"."मला सर्वांशी मित्रत्व जोडता आले पाहिजे""मला प्रेमळ झाले पाहिजे" वगैरे वगैरे.या सर्व प्रतिक्रिया आहेत. परंतू विचारप्रक्रिया हीच मुळी एकांगी, कोंडी करणारी, वेगळे पाडणारी, नाही काय?तुम्ही आपल्या मनाची प्रक्रिया पहात आहात.तुम्ही मन कार्यमग्न असताना पहात आहा.म्हणजेच तुम्ही तुमच्या श्रद्धा, तुमचे अनुभव, तुमचे ज्ञान, पाहात आहा.
                   
श्रद्धा ज्ञान व अनुभव सुरक्षितता निर्माण करत नाही काय ?यामुळे सुरक्षित वाटत नाही काय ?या सर्वामुळे विचारप्रक्रिया मजबूत होत नाही काय ?ही सर्व प्रक्रिया 'मी" "अहम्" मग तो तुमच्या कल्पनेप्रमाणे कदाचित फार उच्च असेल किंवा नीच असेल दृढ करीत नाही काय ?आपले सर्व धर्म, आपल्या सर्व सामाजिक  नियमावली, आपले सर्व कायदेकानू,व्यक्तीला पुष्टी देत नाहीत काय?या सर्वामुळे व्यक्तीची अहंपणाची वेगळेपणाची प्रक्रिया मजबूत होत नाही काय ?(याच्या विरुद्ध म्हणजे साम्य प्रणीत सरकार होय .या पद्धतीत व्यक्तीला काडीचेही महत्त्व नसते ).
                      
जर तुम्ही सुप्त मनात खोल शिराल तर तिथेही हीच प्रक्रिया (अहम् मजबूत करण्याची प्रक्रिया )चालू असलेली तुम्हाला आढळून येईल.सुप्त मन म्हणजे तुमची भोवतालची परिस्थिती, हवामान, समाज, आईवडील, आजोबा, आजी, वगैरे वगैरेचे एकीकृत संस्कार मिश्रण होय.इथेही पुन्हा व्यक्ती म्हणून, मी म्हणून, वैशिष्टय़ राखणे वगैरे सर्व काही चालू असते .             
                       
मनाचे कार्य जे कांही आपल्याला माहीत आहे, ज्याप्रमाणे ते रोज वागत असते, ते वेगळे पाडणारे नाही काय ?तुम्ही स्वत:पुरती मुक्तीची इच्छा करीत नाही काय?लोकांची खरोखरच तुम्हाला पर्वा आहे काय?तुम्ही भविष्यकाळी मरणोत्तर कांही तरी बनण्याची इच्छा करीत नाही काय?किंवा याच आयुष्यात कुणीतरी मोठा लेखक मोठा पुढारी मोठा वक्ता मोठा मनुष्य बनण्याची तुमची इच्छा वासना नाही काय ? आपला मुळी सगळा कलच एकांगी, वेगळे पाडणारा, कोंडी करणारा,स्वतःपुरता असतो .मनाला एकांगी विचार न करणे,स्वतःपुरता वेगळा विचार न करणे, वर्तुळा शिवाय विचार करणे, शक्य आहे काय?ही अशक्य गोष्ट आहे .विचाराचे मनाचे स्वरूपच मुळी आकारयुक्त आहे.ते निराकार कसे काय बनणार ?म्हणूनच आपण मनाची पूजा करीत असतो .त्याबद्दल भक्तिभाव बाळगीत असतो .आपण खुशाल त्यावर विश्वास टाकतो .आपण त्यावर विसंबून असतो .मन ही आपल्याला अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे .तुम्ही जरा जास्त धूर्त, हुषार, मुत्सद्दी, जागृत, तत्पर, सावध, किंचित ज्ञानी, असला की समाजात किती महत्त्वाचे होता ते तुम्हाला माहित नाही काय? बुद्धीने श्रेष्ट असलेले वकील, डॉक्टर,प्राध्यापक, शास्त्रज्ञ, वक्ते, महान लेखक, तत्त्ववेत्ते, संशोधक संस्थापक, या सर्वांबद्दल आपणाला केवढा भक्तिभाव असतो .तर तुम्ही आजपर्यंत फक्त मन व बुद्धी यांचीच मशागत केली आहे.                       
मनाची हालचाल हीच मुळी वेगळी पाडणारी आहे .तसे नसेल तर मनच अस्तित्वात नसते.अनेक शतके ही सवय बाळगल्यानंतर आपल्याला असे आढळून आले आहे कि आपण लोकांशी सहकार्य करू शकत नाही.आर्थिक,सामाजिक, धार्मिक,राजकीय,इ. सत्तेच्या भीतीनेच आपण नाइलाज म्हणून,शिस्तपालन म्हणून,अपरिहार्यतेने सहकार्य करू शकतो.ही वस्तुस्थिती आहे. केवळ वरवर नव्हे, तर अंतर्यामी सुप्त खोल थरातही,आपल्या हेतूत आपल्या हालचालीत  जिकडे तिकडे ही वेगळे पाडणारी,वेगळे राखणारी, प्रक्रिया अखंड अविरत चालू आहे .किंबहुना मानसिक हालचाल म्हणजेच वेगळीक अशी वस्तुस्थिती आहे .दुसरी काही हालचाल आपल्याला माहिती नाही.अशा परिस्थितीत आपण खरेखुरे सहकार्य कसे काय करणार आहोत ?काहीही करण्यासाठी एकत्र येण्याची बुद्धी कशी काय अस्तित्वात येणार ?हे जवळजवळ अशक्य आहे आणि म्हणूनच जातीय धार्मिक राजकीय सामाजिक इ. संस्था व्यक्तींना शिस्त लावून बंधनात ठेवून एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहेत .यामुळे जर आपण एकत्र यायचे असेल, सहकार्य करायचे असेल, तर शिस्त अपरिहार्य व महत्त्वाची बनली आहे .             
                    
ही वेगळेपणाने विचार करण्याची प्रक्रियाच हा "मी" हा "अहम्" दृढ करणारी आहे ."मी"ला महत्त्व देणारी प्रक्रिया व्यक्तिरूपाने किंवा संघटित रूपाने प्रगट झालेली दिसते .जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत शांती अशक्य आहे .सतत झगडे भांडणे दुःखे युद्धे क्लेश विरोध अपरिहार्य आहेत .ही वेगळे पाडणारी विचारप्रक्रिया कशी संपुष्टात आणता येईल ही आपली समस्या आहे .विचार म्हणजेच शब्दीकरणप्रक्रिया व प्रतिक्रिया प्रक्रिया असे असताना विचार कधीतरी "मी" "अहम्" नष्ट करू शकेल काय?विचार म्हणजेच प्रतिक्रिया.प्रतिक्रिया धारणेवर अवलंबून असते.त्यामुळे विचार नेहमीच जुनाट असतो .तो सृजनशील असूच शकत नाहीं. विचार सर्वांगीण असू शकत नाही.विचार एकांगीच राहणार.विचार म्हणजेच एकांगीपणा वेगळेपणा होय.असा हा विचार स्वतःला कधीतरी तिलांजली देऊ शकेल काय?आपण हेच शोधून काढण्याचा प्रयत्न करणार आहोत.मी जेव्हा म्हणतो मला शिस्त पालन केले पाहिजे. मला जास्त योग्य रित्या विचार केला पाहिजे .मला एक अमुकअमुक बनले पाहिजे.या प्रत्येक क्षणी या प्रत्येक हालचालीत विचार स्वतःला एक विशिष्ट आकार देण्याचा, कांहीतरी शिस्त पालन करण्याचा,कांहीतरी बनण्याचा, किंवा न बनण्याचा, प्रयत्न करीत नाही काय ?ही सर्व प्रक्रियाच मुळी एकांगी वेगळे पाडणारी नाही काय?यामुळे एकीकृत शुद्ध बुद्धी कधीच अस्तित्वात नसते .तिची आपल्याला ओळख सुद्धा नाही.जर अशी शुद्ध बुद्धी असेल तरच खरे सहकार्य होऊ शकेल.  
                      
विचाराचा शेवट तुम्ही कसा काय करणार आहात ?किंवा जास्त योग्य शब्दात मांडावयाचे म्हणजे कोंडी करणारा, कोंडी राखणारा, कोंडी वाढविणारा,कोंडी दृढ करणारा,वेगळे पाडणारा, एकांगी विभागाश: विचार करणारा, असा विचार आपण कसा काय संपुष्टात आणणार आहोत .वेगळा पाडणारा विचारच आपल्याला ज्ञात आहे .तुम्ही आता काय करणार आहात ?तुम्ही तुमच्या तथाकथित शिस्तीने त्याचा नाश करू शकता काय?अनेक वर्षे तुम्ही प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही यशस्वी झालेले नाहीत .नाही तर येथे माझ्यापुढे तुम्ही दिसलेच नसतेत.कृपा करून शिस्त प्रक्रिया लक्षात घ्या.शिस्त प्रक्रिया ही विचार प्रक्रिया आहे .त्यामध्ये  इतरांकडून  शरणागती घेण्याची,इतराना शरण आणण्याची, प्रवृत्ती अाहे. शिस्त ताबा जोरा दुसऱ्यांना अंकित करण्याची वृत्ती हे सर्व काही शिस्तप्रक्रियेत आहे .ही सर्व प्रक्रिया सुप्त थरावर परिणाम करीत असते .जसजसे तुम्ही वृद्ध होत जाल तसतसे ते दृग्गोचर  होऊ लागते .अनंत काळ शिस्तपालन करून आता तरी तुमची खात्री पटली असावी कि शिस्त पालनाने "मी" "अहम्" कधीही नष्ट होणार नाही .शिस्त म्हणजे कांहीतरी बनणे होणे होय.म्हणजेच "मी"चे बळकटीकरण होय .मी ला पुष्टी देणे होय.असे असूनही तुमचे सर्व धर्म,सर्व मार्ग,सर्व पूजाभाव,सर्व पंथ, हे शिस्तीला शिस्तपालनाला महत्त्व देत आहेत .ज्ञान कधीतरी "मी" नष्ट करू शकेल काय? श्रद्धा कधीतरी "मी" नष्ट करू शकेल काय ?दुसर्‍या शब्दात विचारायचे म्हणजे आपण तूर्त करीत असलेल्या कर्मापैकी, करीत असलेल्या हालचालीपैकी,कुठलीही हालचाल "मी"च्या मुळापर्यंत जाऊन पोचू शकेल काय?विचार प्रक्रिया ही प्रतिक्रिया प्रक्रिया असल्यामुळे ती एकांगी असणे अपरिहार्य आहे.हा सर्वच अपव्यय नाही काय?विचार विचारांचा नाश करू शकत नाही, हे जेव्हा तुम्हाला खरोखरच खोलवर जाणवते, मूलत: समजते, तेव्हा तुम्ही काय करता?मग काय होते पहा!.तुमच्यावर अखंड जागृत पहारा करा . स्वनिरीक्षण करा.जेव्हा तुम्ही या वस्तुस्थिती  बद्दल पूर्ण जागृत होता,तेव्हा काय होते?
                      
विचार प्रक्रिया ही प्रतिक्रिया प्रक्रिया आहे .प्रतिक्रिया प्रक्रिया ही धारणा आव्हान प्रक्रिया आहे . धारणा ही नेहमीच भूतकाळावर आधारित असते .ती आकार युक्त असते .ती एकांगी असते .म्हणूनच विचार हा वेगळे पाडणारा एकांगी "मी"चे दृढीकरण करणारा असतो .म्हणूनच धारणेतून, धारणा बदलून, सुरुवातीला किंवा शेवटाला, कुठेही स्वातंत्र्य असणे शक्य नाही .हे तुम्हाला उमजेल,तेव्हा स्वातंत्र्य हे नेहमी सुरुवातीलाच असते शेवटाला नाही हे लक्षात येईल .              कुठलीही प्रतिक्रिया ही आकारयुक्त असते.ही प्रतिक्रिया पुन्हा स्वतःला काही आकार देते .आणि म्हणूनच "मी"ला प्रत्येक  प्रतिक्रियेने जीवदान दिले जाते. "मी"चे "अहम्"चे सातत्य वेगवेगळ्या मार्गांनी आणि तर्‍हानी प्रत्येक विचारप्रक्रियेने टिकविले जाते.हे जेव्हा तुम्हाला उमजते तेव्हा खरे काय होते ? ही वस्तुस्थिती तुम्हाला स्पष्टपणे कळली पाहिजे .
                   
श्रद्धा ज्ञान शिस्त अनुभव याद्वारे फल प्राप्तीच्या इच्छेने झालेली कुठलीही प्रक्रिया ही एकांगी आहे .त्याचप्रमाणे अाशा, निराशा, ध्येय,काहीतरी या किंवा मरणोत्तर जीवनात बनण्याची इच्छा,होण्याची इच्छा,असण्याची इच्छा किंवा नसण्याची इच्छा, ही सर्व एकांगी आहेत .वेगळे पाडणारी आहेत ."मी"ला दृढ करणारी आहेत ''अहम्" ला वाढवणारी आहेत."मी"चे सातत्य राखणारी आहेत.यामुळे अपरिहार्यपणे विनाश हाल दुःख क्लेश  संकटे युद्धे येतात.आणि कोणत्याही संघटित क्रियेने मग तो साम्यवाद असो ,किंवा तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये बंदिस्त करण्याची भीती असो,किंवा आणखी काही असो,यापासून पळवाट नाही हे तुम्हाला जेव्हा खरोखरच समजते, उमजते , कळते ,तेव्हा काय होते ?या वस्तुस्थिती बद्दल तुम्ही खरोखरच जागृत आहात काय ?मी काय म्हणतो ते तुम्हाला कळले आहे काय ?"हे असे आहे" "ही माझी समस्या आहे" "बरोबर इथेच मी आहे" "मी जाणतो" "श्रद्धा ज्ञान व शिस्त काय करू शकतात हे मला माहित आहे""ध्येयाने प्रेरित  होउन काय साध्य होते ते मला माहित आहे".असे "मी" "मी" म्हणणारे मन कुठल्या स्थितीत आहे?श्रद्धा ज्ञान विचार यांनी "मी"ला बळकट केलेले नाही काय?जर तुम्ही हे खरोखरच पाहाल समजाल तर एक वेगळीच प्रक्रिया सुरू झाली आहे असे समजा.                       

आपण बुद्धीचे मार्ग जाणतो.प्रेमाचे मार्ग आपल्याला माहीत नाहीत. ते आपल्याला आकलन होत नाहीत. प्रेमाचे मार्ग बुद्धीतून समजणे अशक्य आहे.बुद्धी तिच्या सर्व पैलूसहित,गोतावळ्यासकट,वासना इच्छा धडपड या सकट, संपुष्टात आली पाहिजे.तेव्हाच प्रेमाचा उदय होईल .जेव्हा तुम्ही खरोखरच प्रेम करीत असता तेव्हा स्वतःला विसरलेले असता.अशावेळी तुम्ही खरोखरच सहकार्य करता हे तुम्हाला माहित आहे काय ? जेव्हा तुम्ही उच्च विभूती म्हणून नव्हे,तुम्ही उच्चस्थानी आहात म्हणून नव्हे,तर तुम्ही जेव्हा स्वतःला खरोखरच विसरून प्रेम करीत असता, तेव्हा उच्च शुद्ध बुद्धी अस्तित्वात असते .जिथे तुमचे लागेबांधे अडकलेले आहेत, म्हणजे जिथे तुम्ही विसरल्या सारखे भासता, परंतु प्रत्यक्षात विसरलेले नसता,फक्त समरसतेतून काढलेली ती एक पळवाट असते.तिथे शुद्ध बुद्धी खरे प्रेम नसते .ती फक्त भीतीतून निर्माण झालेली पिळवणुक असते.आपल्याला माहीत असलेले मन जेव्हा नष्ट होईल तेव्हाच खर्‍या प्रेमाचा उदय होईल.  यासाठी मनाची संपूर्ण प्रक्रिया व तिचे कार्य तुम्ही समजावून घेतले पाहिजे.             
                      
जेव्हां एकमेकांवर प्रेम कसे करावे हे तुम्हाला माहीत होईल तेव्हाच सहकार्य शक्य होईल .तेव्हांच शुद्धबुद्धी कार्यरत होईल.कुठच्याही समस्येवर एकत्र कसे यावे ते आपल्याला समजेल . तेव्हा आणि तेव्हाच परमेश्वर म्हणजे काय?सत्य म्हणजे काय? हे शोधणे शक्य होईल .तूर्त आपण सत्य, परमेश्वर, बुद्धीतून, अनुकरणातून, शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. ही केवळ विभुती पूजा आहे.जेव्हा "मी"ला पूर्णपणे समजावून घेऊन अशाप्रकारे तुम्ही त्याला फेकून देऊ शकाल तेव्हा आणि तेव्हाच अनादि अनंत अगणित कालरहित कालातीत असे जे काही आहे ते अस्तित्वात येईल .शोधून तुम्हाला ते कधीही सापडणार नाही .ते तुम्हांला  शोधीत आले पाहिजे.तुम्ही त्याच्याकडे जाऊ शकत नाही. तेच तुमच्याकडे येते .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel