विचाराने आपल्या समस्या कधी सोडविलेल्या नाहीत आणि त्या कधी सुटतील असे मला वाटत नाही .सर्व गोंधळातून गुंतागुंतीतून बुद्धी आपल्याला मार्ग दाखवील असा विश्वास अापण नेहमीच ठेवला आहे .बुद्धी जितकी जास्त तरल, जास्त गूढ, जास्त वेडीवाकडी, जितकी विद्रुप, तितक्या प्रणाली कल्पना व पद्धती वेगवेगळ्या व जास्त जास्त असतात.कल्पना कधीही मानवी समस्या सोडवू शकत नाहीत.त्यांनी त्या कधी सोडवलेल्या नाहीत आणि कधी त्या सोडवू शकणारही नाहीत .मन हीच एक समस्या आहे .मन ज्याला ज्याला स्पर्श करते ते ते समस्या बनते.अशी वस्तुस्थिती आहे.आपण मात्र मन सोडून सर्व गोष्टी समस्या समजत असतो आणि मनाने त्या सोडविण्याचा प्रयत्न करीत असतो.
                    
 मन हीच एक समस्या आहे असे कळल्यावरहि आपण ती मनानेच सोडविण्याचा प्रयत्न करीत असतो.समस्या ही सोडवून कधी सुटत नसते.उलट ती जास्त गुंतागुंतीची बनत जाते .मनाने कधीही उत्तर सापडणार नाही.(त्याशिवाय आपल्या जवळ  दुसरे कांही साधन नाही ).विचारानी कधीही प्रश्न सुटू शकणार नाहीत.विचारांचा मार्ग समस्येतच उलटसुलट फिरत राहतो.तो समस्यांच्या पलीकडे जात नाही.विचार करणे म्हणजे काय हे समजणे फार महत्त्वाचे आहे असे मला वाटते .हे समजून घेऊनच आपण कदाचित विचारातीत होण्याची शक्यता आहे.जेव्हा अापण विचारातीत होऊ ,जेव्हा विचार पूर्णपणे थांबेल ,तेव्हाच आपल्या सर्व समस्या सुटण्याची शक्यता आहे .तेव्हा समस्याच शिल्लक राहणार नाहीत .                     
 
 विचारानी आपले प्रश्न सुटलेले नाहीत.समस्या म्हणजे संबंध. आपल्या समस्या मानवी समस्या म्हणजे,  एकमेकांशी असलेली चराचराशी असलेली कल्पनांशी असलेली संबंधरूपता होय.समस्या याहून वेगळ्या नसतात .या संबंधांशिवाय दुसरी कुठलीही समस्या असणेच शक्य नाही .मोठमोठे विचारवंत, तत्त्वज्ञानी, राजकीय पुढारी, समाजधुरीण,पंडित, विद्वान, कोणीही या समस्या आतापर्यंत सोडवू शकलेले नाहीत. आत्तापर्यंत आपण मन व बुद्धी यांचा वापर समस्या सोडवण्यासाठी केलेला आहे .मन व बुद्धी ही समस्या सोडविण्याची साधने आहेत, असे आपल्याला आजपर्यंत वाटत आलेले आहे.आपल्याला उमेद आहे आपल्याला आशा आहे कि या साधनानी आज ना उद्या आपण सर्व समस्या सोडवू शकू.
                    
विचार कधीतरी समस्या वितळवू शकेल काय? विचार करा विचाराने कधी तरी समस्या सुटली आहे काय ?जेव्हा विचार प्रयोगशाळेत किंवा चित्र फलकावर नसतो तेव्हा तो स्वसंरक्षण स्वसंवर्धन व स्वनित्यअस्तित्व या दिशेने प्रवास करीत असतो.विचार हा नेहमीच स्वयंकेंद्रित नसतो काय ?  विचार हेही एक कर्मच नव्हे काय ?आणि असा विचार स्वतःच निर्माण केलेले प्रश्न सोडवू शकेल काय ?मन स्वतःच निर्माण केलेले प्रश्न स्वतःच पुढे आणलेल्या समस्या कधीतरी सोडवू शकेल काय ? 
                      
विचार करणे , तुमची प्रतिक्रिया, धारणेवर अवलंबून असते. ही एक प्रतिक्रिया आहे .मी तुम्हाला एखादा प्रश्न विचारला तर तुम्ही धारणेनुसार उत्तर देता.तुमच्या जबाबाचा आकार तुमचे स्मरण, संस्कार, पूर्वग्रह ,अनुभव, वय, वातावरण, हवामान, इतर सर्व काही यावर अवलंबून असतो .तुमचे उत्तर त्याप्रमाणे येते . तुमची प्रतिक्रिया धारणेवर अवलंबून असते.तुमचे विचार धारणेबरहुकूम असतात.या सर्व कर्मात(विचारात,विचार हेही एक कर्म आहे)  या सर्व धारणेचे केंद्र"अहम्" "मी" "स्वार्थ" हे असते.जोपर्यंत ही पार्श्वभूमी समजून घेतलेली नाही ,जोपर्यंत ही विचारप्रक्रिया लक्षात आलेली नाही ,जोपर्यंत "अहम्" "मी" "स्वार्थ" समजून घेतलेला नाही,जोपर्यंत अशाप्रकारे समजण्यातून त्याला तिलांजली दिलेली नाही,तोपर्यंत विचार, कल्पना, भावना,  कर्म, यासर्वामध्ये आत व बाहेर, विरोध झगडा दुःख क्लेश हे अपरिहार्य आहेत.
                   
कोणतेही उत्तर कुणाही बुद्धिमंतांनी केवढाही विचार करून काढलेले असले तरी ते तुमच्या वागण्याच्या पद्धतीला,मानवा मानवातील तुमच्या माझ्यातील विरोधाला, पूर्णविराम देऊ शकत नाही. हे सर्व समजून जाणून ओळखून घेऊन,विचार कसा उत्पन्न होतो, विशिष्ट विचारच का उत्पन्न होतो त्याबद्दल जागृत होऊन, आपण असे विचारू शकतो कि विचार कधीतरी संपुष्टात येणे शक्य आहे काय?            
                 
ही खरी समस्या आहे हीच खरी समस्या नाही काय ?विचार कधीतरी प्रश्न सोडवू शकतो काय़ ?तुम्ही विचारांनी कधीतरी समस्या सोडवू शकले आहात काय ? आर्थिक सामाजिक धार्मिक राजकीय कुठलीही समस्या विचारानी सुटू शकली आहे काय़?आपल्या दैनंदिन जीवनात आपण जो जो एखाद्या समस्येबद्दल जास्त जास्त विचार करतो तो तो ती जास्तच कठीण जास्तच गुंतागुंतीची व जास्तच अनिश्चित बनत जात नाही काय?असाच तुमचा अनुभव नाही काय ?ही रोज आढळणारी घडणारी गोष्ट नाही काय ?एखाद्या समस्येचा निरनिराळ्या बाजूंनी विचार करून ,तुम्ही ती समस्या एखाद्याकडून चांगल्या प्रकारे समजावून घेऊ शकाल,  पण विचाराने कधीतरी समस्या सर्व बाजूंनी सर्व पैलू सहित संपूर्णपणे अंतर्बाह्य़ एकाचवेळी पहाता येणे शक्य आहे काय ?ती नेहमीच विभागश:पाहता येते .अर्थातच उत्तरही विभागाश: असते. अर्धवट उत्तर हे संपूर्ण उत्तर होउ शकत नाही.म्हणूनच ती खरी पद्धत नाही ते योग्य उत्तर होत नाही.            
                    
जो जो जास्त विचार करावा, जो जो जास्त संशोधन करावे, जो जो जास्त स्पष्टीकरण व चर्चा करावी, तो तो समस्या जास्तच बिकट जास्तच कठीण व जास्तच गुंतागुंतीची होत जाते.समस्येकडे एकाचवेळी संपूर्णपणे पाहणे समजावून घेणे व उत्तर शोधून काढणे शक्य आहे काय ?हे कसे काय शक्य आहे? आपली खरी अडचण हीच आहे.अशी माझी समजूत आहे .आपल्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत .लहान मोठी युद्धे भूकबळी धर्मबळी पक्षबळी पंथबळी सिद्धांतबळी अभिनिवेश बळी सर्व काही आहे हे सर्व एकाच वेळी संपूर्णपणे आपण कसे काय समजून घेणार आहोत .जर आपण समस्या संपूर्णपणे बघितली तरच ती संपूर्णपणे सुटण्याची शक्यता आहे .जोपर्यंत आपण विभागाश: छाननी करीत आहोत तोपर्यंत समजही व उत्तरही अर्धवट असेल .विचारातून पाहणे हे नेहमीच आकारयुक्त असते .ते विभागश: असते. मग संपूर्ण अवलोकन संपूर्ण समज संपूर्ण उत्तर संपूर्ण सोडवणूक कशी काय शक्य आहे ?"मी" "अहम्" "स्वार्थ" "स्वतः" याने धारणेतून,परंपरेतून, पूर्वग्रहातून,आशेतून, निराशेतून,  निर्माण केलेला विचार जेव्हा लय पावेल तेव्हाच हे शक्य होईल.हा "मी" छाननी करून नव्हे विश्लेषण करून नव्हे पण जसा आहे तसा फक्त समजणे, त्याबद्दल एक विचारप्रणाली म्हणून नव्हे, तर एक वस्तुस्थिती म्हणून जागृत असणे शक्य आहे  काय? हा "अहम्" नष्ट करण्याच्या इच्छेने नव्हे,आशेने नव्हे, तर फक्त तो जसा आहे तसे पाहणे, तो कार्यमग्न असताना सदैव जागृत असणे, शक्य आहे काय ?फल प्राप्तीच्या इच्छेने नव्हे तर तो जसा आहे तसा पाहणे ,तो कार्यमग्न असताना सदैव जागृत असणे, शक्य आहे काय?त्याचा नाश किंवा उत्तेजन यातील कुठच्याही सुप्तसुद्धा वासनेशिवाय,फक्त पाहणे शक्य होईल काय?हीच खरी समस्या आहे असे तुम्हाला वाटत नाही काय?हे "अहम्" हे "केंद्र" सत्ता, प्रतिष्ठा, मान,अस्तित्व, सूत्रता, संरक्षण, संवर्धन,अखंडत्व, यांचे हे केंद्रच जर अस्तित्वात नसेल तर सोडविण्यासाठी कुठचीही समस्याच शिल्लक राहणार नाही.     
                 
"अहम्" हीच एक समस्या आहे.ही समस्या विचार सोडवू शकणार नाही. विचाराशी  जिचा कांहीही संबंध नाही,जी विचारातून निर्माण झालेली नाही,अशा प्रकारची एक अखंड जागृतता,आवश्यक आहे.समर्थन किंवा धि:कार याशिवाय या "अहम्" च्या  कार्याबद्दल प्रतिक्षणी अखंड जागृतता आवश्यक आहे. अलिप्त हेतुरहित जागृतता पाहिजे.अशी खरी जागृतताच पुरेशी आहे.जर तुम्ही समस्या सोडविण्याच्या, बदल घडवून आणण्याच्या, सुप्त खोल हेतूने जागृत असाल, तर ती हालचाल "अहम्" च्या क्षेत्रातील आहे .ती जागृतता हेतुयुक्त व वासना युक्त आहे ,तिला फल प्राप्तीची इच्छा आहे ,म्हणूनच ती निष्फळ आहे .ती खरी जागृतताच नव्हे.ती आकारयुक्त आहे .ती विचारातून आलेली आहे .ते एक हेतुयुक्त कर्मच आहे .म्हणूनच तिला कर्ता आहे .ती खरी सुटका करणारी नाही.ती खरी सोडविणारी नाही .ती खरी मुक्तता देणारी नाही.ती खरी स्वातंत्र्य देणारी नाही .
                       
जो पर्यंत आपण स्पष्टीकरण ,छाननी,जागृतता, विचार, यातून कुठच्या ना कुठच्या फलाची इच्छा करीत आहोत, तोपर्यंत आपण विचाराच्या क्षेत्रात आहोत.या सर्व हालचाली "मी" "अहम" "स्वार्थ" यांच्या कुंपणातील आहेत .               
                       
जेव्हां ही कूट समस्या आपण पाहतो,जेव्हां ही अत्यंत गुंतागुंतीची जीवन समस्या आपण पाहतो, जेव्हां विचार प्रक्रियेबद्दल आपण संपूर्ण हेतुरहित जागृत असतो, जेव्हा विचारातून कांहीही निष्पन्न होत नाही,आपण कुठेही पोहोचत नाही ,आपल्या हाती कांहीही लागत नाही, हे जेव्हा आपल्या संपूर्णपणे लक्षात येते, खरोखरच जेव्हा हे खोलवर जाणवते, तेव्हा एक वेगळ्याच प्रकारची शुद्ध बुद्धी समजयुक्तता निर्माण होते.ती वैयक्तिक व सामाजिक कुठच्याही पातळीवरची नसते .व्यक्ती व समाज,व्यक्ती व जात, व्यक्ती व चराचर, व्यक्ती व देश,  व्यक्ती व कल्पना, व्यक्ती व सत्य,या सर्वातील संबंधरूप समस्याच संपुष्टात येते.
              
कारण नंतर जी व्यक्तिविशिष्ट आहे असेही नाही, नाही असेही नाहीं, अशा प्रकारची  फक्त बुद्धीच, फक्त पाहणे,तिथे असते.ही बुद्धीच आपल्या सर्व समस्या सोडवू शकेल असे मला वाटते .अशी स्थिती हे कुठल्याही प्रश्नाचे उत्तर नाहीं .हा कोणत्याही मार्गाचा शेवट ऩाही .ही फलप्राप्ती नव्हे. आपल्या विचार प्रक्रियेचे जेव्हां संपूर्ण आकलन होते, जाणिवेच्या केवळ प्रगट थरातीलच नव्हे तर त्याहून खोल महत्त्वाच्या सुप्त  थरातीलही हालचाल जेव्हा समजते, तेव्हा ही स्थिती अस्तित्वात येते.कुठलीहि समस्या समजण्यासाठी अत्यंत शांत स्थिर निस्तरंग मनाची आवश्यकता असते .विचार, कल्पना, धारणा, पूर्वग्रह, समजुती, यांचे अडथळे अाणल्याशिवाय पहाण्याला मन समर्थ पाहिजे.वस्तुस्थितीची धारणेनुरूप फरफट झाल्याशिवाय पहाण्याला मन समर्थ पाहिजे .हीच तर आपली खरी अडचण आहे .हा विचार, या कल्पना, हे मन, सारखे अडमडत असते .त्यामुळे खरी समज अशक्य  झाली आहे .जिथे तिथे वस्तुस्थितीचा विपर्यास चाललेला आहे.जेव्हा मला एखादी गोष्ट समजून घ्यावयाची असते तेव्हा मी फक्त पाहातो .मला त्यावर विचार करावा लागत नाही .मी फक्त पाहातो .ज्या क्षणी मी विचार करू लागतो त्या क्षणी मते कल्पना निर्णय पूर्वग्रह ही सर्व भुतावळ उभी रहाते. वस्तुस्थितीचा चिवडा होतो.माझी नजर जे पहायचे त्यावरून ढळते.मला वाटत राहते की जे पहावयाचे तेच मी यथातथ्य पाहात आहे .प्रत्यक्षात मी वस्तुस्थितीचा विपर्यास करीत असतो .मी वस्तुस्थितीची फरफट करतो .मी तिची धिंड काढत असतो .विचार म्हणजे कल्पना मते निर्णय पूर्वग्रह तुलना व समर्थन .विचार म्हणजे धारणेतून आलेला जबाब, विचार म्हणजे विपर्यास, यामुळे समस्यासमज समस्यासोडवणूक अशक्य होऊन बसते.दुर्दैवे करून आपल्यापैकी बहुतेक जणांना विचार आवश्यक होऊन बसला आहे . आपल्याला विचार आवश्यक वाटतो .विचार जरूर पाहिजे असे आपले मत आहे .विचार करण्याशिवाय मी जगू तरी कसा शकेन? विचार नाही तर मला अस्तित्व तरी कुठे राहिले ?कोरे मन असणे होणे शक्य आहे काय ?कोरे मन म्हणजे मूर्खपणा अशी आपली धारणा आहे.वरील प्रकारचा विचार सुद्धा आपण तडकाफडकी तत्परतेने भिरकावून देतो .आपली प्रतिक्रिया झिडकारून देण्याची असते.वस्तुत: जे मन निस्तरंग शांत आहे,जे स्वतःच्या विचारांनी ढवळलेले नाही, जे विचारातून समस्येकडे पहात नाही, जे कोरे आहे, जे लिप्त नाही, जे संपूर्ण सर्व बाजूंनी उघडे आहे,जे अडकलेले नाही, असे मनच अत्यंत सोप्या पद्धतीने सर्व समस्येकडे बघू शकते व ती सोडवूही शकते.अशा प्रकारे विचारामुळे फरफट झाल्या शिवाय, विपर्यासाविना पाहण्याचे सामर्थ्य असणे, हे खरे उत्तर आहे.यासाठी शांत व निस्तरंग मन पाहिजे.            
                  
असे मन प्रार्थना पंथ धर्म यमनियम शिस्त ताबा सक्ती इत्यादिकातून प्राप्त होत नाही .शिस्त ताबा इत्यादिकांशिवाय असे मन आपोआपच अस्तित्वात येते .प्रयत्न करून विचारांनी  प्रेरित होऊन असे "मन" अस्तित्वात येत नाही. संपूर्ण विचार प्रक्रियेचे जेव्हा संपूर्ण आकलन होते, जेव्हा मी कुठलीही स्थिती विपर्यासाविना पाहू शकतो, तेव्हाच ते अस्तित्वात येते .त्या निस्तरंग शांत स्तब्ध मनस्थितीतच खरे प्रेम प्रगट होते .आणि फक्त प्रेमच आपल्या सर्व समस्या सोडवू शकेल .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel