आपल्यापैकी बहुतेक जणांना वासना ही एक मोठी समस्या होऊन बसली आहे.मालमत्ता, सत्ता, प्रतिष्ठा, आराम, अमरत्व, अखंडत्व, आपल्यावर कुणी तरी प्रेम करावे,आपण कुणावर तरी प्रेम करावे, कांहीतरी कालातीत अविनाशी सुख प्राप्त व्हावे, अशा नाना प्रकारच्या वासना आपल्याजवळ असतात .आपल्यावर सत्ता गाजविणारी हुकूम सोडणारी आपल्यावर जोरा करणारी अशी ही काय चीज आहे ?आपल्याजवळ जे कांही आहे, किंवा जे काही आपण आहोत, त्यात आपण सुखी असावे ,असे मात्र मला मुळीच सुचवायचे नाही .~कारण आपल्याजवळ जे कांही आहे किंवा आपण जे कांही आहोत त्यात सुखी असावे ही सुद्धा एक वासनाच आहे.
वासना म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत .वासनेचा आपण फक्त विचार करणार आहोत . ती समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत .खरा बदल खरी क्रांती हे समजून घेण्यानेच होईल .आणि हा बदल म्हणजे एका वासनेची दुसऱ्या वासनेच्या ठिकाणी प्रतिष्ठापना नव्हे.नेहमी हेच चालले नसते काय ?आपण सतत कधीहि न थांबता एका वासनेकडून दुसर्या वासनेकडे प्रवास करीत नसतो काय?अर्थात आपण प्रत्येक वेळी त्या त्या वेळच्या वासनेला जास्त उच्च जास्त श्रेष्ठ जास्त मंगल असे म्हणत असतो .कितीही शुद्ध झाली तरी वासना ही शेवटी वासनाच असते.या वासना प्रवासात शेवट नाही असा अखंड झगडा असतो .
तेव्हा वासना म्हणजे काय ,आणि त्यात मूलगामी बदल घडवून आणता येईल का, हे पाहणे महत्त्वाचे नाही काय? वासना हे काय आहे ?प्रतीक व संवेदना म्हणजेच वासना नव्हे काय ?इप्सित वस्तूंच्या प्राप्तीची होणारी इच्छा-संवेदना- म्हणजेच वासना नाही काय ?प्रतीक व संवेदना याशिवाय वासना असू शकेल काय ? प्रतीक एखादी वस्तू,व्यक्ती, चित्र, शब्द, नाम, मूर्ती ,एखादी कल्पना, किंवा आणखी कांहीही असू शकेल .आता या प्रतिकामुळे संवेदना निर्माण होते . मग मला वाटते की हे मला आवडते किंवा हे आवडत नाही .जर संवेदना सुखकारक असेल तर मला ते प्रतीक मिळवावयाचे असते बाळगायचे असते .नंतर अगदी घट्ट धरून ठेवायचे असते.आणि अशा प्रकारे त्या सुखाचा अखंड उपभोग घ्यायचा असतो .वेळोवेळी माझ्या कलाप्रमाणे, माझ्या आवडी निवडीप्रमाणे, माझ्या धारणेप्रमाणे, तीव्रतेनुसार , मी प्रतीक बदलतो. एकाच प्रकारच्या सुखाने मी शेवटी कंटाळतो दमतो वैतागतो त्रासतो आणि मग मी दुसरी संवेदना दुसरी कल्पना दुसरे प्रतीक यांचा शोध घेऊ लागतो .
जुनी संवेदना मी त्याज्य ठरवितो आणि नवी संवेदना ग्राह्य ठरवितो .नवे शब्द नवे महत्त्व नवा अनुभव यासाठी मी आसुसलेला असतो .मी जुन्याला विरोध करतो, आणि नव्याला शरण जातो.हे नवे जास्त भव्य दिव्य श्रेष्ठ उच्च जास्त संतोष कारक आहे असे मी समजतो. अशा प्रकारे वासनेमध्ये विरोध व शरणागती आणि त्यापासून लुलुपता व मग निष्फळता प्राप्त होण्याची भीती असते .जर मी माझी वासना प्रक्रिया संपूर्णपणे पाहीन, तर मला असे आढळून येते कि, कुठल्या तरी जड किंवा मनाने निर्माण निर्माण केलेल्या वस्तूंच्या पाठीमागे,आणखी आणखी संवेदना मिळविण्यासाठी मन धावत असते.या प्रक्रियेमध्ये विरोध, लुलुपता, आणि शिस्त अंतर्भूत असतात. पहाणे संवेदना सहवास आणि वासना अशी ही प्रक्रिया आहे .
मन हे नेहमी प्रक्रिया करीत राहणारे एक निर्जीव यांत्रिक हत्यार बनले आहे .या प्रक्रियेत प्रतीक, शब्द, किंवा वस्तू हे केंद्र बनते .या केंद्रा भवती सर्व वस्तू, सर्व वासना, सर्व इच्छा ,सर्व कल्पना, सर्व ध्येये, रचली जातात.हे केंद्र म्हणजे मी.ही भूक का ती भूक, ही इच्छा कि ती इच्छा, ही वासना कि ती वासना, हा प्रश्न नाही .हे संपूर्ण वासना केंद्रच, या वासना,तडफड, इच्छा, आशा, आकांक्षा, व यामध्ये अंतर्भूत असलेली निष्फळतेची भीती, ही सर्व ही इमारतच मी जमीनदोस्त करू शकेन काय?
जो जो "मी" निष्फळतचे जास्त जास्त तडाखे खातो तो तो हा "मी" बळकटच होत जातो .जोपर्यंत आशा आकांक्षा तृष्णा आहेत तोपर्यंत पार्श्वभूमीमध्ये भीती उभी आहे.हे सर्व प्रकरण "मी"चे बळकटीकरण करीत असते.पृष्ठभागावर नव्हे तर केंद्रात क्रांती झाली पाहिजे आणि ती शक्य आहे. पृष्ठभागावरील क्रांती ही क्रांतीच नव्हे .तो उथळ वरवरचा बदल असतो .त्याची परिणती खोड्याळ कर्मात होते .
जेव्हा मी या संपूर्ण वासना प्रक्रियेबद्दल जागृत होतो, तेव्हा मन हे एक मृत केंद्र बनले आहे ,मन हे एक नुसते स्मरण यांत्रिक प्रक्रिया केंद्र बनले आहे ,असे मला आढळून येते .एका वासनेचा कंटाळा आल्यावर मी दुसरी वासना धरतो .माझे मन हे नेहमी संवेदने मार्फत अनुभव घेत असते .मन हे केवळ संवेदना हत्यार आहे. संवेदना म्हणजेच प्रतिक्रिया ही नेहमीच जुनाट असते.भूतकाळावर ती आधारित असते. ती धारणेतून आलेली असते.एका संवेदनेचा कंटाळा आला की मी दुसऱ्या संवेदनेच्या पाठीमागे लागतो .ती संवेदना जरी सत्यदर्शन किंवा परमेश्वर प्राप्ती ही असली तरी शेवटी ती संवेदनाच .हे जग मी खूप पाहिले आहे .खूप अनुभवले आहे .मला या प्रवासाचा धडपडीचा तांत्रिकतेचा कंटाळा आलेला आहे.मला जी संपणारी नाही जिला शेवट नाही अशी शांती पाहिजे .मग मी प्रार्थना करतो ध्यानधारणा करतो व अशा प्रकारे शांतीचा अनुभव येण्यासाठी मनाला योग्य प्रकारचा आकार देण्याचा प्रयत्न करतो .त्या शांतीचा अनुभव हीही शेवटी संवेदनाच आहे .अशा प्रकारे माझे मन हे संवेदनेचे स्मरणाचे यांत्रिक हत्यार बनले आहे .ही धारणा, हा संस्कार संग्रह, हा स्मरण साठा, हे निर्जीव केंद्र आहे .
मी या केंद्रातून विचार करीत असतो .शेवटी विचार हेही एक कर्मच आहे .मी ज्या वस्तूंचा पाठलाग करतो ती मनाने आराखडा काढलेली असतात .ज्यांच्यापासून विशिष्ट संवेदना निर्माण होतात अशी प्रतिके असतात .परमेश्वर, प्रेम, सत्य,साम्यवाद, समाजवाद, लोकशाही, हुकूमशाही ,राष्ट्रीयत्व, धर्म,जात,भाषा,प्रांत,या अशा काही वस्तू आहेत, शब्द आहेत, की ज्यापासून मनाला विशिष्ट संवेदना निर्माण होतात .मग मन त्यांना चिकटते.आता मला व तुम्हाला हे माहीत आहे कि प्रत्येक संवेदनेला शेवट असतो. मग आपण एका संवेदने कडून दुसर्या संवेदनेकडे जातो . प्रत्येक संवेदना, संवेदनेचा पाठलाग करण्याची सवय दृढ करते .अशा तऱ्हेने मन हे संवेदना स्मरण यांचे हत्यार बनते .या प्रक्रियेमध्ये आपण सापळ्याप्रमाणे पकडले जातो .
जोपर्यंत मन आणखी अनुभव , आणखी अनुभव, अशा प्रकारे शोध घेत आहे,विचार करीत आहे, तोपर्यंत ते फक्त संवेदनात्मक दृष्टीतूनच विचार करीत आहे. कसलाही अनुभव असो शेवटी तो एक अनुभवच असतो. पुरे झाले हाही एक अनुभवच असतो .कुठल्याही जिवंत स्वयंभू सृजनशील नव्या अनुभवाला संवेदनेचे स्वरूप प्राप्त करून दिले जाते.या संवेदनेचा पाठलाग सुरू होतो .मग हे स्मरण बनते .कुठलाही अनुभव हा मृत असतो आणि अशा प्रकारे मन हे भूतकाळाचा निर्जीव साठा बनून रहाते.
आपण जर या प्रक्रियेचा सूक्ष्मपणे विचार केला असेल, तर आपली या प्रक्रियेशी नीट जान पहचान आहे, असे तुम्हाला आढळून येईल .छे:या सर्व प्रक्रियेचा कंटाळा आला बुवा!आपण या सगळ्याच्या पलीकडे गेले पाहिजे .वस्तूतः काय झाले नवीन वासनेचा जन्म झाला.आपल्याला सत्य दर्शन झाले पाहिजे, आपल्याला परमेश्वर भेटला पाहिजे, आपल्याला ते अनंत भेटले पाहिजे,अशा प्रकारे मन सत्याचा, परमेश्वराचा, अनंताचा, आराखडा काढते. संपूर्ण जिवंत बदलाबद्दल अाशा धरते .हा बदल घडवून आणण्याच्या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचा भाग घेण्याचे ठरविते.कि झाली पुनः चालू गाडी.
यामुळे सृजनशीलता कधीच अस्तित्वात येत नाही.यांत्रिक पुनः पुनः तेच करणारी, ज्यामुळे मन पुन्हा पुन्हा त्याच मार्गावरून सारखे फिरत रहाते,ज्यामुळे मन हे भूतकाळाचे निर्जीव केंद्र बनते , जिथे सृजनशीलता नसते, अशी ही वासना प्रक्रिया आहे .अशी वासना प्रक्रिया मी माझ्यामध्ये कार्यमग्न असलेली पहातो . त्याचप्रमाणे जी मनाने निर्माण केलेली नाही जी संवेदना नाही असे काही सृजनशील क्षणही मी अनुभवितो.
वासनेला समजून घेणे ही आपली समस्या आहे .ही वासना असावी की ती वासना असावी, ती कुठपर्यंत ताणावी ,व कुठे तिचा शेवट व्हावा ,अशी ही समस्या नसून ही संपूर्ण वासना प्रक्रिया, आशा ,आकांक्षा, तृष्णा, जळत्या भुका ,समजून घेणे,ही आपली समस्या आहे .थोडा संग्रह म्हणजे वासना मुक्ती असा कांही जणांचा समज असतो .जे विशेष संग्रह करीत नाहीत त्यांच्याबद्दल आपल्याला केवढा अभिमान वाटतो .केवढा भक्तिभाव वाटतो.जाडे भरडे कपडे कफनी, हे वासनेपासून मुक्त होण्याच्या वासनेचे, प्रतीक असतात .हेही फार उथळ कर्म आहे .जर मन अगणित वासना, इच्छा, आशा, आकांक्षा, श्रद्धा, व विरोध, यांनी लुळेपांगळे होऊन गेले असेल, तर बाह्य तमाशाला काही अर्थ नाही.काही अर्थ असू शकतो काय?तुम्ही काय संग्रह करता, कसले कपडे घालता, काय खाता,याला कांहीही महत्त्व नाही . बाह्य रूपात नव्हे तर केंद्रात क्रांती झाली पाहिजे.परंतु आपण या बाह्य तमाशाने निश्चितच आकर्षित होतो .कारण आपले मनच फार उथळ असते .
मन वासनेपासून संवेदनेपासून अनुभवापासून कधीतरी मुक्त होऊ शकेल काय?तुमची व माझी खरी ही समस्या आहे .सृजनशीलतेचा संवेदनेशी काहीही संबंध नाही .सत्य परमेश्वर किंवा तुम्ही जे काही म्हणाल, ते संवेदना म्हणून अनुभवण्याची स्थिती नाही. जेव्हा तुम्हाला एखादा अनुभव येतो तेव्हा काय होते ?एक विशिष्ट संवेदना निर्माण होते. त्यामुळे वर किंवा खाली गेल्याची भावना निर्माण होते.नंतर दुसरी स्थिती म्हणजे खाली गेल्याची भावना दूर करण्याचा टाळण्याचा आपण प्रयत्न करतो .परंतु जर ती पहिली स्थिती असेल म्हणजे तुम्हाला सुख झाले असेल तर तुम्ही ती घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करता .एवढेच नव्हे तर तिच्यामध्ये वाढ कशी होईल त्यादृष्टीनेही प्रयत्न करता .तुमचा अनुभव सुखमय संवेदनेचा आहे आणि तुम्हाला ती आणखी पाहिजे हे "आणखी" मनाचे निर्जीव केंद्र जास्त बळकट करते .तुम्हाला आणखी आणखी अनुभवण्याची इच्छा होते .त्यामुळे तुमचे मन कुठलाही नवा अनुभव घेवूंच शकत नाही.
मन नेहमी कांहीही नवीन अनुभवण्याला असमर्थ आहे.त्याची दिशा नेहमी स्मरणातून असते .ओळखण्यातून तुलनेतून असते आणि जे धारणेतून ओळखलेले आहे ते सत्य नव्हे .ती सृजनशीलता नव्हे.मन सत्य अनुभविण्याला असमर्थ आहे.ते फक्त संवेदना अनुभवू शकेल. सृजनशीलता ही संवेदना नव्हे.ते अखंड नित्य नवे अनंत असे काहीतरी आहे .
आता मला माझ्या मनाची ओळख झाली आहे .संवेदना व वासना यांचे मन हे हत्यार आहे .किंबहुना संवेदना व वासना म्हणजेच मन होय.आणि हे मन अशाप्रकारे यांत्रिकपणे त्या प्रक्रियेत बद्ध झालेले आहे. असे मन काहीही नवे घ्यायला अनुभवण्याला असमर्थ आहे.नवे हे संवेदनेच्या पलीकडचेच असले पाहिजे .संवेदना म्हणजे जुनाटपणा.~ही यांत्रिक संवेदना प्रक्रिया नष्ट झालीच पाहिजे.~ही इच्छा हीही एक वासनाच आहे आहे हे तुमच्या लक्षात येत आहे काय ?तुम्हाला तसे वाटत नाही काय? आणखी प्रतिकांचा पाठलाग, शब्द मूर्ती कल्पना त्यापासून प्राप्त होणार्या संवेदना या सर्वांचा शेवट झाला पाहिजे .ही वासना प्रक्रिया नीट समजली तर आपोआपच तिला पूर्णविराम मिळेल .तेव्हा आणि तेव्हाच मनाला जिथे नेहमी प्रतिक्षणी नवे प्रगट होत असते अशा सृजनशील अवस्थेमध्ये राहता येईल.जर तुम्ही शब्द कल्पना सवयी भावना समजुती यांनी भारले गेल्याशिवाय , मी काय म्हणतो ते समजाल व सतत प्रतिक्षणी अखंड नवे मनावर आदळत असण्याचे महत्त्व जाणाल, तर कदाचित् वासना प्रक्रियेचे त्याच मार्गाने फिरत राहणे, व सतत आणखी आणखी अनुभवाची वासना करणे, किती कंटाळवाणे आहे हे तुमच्या लक्षात येईल .जो खरा शोधक आहे त्याला कुठच्याही वासनेचे "शोधणे" किंवा "न शोधणे" या वासनेचे सुद्धा काही महत्त्व नाही हे लक्षात येईल असे मला वाटते .अन्नपाणी वस्त्र निवारा अशा काही प्राथमिक गरजा नेहमीच असणार परंतु या मानसिक भुका कधी बनू शकत नाहीत .ज्या वस्तूंना मन वासना केंद्र करून इमारत रचित असते आश्या वस्तू या वस्तू बनणे शक्य नाहीं .शारीरिक गरजा पलीकडे कुठलीही वासना श्रेष्ठत्व प्राप्ती,सत्य दर्शन, सद्गुणसंपन्नता, म्हणजे जिच्या आधाराने मन "मी" ची कल्पना रचते व नंतर हे केंद्र बळकट करण्याचा प्रयत्न करते अशी एक मानसिक प्रक्रिया आहे .
जेव्हा तुम्ही ही प्रक्रिया बघता, जेव्हा विरोधाशिवाय, लुलुपतेशिवाय ,समर्थनाशिवाय, धि:काराविना, योग्यायोग्य निर्णयाविना, तुम्ही जागृत असता, तेव्हाच मन नवीन ग्रहण करण्याला समर्थ असते."हे नवे" संवेदना नाही ,ते ओळखता यावयाचे नाहीं, .त्याचा पुन:पुन: अनुभव घेता यावयाचा नाही ,असे तुम्हाला आढळून येईल .ती एक अशी स्थिती आहे की जिथे सृजनशीलता निमंत्रणाशिवाय स्मरणाशिवाय येते तेच अंतिम सत्य होय .