"तानशे,अगं ये तानशे,पोटदिशी आहेसं ना तू आणि पपया खातेस?बाळ राहील का तुझं?"

"अहो मालकीन ताई ,घरात रोज दोनच भाकरी होत्यात.खाणारी तोंड पाच. मह्या सासूबाई दोन दिवसाआड मालकाला विनवणी करून पपया आणत्यात.त्या दोन भाकऱ्यांवर आमचं पोट नाही भरत.आम्ही सर्वजण पपयाच खातूं की मग दिवसभर.एक सुंदरी हायं की मला.आता दुसरीबी पोरचं होणार असं वाटतंया.त्यामुळं बाळ राहीलं काय अन् गेलं कायं"

"हे बघ,मह्या घरला आली की दिल मी तुला भाकरी.येते मी."

"सुंदरे,अगं ये सुंदरे कुठे फीरतीस?"

"वायके शोधून राहीली हाय वेलीला."

"रोज रोज तोडून खाशील तर राहणार काय हाय त्या वेलीला.ये तरफड इकडे."

"आये,मी उद्यापासून शाळेत नाय जाणार.मह्या रंग इतका पक्का होता तरी माह्यं नाव सुंदरा का ठेवलयां?सगळ्या पोरी मला काळी म्हणत्यात."

"अगं तू मनाने सुंदर म्हणून तुझं नाव सुंदरा हाय.मास्तरीनताईले सांगायचे की मग त्या पोरींच नाव"

"ह्या...ती मास्तरीन .मोबाईलमधी बोटं फीरवती दिवसभर.तिला काही सांगाया गेलं की धपाटाच टाकती पाठीत.तिच्याजवळ न गेलेलच बरं असतूया."

"आ हा.... अशी कशी धपाटा टाकती पाठीत.मी येते की उद्या तुझ्या शाळेत.मही आठ वर्षाची पोरं पण तिला बी कीती त्रास ह्या दुनियेचा."

"तानशे,अगं तानशे पाणी आण प्यायला."

"आणते हो आत्याबाई"

"हे बघ ,उद्यापासून आपल्या गावापासून तालुक्यापर्यंत पायी चालत जायचे.रस्त्याने हाडूके वेचायची आणि तालुक्याच्या ठिकाणी मरीआईचे मंदीर हाय.तिथे वडाच्या झाडाखाली इकायची.ह्या सुंदरीलाबी घेऊन जात जा तुह्या सोबत म्हणून."

"एवढीशी पोर,इतक्या दूर कशी चालणार?"

"चालीन बरोबर, तू नको इचार करू.तिला कोण सांभाळीन दिवसभर?"

"ही आत्याबाई जिवंत हाई तोपर्यंत शांतता लागू द्यायची नाय मला,"तानसा स्वतःशीच बोलत होती.

सकाळी सकाळी पहाटेलाच सुंदरी आणि तानसाने तालुक्याचा रस्ता धरला.तालुक्याला पायी पायी पोहोचतच संध्याकाळ झाली. हाडे विकून काही पैसे मिळाले. दोन्ही मरीआईच्या मंदीरात दर्शनासाठी गेल्या

"सुंदरे ,तुझ्यासाठी एक भाऊ माग मरीआईकडे."

"बरं,बरं"

रीक्षाने दोघीजणी रात्री घरी परतल्या तर घरात सुंदरीच्या बापाचे प्रेत पडलेले होते.दारू पिऊन पिऊन त्याचे शरीर पूर्ण सडून गेले होते.त्यामुळे त्याच्या जास्त दिवस जगण्याची आशाच नव्हती कुणाला.सकाळी प्रेत उचलून जाळले आणि रोजचे रहाटगाडगे चालू झाले. दहावं नाही की सुतक नाही. सकाळी उठले की आज खायला मिळणार की नाही तोच मोठा प्रश्न. दोन वर्ष तानसाचा हाडे विकण्याचा उद्योग चालू राहीला. तानसाला आता सुंदरासोबत एक मुलगा सोपानपण होता.

"तानशे,मह्या वाटते तुझ्यापुढं पूर्ण आयुष्य पडलेलं आहे. तु दुसरं लगीन करं"

"काहून,नही नही आत्याबाई. असं काही सांगू नका."

"अगं या दोन्ही पोरांना सांभाळीन मी.तु इतकी सुंदर हाय.ही दुनिया तुला शांततेत जगू द्यायची नाय"

"जे होईन ते मी माझं पाहीन.पण आता मला दुसरं लगीन नको."

"दुसरं लगीन नको तर उचल तुझ्या दोघं पोरांना आणि माझी झोपडी खाली कर",आत्याबाई संतापातच बडबड करायला लागली.

दुसऱ्याच दिवशी तानसा तिच्या दोन्ही पोरांना घेऊन तालुक्याला गेली. दिवसभर तालुक्याला फिरून फिरून ते तिघे एका बंगल्यासमोर येऊन बसले.जोराचा पाऊस सुरू झाला. बंगल्याचा मालक आनंदराव त्याची फोरव्हीलर घेऊन गेटमध्ये शिरला.गाडीच्या काचेतून हे तिघे त्याच्या नजरेस पडले.तानसाला पाहताच ती त्याच्या नजरेत भरली.बंगल्याचा मालक आनंदरावांनी तिला मध्ये बोलवले.

"घर नाही का राहायला?"

"नाय साहेब"

"माझ्या बंगल्याच्यामागे एक खोली आहे.रहा तिथे काही दिवस."

"खूप उपकार झाले साहेब. तुम्ही सांगाल ते काम करीन पण काही दिवस राहू द्या आम्हांला."

तानसा आणि मुले पटकन खोलीकडे गेले.बंगल्याचा वॉचमन त्यांना खाण्यासाठी ताटात जेवण वाढून घेऊन आला.वॉचमनने बंगल्यातील कामाचे स्वरूप समजावून सांगितले.

"मालक वेगळे पैसे काही देणार नाहीत तुला.रोज दोन टाईमचे जेवण मिळेल फक्त तिघांना."

"व्हय,व्हय.मान्य हाय."

दुसऱ्याच दिवसापासून तानसा बंगल्यात काम करू लागली. बंगल्यात एकही बाई नव्हती,त्यामुळे तानसाला भीतीच वाटत होती. साहेब बंगल्यात असले की ती पटकन काम आवरून आपल्या खोलीत मुलांजवळ पळत असे.आनंदराव नसले की ते तिघे खूप मजा करीत.

"आये,गच्चीवर लयी गिलके हायेत.मी जाऊ का इकायला?",सुंदरा हट्टच करायला लागली.१०रुपये टोपलीप्रमाणे ती भाजीवाल्यांना विकायला लागली. पहील्याच दिवशी तिला चाळीस रूपये मिळाले. सुंदरेने पंचवीस रूपयांचा तांब्या घेतला आणि घरी गेली.भाजीवाले तेच गिलके बाजारात पावशेर,कीलो करून विकत आणि जास्त पैसे कमवत.सुंदराकडे तराजू आणि मापे नव्हती. तरी सुंदरा याला त्याला विनवणी करून पावशेर मोजून घ्यायला लागली आणि विकायला लागली. त्यामुळे तिला जास्त पैसे मिळायला लागले.रस्त्यावरून शेण गोळा करून आणणे,त्याच्या गोवऱ्या थापणे आणि विकणे हा दुसरा उद्योग ती करत असे.उरलेला वेळ ती सोपानला सोबत घेऊन भीक मागत असे.जमलेल्या पैशांतून सुंदराने दोन ताटे आणली.एक पातेले आणले.काही दिवसांनी सुंदराकडे साडे तीनशे रूपये जमले.सुंदराने एक कोंबडी आणली. कोंबडीने अंडी दिली. सुंदरा व सोपानने ती लगेच उकडून फस्त केली.दुसऱ्यावेळी कोंबडीने पुन्हा अंडी दिली.यावेळी सुंदराने ती अंडी उबवण्यास टाकली.काही दिवसांनी अंड्यातून कोंबडीची पिल्ले बाहेर पडली.सुंदराने ती पिल्ले बाजारात विकून आणखी पैसे कमवले.त्याच रात्री वॉचमन खोलीचा दरवाजा ठोकू लागला. तानसाने दरवाजा उघडला.

"तानसा, साहेबांना चहा पाहीजे."

"इतक्या रात्री, बरं आली."

तानसा चहा ठेवण्यासाठी कीचनमध्ये गेली. तेवढ्यात आनंदराव तिच्यामागे येऊन उभे राहीले.आनंदराव दारुच्या नशेत बुडालेले होते.तानसाने त्याचा डाव ओळखला.ती त्याला धक्का मारून पटकन आपल्या मुलांकडे पळाली.तानसाने मुलांना घेऊन कम्पाउण्डच्या भिंतीवरून उड्या मारल्या आणि पळ काढला.सुंदराची कोंबडी बंगल्यातच राहील्याने तिचे मन तेथेच घुटमळत होते. या प्रसंगाने तानसाला आत्याबाईची आठवण झाली. दुसऱ्याच दिवशी सकाळी आपल्या पोरांना घेऊन ती आपल्याच मूळ गावाला परत आली.गावाच्या बाहेर दिवसभर काड्या गोळा केल्या आणि एक झोपडी उभी केली.सुंदराच्या हाताला मोठे मोठे फोड आले होते.तानसा शेतात मजूरी करायला लागली. शेतात येताजाता कीवा काम करतांना अनेकवेळा तिला पुरूषांच्या वाईट नजरेचा सामना करावा लागे.दोन ताट,एक तांब्या,एक पातेले व मोजके कपडे असा त्यांचा सामान होता. गावात परत येताच शाळेची मुलं सुंदराला शाळेत बोलवू लागली. सोपानपण काही दिवसांनी शाळेत पहीलीच्या वर्गात दाखल झाला.शाळेतून पुस्तके, कपडे आणि एकवेळचे जेवण मिळू लागले.

 गावातला सावकार एक दिवस दोन पोते गहू,एक पोते तांदूळ तानसाच्या झोपडीत टाकून गेला.काही दिवसांनी तिघांना नवे कपडे घेऊन आला.सावकाराचा काळा बेत आणि नजर तानसाला समजत होती.तानसाने गहू,तांदूळ विकून टाकले आणि पैसे घेऊन गाव सोडून निघून गेली.तानसा आता नव्या गावात पोहोचली.पुन्हा काड्या जमवून गावाच्या बाहेर झोपडी बनवली.दोनच दिवसांत मराठी शाळेचे गुरूजी सुंदरा आणि सोपानचे नाव शाळेसाठी कागदावर लिहून घेऊन गेले. पुन्हा मुले शाळेत दाखल झाली. आता तानसाने जगातील पुरूषांना कंटाळून नवीन गावात बाळंतीन बाईची सुटका करणे,मालीश करणे,तान्ह्या लेकरांना अंघोळ घालणे,घरातील धान्य निवडून देणे,स्वयंपाकघरात मदत करणे,धूणी भांडी करणे अशी घरगूती कामे करण्यास सुरुवात केली.

सतत स्थलांतर केल्यामुळे सुंदराच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला होता.सुंदरा शाळा कमी आणि इतर उद्योग जास्त करीत असे.दुसऱ्यांच्या शेतातील मिरच्या, काकड्या, लिंबू रात्रीच्या अंधारात तोडणे व ते बाजारात विकणे.दिवसभर गावात भंगारात विकण्यासारखे जे मिळेल ते शोधणे.काही दिवस शेतात मजूरी करणे.अशी अनेक कामे ती करत असे.तानसाला आता सुंदराची चांगलीच मदत व्हायला लागली होती.सोपान खूपच शांत व पुस्तकप्रिय मुलगा होता.सोपान अभ्यासात खूप हुशार होता.एका रात्री सुंदरा नेहमीप्रमाणे दुसऱ्यांच्या मळ्यात पेरू तोडायला गेली तर अंधारात साप चाऊन तिचा मळ्यातच म्रूत्यू झाला. तानसा व सोपान ही बातमी ऐकून खचून गेले.शाळेतील गुरूजी तानसाचे सांत्वन करण्यासाठी तिच्या घरी पोहोचले.सोपानसारख्या हुशार मुलाच्या घराची दैन्यावस्था पाहून सोपानच्या भदाणे सरांना खुप वाईट वाटले.भदाणे सरांना स्वतःलाही मुलबाळ नव्हते. त्यांनी सोपानला दत्तक घेण्याचा विचार तानसाला सांगितला.तानसाने एका क्षणात 'हो' म्हणून टाकले. सुंदरातर गेली पण सोपानच्या आयुष्यातील तरी दारीद्र्याचा हा अंधार संपेल या आशेने सोपानची रवानगी भदाणे सरांच्या घरी झाली. तानसा छोटीमोठी कामे करुन आपले पोट भरू लागली. सोपान मधून मधून तानसाला भेटण्यास येत असे.दोघांचेही मन वेगळे होतांना भरून येत असे.

तानसा आता एकटीच सोपानच्या उज्ज्वल भविष्यासाठी थोडीफार पुंजी जमा करीत होती.काही वर्षांनी तिचा सोपान कलेक्टर बनूनच तिच्या झोपडीत आला.सोपान आपल्या आईला घेऊन कलेक्टर बंगल्यात दाखल झाला. भदाणे सर आणि मँडम,तानसा आणि सोपान आता बंगल्यात राहू लागले. वार्धक्याने तानसाचे शरीर थकले होते पण भदाणे मँडमांच्या मदतीने ती कलेक्टर बंगल्यात गरजू स्त्रियांसाठी शिवणकाम प्रशिक्षण केंद्र चालवू लागली.अखेरीस मायलेकरांचा वनवास संपला आणि दोघेही सोनेरी भविष्यासाठी आतूर झाले.

अर्चना पाटील,
अमळनेर
फोन नंबर 8208917331

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel