शिका मुलांनो शिका

सर वर्गात हजेरी घेऊ लागले.

"तारा"

"येस सर"

"सीता"

"येस सर"

"मयूर"

"सर,तो बकऱ्या चरण्यासाठी घेऊन गेला आहे."

"दिव्या"

"सर ती तिच्या लहान भावाला सांभाळते आहे,तिची आई शेतात गेली आहे."

"सविता"

"सर,ती तर रोजच शेतात कामाला जाते."

"तुषार"

"सर तो सप्तशृंगी देवीला पायी जाणार आहे चैत्र महीन्यात.त्यासाठी शेतात मजूरी करून पैसे कमवतो आहे."

"राहूल"

"सर तो घरीच खेळतो आहे"

"घरीच खेळतो आहे,चला आपण त्याला घेऊनच येऊ शाळेत",असे सांगून सर सर्व मुलांना घेऊन गावात निघाले.

सर्वप्रथम राहूलच्या घरी सर पोहोचले.राहूल गोट्या गोट्या खेळत होता.सरांना पाहताच राहूल धूम ठोकून पळू लागला.

"अरे,अरे पकडा त्याला."

मुलांनी पळतपळत जाऊन त्याला पकडून आणले.

"कारे बाळा गोट्या खेळण्यासाठी शाळा बुडवतोस.शारीरिक शिक्षण हा तास खेळण्यासाठीच असतो ना तुम्हाला. शिवाय नेहमीचा येणारा रविवार असतोच ना.आईबाबा दिवसभर शेतात जातात,दोन घास कमी जेवण करतात कारण तुझं शिक्षण पुर्ण झालं पाहीजे. त्याचा तरी थोडा विचार कर.येशील ना मग तू स्वतःहून रोज शाळेत?"

"हो सर.माझी चुक मला समजली.आईबाबांचे कष्ट मी वाया जाऊ देणार नाही."

"सर,सर तुषारकडे जाऊ",मुले सांगू लागली.

कायरे तुषार,गडावर जाण्यासाठी शाळा बुडवतो आहेस.गडावर पोहोचल्यावर देवीपण हेच सांगेल की तू अजून विद्यार्थी आहेस.तुझे पहीले कर्तव्य अभ्यास आहे त्यानंतर पुजाअर्चा.श्रावण सोमवार, गावातील देवीची यात्रा,कानबाई, दशामाय,गणपती नवरात्र ह्या गोष्टी तर वर्षानुवर्षे चालूच राहणार आहेत.स्वतःचे कर्तव्य पुर्ण न करणाऱ्या माणसांना देव कधीही पावत नाही. तू आताशी चौथीला आहेस.खुप खुप शिक आणि मोठा हो.समजतंय ना.चल मग शाळेत."

त्यानंतर मोर्चा मयुरच्या घरी वळला.सविताचे घरपण तेथेच होते. सविता आणि मयूर दोघेही आपली शेतातील कामे आटोपून अंगणातील खाटेवर बसली होती.

"काय,बकऱ्या कुठे गेल्या तुझ्या?"

सरांना अचानक आपल्या घरी पाहून सविता आणि मयूरला लाजल्यासारखे झाले. त्यांचे आईवडीलपण तेथेच बसले होते.

"काय हो भाऊ,सोन्यासारखी पोरे तुमची,का म्हणून नुकसान करता त्यांचे?आंबेडकर आणि फुलेंनी आपले संपूर्ण आयुष्य तळागाळातील गरीब लोकांनी शिकावे म्हणून प्रयत्न केले.शिका,संघटीत व्हा आणि संघर्ष करा.शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध. शिक्षणाशिवाय प्रगती नाही. हा उपदेश मरेपर्यंत ते करीत रहीले.तुमची मुले रोज शाळेत आली म्हणून त्यांना लगेच सरकारी नोकरी मिळेलच असे नाही पण हे त्यांचे शिकण्याचे वय.या वयात त्यांना शेतामधे जुंपू नका.तुमच्या आईवडीलांनी जी चुक केली ती तुम्ही करु नका.कोवळी फुले आहेत ही.त्यांना फुलू द्या"

"अहो गुरूजी,आम्ही कुठे रोजच शेतात घेऊन जातो त्यांना. तेच पैसे कमवण्यासाठी आमच्या मागेमागे येतात. हा पण जेव्हा हंगाम असतो,तेव्हा गुरूजी पर्याय नाही. पोट भरलेलं राहील तेव्हाच तर शाळेतपण लक्ष लागेल ना!पटतं की नाही तुम्हाला."

"हो पटतंय मला,पण तरीही जेवढा वेळ शाळेसाठी देता येईल तेवढा या दोघांनी दिला पाहिजे. पटतयंना तुम्हाला."

"हो पटतयं.आम्ही आजपासून पुढे यांची शाळा बुडणार नाही यासाठी काळजी घेऊ.आता घेऊनजा यांना तुमच्या सोबत.रीकामीच आहे ती आता."

"सर,सर दिव्याकडे जाऊ"

सर्व मंडळी दिव्याकडे आली.तिच्या नऊ महीन्याच्या भावाला कडेवर घेऊनच उभी होती ती दरवाज्यात.तिची आई नुकतीच शेतातून आली होती.हातपाय धूत होती.पोरांचा एवढा गलका पाहून दिव्या घाबरूनच गेली.

"काहो ताई,पोरगं तुमचं.जन्म दिला तुम्ही, आणि सांभाळायला लावता छोट्याशा दिव्याला.उद्या एक दिवस तीपण आई होणारचं आहे की.आतापासूनच तुम्ही तिला जबरदस्तीचे बालसंगोपन करण्यासाठी घरी ठेऊन घेत आहेत.तिची शाळा बुडते याविषयी तुम्हाला वाईट कसं वाटत नाही. दिव्या तुमची सावत्र मुलगी आहे की काय?"

"नाही हो गुरुजी, पण...तिचा बा मला कसलीही मदत करीत नाही. मी तरी काय करू?"

"म्हणून मुलीला निरक्षर ठेऊन जगण्यास नालायक बनवणार.उलट आपण शिकलो नाही तर कमीत कमी माझी पोरं शिकली पाहीजे असं तुम्ही म्हटलं पाहीजे."

"गुरूजी ,मी दुपारून शेतातून घरी आल्यावर तिला शाळेत पाठवेन.बघू जसं जमेल तसं."

"सुरूवात तर करा पण कायमस्वरूपी घरी नका बसवू.अहो पुस्तके,गणवेश मोफत.एकवेळ जेवण मोफत.अजून काय पाहिजे. प्राथमिक शिक्षण स्वस्त आहे म्हणून त्याचा अनादर करू नका.हायस्कूलचा खर्चतर तुम्हाला परवडणारपण नाही. पाठवा तिला शाळेत."

"सर ही गायत्री,आत्या आली होती म्हणून शाळेत येत नव्हती."

"गेले का पाहुणे?पाहुणे आले म्हणून शाळा बुडवतात,मुंज,जाऊळ,दहावे,भंडारा म्हणून शाळा बुडवतात. असे कसेरे तुम्ही?शिक्षणाशिवाय आयुष्यात काही खरे नाही रे बाळांनो.तुम्ही शिकाल तरच स्पर्धेच्या या युगात टिकाल.आर्थिकद्रूष्टया स्वावलंबी होण्यासाठी शिक्षणाला पर्याय नाही. एकदा तुम्ही मोठे झाल्यावर कोण तुम्हाला शाळेत जा म्हणून सांगणार आहे.अभ्यासाचे हे वय गेले की कोणीही तुम्हाला पुस्तके वाचायला सांगणार नाही. तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेणे शक्य नाही पण गावातील आपली शाळातर तुम्ही जिवंत ठेवा.तुम्ही मोठे होऊन सैनिक, पोलिस, इंजिनिअर, डॉक्टर, कलेक्टर, शिक्षक झाले तर कीती आनंद होईल तुमच्या आईवडीलांना.!"

"हो सर,आम्ही रोज शाळेत येऊ.आमच्या लहान भाऊ बहीणींनापण शाळेत घेऊन येऊ.आमच्या गल्लीत शाळा बुडवणाऱ्या पोरांनापण शाळेत आणू.आम्हाला शिकायचे आहे आणि खूप मोठे व्हायचे आहे."

अर्चना पाटील,
अमळनेर
8208917331

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel