मन्या कम्या रम्या चकण्या चौघेही जीवश्चकंठश्च मित्र .चकण्याचे मूळ नाव लोक विसरून गेले होते. सर्वजण त्याला तसेच हाक मारीत .त्या अशा हाकेमध्ये त्याला किंवा इतरांना काहीच गैर वाटत नसे.चौघेही चौथीमध्ये शिकत होते .शाळा संपली की बऱ्याच वेळा चौघेजण बरोबरच कुठेही सापडत .चकण्या आणि त्याचा बाप दोघेही महा इब्लिस म्हणून ओळखले जात .
आज त्यांची शाळेची ट्रिप होती .ट्रिप जवळच समुद्रकिनारी जाणार होती .तीन चार किलोमीटरवर समुद्र किनारा होता जायला एखादा तास लागणार होता .समुद्र किनारी खेळून जमल्यास समुद्रात अंघोळ करून डबे खावून संध्याकाळी परत यावे असा एकूण कार्यक्रम होता .ट्रीप छान झाली परंतु या चौघांच्या डोक्यातून समुद्र किनार्याचा डावीकडचा भाग काही जात नव्हता. तिथले खडप त्यांना खुणावत होते .ते खडप करपांचे होते. कालवे भरपूर मिळण्याचा संभव होता.अमावास्येच्या आगेमागे दोन तीन दिवसांत एखाद्या संध्याकाळी तिथे जायचे व कालव्यांचे शिंपले घेऊन यायचे असा त्यांचा प्लॅन होता .ते घरी सांगून जाऊ शकत नव्हते.त्यांना कोणीही जाऊ दिले नसते .प्रत्येकाने दुसऱ्या कुणाच्या तरी घरी अभ्यास करायला जातो म्हणून सांगायचे आणि चौघांनीही समुद्रकिनारी धाव ठोकायची असा त्यांचा एकूण प्लॅन होता .कालवे आणल्यानंतर ती कशी शिजवायची वगैरे नंतर बघू असे त्यांनी ठरविले .शाळेतून निघाल्याबरोबर दप्तरे घरी टाकायची काहीतरी सबब प्रत्येकाने घरी सांगून समुद्र किनारी पळायचे असे त्यांचे ठरले.
चकण्याने दोन दिवसांपासून एकूण कार्यक्रमाला नाट लावयला सुरवात केली.तिथे संध्याकाळी आसरा येते. भुतांचा वावर असतो. जो कोणी त्या समुद्र किनारी संध्याकाळी येतो त्याला ती झपाटतात .अमक्याचे असे झाले . तमक्याचे तसे झाले . वगेरे पुड्या सोडण्याला त्याने सुरुवात केली. तो अशा प्रकारे बोलत होता की म्हटले तर ते खरे आहे नाही तर त्या अफवा आहेत . तरीही जायचे आणि कालवे आणायची हे त्यानी निश्चित केले .सकाळी शाळेत आल्यावर चौघांनीही योजना पक्की केली. पाच वाजता घरी दप्तरे टाकून निघायचे.जायला पाऊण तास यायला पाऊण तास तिथे एकदीड तास आठपर्यंत घरी .शिंपले वाटून घ्यायचे आणि मग घरी सगळे खरे सांगायचे असे त्याने ठरविले . कालवे बघितल्यावर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटेल व मग कोणी आपल्याला फारसे बोलणार नाही असा त्यांचा अंदाज होता .मंगळवारची संध्याकाळ झाली रम्या कम्या आणि मन्या ठरलेल्या झाडाखाली चकण्याची वाट पाहात उभे राहिले .वेळ निघून जात होता चकण्या काही दिसेना .तो पुढे तर निघून नाही ना गेला?भेटायचे झाड हेच होते की दुसरे कुठचे होते?चकण्याच्या बापाने त्याला काही काम तर नाही ना सांगितले?किं हा पठ्या भुताला घाबरला ?आता बेत कॅन्सल करायचा कि तिघांनीच पुढे जायचे? आपणच गेलो आणि भुताने आपल्याला पकडले तर?घरच्या लोकांना बेत कळला असला तर मार पडणार नाही ना?एक ना दोन हजारो प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर उभे राहिले .एका बाजूला कालवे खुणावत होती. तोंडाला पाणी सुटत होते. वेळ निघून जात होती. चकण्या तर दिसत नव्हता. शेवटी त्यांनी चकण्या गेला उडत,पुढे गेला असला तर भेटेलच, असे म्हणून ठरलेला बेत तिघांनी पार पाडायचा असे ठरविले . तिघांनी पिशवीमध्ये विळे घेतले होते.त्या पिशव्या घट्ट धरून तिघे समुद्राच्या दिशेने धावत सुटले.
अगोदरच उशीर झाला होता .सूर्य केव्हाच मावळला होता.समुद्रावरचे गार वारे अंगाला झोंबत होते .वाऱ्याबरोबर समुद्राच्या पाण्याचे तुषार अंगावर उडत होते त्यानी अंग भिजले होते .ओल्या कपड्यांवर वारा लागून शिरशिरी उठत होती.एक टिटवी ओरडत आकाशातून गेली आणि तिघांचेही अंगावर सरकन् काटा उभा राहिला.भुतांच्या ऐकलेल्या न ऐकलेल्या सगळ्या गोष्टी तिघांच्याही डोक्यात घोळू लागल्या .गार वारा सुनसान किनारा मधूनच पक्षांचे ओरडणे, या सगळ्यामुळे उगीचच अापण या फंदात पडलो असे प्रत्येकाला वाटू लागले .बऱ्यापैकी शिंपले प्रत्येकाच्या पिशवित जमले होते.तिघांनीही पिशव्या घट्ट पकडल्या एकमेकांकडे बघितले आणि घराच्या दिशेने धूम ठोकली .
समुद्र किनारा संपला आणि मग झुडपातून वाट गेलेली होती . त्यांच्याच पायांचा आवाज त्यांना मोठा वाटू लागला .पाठीमागून कुणी तरी येत आहे असे उगीचच वाटू लागले .सर्वत्र दाट काळोख पडला होता .तेवढ्यात कुठुनतरी चार ढग आले आणि पाऊस पडून गेला.रस्ता निसरडा झाला होता .भरभर चालताही येत नव्हते .एकूण वातावरणनिर्मिती झकास झाली होती .तिघांचीही चांगल्यापैकी गाळण उडाली होती.चकण्याची तर आठवणच राहिली नव्हती .एकदा घरी केव्हा पोहोचतो असे त्यांना झाले होते.एवढ्यात डाव्या बाजूला खाकरण्याचा आवाज आला.रस्ता एकेरी असल्यामुळे त्यांना हात धरूनही चालता येईना .एवढ्यात उजव्या बाजूला बसलेला पक्षी यांच्या पायरवाने फडफड करीत उडाला .कुठलाही लहान सहान आवाज त्यांना घाबरवून सोडत होता .किती वाजले त्याचा अंदाज येत नव्हता .अजून दहा पंधरा मिनिटांचा रस्ता बाकी होता .कुठून या फंदात पडलो असे त्यांना झाले होते .आता एकेरी रस्ता संपला होता आणि वाट कुर्याठातून(पटांगणासाखा भातशेतीचा भाग) जात होती .पटांगणात येण्याच्या अगोदरच उजव्या बाजूला काहीतरी सरसरले आणि तिकडे पाहतात तो एक काळी कभिन्न आकृती हातवारे करीत त्यांच्याकडे येत होती. तिघांच्याही तोंडचे पाणी पळाले .तिघेही जागच्या जागी स्क्रू लावल्यासारखे खिळून उभे राहिले .त्या काळ्या कभिन्न आकृतीचे फक्त डोळे चमकत होते .कृत्रिम हातवारे करीत व हळू हळू पाय टाकीत ती आकृती त्यांच्याजवळ येऊ लागली .ती आकृती काळोखात काय आहे तेही नक्की दिसेना .आकाशात मेघ दाटून आल्यामुळे चांदण्यांचा प्रकाशही काही नव्हता.ती आकृती त्यांच्या पासून दहा बारा फुटावर आली आणि मटकन खाली बसली .गुडघ्यावर हात ठेवून ते हलवीत ती आकृती त्यांच्याकडे बघत होती .तोंडाने एखाद्या जनावरासारखा गुरगुरण्याचा आवाज येत होता .आता त्या तिघांनाही जास्त धीर धरवेना एवढ्यात त्या आकृतीने एक भयानक किंकाळी ठोकली आणि त्याबरोबर हे तिघेही हातातील पिशव्या तशाच टाकून सैरभैर होऊन वाट फुटेल तिकडे धावत सुटले .
घरी पोहोचल्यावर त्या तिघांनाही सडकून ताप भरला कपडे चिखलाने माखलेले का? इतक्या उशिरा कुठपर्यंत होता?हे विचारण्याला त्यांनी आई वडिलांना जागाच ठेवली नाही .तिघांच्याही शुश्रूषा करण्यात आई वडील गुंतून गेले. त्यांना कुठे तरी लागीर झाले असे त्यांना वाटले .तीन चार दिवसात त्यांचा ताप निघाला .दुसर्या दिवशी चकण्याही त्यांची चौकशी करण्याला आला. तापामध्येहि तो कां आला नाही ते त्यानी विचारले .काही जुजबी कारणे त्याने दिली .कोणीच प्रकरण फारसे ताणले नाही .
येणार्या जाणार्याला नवी करपे चकण्याच्या घराच्या मागच्या बाजूला टाकलेली आढळून आली .दोन दिवस कालवांचे निरनिराळे प्रकार चकण्याची आई शिजवत होती आणि भिंतीला टेकून गुडघे वर घेऊन गुडघ्यावर हात ठेवून हात हलवीत चकण्या निवांत बसला होता.त्याच्या चेहऱ्यावर पुसटसे इब्लिस हसू दिसत होते .
२५/११/२०१८©प्रभाकर पटवर्धन