ते चौघे खास फ्रेंड होते .केव्हाही कुठेही नेहमी ते बरोबरच असत.शाळा कॉलेजपासून त्यांची घट्ट मैत्री होती .कॉलेज जीवनानंतर त्यांच्या वाटा निरनिराळ्या झाल्या.दोघे जण खासगी उद्योगांमध्ये नोकरीला लागले तर एकजण सरकारी नोकरी व दुसरा स्वतंत्र व्यवसाय करू लागला .तरीही सिनेमा नाटक संध्याकाळी फिरायला जाणे सर्व एकत्रच असे.अजून त्या चौघांचीही लग्ने झाली नव्हती.

त्या चौघांना साध्या साध्या गोष्टीवरून पैज मारण्याची फार सवय होती .सर्वात जास्त पाणी पिऊन कोण दाखवितो.सर्वात जास्त लाडू खाऊन कोण दाखवितो.सायकलिंग स्कूटर धावत जिने चढून वर जाणे इत्यादी पुढे कोण जातो .त्या चौघांना कशावरूनही पैज मारण्याची खोड होती .त्या चौघात भरतला आपण सर्वात श्रेष्ठ आहोत, शूर आहोत, धीट निर्भय़ आहोत, असे वाटत असे.चौघे जरी परस्परांत पैज लावून कुणी केव्हा कुणी केव्हा जिंकत असले तरी पैज मारण्यात आणि जिंकण्यात तोच पुढे असे. पन्नास मीटर लांबीच्या पुलावरुन अरुंद कठड्यावरून कोण चालत जाईल ही पैज भरताने जिंकली होती .एका बाजूला खोल शंभर फूट खोल नदीचे पात्र बघूनच तिघांनी  शरणागती पत्करली होती .भरत मात्र बिनधास्तपणे कठड्यावर चढून तोल सांभाळीत शेवटपर्यंत चालत गेला होता.भरतची आई त्याला नेहमी तू अशी साहसे करू नकोस एक दिवस तुझ्या जीवाशी बेतेल म्हणून त्याला आर्जवाने सांगत असे .परंतू भरत तिकडे काणाडोळा करीत असे .भरत कोणाशीही पैज मारीत असे .त्याच्या जीवश्चकंठश्च मित्रांनीही पैज मारावी परंतु भलते साहस करू नये म्हणून त्याला अनेकदा सांगितले होते . परंतु जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही हेच खरे .

भरतचे तिघे मित्र त्याला नेहमी हरभऱ्याच्या  झाडावर चढवीत असत .त्याच्याशी पैज मारावयाची, त्याला साहस करू द्यावयाचे , यामध्ये बसल्या बसल्या एंटरटेनमेंट व थ्रील दोन्हीही होती.दिवाळीला लागून दोन तीन दिवस सुट्या आल्या होत्या .आणखी एक दोन दिवस जर रजा टाकल्या तर संपूर्ण आठवडा मिळत होता .त्याप्रमाणे चौघांनी नियोजन करून कुठेतरी समुद्राकाठी जावयाचे ठरविले .जिथे गर्दी आहे अशी जागा त्यांना नको होती.एका शांत ठिकाणी समुद्राकाठी अवे फ्रॉम दि मॅडनिंग क्राऊड एक सुंदर रिसॉर्ट आहे  असे त्यांना कळले .चौघांनीही रजा टाकल्या अॅडव्हान्स बुकिंग केले आणि एका आठवड्यासाठी चौघेही त्या रिसॉर्टवर रवाना झाले .

रिसॉर्ट ज्याप्रमाणे सांगण्यात आले त्याप्रमाणेच होते .आपल्या खोल्यांमधून समुद्र किनारा वाळू दिसत असे .सकाळी तर गार वारा अंगाला झोंबत असे.वाटेल तेव्हा पाण्यात डुंबणे वाळूत लोळणे व रिसॉर्टवर येऊन पाण्याच्या शॉवरखाली स्नान करणे चालू होते.त्याशिवाय धावा धावी क्रिकेट बैठे खेळ माफक ड्रिंक्स इत्यादी गोष्टी चालू होत्या .आल्यापासून दोन तीन दिवस असा आरामात काढल्यावर त्यांना जरा लांब कुठेतरी फिरून यावे असे वाटू लागले .किनाऱ्याची रचना साधारणपणे कोकणात नेहमी जशी असते तशीच होती .दोन बाजूला डोंगराचे आत गेलेले सुळके आणि मध्ये पसरलेला समुद्र किनारा .सर्वसाधारणपणे पांढरी शुभ्र वाळू सर्वत्र आढळते .क्वचित कुठे काळी वाळू असते.हा समुद्र किनारा तीन चार किलोमीटर लांबीचा होता .पांढरी शुभ्र वाळू होती .दोन्ही बाजूला डोंगरांचे सुळके समुद्रात गेलेले होते .आज या चौकडीने उजव्या बाजूच्या डोंगरावर जायचे ठरविले .

थोडीशी वाळू तुडविल्यानंतर डोंगराला सुरुवात झाली.डोंगरावर जाणारी वाट स्मशानातून जात होती.कोकणामधील बऱ्याच ठिकाणी पायवाटा स्मशानातून गेलेल्या असतात.गावाची लोकसंख्या लहान असेल तर मृत्यूचे प्रमाणही स्वाभाविक कमी असते .शहराप्रमाणे आखीव रेखीव आणि त्याच कामाला वाहिलेले जिथे लाकडाची वखार साठा मोठ्या प्रमाणात आहे अशा स्मशानाची गरज नसते .मृत्यू झाल्यावर एक दोन झाडे तोडून लाकडे  किनाऱ्यावरील स्मशानात नेली जातात .स्मशानातील दगडांवर लाकडे रचून नंतर अग्नी दिला जातो .काही सुकी लाकडे काही ओली लाकडे व रॉकेल यांचा वापर करून वाऱ्यावर अग्नी चांगल्या प्रकारे पसरतो .त्यामुळेच सुक्या लाकडांबरोबर ओली लाकडेहि जळतात अशी म्हण निर्माण झाली असावी .प्रेत जळण्यात कोणतीही अडचण येत नाही .वर्षांकाठी दोन चार प्रेते जाळावी लागतात  यापेक्षा जास्त मृत्यू नसल्यामुळे व्यवस्थित स्मशानाची गरज नसते .आठ पंधरा दिवसांमध्ये येथे स्मशान आहे याचा मागमूसही रहात नाही .स्मशान लांब असल्यास काही वेळेला घराच्या पाठीमागे समुद्रकिनाऱ्यावर वाळूवरच अग्नी दिला जातो .

आपली वरील चौकडी डोंगरावर चढताना स्मशानातून जात होती.एक दोन दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्यामुळे तेथे बांबूची लाकडे राखेचा ढीग वगैरे दिसत होता. शहरी बाबू स्मशानातून जाणाऱ्या वाटेवरून चालताना जरा दचकलेले होते. डोंगरावरून परत येताना त्याच वाटेने त्यांना यावे लागले .रात्र झाल्यामुळे व काळोखी रात्र असल्यामुळे बरोबरच्या टॉर्चच्या प्रकाशात ती चौकडी स्मशानातून आपल्या रिसॉर्टवर परत आली.  डोंगरावरील जंगल,स्मशानातील वाट, समुद्रावरून येणारा भणभण करणारा वारा,निर्मनुष्य समुद्र किनारा ,काळोखी रात्र या सर्वांचे थोडे बहुत दडपण चौघांच्याही मनावर आले होते .गप्पा मारता मारता त्यातील एकाला एक भन्नाट कल्पना सुचली .रात्री एक वाजता जो स्मशानात जाऊन येईल त्याला एक हजार रुपये देण्यात येतील असे त्याने जाहीर केले .अनोळखी गाव अनोळखी समुद्र किनारा अशा वेळी तेथील नुकत्याच पाहिलेल्या स्मशानात जाऊन येण्याची कल्पना कुणालाही रुचली नाही .तुम्ही सर्व डरपोक आहात भित्री भागुबाई आहात वगैरे चिडवाचिडवी सुरू झाली.पैज लावणार्‍याने मी आहे बुवा भित्रा म्हणून पांढरे निशाण फडकाविले .नेहमीप्रमाणे हो ना करता करता भरत स्मशानात जाऊन येण्यास तयार झाला .त्यावर एकाने शंका काढली की हा बेटा थोडासा समुद्र किनाऱ्यावर चक्कर मारून परत येईल आणि मी स्मशानातून आलो म्हणून सांगून एक हजार रुपये उपटील.स्मशानातून जाऊन आल्याची काही तरी खूण पाहिजे. तेवढय़ात एकाला रिसॉर्टमध्ये येताना बाहेर उभी करून ठेवलेली पहार आठवली .आहे या नेसलेल्या लुंगीवर ती पहार बरोबर घेऊन स्मशानात एकटे जावे ती पहार तिथे  जमिनीमध्ये जोरात मारून उभी ठेवावी म्हणजे दुसऱ्या दिवशी भरत तेथे जाऊन आल्याचा आपल्याला सकाळी पुरावा मिळेल .अशा प्रकारच्या सर्व अटी ठरल्या. बोलता बोलता प्रकरण इथपर्यंत आल्यावर पैज लावणार्‍याने भरत तू जाऊ नको मी पैज मागे घेतो वगैरे सांगून भरतला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.यामुळे चेव चढून भरत जाण्यासाठी आणखीनच तयार झाला .

रात्री एक वाजता सर्वत्र सामसूम झाल्यावर भरत स्मशानात जाण्यासाठी निघाला .बाहेर पडलेली पहार घेऊन भरत पाठिमागच्या बाजूने समुद्रावर चालत गेला.साधारणपणे अर्धा ते पाऊण तासामध्ये भरत परत येणे अपेक्षित होते.साधारणपणे स्मशान पंधरा मिनिटांच्या अंतरावर होते .तिघेही भरतची वाट पाहात होते .फार फार तर दोन वाजेपर्यंत भरत परत येणे अपेक्षित होते .अडीच वाजल्यानंतर तिघांनाही दम धरवेना .ज्याने पैज लावली होती त्याच्यावर उरलेले दोघे जण तुटून पडले .भरतचा स्वभाव तुला माहित आहे तू त्याला कशाला भरीला पाडले?येथे परक्या गावी काही भलते सलते झाले तर आपण काय करणार? त्याच्या आईला उत्तर काय देणार? वगैरे वगैरे .तो बिचारा कानकोंडा होऊन बसला .तिघेही बाहेर आले आणि त्यांनी वॉचमन जो झोपला होता त्याला जागे केले .रिसॉर्टच्या मालकालाही जागे केले .त्यांना सर्व हकिगत सांगितली .कोकणात खेडेगावात भुतांच्या कथा खूपच असतात .मालक या तिघांवर बरसला जर काही भलते सलते झाले तर पोलिस येतील रिसॉर्टचे नाव बदनाम होईल .इ.इ.

झाले ते झाले. प्रथम भरतला शोधून काढला पाहिजे. पांचहीजण स्मशानाच्या दिशेने मोठा दिवा व प्रत्येकाच्या हातात एक काठी असे सज्ज होऊन निघाले.वाटेत भरत भेटेल अशी एक वेडी आशा त्यांना वाटत होती .सर्वत्र सामसूम होती. केवळ लाटांचा आवाज येत होता. रात्र काळोखी होती .आकाशात चांदण्या चमचम करीत होत्या . भरतचा कुठेही मागमूस नव्हता .दबकत दबकत सर्वजण स्मशानात आले.दिव्याच्या प्रकाशात त्यांना जमिनीत मारलेली पहार व तेथेच पडलेला भरत दिसला. सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला .एवढय़ात शेजारच्या झाडावरून घुबडाने घुत्कार केला .भुताने घोळसल्यामुळे हा बेशुद्ध झाला किंवा मेला अशी सर्वांची कल्पना झाली .जवळ जाऊन नीट पाहतात तो भरतच्या लुंगीचा शेव सुटलेला होता .त्यात पहार घुसून जमिनीमध्ये उभी होती .व शेजारीच भरत आडवा झालेला होता .त्याच्या छातीवर हात ठेवता तो बेशुद्ध आहे असे लक्षात आले.समुद्राचे खारे पाणी आणून त्याच्या तोंडावर शिंपडल्यावर तो शुद्धीवर आला .

प्रत्यक्षात पुढीलप्रमाणे घटना घडलेली सर्वांच्या लक्षात आली .दबकत दबकत भरत स्मशानात गेला तेव्हां अनवधानाने त्यांच्या लुंगीचा शेव मोकळा झाला होता .दोन हाताने जोरात पहार मारताना ती त्या शेवामधून जमिनीत गेली.भरत परत येण्यासाठी निघाला आणि त्याला आपल्याला कुणीतरी धरून ठेवले आहे असे स्वाभाविकपणे वाटले.आधीच प्रचंड दडपणाखाली असलेला तो एवढ्या आघाताने बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला .सर्व गोष्टींचा उलगडा व्यवस्थित झाला .तरीही भरतला सणसणून ताप भरला . समुद्रात वेळी अवेळी डुंबणे अंग न पुसता वाळूवर अंग कोरडे करणे आणि या सर्वावर कडी म्हणून रात्रीचा झालेला हा प्रकार यांचा तो परिणाम असावा .दुसऱ्या दिवशी टॅक्सी करून चंबूगबाळे आवरून चौघेही परत आपल्या गावी आले .

चार दिवसांमध्ये ताप निघाला आणि त्याबरोबरच पैज मारण्याची हौसही निघून गेली .पुन्हा चौघेही कधीही कोणतीही पैज मारण्याच्या फंदात पडले नाहीत !!!सुदैवाने केवळ बेशुद्ध होण्यावर भागले जर कदाचित त्या धक्क्याने त्याला हार्ट अटॅक  आला असता तर भलतेच काही झाले असते.जिवावरचे शेपटीवर निभावले असे म्हणता येईल .

२०/१२/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel