शहरात येऊन गोविंदा फार बदलला होता.त्याला आपले गोविंदा हे नावसुद्धा आवडत नव्हते . खेडेगावातील शाळेत आपले संपूर्ण नाव गोविंद दगडू नारकर हे तो कोणतीही लाज न बाळगता सहज लिहित असे .शहरात आल्यावर त्याला आपल्या वडिलांच्या दगडू नावाची लाज वाटू लागली .पूर्वी अशी एक पद्धत होती, हल्ली ही कदाचित असेल, जर मुलगा होत नसेल तर मी त्याला दगडू म्हणेन दगड झाला धोंडा झाला असे समजेन.मग त्याचे नाव दगडू धोंडू असे ठेवले जात असे.गोविंदाच्या वडिलांचे नावही दगडू असे ठेवले होते .गोविंदाला आपल्या मित्रांची अनेक आधुनिक छान छान नावे पाहाता आपले नाव गावंढळ वाटे.त्यामुळे तो स्वतःला जीडी म्हणे. मित्रांनीही जीडी वरून हाक मारावी असा त्यांचा आग्रह असे .
एकेकाळी नाव व वडिलांचे नाव अशी लावण्याची पद्धत असे .आडनावाला विशेष महत्त्व नसे.नंतरच्या काळात आडनावावरून हाक मारली जाई.माणूस ओळखला जाई. एकाच आडनावाची दोन माणसे असली तर मग नावाचा संबंध येई.हल्ली केवळ नावावरून माणसाची ओळख ठेवली जाते.
तर असा हा आपला गोविंदा किंवा गोविंद दगडू किंवा नारकर .आई वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्याचे लाड जरा जास्तच होत असत .घरची परिस्थिती बेताचीच होती .आपल्या शेतात काम करून व दुसरीकडे मोलमजुरी करून त्यांचे कसेबसे भागत असे.अशी परिस्थिती असूनही त्याचे लाड होत असत .त्याने एखादी वस्तू मागितली आणि ती त्याला मिळाली नाही असे सहसा होत नसे .खेडेगावात आकर्षणे मुळातच कमी त्यामुळे त्यांची मजल गोविंदाच्या वडिलांच्या आवाक्याबाहेरील वस्तू मागण्याकडे जात नसे.सगळ्याच आईबापाना वाटते त्याप्रमाणे आपल्या मुलाने खूप शिकावे खूप मोठे व्हावे खूप नावलौकिक कमवावा असे त्याच्या आई वडिलांना वाटत असे .
गोविंदा हुशार होता. सुरुवातीपासून त्याने पहिला नंबर कधीही सोडला नाही .गांवढ्या गावात गाढवी सवाशीण अशी एक म्हण आहे त्यांच्या छोट्याश्या गावात पहिला नंबर म्हणजे काही विशेष गोष्ट नव्हती.परंतु पुढेही त्याने पहिला नंबर कधी सोडला नाही.एसएससीला तो पहिल्या दहा नंबरमध्ये आला .त्याचे शिक्षण स्कॉलरशिपवर चालले होते . शहरात गेल्यावरसुद्धा तो काही मुले बिघडतात तसा बिघडला नाही.अभ्यासात त्याने कधीही कुचराई केली नाही . त्याच्या वडिलांनीही त्याला शिक्षणासाठी पैसा सतत पुरवला.गावातील खोतांकडून सावकारांकडून कर्ज काढूनही पैसा पाठविला .हे कर्ज कुणीही दगडू जवळ असलेल्या जमिनीच्या तारणावर देत असे.केवळ स्कॉलरशिप मिळाली म्हणजे सर्व खर्च भागत नाही .पैसा हा लागतोच .मोलमजुरी करून शेतात जास्त काबाडकष्ट करून शक्यतो त्याचे वडील त्याला पैसे पाठवीत असत .माझा मुलगा शिकेल मोठा होईल आणि कर्ज फेडील अशी त्यांना खात्री होती.
मनुष्य नेहमी आशेवर जगत असतो .मुलांच्या रूपाने स्वतः आपण जगत असतो . आपल्याला जे जे मिळाले नाही ते ते आपल्या मुलाला मिळावे असे स्वाभाविकपणे वडिलांना वाटते.परंतु मुलांवर खर्च करीत असताना आपली स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.काळाच्या पोटात काय काय दडलेले आहे ते आपण पाहू शकत नाही .आपल्या इच्छेप्रमाणे कल्पनेप्रमाणे सर्व काही घडतेच असे नाही.त्यामुळे स्वतःसाठी किंवा मुलासाठी वर्तमानात खर्च करताना नेहमी स्वतःच्या भविष्य काळाचाही विचार डोळ्यांसमोर असला पाहिजे दुर्दैवाने काही पालक हा विचार करीत नाहीत .गोविंदाचे वडीलही त्याच प्रकारात मोडणारे होते.
गोविंदा शिकत गेला त्याचे वडील पैसे पाठवत राहिले.सुटीमध्ये गोविंदा घरी यावा असे त्याच्या आईवडिलांना वाटत असे.सुरुवाती सुरुवातीला गोविंदा सुटी लागली की घरी येत असे .परंतु हळूहळू त्याचे येणे कमी होऊ लागले.आई वडील वाट पाहत. तो आज येतो उद्या येतो म्हणून टोलवाटोलवी करीत असे.परीक्षा आहे. अभ्यास करायचा आहे. आणखी काही कोर्सेस करावे लागत आहेत.अशा काही ना काही सबबी तो सतत सांगत असे .केव्हा कारणे खरी असत तर केव्हा कारणे खोटी असत.एकंदरीत त्याचे प्रेम त्याची आपुलकी हळूहळू आटत चाललेली आढळून येत होती .काही लोकांना उपकाराची जाणीव नसते .इथे तर उपकार नव्हते वडील आपले कर्तव्य आपल्या मर्यादेबाहेर जाऊन पार पाडीत होते . त्याला तसाच प्रतिसाद गोविंदाकडून मिळणे अपेक्षित होते .परंतु गोविंदा तसा कठोर निघाला असे म्हणावे लागेल .
वडिलांची एकच आशा होती तो शिकेल मोठी नोकरी त्याला मिळेल आणि तो आपले पांग फेडील.आईवडील हळूहळू वृद्ध होत आहेत .त्यांचे हातपाय वयोमानाप्रमाणे हळूहळू थकणार.ते आपल्या मुलाच्या तोंडाकडे पहाणार नाही तर कुणाकडे पहाणार ?आपला मुलगा शिक्षणासाठी घेतलेले सर्व कर्ज तर फेडेलच परंतु त्याचबरोबर आपल्यालाही काही पैसे नेमाने पाठवीत जाईल आणि आपला म्हातारपणाचा काळ सुखात जाईल अशी त्यांची आशा होती.त्यांची असलेली सर्व जमीन सावकारच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली होती .गोविंदाला त्यांनी त्याची सर्व कल्पना वेळोवेळी दिलेली होती .तुम्ही काळजी करू नका मी सर्व कर्ज फेडीन असे तो सतत सांगत असे.
गोविंदा शिकला. मोठा झाला. त्याला चांगली नोकरी मिळाली . त्याचे लग्नही झाले .पुष्कळ शिक्षण मोठी नोकरी त्यामुळे सूनही शिक्षित मोठ्या घरची मिळाली .सर्व काही मनासारखे चालले होते.
गोविंदा पूर्वी केव्हातरी घरी येत होता .आता तो मुळीच येत नाहीसा झाला.केव्हाही विचारले की नवीन नोकरी नवीन जबाबदाऱ्या इत्यादी सबबी तो सांगत असे.पूर्वी अभ्यास परीक्षा यांची सबब असे तर आता नवीन नोकरी जबाबदाऱ्या इत्यादी सबबी असत.आई वडिलांबद्दल जे आतूनच प्रेम वाटले पाहिजे .आतूनच जो जिव्हाळा वाटला पाहिजे .ते प्रेम तो जिव्हाळा दुर्दैवाने त्याच्या जवळ नव्हता .एखाद्याजवळ प्रेम नसले तरी कर्तव्यबुद्धी असते.कर्तव्याची जबाबदारीची जाणीव असते. गोविंदाजवळ दुर्दैवाने तीही नव्हती .
सावकाराचे कर्जफेडीसाठी तगाद्यावर तगादे चालू झाले होते .दगडू जे काही तुटपुंजे उत्पन्न शेतीवर काढीत असे त्यातील मोठा हिस्सा व्याज फेडीसाठी जात असे.उरलेल्या पैशांमध्ये त्यांना जेमतेम स्वतःचे पोट भरता येत असे .गोविंदा कर्जफेडीचे नावही काढीत नव्हता .पत्रांवर पत्रे पाठवून तो त्याचा जबाबही देत नसे.सावकाराने वाट पाहिली आणि डिक्री आणून जमीन आपल्या ताब्यात घेतली .राहते घर आणि सभोवतीची थोडीशी जमीन त्यांच्या मालकीची राहिली.गोविंदा जणू काही आपल्याला आई वडील आहेत हे विसरूनच गेला .पूर्वी त्याला आपल्या नावाची लाज वाटत असे आता त्याला आपल्या आई वडिलांचीही लाज वाटू लागली .कर्जफेडीचे नाव नाही. आईवडिलांची विचारपूस नाही. म्हातारपणी त्यांना सुख समाधान आनंद द्यायचे तर दूरच राहिले परंतु त्या ठिकाणी क्लेश यातना दुःख त्यांच्या पदरी आले .
उत्पन्नाचे साधन नाही .हात पाय थकल्यामुळे काम करून पैसा मिळविता येत नाही .आजारपणात आपले प्रेमाचे माणूस जवळ नाही .प्रेम राहू द्या परंतु कर्तव्य बुद्धीनेही पाहणारे कोणी नाही .अशी अत्यंत वाईट परिस्थिती दगडू व त्याची बायको यांच्यावर ओढवली. एकदा शहरात जाऊन त्यांनी मुलाचा संसार पाहण्याचा प्रयत्न केला .अशा मुलाकडे जाणे ही नको असेच गोविंदाची आई त्रासून वैतागून म्हणत होती .मुलगा घरी येत नाही तर आपण त्याच्याकडे जाऊन त्याला सगळी सत्य परिस्थिती सांगावी.त्या उप्पर तो आणि त्याचे कर्तव्य आपण व आपले नशीब असे दगडूचे मानणे होते .दोघांचेही स्वागत मुळीच झाले नाही .आलेत कशाला ,आलेत तर शक्य तितक्या लवकर परत जा, असा त्यांचा एकूण दृष्टिकोन होता .हे माझे आई वडील हे सांगण्याला सुद्धा त्याला लाज वाटत आहे असे दिसत होते.त्याच्या शिक्षणासाठी काढलेले कर्ज त्याच्या शिक्षणासाठी खर्च केलेला पैसा यांची उजळणी नाइलाजाने दगडूने केली. त्यामुळे सावकराने कर्जापोटी आपल्या ताब्यात घेतलेली जमीन त्यामुळे त्यांच्यावर ओढवलेला दुर्धर प्रसंग हे सर्व दगडूने सांगितले .
तुम्ही तुमचे कर्तव्य केले .त्यात विशेष ते काय ?शहरातील खर्चाची तुम्हाला काय कल्पना .आमचाच खर्च आम्ही इथे कसा बसा भागवतो. इत्यादी त्यांची मुक्ताफळे ऐकून दगडूला व त्याच्या बायकोला इतका राग आला की त्याच्या दोन थोबाडीत ठेवून द्याव्या असे त्यांना वाटले .दुसऱ्याच दिवशी दगडू व त्याची बायको कुणाचाही निरोप न घेता आपल्या घरी निघून आली .
*त्यानंतर महिन्याभरात वर्तमानपत्रात शेवटच्या पानावर खाली उजव्या कोपऱ्यात एक छोटीशी बातमी आली .अमुक अमुक गावात अमुक अमुक नावाचे एक कुटुंब घराला आग लागून त्यामध्ये जळून मेले.*
* ती बातमी गोविंदाच्या वाचनात आली की नाही कुणाला माहिती*
२९/१/२०१९©प्रभाकर पटवर्धन