दादासाहेब हे एक बडे प्रस्थ होते .ब्रिटिश राज्य होते त्या वेळची एकोणीसशे सालची गोष्ट आहे .पेशवे यांनी कित्येक व्यक्तीना वतने इनामे दिली होती .अशा व्यक्तीना वतनदार किंवा इनामदार असे म्हणत .ब्रिटिश सरकारने विरोध नको म्हणून पूर्वीची वतने, इनामदार पाटील वगैरे तशीच ठेविली होती .त्यात दोन प्रकार होते .शेतसारा गोळा करून त्यातील काही भाग आपल्याकडे ठेवून उरलेला सरकार दरबारी जमा करावा लागणारे.तर दुसऱ्या प्रकारात गोळा केलेला सर्व शेतसारा स्वतःकडे ठेवणारे. दादासाहेब हे दुसऱ्या प्रकारचे इनामदार होते.सर्व महसूल शेतसारा स्वतःजवळ ठेवण्याची त्यांना परवानगी होती.त्यांचे पूर्वीचे आडनाव दोन पिढ्यांपूर्वीच सर्व विसरून गेले होते.गेल्या दोन पिढया व आता दादांची तिसरी पिढी , इनामदार म्हणून आडनाव लावीत.त्यांच्या आजोबानी युद्धामध्ये पेशव्यांवर होणारा घाव स्वतःवर झेलला होता.तेव्हा त्यांना दहा गावची इनामदारी पेशव्यांनी दिली होती .ही इनामदारी वंशपरंपरेने चालत असे . थोडक्यात या दहा गावांचे दादासाहेब राजेच होते.या दहा गावांचा सारा त्या काळात एक लाख रुपये येत असे .म्हणजे आजच्या हिशोबात पाच दहा कोटी रुपये सहज झाला .त्यावेळी सोने पाच रुपये तोळा म्हणजे सुमारे बारा ग्रॅम असा भाव होता .हे लक्षात घेतल्यावर त्या वेळच्या स्वस्ताईची दादासाहेबांच्या श्रीमंतीची कल्पना येईल .
त्यांची आवक जशी मोठी होती तसा खर्चही भक्कम जबरदस्त होता. त्यांचा वाडा, वाडा कसला राजवाडा फार मोठा होता .त्यामध्ये किती खोल्या आहेत ते कदाचित दादासाहेबांना सुद्धा माहित नसेल .त्यांचे मुदपाकखाने दोन होते .एक गड्यांसाठी व दुसरा घरातील माणसे पाहुणे रावळे यांच्यासाठी .त्यांच्या इथे दहा पंधरा गडी व दहा पंधरा पयिरी म्हणजे बायका माणसे नेहमी सबंध दिवस कामावर असत.त्यांचे दुपारचे व रात्रीचे जेवण आणि सकाळची न्याहरी वाड्यावर होत असे . त्याशिवाय त्यांच्या घराचा सर्व खर्च भागेल एवढे वेतन त्यांना दादासाहेब देत असत .आलटून पालटून यातील निम्मे गडी माणसे व बायका माणसे रात्रीही वाड्यावर असत .दादांकडे तीन चार मुनीम होते .एक मुनीम गडीमाणसे बायकामाणसे यांच्याकडून काम करून घेत असे .दुसरा मुनीम केवळ शेतसारा पाहात असे .तिसरा मुनीम सावकारी हिशोब व एकूण घराची देखभाल पाहात असे.चौथा मुनीम नेहमी दादांबरोबर असे. शिवाय या सर्वांवर लक्ष ठेवीत असे .
दादांकडे गाई म्हशी बैल इत्यादी जनावरे तीस चाळीस होती.याशिवाय तबेला वेगळा होता .दादांना निरनिराळ्या जातीच्या घोड्यांची हौस होती .नामवंत जातीचे चार पाच घोडे त्यांच्याकडे होते.ज्याप्रमाणे हल्ली श्रीमंत व्यक्ती दोन चार मॉडेलच्या मोटारी बाळगून असते .व मनाप्रमाणे त्यातील एखाद्या मोटारीतून फिरत असते त्याप्रमाणेच दादाही बाहेर पडताना त्यांच्या पसंतीच्या एखाद्या घोड्यावरून निघत असत .त्याशिवाय एक पालखीही होती.पालखीला चार गडी असत.ते दमले की बरोबरचे दुसरे चार गडी पालखी उचलत .दादा घोड्यावरून निघाले तरी बरोबर पालखीवाले असतच .दादा घोड्यावरून जात असताना या पालखी वाल्यांना मागून पळत जावे लागे.दादा त्यांच्या राज्यात घोड्यावरून फिरत असताना त्यांच्या मर्जीप्रमाणे वाटेतच केव्हातरी पालखीत बसत असत .पालखी हळूहळू नेलेली त्यांना पसंत नसे.पालखीवाल्यांनी पालखी दौडत नेली पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता.वाड्यावरील गडीमाणसापेक्षा हे पालखीवाले वेगळे होते.दादांबरोबर त्यांचा एक मुनीमही घोड्यावरून येत असे.तो वेळोवेळी दादांना सर्व माहिती देत असे.
दादा भेटले की त्यांची रयत त्यांना वाकून नमस्कार कुर्निसात करीत असे.दादांचा दरारा प्रचंड होता .ते रागीट व कठोर होते तसेच मृदू स्वभावाचेही होते .एखाद्याने काही गुन्हा केला असला तर त्याला ते स्वतः चाबकानेही फोडून काढीत असत .पाऊसपाणी नीट झाले नाही,शेत नीट पिकले नाही,शेतीवर कीड पडली,तर शेतसारा देणे शेतकऱ्याला कठीण पडत असे.अशा वेळी दादा त्याला सूट देत असत .दादा सूट देतात म्हणून नुकसानी झालेली नसतानाही काहीजण त्यांच्याकडे गयावया करून सूट मागत.दादा अशा लोकांना बरोबर ओळखून काढीत.त्यांची तीक्ष्ण नजर रयतेच्या चेहऱ्यावरील बारीक बदलते भाव बरोबर ओळखीतअसे.दादासाहेबांना सर्व काही कसे काय कळते याचे लोकांना आश्चर्य वाटे .
दादा गोरेपान किंचित बुटके होते तरीही त्यांची उंची साडेपाच फुटांच्या आसपास होती .शरीरयष्टी काटक व सुदृढ होती .अजूनही ते सकाळी नियमितपणे व्यायाम करीत असत .घोडा घामाने निथळेपर्यंत त्यांची सकाळी घोड्यावरील रपेट चाले. दादा धार्मिक होते .वाड्यावर नेहमी यज्ञयाग अनुष्ठाने इत्यादी चालत.पूजेसाठी म्हणून गुरुजी होते तरीही ते शक्यतो स्वतः पूजा करीत असत.त्यांची बाळकृष्णावर अतोनात भक्ती होती. संगमरवराची बाळकृष्णाची मुरली वाजवीत गायीला टेकून उभी असलेली अत्यंत रेखीव मूर्ती त्यांच्या देवघरात होती .त्याशिवाय एक रांगत्या बाळकृष्णाचीही मूर्ती होती .
त्यांच्याकडे सर्व सण समारंभ मोठ्या थाटामाटात होत असतच परंतु विशेषतःश्रावणामध्ये प्रतिपदेपासून आठ दिवस त्यांच्याकडे मोठा उत्सव असे.सर्व गाव त्यावेळी वाड्यावर असे . भजन पूजन कीर्तन असा एकच कल्लोळ होत असे .हा पावसाचा काळ असे.तरीही कुस्त्या आणि इतर अनेक खेळ घेतले जात .त्यामध्ये दादासाहेब स्वतः बक्षिसे वाटीत असत .दादासाहेबांनी गावात एक मुरलीधराचे मंदिर बांधले होते. जन्माष्टमीचा उत्सव घरी व मंदिरात दोन्ही ठिकाणी धूमधडाक्यात होत असे. दहीकाला होऊन व दहीकाल्याचा प्रसाद सर्वांना वाटून नंतर हा समारंभ संपे. या काळात वाड्यावर शेकडोंनी पंक्ती उठत. सर्व नातेवाईक मंडळी जमलेली असे .त्या काळात एक स्वतंत्र भटारखाना चालविला जाई .या समारंभाच्या काळात खर्चाकडे पाहिले जात नसे .
दादाना एक मुलगा व एक मुलगी असे अपत्य होते .मुलगी मोठी व मुलगा लहान होता .मुलीचे लग्न लहानपणीच झाले होते .जावई त्यावेळचा मॅट्रिक व घरचा संपन्न होता .घरी त्याचे भाऊबंद इस्टेट पाहात असत.मुलगा चांगल्या पोस्टवर मुंबईला नोकरीला होता.
ब्रिटिश सरकारला वतने शक्य असेल तिथे खालसा करावयाची होती . त्यामुळे काही ना काही कारण किंवा खुसपट काढून वतन खालसा केले जात असे .दादांना फार पूर्वी त्यांचा वारस कोण असे सरकारने विचारले होते .दादांनी अर्थातच मुलगा वारस असेल म्हणून सरकारला कळविले होते .
त्या काळी व्हॅक्सीनेशन वगैरे विशेष प्रमाणात नव्हते .देवीच्या किंवा इतर साथीमध्ये फार मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असत .दादांचा तरणाबांड मुलगा साथीमध्ये चार दिवसांचे तापाचे निमित्त होऊन वारला .बहुधा नवज्वर असावा . मुलाच्या मृत्यूमुळे दादा पूर्णपणे खचून गेले.एका दिवसात ते दहा वर्षांनी म्हातारे दिसू लागले.साठी आली तरी त्यांचे केस काळेभोर होते.कणा ताठ होता.एका रात्रीत त्यांचे काळे केस पांढरे शुभ्र झाले.दादांच्या समाचारासाठी वाड्यावर रयतेची रीघ लागली होती .मुलाचे दिवस वार झाले. हळूहळू दादा पूर्वीच्या स्थितीला येतील म्हणून सर्व आशा करीत होते .दादा हा धक्का पचवू शकले नाहीत. पोलादाच्या कांबी सारखा ताठ मनुष्य वाकून गेला.दादा आता गावात पूर्वी सारखे फिरत नाहीसे झाले .मुलगी व जावई आधारासाठी दादांजवळ येऊन राहिले होते.दादांनी मुलगा वारल्यामुळे आता माझी मुलगी वारस म्हणून राहील असे सरकारला कळविले .आपल्या मुलीने व जावयाने सर्व इनामदारी सांभाळावी अशी त्यांची इच्छा होती. सरकारने त्यांची विनंती धुडकावून लावली .दादांच्या मृत्यूनंतर त्यांची सर्व इनामदारी गावे सरकारमध्ये जमा केली जातील इनामदारी खालसा होईल असे स्पष्टपणे कळविले .सरकार दरबारी रदबदली करून अनेक खटपटी करूनही काहीही उपयोग झाला नाही .शेवटचा उपाय म्हणून कोर्टकचेरीही करण्यात आली परंतु त्याचाही काही उपयोग झाला नाही .या धक्क्याने दादा अंथरुणाला खिळले. मुदपाकखाने बंद झाले. गडी माणसांना रजा देण्यात आली.सर्व मुनिमांना रजा देण्यात आली. आश्रयाला आलेली नातेवाईक मंडळी जेवढे आपल्याला मिळेल तेवढे घेऊन पांगली.वाड्याची रया गेली .दादा मुलगी जावई आणि दोन चार माणसे एवढीच घरी उरली .दादांची स्वतःची म्हणून जेवढी शे दोनशे एकर जमीन होती तेवढीच त्यांच्या वारसांकडे दादांच्या मृत्यूनंतर राहणार होती .बाकी सर्व लयाला जाणार होते .वाड्यावरील यज्ञयाग सण समारंभ मंत्रघोष सर्व बंद झाले.फक्त गोकुळाष्टमी व त्याचा उत्सव राहिला .कुस्तीचे आखाडे खेळाचा जल्लोष मिरवणुका सर्व बंद झाले .पूर्वी वाड्यावर माणसांचा राबता असे . आता तो ओघ पूर्णपणे बंद झाला .
अशा परिस्थितीत दादांनी एक दिवस डोळे मिटले .दादांचा स्वभाव व पूर्वीचे वैभव आठवून सर्व गाव हळहळत होता. गावकऱ्यांनी त्यांची शेवटची मिरवणूक मोठ्या थाटात काढली आणि त्यांना अखेरचा निरोप दिला .
सर्व काही संपले .वाडा मोडकळीस आला .मुलगी व जावई मुंबईला निघून गेले .आता वाडा पूर्णपणे जमीनदोस्त झाला आहे .चौथऱ्यावर गवत उगवले आहे .त्यावर उनाड भटकी जनावरे चरताना दिसतात .जुने लोक वाड्याचे वैभव पूर्वीच्या आठवणी सांगतात.हल्लीच्या पिढीला दादा नावाची एक मोठी असामी होऊन गेली हेही माहित नाही .
जिथे राम कृष्ण आले व गेले तिथे दादांचे काय महत्त्व .त्यांची कसली आठवण .त्यांची मुलगी जाईपर्यंत फक्त त्या मुलीच्या हृदयात दादा होते. नंतर सर्व काही संपले .
*कालाय तस्मै नम:*
२१/२/२०१९©प्रभाकर पटवर्धन