( कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
माझ्या ओळखीचे एक अँटिक शॉप आहे.त्या दुकानात जुन्या पण खास अशा वैशिष्ट्यपूर्ण वस्तू असतात. निरनिराळ्या देशांच्या चलनातील निरनिराळ्या कालखंडातील प्रचलित असलेली व प्रचलित नसलेली नाणी, कागदी चलन ,जगप्रसिद्ध चित्रकारांनी काढलेली तैलचित्रे,प्रसिद्ध व्यंगचित्रकारांनी काढलेली मूळ व्यंगचित्रे,प्रसिद्ध मूर्तिकारांच्या मूर्ती,अज्ञात मूर्तिकारांची शिल्पे,प्रसिद्ध लेखकांचे किंवा इतर क्षेत्रातील व्यक्तींचे हस्ताक्षर व सह्या ,पोथ्या,मंदिरातील जुनी शिल्पे,प्राचीन वस्तू ,आकर्षक जुन्या पुराण्या कोणत्याही गोष्टी,त्या दुकानात हमखास सापडतात .ते एक छोटेसे वस्तूसंग्रहालय(म्युझिअम) आहे . ज्यांना कोणत्याही कारणाने अशा वस्तू नको असतात असे लोक त्या वस्तू मोहनरावाना(दुकानाच्या मालकाचे नाव) विकतात.पैशाची गरज, त्या वस्तूचे खरे मूल्य माहीत नसणे,अशा गोष्टी मिळवण्याचा व विकण्याचा उद्योग, चोरीची वस्तू किंवा आणखी काही कारणे अशी वस्तू विकण्यामागे असू शकतात.अर्थात त्याला मूल्य आहे की नाही हे दुकानदार ठरवतो.आणि त्या विकत घेतो . कधी कधी विकणाऱ्याला आणि खरेदी करणाऱ्यालाही त्याचे खरे मूल्य,खरे स्वरूप माहीत नसते.माझ्या बाबतीत असेच झाले .
मला जुन्या परंतु काहीतरी वैशिष्ट्य असलेल्या वस्तू विकत घेण्याचा छंद म्हणा, आवड म्हणा,नाद म्हणा आहे.काही दिवसांपूर्वी मी असाच त्या दुकानात गेलो होतो .म्युझियमप्रमाणे त्या दुकानात निरनिराळ्या दालनांमध्ये, निरनिराळ्या वस्तू,चित्रे,शिल्पे,मूर्ती,पुस्तके,पोथ्या, काचेच्या शोकेसमध्ये, पाहण्यासाठी ठेवलेल्या असतात .त्याच्या खाली थोडक्यात वस्तूंचे वर्णन लिहिलेली चिठ्ठी व किंमतही असते .त्यामुळे त्या वस्तूचे स्वरूप व महत्त्व आपल्याला कळते. वाटले तर खरेदी करावे किंवा नुसतीच एक चक्कर मारून निघून जावे .आतापर्यंत मी बऱ्याच वस्तू विकत घेतल्या असल्यामुळे माझी मोहनरावांशी,दुकानाच्या मालकाशी चांगली ओळख झाली आहे .
त्या दिवशी मी दुकानात गेल्यावर मोहनरावानी टेबलाखालील कपाटातून एक कॅमेरा काढून मला दाखविला.मोहनरावांच्या दृष्टीने जर एखादी वस्तू विशेष असेल तर ते ती वस्तू, निदान काही दिवस तरी, खाली कपाटात ठेवतात .आणि त्यांच्या खास ग्राहकाना ती दाखवितात.
मला त्या कॅमेर्यामध्ये विशेष काही आहे असे वरवर तरी दिसत नव्हते .मी त्याचे नीट निरीक्षण केले.तरीही काहीही खास बाब लक्षात आली नाही . मी कॅमेर्याच्या दृश्य शोधकामधून(व्ह्यू फाइंडर) निरनिराळया वस्तूंकडे पाहू लागलो आणि आश्चर्यचकित झालो .सर्व वस्तू स्पष्ट स्वच्छ रेखीव दिसत होत्या. कॅमेरा जरी जुना ज्यावर अनेक खड्डे पडले आहेत,रेघा आहेत,खांचा आहेत,रंग उडाला आहे ,असा दिसत असला तरी त्याची आंतील यंत्रणा एकदम नव्यासारखी होती.मनोमन मी तो कॅमेरा घेण्याचे निश्चित केले.
फोटो कसा येतो ते पहावे म्हणून दृश्यशोधकातून सर्वत्र पहात मी फोटो कशाचा घ्यावा त्याचा विचार करीत होतो.माझी नजर एका लाकडी बैलगाडीवर पडली .बैलगाडी साधारणपणे एखादी वीत रुंदी व हातभर लांबी एवढी होती.मला ती बैलगाडी आवडली.बैल डोलदार, सतेज, धष्टपुष्ट होते, तिचा रंग किंचित उडालेला होता .ती जुनाट वाटत होती .तिची कारागिरी उल्लेखनीय होती.मी तिचा एक फोटो घेतला.फोटो माझ्या कल्पनेपेक्षाही छान आला होता .नंतर मी आणखी दोन तीन फोटो घेत दुकानात फिरत होतो .फोटोची तुलना प्रत्यक्षातील बैलगाडी बरोबर करावी म्हणून मी जिथे बैलगाडी होती त्या जागेकडे पाहिले.बैलगाडी तिथे नव्हती.चौकशी करता तेवढ्यात एका ग्राहकाने बैलगाडी खरेदी करून नेली होती. फोटोची तुलना प्रत्यक्ष बैलगाडी बरोबर करणे मला शक्य झाले नाही . मी ज्या इतर वस्तूंचे फोटो घेतले होते त्यांच्याशी तुलना केली. माझे समाधान झाले.मी कॅमेर्याची किंमत विचारली .किंमत वाजवी होती.मी तो कॅमेरा खरेदी केला.
कॅमेरा फ्रंट सीटवर ठेवला आणि घरी आलो . दुसऱ्या दिवशी सकाळी जॉगिंगला जाताना तो कॅमेरा माझ्याबरोबर होता.रात्री मी तो कॅमेरा मोटारीतून घरात नेला नव्हता . फ्रंट सीटवर तो तसाच होता .पार्किंगमध्ये मोटार उभी केल्यावर मला जवळच एक गाय दिसली .गाय एकदम मरतुकडी होती.तिची प्रत्येक फासळी स्पष्ट दिसत होती.तिचे पोट खपाटीला गेले होते.तिला आठ पंधरा दिवसांत अन्न पाणी व्यवस्थित मिळाले नसावे असे वाटत होते. ती आता मरेल कि नंतर मरेल असे वाटत होते. तिचा मी एक फोटो घेतला .एवढ्यात मला कुणीतरी हाक मारली. त्याच्याशी बोलण्यात मी काही काळ गुंतलो होतो .नंतर मी गायीकडे पाहायला गेलो तो गाय तिथे नव्हती.तेवढ्यात ती निघून गेली असावी.गाय एवढी मरतुकडी होती की ती निघून गेली असेल यावर माझा विश्वास बसत नव्हता.परंतु ती गाय तिथे नव्हती एवढी गोष्ट मात्र खरी. मी तो कॅमेरा माझ्या मित्राना दाखविला.मित्रांचेही दोन तीन फोटो घेतले.
मी मोटार घेण्यासाठी पार्किंग लॉटमध्ये आलो.~एक धष्टपुष्ट तेजस्वी गाय तिथे बसली होती .~मी मोटार काढली आणि घरी निघून आलो.कांही कामांमध्ये नंतर दोन चार दिवस मी व्यस्त होतो. नंतर कॅमेरा घेतल्याचे मी विसरून गेलो.
आठ पंधरा दिवसांनी एका रविवारी पिकनिकसाठी कुटुंबाबरोबर नदी किनारी गावाबाहेर जाणार होतो.मला एकदम विकत घेतलेल्या कॅमेर्याची आठवण झाली.नेहमींचा कॅमेरा न घेता,नवीन घेतलेला जुन्या वस्तूंच्या दुकानातील कॅमेरा बरोबर घेतला.नदीकिनारी एक झोपडी होती.मोडकी तोडकी जीर्णशीर्ण अशी ती झोपडी होती.तिचा एक फोटो मी घेतला.नंतर आम्ही गप्पा गोष्टी हास्यविनोद खाणे पिणे यांत मग्न झालो होतो .निघताना माझी नजर पुन्हा झोपडीकडे गेली.तेथे एक नवी नुकतीच बांधलेली झोपडी उभी होती .जुन्या झोपडीचे रुपांतर एवढ्या अल्प वेळेत नवीन झोपडीत करणे शक्य नव्हते .हे असे कसे झाले ते माझ्या लक्षात येईना .मी कॅमेर्यात फोटो पाहिला. तो जुन्या झोपडीचा होता.मी पत्नी व मुलांना विचारले .त्यानाही जुनाट मोडकी तोडकी झोपडी पाहिलेली आठवत होती.मी नंतर घेतलेले फोटो पाहिले.ते फोटो वस्तुस्थितीशी जुळत होते .झोपडीचाच फोटो जुळत नव्हता.
~माझ्या मनात एक विलक्षण कल्पना आली .~
~ हा कॅमेरा अद्भुत होता.~
*हा कॅमेरा कोणत्याही दिवशी पहिल्या घेतलेल्या फोटोतील वस्तूचे नूतनीकरण,पुनरुज्जीवन करीत होता .*
*नंतर फोटो काढलेल्या वस्तूंमध्ये कॅमेरा काहीही बदल घडवत नव्हता.*
*अर्थात याची मला खात्री नव्हती. *
*दोन तीन दिवस प्रयोग केल्यावर खात्री होणार होती .*
(क्रमशः)
१६/८/२०२०©प्रभाकर पटवर्धन