हनुमान डोंगर दोन गावांच्या बरोबर मध्ये विसावला होता . डोंगराच्या दोन बाजूला दोन गावे वसलेली होती .आडगाव व पाडगाव अशी त्यांची नावे होती . बहुधा अल्याडगाव व पल्याडगाव अशी मुळात नावे असावीत.ल्या शब्द उच्चारणे कठीण असल्यामुळे अडगाव व पडगाव  आणि नंतर आडगाव व पाडगाव अशी सोपी सरळ सुटसुटीत नावे प्रचलित झाली असावीत .

हनुमान नाव पडण्याचे कारण तो डोंगर मारुतीसारखा कुठुनही पाहिला तरी दिसत असे .हनुमानाची खांद्यावर गदा घेतलेली, रामाच्या पुढ्यात बसलेली, जी प्रसिद्ध बैठक मुद्रा आहे,तसा तो डोंगर दिसत असे. हनुमान डोंगर नेहमी हिरवागार असे.उन्हाळा पावसाळा हिवाळा सर्व ऋतूत डोंगर हिरवागार असे.त्यावरील गवतही विशिष्ट उंचीचे नेहमी रहात असे .पाऊस कमी असो ,जास्त असो,उशीरा किंवा लवकर सुरू होवो,गवत नेहमी हिरवेगार व एकाच उंचीचे असे.संपूर्ण डोंगर एखादा हिरवागार उंची गालीचा पसरल्यासारखा वाटे. या हिरव्यागार गवतामुळे हनुमानाला एक खास शोभा प्राप्त झाली होती . नेहमी एकाच रंगाचे,एकाच उंचीचे असलेले, हिरवेगार गवत, हे एक आश्चर्य होते.अनेक शास्त्रज्ञांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला होता .कुणालाही हे कोडे सुटले नव्हते. कुणालाही याचे कारण कळंले नव्हते .हा काहीतरी दैवी चमत्कार असावा असे भाविकांचे म्हणणे होते .काहीतरी शास्त्रीय कारण असणारच फक्त आपल्याला ते कळत नाही असे शास्त्रज्ञांचे, तथाकथित बुद्धिवाद्यांचे,म्हणणे  होते .गदेचा गोल गोळा व त्यापुढील टोक, सर करण्यास अत्यंत कठीण असा एक प्रसिद्ध सुळका म्हणून प्रसिद्ध होते.हा चमत्कार ,हा डोंगर पाहण्यासाठी जवळच्या शहरातून अनेक पर्यटक येत असत .सुळका सर करण्यासाठी गिर्यारोहकही येत असत .शहरातून येणारा रस्ता अाडगाववरून पुढे जात असे.अाडगावला पर्यटन हा एक पैसे मिळवण्याचा चांगला उद्योग होता.या डोंगरासमोर हायवेला लागून एक मोठे षटकोनी पटांगण होते .

आडगाव व पाडगाव या दोन्ही गावांची लोकसंख्या कमी असल्यामुळे त्यासाठी एकच शाळा होती . शाळा डोंगरावर होती. दोन्ही गावांना समान अंतर पडेल अश्या  ठिकाणी ती बांधली होती.आडगाव वरून जाणाऱ्या हायवेला लागून असलेले, हनुमान डोंगरासमोर  असलेले, षटकोनी पटांगण शाळेमधून दिसत असे. डोंगराप्रमाणेच ते पटांगणही नेहमी हिरवेगार असे. लांबून पाहताना हनुमान व समोर षटकोनी पटांगण हे दृश्य फार मनोहर दिसत असे . 

मी सांगतो ती गोष्ट  सुमारे पंचवीस तीस वर्षांपूर्वीची आहे.आडगावात रामू व शामू असे दोघे मित्र शेजारी शेजारी  रहात होते. यथावकाश दोघांचाही विवाह झाला .त्याना कमल व विमल अशा  मुली झाल्या .कमल व विमल जवळ जवळ एकाच वयाच्या होत्या . दोघीही लहानपणापासून एकत्र खेळत, भांडत, वाढल्या.त्यांची मैत्री अत्यंत घट्ट होती .कळत नव्हते त्या वयात असताना त्या,आम्ही एकाच मुलाशी लग्न करणार असे म्हणत असत.त्यावर एकच हशा पिकत असे .दोघीही शाळेत जाऊ लागल्या .गावातील शाळेत जाणारी सर्व मुले निघताना एकमेकांना हाका मारून बरोबरच निघत असत.क्वचित कुणी काही कारणाने अगोदर किंवा नंतर निघत असे.येतानाही सर्व मुले सर्वसामान्यपणे बरोबरच येत असत .परंतू घरी जाताना रेंगाळत रेंगाळत रमतगमत जाण्याची प्रवृत्ती असे. 

गावातून निघणारा रस्ता प्रथम हायवेला मिळे. हायवेवरून एखादा किलोमिटर चालल्यानंतर षटकोनी पटांगण येई.पटांगण संपल्यावर थोड्या वेळाने डोंगरावर जाणारा रस्ता येई.ही पायवाट होती .ती दगडाने बांधलेली होती .त्याला पायऱ्या पायऱ्या होत्या . या पायर्‍या  सरळ  मुलांना शाळेमध्ये घेऊन जात असत .पाडगांवकडून येणारी पायवाटही अशाच प्रकारची होती.

कमल व विमल दोघांनाही लहानपणापासून वाचनाची खूप आवड होती.अरेबियन नाइट्स, जलपरी, मत्स्यकन्या ,सिंड्रेला अशा प्रकारची पुस्तके वाचायला त्यांना आवडत .रिकाम्या वेळात आपण मत्स्यकन्या आहोत,जलपरी आहोत, अरेबियन नाइट्स मधील एखादी व्यक्तिरेखा आहोत,असे समजून  त्या आपली करमणूक करून घेत असत.

कमल व विमल दोघीही षटकोनी पटांगणावरून जात असताना तिथे फुललेल्या गुलाबी बागेकडे पाहात जात असत .त्या षटकोनी पटांगणात षटकोनी आकाराचेच असंख्य वाफे केलेले होते.प्रत्येक वाफ्यात निरनिराळया  रंगांचे गुलाब लावलेले होते .कधी कुणीही न पाहिलेल्या व ऐकलेल्या रंगाचेसुद्धा गुलाब तिथे होते .काळे पिवळे हिरवे निळे लाल नारिंगी जांभळे पांढरे शुभ्र अशा विविध  रंगांचे गुलाब तिथे होते . याशिवाय विविध मिश्र रंगांचेही गुलाब तिथे होते.प्रत्येक षटकोनी वाफ्यात एकाच रंगाचे सर्व गुलाब असत .या गुलाबाच्या बागेकडे डोंगरावरून पाहताना, शाळेतून पाहताना ,दोघीना फारच आनंद होत असे.गुलाबाच्या बागेजवळील हायवेवरून जातानासुद्धा बागेकडे बघत बघत दोघीही जात असत.एकदा या बागेत जायचेच असा दोघींचाही निश्चय होता .त्या बागेला एक काटेरी कुंपण होते.बागेचा दरवाजा हायवेच्या बाजूलाच होता.गुलाबाची सुलभतेने वाहतूक करण्यासाठी हा दरवाजा हायवेच्या बाजूला असावा .

या दरवाज्याच्या चौकटीवर तीन पाट्या लावलेल्या होत्या . "प्रवेश निषिद्ध आहे" "tresspassing prohibited" "अंदर आना मना है"अश्या  त्या तीन पाट्या होत्या . दरवाज्याला बाहेर कुलूप लावलेले नसे .बहुधा रखवालदार असावा आणि तो आतून कडी लावून घेत असावा .

बागेत जावे,सर्वत्र हिंडावे फिरावे,गुलाबाच्या फुलांचा मस्त वास छातीत भरून घ्यावा,जमल्यास आवडत्या रंगाची  दोन चार फुले तोडावीत ,डोक्यात माळावीत,थोडी बरोबर नेऊन  देवावर वहावीत असे त्याना वाटे.दोघी पाचवीत होत्या. त्यांचे वय दहा अकरा वर्षे असावे. फाटकाला कुलूप नसले तरी आत जाण्याचा त्यांना धीर होत नसे.

कुठून तरी एखादा रखवालदार येईल आणि आपल्याला रागावेल .कदाचित दोन दणके देईल,मालकाकडे घेऊन जाईल, आपल्याला दाट बसेल, घरीही रागावतील, म्हणून दोघीही आत जावे असे उत्कटतेने वाटूनही आत जात नसत.शाळेतून येताना आज जायचेच असे दोघी मनाशी अनेकदा ठरवीत.परंतु फाटका जवळ आल्यावर त्यांना आत जायला भीती वाटे आणि शेवटी थोडा वेळ रेंगाळून मार्गस्थ होत.

दिवस असेच चालले होते .शेवटी एक दिवस त्यांनी आत जायचेच असा निश्चय केला.आतून कडी लावलेली असली तर पंचाईत होणार होती .ढकलून तर पाहू ,चान्स घेऊ, असा त्यांनी विचार केला.आज समजा कडी लावलेली असली तर उद्या प्रयत्न करू. रोज दरवाजा ढकलून पाहायचा.एखाद्या दिवशी तरी आपल्याला दरवाजा उघडा मिळेल.त्या दिवशी आपण आत शिरायचे. आपली  इच्छा  पूर्ण करून घ्यायचीच. सर्व गुलाब जवळून पाहायचे. असे त्यांनी मनाशी पक्के केले.

*रोज त्या दरवाजा ढकलून पहात असत.दरवाजा बंद असे .बहुधा आतून कडी कुलूप असावे .*

*आठ पंधरा दिवस असा प्रयत्न केल्यावर एके दिवशी दरवाजा हळूच उघडला .*

(क्रमशः)

५/१/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel