(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

मला रस्त्यावर जुनी पुस्तके खरेदी करण्याचा छंद आहे .कित्येक वेळा आऊट ऑफ प्रिंट झालेली पण उत्तम आशय असलेली ,मनोरंजक,वाचनीय , रोचक, आकर्षक, ज्यांची किंमत पैशात करता येणार नाही अशी पुस्तके मला रस्त्यावर मिळालेली आहेत .

असाच एकदा  मी  रस्त्यावर पुस्तकांची खरेदी करीत होतो . पुस्तक चाळायचे  चांगले वाटले तर बाजूला ठेवायचे. असे मी करीत होतो . मी नेहमी त्याच्याकडून पुस्तके विकत घेत असल्यामुळे हा रस्त्यावर बसून पुस्तके विकणारा माणूस माझ्या चांगलाच ओळखीचा झाला होता.एखादे विशेष पुस्तक आहे असे त्याला वाटले तर तो ते माझ्यासाठी बाजूला ठेवीत असे.त्याने माझ्या हातात एक वही ठेवली. तुम्हाला आवडेल असे वाटले म्हणून मी ही मुद्दाम बाजूला ठेवली आहे. वहीवर नाव होते परंतु पत्ता नव्हता.वहीतील पाने चाळता चाळता मला त्यातील कांही मजकूर अविश्वसनीय वाटला .असे कसे काय होऊ शकेल?असा प्रश्न माझ्या मनात आला.हे कुणाचे तरी कल्पना रंजन असावे असे मला वाटले. मला स्वस्तात फक्त एक रुपयात ती वही मिळाली .

त्यातील विशिष्ट पाने मी येथे  पुनर्मुद्रित  करीत आहे.ज्यांचा याच्यावर विश्वास बसणार नाही त्यांनी अपॉइंटमेंट घेऊन मूळ वही पहावी.मी ती वही जपून ठेवली आहे.  लेखकाला जेव्हा लिहावेसे वाटले त्यावेळी त्याने लिहिले आहे .

~ १~

लहानपणी प्रथम मी जेव्हा पक्ष्यांना आकाशात उडताना पाहिले तेव्हा आपल्याला जर असेच आकाशात उडता येईल तर किती चांगले होईल अशी कल्पना मनात आली .घार गरुड असे पक्षी आकाशात उंच उडताना थोडा वेळ पंख फडफडवतात  नंतर पंख स्थिर ठेवून किती तरी वेळ आकाशात विहरत असतात .बऱ्याच वेळा मी तशीच कल्पना करीत असे.मला पंख फुटले आहेत किंवा पंखाशिवायही मी आकाशात उंच उडत आहे.एखाद्या पक्षाच्या नजाकतीने मी इकडून तिकडे सहज जात आहे .इत्यादी इत्यादी .मी लहानपणी कित्येक वर्षे कोकणात रहात होतो. आमच्या घरून माझ्या आजोळी जायला दोन तीन तास सहज लागत .अगोदर अर्धा एक तास चालत जायचे नंतर नदी ओलांडण्यासाठी होडीची वाट पाहात थांबावे लागे.त्या काळी नदीवर पूल नव्हता.कित्येक  वेळा होडी मिळून पलीकडे जाईपर्यंत एक तास सुद्धा लागत असे. नंतर पुन्हा एखादा तास चालावे लागे.

हवेत उडून मी हा हा म्हणता पाच दहा मिनिटात माझ्या आजोळी पोचू शकत असे.अर्थात हे सर्व कल्पनेत असे.

~२~

मी जसजसा मोठा होऊ लागलो तसतसा हवेत उडण्याच्या माझ्या इच्छेला जास्त बळकटी, जास्त तीक्ष्णता, जास्त धार, येऊ लागली.

समुद्र किनारी बसलेला असताना मी कल्पनेने  क्षणात आकाशात अवगाहन करू लागे.क्षितीज रेषेवरून बोटी जाताना दिसत .त्यांच्या अस्पष्ट आकृती व धुराच्या रेषा दिसत. मी क्षणात आकाशात झेप घेत असे .थोड्याच वेळात मी क्षितिज रेषेवर पोचत असे .अर्थात त्यावेळी क्षितिजरेषा आणखी लांब गेलेली असे तो भाग वेगळा .धुराच्या रेघा काढणाऱ्या बोटींच्यावर चक्कर मारून मी पुन्हा समुद्र किनाऱ्यावर येत असे . 

मनाने केव्हाही मी आकाशात झेप घेत असे.हळूहळू मला स्वप्नेही तशीच पडू लागली .उदाहरणार्थ पाठीवर दप्तर घेऊन  आकाशातून आरामशीर विहरत मी शाळेत पोचत असे.चालणे, बसमध्ये चढणे उतरणे, रस्ता ओलांडणे, घामाघूम होणे,धक्काबुक्की करीत शाळेच्या फाटकातून इतरांबरोबर आत शिरणे हे सर्व  मी टाळत असे .आकाशातून  मी एकदम माझ्या वर्गाच्या पुढे उतरत असे.

~  ३~

मी माझ्या आई वडिलांबरोबर हिमाचल प्रदेशात पर्यटनासाठी गेलो होतो.तेथील दऱ्या, खोरी,वळणावळणाचे रस्ते, उंच पहाड, नजर पोचणार नाही अश्या  खोल दऱ्या,  पाहताना आकाशात उडण्याची माझी इच्छा आणखी तीव्र झाली.

हिमाचल प्रदेशात असेपर्यंत जवळजवळ रोज मी आकाशात विहरत आहे अशी  स्वप्ने मला पडत होती.जेव्हा जेव्हा मी उंच डोंगर, पर्वत, खोल दऱ्या ,सागर किनारे, पाहात असे त्या त्या वेळी मला  आकाशात जाऊन तिथून हे सर्व कसे दिसत असेल ते पाहण्याची तीव्र इच्छा होत असे.अशी तीव्र इच्छा झाली की रात्री मला लगेच स्वप्न पडत असे.मी उंचावर जाऊन सर्व भूप्रदेश पाहात असे .

~ ४~

मी मोठा होत होतो .शाळेतून विद्यालयात, विद्यालयातून महाविद्यालयात, माझा प्रवास सुरूच होता .आकाशातून तरंगत जाण्याची माझी स्वप्ने बंद होत नव्हती .पूर्वी मी एकटा आकाशात तरंगत असे .आता मी माझ्या बहिणीबरोबर, मित्रांबरोबर, मैत्रिणींबरोबर, आकाशात विहरू लागलो होतो.पूर्वी एकटा असे आता गटाने असे . 

मी एकदा माझ्या स्वप्नांबद्दल आई वडिलांजवळ बोललो.त्यांनी मला एका मनोविकारतज्ज्ञाकडे नेले .त्याने माझी स्वप्ने नीटपणे समजून घेतली .मला त्या संबंधी अनेक प्रश्न विचारले .शेवटी तो म्हणाला तुमच्या स्वप्नात विशेष काही नाही .प्रत्येकाला काही ना काही स्वप्ने पडत असतातच .जी इच्छा आपल्या मनात जास्त तीव्रतेने असेल त्याची स्वप्ने बऱ्याच वेळा बर्‍याच जणांना पडत असतात.हळूहळू ही स्वप्ने पडण्याचे प्रमाण कमी होत जाईल.काळजी करण्याचे कारण नाही .

~५~

मी मोठा झालो  तरी मला स्वप्ने पडण्याचे प्रमाण कमी झाले नाही.

मी  कल्पनेने प्रेमात पडलो.प्रेयसीबरोबर आकाशात विहरू लागलो.स्वप्नात मी तिच्याबरोबर जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी ,हँगिंग गार्डन ,कमला नेहरू पार्क ,एवढेच काय तर पुण्याची सारसबाग, आग्र्याचा ताजमहाल,  स्वप्नात कुठेही क्षणार्धात  आकाशातून जाऊ लागलो.

मी अंधेरीला राहत होतो .मला नोकरीसाठी बलार्ड पिअरला असलेल्या अॉफिसमध्ये जावे लागे.बस ट्रेन पुन्हा बस असे करीत पोहचेपर्यंत माझा दीड तास सहज जात असे.जर ऑफिसात उडत  जाता आले तर हा सर्व त्रास व खर्च वाचेल असे  माझ्या मनात अनेकदा येई .

~६~

हळूहळू माझ्या स्वप्नात वास्तवदर्शी फरक पडत जात होता .पूर्वी स्वप्नात मी कुठेही उडत जाऊ शकत असे .मला अंतराचे बंधन नव्हते .ज्याप्रमाणे मन क्षणात  कुठेही पोचू शकते त्याप्रमाणे स्वप्नात मी पोचू शकत असे.आता तसे होत नव्हते .माझ्या स्वप्नातील विहार करण्याला अंतराच्या मर्यादा पडल्या होत्या. जर मला खरेच जागेपणी वास्तवात उडता येत असते तर ज्या अंतरापर्यंत मी वास्तवात  उडत जाऊ शकलो असतो तेवढ्याच अंतरापर्यंत स्वप्नात उडत जाऊ शकत होतो .आता मला स्वप्नात निरनिराळ्या ठिकाणी जाण्यासाठी निरनिराळा वेळ लागत असे .उदाहरणार्थ अंधेरीहून मी जुहू चौपाटीला लवकर पोचत असे तर गिरगाव चौपाटीला जायला मला जास्त वेळ लागत असे .त्यामुळे हल्ली माझी स्वप्ने बहुशः मुंबईपुरतीच मर्यादित झाली होती .

समजा मी अाग्रा येथे गेलो असलो तर मी  आकाशात विहरत असल्याची स्वप्ने आग्रा, मथुरा, फत्तेपूर सिक्री,  एवढ्याच मर्यादित भागातील असत.

मुंबईहून मी फार फार तर लोणावळा पुणे पर्यंत स्वप्नात आकाशातून विहरत जात असे .

~७~

आणि एके दिवशी एक चमत्कार झाला .आतापर्यंत न घडलेली न जाणवलेली अशी एक गोष्ट घडली .

पावसाळी दिवस होते. बाहेर धुंवाधार पाऊस पडत होता.गार वारे सुटले होते .अश्या  वेळी  पावसात आकाशात  विहार करणे शक्यच नव्हते .पांघरुणात गुरगटून झोपण्याची ही वेळ होती.मी नेहमीपेक्षा जरा लवकरच झोपी गेलो . स्वप्नात मी आकाशात फिरत होतो .

पावसात आकाशातून उडताना स्वाभाविकच माझे कपडे पूर्णपणे भिजले.

केस भिजून  त्यातून पाणी निथळू लागले.गार वारे सुटले होते .मला खूप थंडी वाजत होती . 

त्यामुळे कुडकुडतच मी जागा झालो.जागा झाल्यावर इतकी थंडी वाजण्याचे कारण माझ्या लक्षात आले. 

माझे कपडे पूर्णपणे  भिजले होते.केस ओले गच्च झाले होते. गादी ओली झाली होती.

गॅलरीतून कॉटपर्यंत ओल्या पावलांचे ठसे उमटले होते.याचा अर्थ मी स्वप्नात नव्हे तर  खरेच बाहेर गेलो होतो .

ओल्या पावलांच्या ठशांचा शोध घेता ते पुढे लिफ्टपर्यंत गेलेले नव्हते.म्हणजे मी खरेच आकाशात विहरत होतो.

तिथेच मी भिजलो होतो.मी तसाच गॅलरीत उतरलो असावा .याचाच अर्थ स्वप्नात आकाशातून फिरणे स्वप्न नव्हते तर मी प्रत्यक्ष विहरत होतो!!

*  पूर्वी कदाचित स्वप्न असेलही परंतु आता स्वप्न वास्तवता झाली होती .* 

(क्रमशः)

१५/४/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel