(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

माझे कपडे पूर्णपणे  भिजले होते.केस ओले गच्च झाले होते. गादी ओली झाली होती.

गॅलरीतून कॉटपर्यंत ओल्या पावलांचे ठसे उमटले होते.याचा अर्थ मी स्वप्नात नव्हे तर  खरेच बाहेर गेलो होतो .

ओल्या पावलांच्या ठशांचा शोध घेता ते पुढे लिफ्टपर्यंत गेलेले नव्हते.म्हणजे मी खरेच आकाशात विहरत होतो.

तिथेच मी भिजलो होतो.मी तसाच गॅलरीत उतरलो असावा .याचाच अर्थ स्वप्नात आकाशातून फिरणे स्वप्न नव्हते तर मी प्रत्यक्ष विहरत होतो!!

पूर्वी कदाचित स्वप्न असेलही परंतु आता स्वप्न वास्तवता झाली होती .

~८~

नंतर मला असाच पुन्हा  एकदा अनुभव आला .मी दार्जिलिंगला सफरीसाठी एका पर्यटन कंपनीबरोबर गेलो होतो.थंडी प्रचंड असल्यामुळे गरम कपडे  घालून झोपलो होतो.नेहमीप्रमाणे स्वप्नात आकाशात माझा संचार सुरू झाला.बर्फवृष्टी होत होती.मला खूप थंडी वाजू लागली .मी आकाशात अवगाहन थांबवून लगेच खोलीत आलो. मी केव्हा गादीवर येऊन झोपलो माहीत नाही.परंतु लगेचच जाग आली असावी .दिवा लावून पाहतो तो माझ्या स्वेटरवर जिकडे तिकडे बर्फ चिकटलेला होता.

माझा आकाशातील संचार मर्यादित क्षेत्रात असणे, आणि त्याचवेळी आकाशात असलेल्या परिस्थितीचा, पाऊस बर्फ इत्यादी गोष्टींचा पुरावा माझ्या कपड्यांवर दिसणे या दोन्ही गोष्टींमुळे मी झोपल्यावर आकाशात खरेच संचार करत असतो याची मला खात्री पटली.

~ ९~

नंतरचा तिसरा अनुभव तर मजेशीर आणि स्वागतार्ह होता . मी जंगल सफारीसाठी मुंबई जवळील जंगलात एका रिसॉर्टमध्ये उतरलो होतो. त्या दिवशी पौर्णिमा होती . शरदाचे सोनेरी चांदणे पडले होते .मुंबई सारखा जंगलात दिव्यांचा झगमगाट नव्हता .पौर्णिमेच्या  चांदण्याचा आस्वाद मनमुराद घेता येत होता.निद्राधीन व्हायचे आणि आकाशात विहार करायचा याचे मला आता व्यसनच लागले होते.मी आकाशात नेहमी प्रमाणे फिरत होतो .मला माझ्या प्रमाणेच एक मुलगी आकाशात तरंगताना दिसली .तिची कांती सुवर्णाची होती .बहुधा सोनेरी चंद्रकिरणांमुळे ती मला तशी दिसली असावी .मनात चांदणे असले की सर्वच सुंदर दिसू लागते .आपली "ती" भेटली की निश्चितच "ती" सुंदर दिसू लागते .एका विशिष्ट वयात मुले मुली इतरांना व परस्परांना तर नक्कीच  सुंदर दिसू लागतात.

तिने सैलसर पंजाबी ड्रेस घातला होता.तिचा चेहरा मोहक व आकर्षक होता. निदान मला तो तसा वाटला.तिला बघून मला जसे आश्चर्य वाटले त्याप्रमाणे मला बघून तिलाही आश्चर्य वाटले.मला जशी माझी ती हीच असे वाटले, त्या प्रमाणेच तिलाही माझा तो हाच असे वाटले असावे .माझिया आवडीचे मज भेटो कोणी,आवडीची धनी निरंतरी,  असे कुणीतरी म्हटलेले आहे.स्वतःला ज्याचा छंद आहे, स्वतःला ज्याची आवड आहे, तीच आवड असलेले कुणी तरी मला भेटो.त्याचा तिचा सहवास सदैव लाभो अशी इच्छा प्रगट केली आहे. माझे तसेच झाले .

ट्रेनमध्ये, बसमध्ये, बागेमध्ये ,आवडलेले माणूस  भेटल्यावर ज्याप्रमाणे आपण ओळख करून घेण्यासाठी उत्सुक असतो .तुम्ही कोण मी कोण वगैरे चौकशी  करतो त्याप्रमाणे आम्ही परस्परांची चौकशी केली.बोलताना आम्ही पक्ष्याप्रमाणे उडतच होतो.  त्या रात्री आम्ही बरोबरच फेरफटका मारला.नेहमीपेक्षा बहुधा जास्तच मी आज आकाशात रेंगाळलो असावा.कारण दुसऱ्या दिवशी उठलो तेव्हा माझे डोळे जास्तच चुरचुरत होते.जेव्हा जेव्हा मी स्वप्नात आकाशात जास्त काळ विहरत असे ,त्या त्या वेळी सकाळी मला झोप अपुरी  झाली असे वाटत असे . तीही जंगल सफारीसाठी आली होती .दुसऱ्या एका हॉटेलात ती उतरली होती.जंगलात असेपर्यंत आम्ही दोघेही ठरवून, अपॉइंटमेंट घेऊन, हातात हात घालून जंगलावरून आकाशात स्वैर  संचार करीत होतो.

गंमत म्हणजे माझ्या अशा संचाराची कोणालाही शंका येत नव्हती .माझ्या खोलीचा दरवाजा उघडून मी गॅलरीत येत होतो.बहुधा गॅलरीच्या कठडय़ावर चढून  आकाशात झेप घेत होतो .

~१०~

तीही मुंबईची

होती.तिला माणिकला माझ्याप्रमाणेच आकाशात स्वैर संचार  करण्याची इच्छा लहानपणापासूनच होती . ती दिवसा कल्पनेत आकाशात संचार करीत असे.रात्री तशीच स्वप्ने तिला पडत.माझ्याप्रमाणेच  तिची स्वप्ने, स्वप्ने न राहता वास्तवता झाली होती. आम्ही ठरवून आकाशात भेटत असू.ठरविल्याप्रमाणे स्वप्नात प्रत्यक्षात आम्ही कसे काय न चुकता भेटत असू फिरत असू ते आम्हाला कधीच कळले नाही .चांदण्यात चौपाटीवर बसून गप्पा मारत असू.इतरांसारखे सिनेमा नाटक मॉल इत्यादी आमचे फिरणे असेच,परंतु रात्री झोपल्यानंतर  आकाशातून विहार करणे, हा आमचा खास आवडीचा, सर्वस्वी खासगी, फक्त दोघांनाच माहीत असलेला, असा  प्रांत होता .

एक दिवस मी तिला प्रपोज केले .तिनेही माझा स्वीकार केला .तिलाही माझ्यासारखीच लहानपणापासून आकाशात उडण्याची दुर्दम्य इच्छा होती.प्रथम ती स्वप्नात आकाशात विहरत असे .प्रत्यक्षात आपल्या खोलीत झोपलेली असे .झोपल्यावर कसे कोण जाणे आपण खुद्द आकाशात  जाऊन विहार करतो असे तिला माझ्यासारखेच लक्षात आले.

झोपल्यावर ही विद्या, ही शक्ती, आपल्यात कशी येते हे तिला माझ्याप्रमाणेच कळत नव्हते .तिच्या व आमच्या घरच्याना आम्ही आकाशातील विहार वगळून बाकी सर्व गोष्टी सांगितल्या .त्यांनी आमच्या विवाहाला संमती दिली .

धूमधडाक्यात आमचे लग्न झाले .

~११~

मधुचंद्रासाठी आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो.

जर झोपल्यावर आपल्याला आकाशात उडता येते तर जागेपणी उडता का येणार नाही?असा प्रश्न आमच्या मनात सारखा घोळत असे . जमिनीवर उभे राहून आम्ही उडण्याचा प्रयत्न करून पाहिला होता.आमचा प्रयत्न असफल ठरला होता .

आमच्या मनात एक कल्पना बरेच दिवस तरळत होती .ज्याप्रमाणे मुलाला पाण्यात ढकलून दिले की तो पोहू लागतो . त्याची भीती जाते .त्याप्रमाणेच जर आपण उंचावरून उडी मारली तर आपण तरंगू शकू.

झोपेत ज्याप्रमाणे काही लोक चालतात त्याच प्रमाणे आपण झोपेत आकाशात विहार करतो .

प्रयत्न केला तर आपल्याला  जागेपणीही आकाशात विहार करता येणे शक्य आहे .

आपण धीर करून  उंचावरून उडी मारली पाहिजे.

यापुढे डायरी लिहिलेली नव्हती.

पुढील सर्व पाने कोरी होती .

+      +        +        +         +  

* वही फार जुनी वाटत नव्हती  *

*मला वर्षभरापूर्वी वर्तमानपत्रात छापून आलेली एक बातमी आठवली.*

बातमी पुढीलप्रमाणे होती .

*मधुचंद्रासाठी एक जोडपे मुंबईहून महाबळेश्वरला आले होते .*

*बॉम्बे पॉइंटवर पाय घसरून दरीत पडून त्यांचा अपघाती दु:खद मृत्यू झाला. *

*परमेश्वर मृतात्म्यांस शांती देवो .*

(समाप्त)

१५/४/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel