( कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)

माझ्या मनात एक विलक्षण कल्पना आली .हा कॅमेरा अद्भुत होता.हा कॅमेरा कोणत्याही दिवशी पहिल्या घेतलेल्या फोटोतील वस्तूचे नूतनीकरण,पुनरुज्जीवन करीत होता .

नंतर फोटो काढलेल्या वस्तूंमध्ये  कॅमेरा काहीही बदल घडवत नव्हता.अर्थात याची मला खात्री नव्हती. दोन तीन दिवस प्रयोग केल्यावर खात्री होणार होती .

मी जिथे कॅमेरा घेतला तिथे पहिल्या फोटोची तुलना, वस्तूशी करणे शक्य झाले नव्हते.

ती बैलगाडी तेवढ्यांत कुणीतरी विकत घेऊन गेला होता.प्रत्यक्षात बैलगाडीचे नूतनीकरण झाले असले तरी ते मला कळणे शक्य नव्हते.  

दुसर्‍या दिवशी काढलेला पहिला फोटो गायीचा होता.परंतु तेवढय़ात कुणीतरी हाक मारल्यामुळे त्याच्याशी बोलण्यात मी गुंतलो होतो .नंतर पाहतो तो ती गाय तेथून निघून गेली होती . गायीचे रूपांतर झाले असल्यास ते मला कळणे शक्य नव्हते. पार्किंग लॉटमधून मोटार  काढताना तिथे एक धष्टपुष्ट गाय होती.मी ती दुसरीच समजलो होतो.मी फोटो काढलेली गायच ती असण्याची शक्यता होती.अद्भुत कॅमेऱ्यामुळे तिचा फोटो काढताच ती धष्टपुष्ट झाली होती !!

नंतर आज मी पडक्या झोपडीचा त्या दिवसातील  पहिला फोटो घेतला होता .ती नवीन चकाचक झाली होती .त्यामुळेच ही विलक्षण कल्पना माझ्या मनात आली होती .मनातल्या मनात मी त्या कॅमेर्‍यातून घेतलेले प्रत्येक दिवशीचे पहिले फोटो आठवत होतो.माझ्या निष्कर्षाला  बळकटी मिळत होती.  

दुसऱ्या दिवशी सकाळीच मी गावाबाहेर मोटार घेऊन आलो.रस्त्याच्या कडेला एक वठलेले बहुधा मेलेले झाड उभे होते.मी त्याचा फोटो घेतला .मी लगेच त्या झाडाकडे पाहण्याला सुरुवात केली . कांही सेकंदात त्या झाडाचे रूपांतर नवीन झाडात होताना मी पाहिले.शुष्क झाडाला फांद्या फुटल्या, पालवी फुटली,पाहता पाहता पाने जून झाली .झाड नाविन्याने रसरसलेले होते .माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता .मी तशी कल्पना करूनही प्रत्यक्षात तसे होताना पाहून गांगरून गेलो होतो . मी आणखी काही फोटो काढले .फोटो काढलेल्या वस्तूंमध्ये काहीही फरक पडला नव्हता .

नंतर मी आणखी एक प्रयोग करून बघण्याचे ठरविले .दिवसांत पहिल्या घेतलेल्या फोटोतील वस्तूचे होणारे नूतनीकरण टिकून राहते की नाही ते मला पहायचे होते. 

आमच्या घराला रंग द्यायला झाला होता.मी सकाळीच हॉलमधील एका भिंतीचा फोटो घेतला.भिंत काही सेंकदातच नवीन रंग दिल्यासारखी झाली .पुढील काही दिवस मी आमच्या घरातील निरनिराळ्या भिंतींचे फोटो काढीत होतो.सकाळी उठल्याबरोबर एका भिंतीचा फोटो मी काढीत होतो. भिंतीवरील रंगांचे नूतनीकरण होत होते .मात्र रंग बदलत नव्हता .पूर्वीचाच रंग नव्याने दिल्यासारखा होत होता .थोड्याच दिवसात माझे घर नवीन रंग दिल्यासारखे चकाचक झाले. 

कॅमेऱ्यावर खर्च केलेले पैसे वसूल झाले.एवढेच नव्हे तर छंद म्हणून घेतलेल्या कितीतरी गोष्टींचे पैसेही वसूल झाले होते .घरातील रंगांचा राडा साफ करणे ,वस्तूंची फिरवाफिरव ,रंगकाम करणाऱ्यांचे येणे जाणे ,त्यांचा घरात होणारा मुक्त वावर ,रंगांचे येणारे उग्र वास ,त्यामुळे चुरचुरणारे डोळे,श्वासावर होणारा परिणाम,काही दिवस सहन करावे लागणारे गुदमरणे, या सर्वांपासून आम्हाला मुक्ती मिळाली होती .माझ्या वडिलांना रंगांचा त्रास होतो .त्याना दमा लागतो.औषधे घ्यावी लागतात .कदाचित डॉक्टरांकडे जावे लागते .त्या सर्व त्रासापासून त्यांची मुक्तता झाली  होती. आम्ही सर्वच आपापल्यापरीने आनंदी होतो.   

कॅमेर्‍यामार्फत घराला रंग देऊन झाल्यावर नूतनीकरणाचा हा छंद मी काही दिवस बाजूला ठेवला .या कॅमेऱ्याने फोटो काढणे म्हणजे निसर्गातील समतोलाशी ढवळाढवळ करणे होय असे मला वाटत होते .त्या कॅमेर्‍याने फोटो छान येत .फक्त दिवसातील काढलेला पहिला फोटो,(तोही यथातथ्य येत असे ) त्या सजीव किंवा निर्जीव वस्तूचे नूतनीकरण करीत असे.

माझ्या मनात आणखी एक विलक्षण कल्पना आली .हॉस्पिटलमध्ये जो अासन्नमरणावस्थेमध्ये आहे,त्याचा जर सकाळी पहिला फोटो घेतला तर तो पूर्ण बरा होईल .किंबहुना त्याला लगेच डिस्चार्जही मिळेल.मला मरतुकडी आसन्नमरण अवस्थेत असलेली गाय आठवत होती .मी धष्टपुष्ट पाहिलेली गाय तीच होती अशी माझी ठाम समजूत होती .

एक दिवस मी मुद्दाम  माझ्या डॉक्टर मित्राच्या हॉस्पिटलमध्ये गेलो.तेथील आयसीयूमध्ये असलेल्या एका पेशंटचा फोटो घेतला.हे सर्व मी सर्वांची नजर चुकवून केले .तो पेशंट टुणटुणीत  टकाटक झाला.डॉक्टर राऊंडला आल्यावर त्यांना त्याच्यातील आश्चर्यकारक बदल पाहून धक्का बसला. पेशंटला त्याच्या इच्छेनुसार स्पेशल खोलीत हलविण्यात आले.डॉक्टरांच्या मतानुसार ज्या पेशंटला निदान पंधरा दिवस तरी हॉस्पिटलमध्ये राहावे लागले असते त्याला दुसऱ्या दिवशी  डिस्चार्ज मिळाला होता .माझ्या कल्पनेनुसार प्रत्यक्षात घडले होते !

नंतर मी आणखी एक प्रयोग केला .विहिरीचे पाणी एकाएकी आटले होते. विहीर पडीक  होती. सकाळी सकाळी त्या विहीरीचा फोटो घेतला.विहिरीतील आटलेले झरे पुन्हा झुळुझुळु वाहू लागले. विहीर पाण्याने भरली !!

गावाबाहेर एक शुष्क कोरडा ओढा होता. .सकाळी सकाळी त्याचा फोटो घेतला .ओढ्यातून पाणी वाहू लागले. विहिरी प्रमाणेच ओढ्यातील आटलेले झरे पुनर्जीवित झाले !!!

आता मी मनात येईल तेव्हा ठरविलेल्या जिवंत किंवा निर्जीव वस्तूंचे नूतनीकरण  त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी करू शकत होतो .

फक्त प्रश्न असा होता की असे करावे की करू नये ?ही निसर्गामध्ये ढवळाढवळ नाही ना?डॉक्टर औषध देतो.सर्जन ऑपरेशन करतो.झाडाला आपण खतपाणी घालतो.कीटकनाशकांचा वापर करतो.इनॉक्युलेशन, व्हॅक्सीनेशन,अँण्टीबायोटिक्सचा वापर करतो,या सर्व गोष्टी म्हणजे निसर्गात ढवळाढवळ नाही का?

मनुष्य पदोपदी निसर्गात प्राचीन काळापासून ढवळाढवळ करीत आला आहे.त्यालाचआपण उत्क्रांती विकास असे म्हणतो. आपण धरणे बांधतो .रस्ते बांधतो .मोटार ,विमान, रेल्वे, किंबहुना सर्व शोध हे निसर्गात ढवळाढवळ नव्हे काय? मग मी रोज एक फोटो काढून नूतनीकरण केले तर काय बिघडले? उलट अशा कृतीमुळे जग जास्त सुंदर सुदृढ बनेल .

मी या गोष्टीवर संभ्रमित (कन्फ्यूज्ड) होतो.मी नंतर त्या कॅमेर्‍याचा काही दिवस वापर केला नाही.

आम्ही कुटुंबीय एक दिवस आमच्या गावच्या नदीमध्ये जलविहारासाठी  गेलो होतो .

कॅमेरा बरोबर घेतला होता .

माझ्या मुलाला फोटो काढण्याची लहर आली .

मी त्याला कॅमेरा दिला.

फोटो काढताना कॅमेरा त्याच्या हातातून निसटला.दुर्दैवाने घाई घाईत त्याने कॅमेराचा बेल्ट गळय़ात अडकवला नव्हता. 

*बघता बघता कॅमेरा पाण्यात दिसेनासा झाला.*

*बहुधा कॅमेरा नदीतून वाहून गेला असावा.*

*कॅमेरा जलाभेद्य आहे की नाही माहीत नाही .*

* तो कुणाला सापडेल की नाही माहीत नाही .*

*माझ्याजवळ तो आता नाही एवढी गोष्ट मात्र खरी.* 

(समाप्त)

१६/८/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel