( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

*जर त्यांना त्या बुजगावण्यामध्ये खवीस राहायला आला आहे याची कल्पना असती तर ते त्या बुजगावण्याच्या वाटेला कदापि गेले नसते.*

*अशा कुटिल हेतूने मनोहरपंतांच्या आगरात रात्रीचे गुपचूप कधीही शिरले नसते.*

*परंतु होणारे टळत नाही हेच खरे.जशी दैवगती तशी बुद्धी. *

विसुभाऊ ही एक खास चीज होती.कोकणातही विरळा सापडणारा हा एक खास नमुना होता. विसुभाऊना भीती हा शब्द नाहीत नव्हता.प्रकाशाविना मध्यरात्रीही ते एका गावातून दुसऱ्या गावात आरामात चालत जात असत.गाडी रस्त्याने नव्हे तर डोंगरातून जाणार्‍या जवळच्या पाय रस्त्याने ते जात.पायात करकरणार्‍या वाहणा आणि हातात सोटा एवढी आयुधे त्यांना पुरेशी असत.मी मी म्हणणारे ज्या रस्त्याने आणि ज्या वड पिंपळाच्या झाडाखालून, पाणवठ्यावरून,आसरा आहेत अशा तळ्यावरून  जायला घाबरत असत किंबहुना जातच नसत तेथून विसुभाऊ आरामशीर  मनात कोणताही किंतू न येता, जात असत.

तर हे असे उलटय़ा काळजाचे धैर्यशील विसुभाऊ अमावास्येच्या रात्री आवाज करू न देता मनोहरपंतांच्या आगरात शिरले. बुजगावणे एका जागी स्थिर होते.त्यामध्ये खवीस होता.त्या रात्री खवीसालाही बहुधा  झोप लागली असावी.दबक्या पावलांनी हळू हळू चालत विसुभाऊ बुजगावण्याजवळ पोचले.बुजगावण्याने कांही हालचाल केल्यास प्रतिकार करण्यासाठी,त्या बुजगावण्याचा कपाळमोक्ष करण्यासाठी विसुभाऊ हातात सोटा घेऊन तयार होतेच. बुजगावणे कांहीही करणार नाही याबद्दल त्यांची मनोमन खात्री होती.

बुजगावण्याजवळ येताच विसूभाऊनी त्यांच्या जाड सोट्याचा एक भक्कम घाव बुजगावण्याच्या डोक्यावर घातला.बुजगावण्याच्या डोक्याचा क्षणात चक्काचूर झाला .अंमळ झोपलेला खवीस खडबडून जागा झाला.सोटयाचा एक दणका त्यालाही बसला होता.त्यामुळे तो चांगलाच चिडला होता.पिंपळावर असताना तो विसूभाऊना दिवसा रात्री केव्हाही जाता येताना बघत असे.उगीचच्या उगीच कुणाच्या वाटेला जाण्याचा खवीसाचा स्वभाव नव्हता.आणखी काही फटक्यांमध्ये बुजगावण्याचा प्रत्येक भाग तुटला होता.खवीस तरीही स्तब्ध होता.

समाधानाने विसूभाऊ परत फिरले.बुजगावण्यामध्ये दम नाही हा त्यांचा सिद्धांत, ही त्यांची थेअरी, सिध्द झाली होती.विसुभाऊ चार पावले चालून जातात न जातात तो त्याना पाठीमागून वाघाची डरकाळी ऐकू आली.दचकून त्यांनी मागे पाहिले तो  त्यांनी ज्या बुजगावण्याच्या चक्काचूर केला होता ते बुजगावणे जसे होते तसे  उभे होते.जणू काही कुणी त्याचा चक्काचूर केलाच नव्हता.मात्र एक फरक होता. बुजगावण्याच्या डोक्याच्या जागी आता वाघाचे डोके होते.त्या वाघानेच अंगाचा थरकाप उडवणारी जीवघेणी डरकाळी मारली होती. अमावास्येची रात्र असूनही ते बुजगावणे  व त्याचे वाघाचे डोके प्रकाशाने चमकत होते.  

ते बुजगावणे,तो वाघ विसूभाऊंवर उडी मारण्याच्या तयारीत होता.विसुभाऊंच्या अंगाचा थरकाप उडाला होता.ते बुजगावणे वाटले त्यापेक्षा फारच सामर्थ्यशाली होते.विसुभाऊ पळत सुटले. बुजगावण्याने हात लांब करून विसुभाऊंची  मानगुटी पकडली.मनात आले तर तो खवीस विसुभाऊंचे कांहीही करू शकत होता .परंतु बहुधा त्याला विसुभाऊना, मांजर जसे उंदराला खेळवते  व नंतर त्याला ठार मारुन खाते तसे खेळवण्याचे मनात असावे.विसुभाऊंची मानगुटी धरून त्यांना त्याने जवळजवळ दहा पंधरा फूट उंच उचलले.व नंतर अलगद सोडून दिले.विसुभाऊ बुडावर आपटले.जमिनीवरील काटे,खडे, त्यांच्या बुडाला टोचले. त्यांच्या मस्तकात एक तीव्र कळ गेली . सुदैवाने त्यांची काही मोडतोड झाली नव्हती.किंबहुना खवीसाने त्यांची मोडतोड होवू नये अशीच व्यवस्था केली असावी.कसेबसे उभे राहून विसुभाऊ वेडेवाकडे पळत सुटले.बुडावर आपटल्यामुळे त्यांना नीट पळता येत नव्हते .थोडे अंतर ते पळाले तोपर्यंत त्यांना कुणीही धरले नाही.आपण त्या विचित्र विक्षिप्त भयंकर बुजगावण्याच्या तडाख्यातून सुटलो म्हणून विसुभाऊनी नि:श्वास सोडला.पळत पळत ते मनोहरपंतांचे आगर सोडून रस्त्यावर आले होते.आता आरामशीर चालत जायला हरकत नव्हती.तरीही ते पळत होते.शक्य तितक्या लवकर त्यांना आपले घर गाठायचे होते.एवढ्यात त्यांना मागून अरे विसू कुठे पळत चाललास अशी हांक ऐकू आली.ती हाक त्यांच्या वडिलांनी मारली होती.त्यांचे वडील तर केव्हाच कैलासवासी झाले होते मग ही हांक कुणी मारली?त्यांनी मागे वळून पाहिले तो ते बुजगावणे त्यांच्या मागून येत होते .मात्र त्या बुजगावण्याच्या डोक्याच्या ठिकाणी आता वाघाचे डोके नव्हते तर विसुभाऊंच्या वडिलांचे डोके होते.त्यांनीच विसुभाऊना हांक मारली होती .कैलासवासी वडिलांना आपल्यामागे बुजगावण्याचे धड व शीर वडिलांचे असे पाहून त्यांना हे प्रकरण काही भलतेच आहे असे लक्षात आले.हे बुजगावणे नाही.ही यांत्रिक करामत नाही.ही जबरदस्त असामान्य भुताटकी आहे हे त्यांच्या लक्षात आले.तरीही प्रतिक्षिप्त क्रियेने ते पुन्हा पुढे पाहून पळत सुटले.एवढ्यात त्यांच्या पायात त्या बुजगावण्याने  पाय घातला आणि ते धाडदिशी तोंडावर कोसळले.बहुधा अकस्मात कोसळल्यामुळे त्यांचे दोन तीन दात पडले असावे.एक दात तर त्यांच्या ओठात शिरला .त्यांचे तोंड रक्ताने बरबटले.त्यांना रक्ताची किंचित खारट उष्ण चव लागली.आता तर त्यांना पळण्याचेही अवसान नव्हते.तरीही उरला सुरला धीर गोळा करून ते पळू लागले.एवढ्यात त्यांना त्यांच्या धाकट्या भावाची मागून हाक ऐकू आली. अरे दादा थांब .मलाही घरी यायचे आहे. पळत कां सुटला आहेस?धाकटय़ा भावाची हांक ऐकून त्यांना जरा धीर आला.भाऊ कुठेतरी गेला असावा आणि तो घरी जात असावा. त्याने आपल्याला पाहून हांक मारली असावी .असा  विचार त्यांच्या मनात आला . त्याच्या सोबतीने, त्याच्या आधाराने, आपण घरी नक्की व्यवस्थित पोहचू असा विचार त्यांच्या मनात आला.  ते पळण्याचे थांबले.त्या क्षणी त्यांच्या डोक्यातून बुजगावण्याचे  विचार गेले होते.बुजगावण्यानेच ही हांक मारली असेल असे त्यांना वाटले नाही .त्यांनी मागे वळून पाहिले.ते बुजगावणे त्यांच्या अगदी जवळ होते  .बुजगावण्यावर डोके मात्र त्यांच्या धाकट्या भावाचे होते.धाकटा भाऊ जिवंत होता. तो घरीच होता. तो मेला की काय अशा आशंकेने विसूभाऊंच्या काळीजाचे पाणी पाणी  झाले. बुजगावण्याच्या डोक्यावर वाघाचे डोके आणि वाघाची डरकाळी  .तिथेच थोडय़ाच वेळात विसूभाऊंच्या मृत वडिलांचे डोके आणि त्यांनी मारलेली हांक.काही क्षणातच त्यांच्या धाकटय़ा भावाचे डोके आणि त्याच्याच आवाजात दादा म्हणून मारलेली हांक.अमावास्येच्या रात्री मिट्ट काळोखात हे सर्व दिसणे ही नि:संशय  भुताटकी आहे असे विसुभाऊंच्या लक्षात आले.आपण कितीही पळालो तरी हे जबरदस्त भूत आपल्याला पकडल्याशिवाय राहणार नाही हे विसुभाऊ समजून चुकले .विसुभाऊंच्या पायातील बळ निघून गेले.त्यांना पळता येईना.ते जागच्या जागी कोसळले.त्यांची शेवटची आठवण म्हणजे त्यांच्या अंगावर वाकून पाहत असलेला हाडांचा सापळा आणि त्या एकाच सापळ्यावर वाघ, वडील, लहान भाऊ, अशी तीन डोकी . विसुभाऊ बेशुद्धावस्थेत गेले होते.

वाघाची डरकाळी ऐकल्याबरोबर मनोहरपंत व म्हादबा बाहेर आले होते.बुजगावण्याचा सर्व गोंधळ ते पाहत होते.अमावास्येच्या घनघोर अंधारात सर्व स्पष्ट दिसत होते. सर्व स्तिमित झाले होते.   

*आज  एक महिना झाला आहे.*  

*विसुभाऊ हॉस्पिटलमध्ये आहेत.*

*तूर्त ते सपोर्ट सिस्टीमवर आहेत.*

*ते शुद्धीवर केव्हां येतील, येतील की नाही ते डॉक्टर सांगू शकत नाहीत.*

* विसुभाऊ, बुजगावणे नष्ट करण्याच्या फंदात न पडता त्यानी प्रेमाने मनोहरपंतांजवळ बोलून बुजगावण्याला दोन्ही आगरांचे रक्षण करण्यास सांगितले असते तर ही वेळ आली नसती.* 

*त्यांचा हेतू साध्य झाला असता*   

*शत्रुत्व व विनाश यांचा मार्ग न निवडता मित्रत्व व  संरक्षण हा मार्ग श्रेष्ठ हे त्यांच्या कधी लक्षातच आले नाही.*

(समाप्त)

२३/४/२०२१©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel