पिवळी पिवळी हळद लागली 
भरला हिरवा चुडा वधू लाजरी..

सुमनताईंच्या आवाजातलं  हे गाणं ओघवतं कानावर आलं कि आठवणी डोळ्यासमोर येवून जातात. मला जगायचे म्हणत ती चिमुकली बाहेर जगात प्रवेश करते  अन् सारं जग कवेत घेते.दुडूदुडू रांगत घराचा ताबा घेत जणू काही आपलं अस्तित्व सर्वांना दाखवते..

तिन टाकलेलं पहिलं पाऊल तिने म्हटलेला पहिला शब्द सगळ्याचच मोल खूप मोठं असतं त्यावेळेस तीच तिची खरी ओळख असते मग हीच ती ओळख हळूहळू बदलत जाते वेगवेगळ्या रुपात अजून उलगडत जाते.

आई बाबांची सोनुकली म्हणत आजी आजोबांची लाडुकली म्हणत ती घरावर अधिराज्य गाजवते .प्रत्येक फुलाचा सुगंध जसा वेगळा तसेच प्रत्येक नाते तिच्यासाठी वेगळे असते हीच तिची परीक्षाअसते.प्रत्येक नाते जपताना दुस रे नाते दुखावले तर जाणार नाही ना हे अगदी कोवळ्या वयापासून ती शिकते. जगाच्या या रहाटगाड्यातून जाताना प्रत्येक वळणावर घेतलेला श्वास टाकलेलं तिचं पहिल पाऊल तेवढच उपयोगी महत्त्वाचे ठरते पण एवढीच अपेक्षा तिच्या कडून ठेवली तर ती चुकीची ठरेल.प्रत्येक नात्यांमधला सुगंध अनुभवताना तिला प्रत्येक फुलाची साथ हवी असते तरच हा धागा होवून सुगंधारुपी नात्याचा गजरा होईल उत्तम ता अशा सुगंधाला भारावून टाकेल.

घराच्या बंद चौकटी पार करुन जेव्हा ती तारुण्यात पदार्पण करते तेव्हा तिची अवस्था दिवस तुझे हे फुलायचे अशीच असते.अजून नवीन नात्यांचा सुगंध तिला खुणावत असतो पण ती नवीन नाती जपताना तिला जुन्या नात्यांचाही तेवढाच आधार हवा असतो लहानपणी मनात घट्ट रोवून बसलेल्या संकल्पना आवडी स्वपने पूर्ण करण्याचा हाच कालावधी हीच बैठक तिच्या संपूर्ण आयुष्याला उपयोगी पडते. स्वतःला सिद्ध करत स्वपनांच्या गावात फेरफटका मारत रुंजी घालणारं तिचं मन प्रत्येक क्षणाचा आनंद मनमुराद लुटत असते ह्या वळणावर तिची जबाबदारी अजूनच वाढते आई-बाबांची सोनुकली आता समंजस झालेली असते प्रत्येक नात्यात तिची बदलत जाणारी भूमिका तिला खुणावत असते.

खरचं किती अवघड वयाच्या २४-२५ वर्षापर्यत घालवलेला कालावधी जिथे मनाची बैठक तयार होते असा कालावधी निसटून जाताना पाहिला कि मनात काहूर माजते. आजी - आजोबांची लाडूकली आता एक जबाबदारी पेलण्यास सज्ज होते पुन्हा एकदा नवीन नात्याची भर तिच्या आयुष्यात पडते.ही नाती जपताना अनेक वेगवेगळ्या नात्यांना कधी मनाप्रमाणे तर कधी मनाविरुद्ध तिला सामोरे जावे लागते पण हे करताना तिची तक्रार नसते बाल्यापासून तारुण्यापर्यत अनेक नाती तिने निभावली असतात फरक एवढाच पडतो यात पत्नी , सून, नणंद भावजय म्हणून तिला जपायचे असते तिथे ती एकटीच पुरेशी नसते तर तिला दोन्ही हातांची गरज असते.तिला प्रत्येकीने तेवढेच समजून घ्यायाला हवे तरच नात्यांचा हा अखंड गजरा चिरंतन सुगंध देईल.  ह्या सर्व विचारांनी त्या आईचे मन रडते.खरच मिळेल का तिला साथ? देईल का तिला कुणी आधार?घेईल तिला कुणी समजून?करेल का कुणी तिच्या मतांचा आदर? अशी असंख्य प्रश्नचिन्हे मनात ठेवून बहरलेल्या त्या कळीला तोडून आपल्यापासून वेगळे करावे लागते तेव्हा त्या रोपट्याच्या भावना दाटून येतात तिच्या बरोबर टाकलेलं ते पहिलं पाऊल खुणावतं तिच्या बोबड्या बोलातून बोललेले ते शब्द आठवतात त्याच शब्दफुलांची ओंजळ करुन तिच्या सुरातून बाहेर पडलेलं ते गाणं आठवत स्वतःच्या रक्तमासाचा गोळा दुसऱ्याच्या अंगणात लावताना तो खुरटणार तर नाही ना?ही भीती तर आपल्या अंगणातला सुगंध अजून कुणाच्या तरी अंगणात सुगंध देणार हे सुख त्या रोपट्याला असते.

बालपणापासून तारुण्यापर्यत दिलेला आधार, पदरात घेतलेल्या चुका, नवीन उमेदीने जगण्यास शिकवलेली स्वपने तिथे पूर्ण होतील ना अशा साशंक अंतःकरणाने तिला निरोप देण्याची वेळ येते डोळ्यातून गंगा जमुना वाहायला लागतात कंठ दाटून येतो क्षणाक्षणाला हातातून हात निसटत जाण्याची वेळ येते अन् जन्मापासून वाढवलेली ती पोर एका क्षणात दुसऱ्याची होते.तिचे कन्यादान करावे लागते तेव्हा तिच्या माऊलीची किमान अपेक्षा असते तिला कुणी समजून घ्या .पुन्हा नव्याने आपले अस्तित्व सिद्ध करण्यास सज्ज होते.पुन्हा  तेच नवीन ओळख..नविन नाती..पुन्हा समजावून घेणं...सगळ्यात अ सूनही आपली परकेपणाची भावना घालवण्यास पुन्हा तिनेच प्रयत्न करायचा का? तर नाही ही सर्वांचीच जबाबदारी असते.तिला एक संधी पुरेशी असते मग ती घराचे नंदनवन कधी करते हे कळतही नाही.पण नात्यात अनेक पर्याय असले तर इतरांच्या त तिची घुसमट होते...

ह्या नवीन सहजीवनाच्या प्रवासात तिला तेवढयाच विश्वासाची प्रेमाची अपेक्षा असते.मिळेल ना मला ही साथ..घेईल ना मला समजून कुणी अशा मनाच्या अवस्थेताही ती सर्वांना जिंकते एका बरोबर दोन घरांचे नाव उंचावत जाते .

ज्याच्यासाठी ती आपली जुनी नाती सोडून नवीन नात्यात प्रवेश करते त्या जोडीदाराची भूमिकाच महत्त्वाची ठरते.अखेरपर्यत तिथे मतभेदांना जागा नसावी केवळ प्रेम मैत्रीच असावी अशीच अपेक्षाअसते.

मागे वळून बघू नको तुला पुढे जायचे आहे असे जड अंतःकरणाने आई सांगत असते तेव्हा ती ही यातून गेलेली असतेच हीच ताकद फक्त स्त्रीमधे असते म्हणून ती सबला आहे.ती अर्धांगिनी लक्ष्मी अन्नपूर्णा दुर्गा अशा विविध रुपात बहरत जाते.

माहेरपेक्षा सासरचा विचार कर हे आई सांगते तेव्हा ....सासरच्यांनीही तिला समजून घ्यायला हवे अशी अपेक्षा असतेच मग ख-या अर्थाने समजते उंबरठा ओलांडला कि ती परकी होते तर नाही ती अजून एका घराचा उंबरठा जोडू पहाते अधिकस्य अधिक होण्यासाठी मात्र त्यासाठी मुलीचे कन्यादान करावेच लागते.

दिल्या घरी तू सुखी राहा म्हणताना फुलाला आपल्या पासून वेगळे होताना पाहणे काय असते ही रोपट्याची वेदना कळते त्यासाठी त्यातून जावेच लागते.कन्यादान करावेच लागते. कन्यादान महापुण्य दान.
कन्यादानामुळे मुलीचे श्रेष्ठत्व सिद्ध होते.

"फिरुनि नवी जन्मेन मी "..म्हणत ती पुन्हा अजून नवीन नात्यांत गुंफत जाते.

काळानुसार नात्यांची वीण बदलत जातेच मात्र मूळ नाती तिच तशीच फक्त विचारधीनता आधुनिकतेकडेच जात फिरुनि नवी जन्मेन मी ....म्हणत सजग होते इतकेच.

©मधुरा धायगुडे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel