अध्याय पहिला

श्रीलक्ष्मीसहित वेंकटेशास नमस्कार असो. ब्रह्मरुद्रादिकांना नमस्कार करण्यास योग्य व वेंकट नामक अधिपती अशा तुला मी भजतो. हे माधवा आमचि संकटे निवारण कर आणि तसेच आमचे कल्याण कर. ॥१॥

शौनक ऋषि सूत नामक पुराणिकास प्रश्न करतात. हे सूता, तू आम्हांस श्रीरंगक्षेत्राचे व कालहस्ती नगराच्या अधिपतीचे माहात्म्य सांगितलेस, तसेच जगन्नाथ अशा विष्णूचे अतुलनीय असे माहात्म्यहि आम्हास सांगितले आहेस. आता मी वेंकटेशाचे माहात्म्य ऐकण्याची इच्छा करितो. ॥२॥

याप्रमाणे शौनकऋषीने प्रश्न विचारला असता सूत म्हणतो- हे ब्रह्मन् तू मला वेंकटेशाचे माहात्म्य विचारलेस ही गोष्ट फार चांगली आहे. ॥३॥

आता अतिशय ज्ञानसंपन्न अशा वेदव्यासांच्या मुखातून मी जसे ऐकले आहे त्याप्रमाणेच विचारपूर्वक मी हे वेंकटेशाचे माहात्म्य तुला सांगतो ते तू लक्षपूर्वक श्रवण कर. ॥४॥

श्रीसूत म्हणतो - फार दिवसापूर्वी जनक या नावाचा अत्यंत धार्मिक असा एक राजा होऊन गेला. तो राजा खरे बोलणारा, सर्व शास्त्रांत पंडित होता. त्यास क्रोध कधीहि येत नसे. ॥५॥

परमात्म्याच्या अनुग्रहाला तो पात्र होता. कारण तो सदैव ममत्वाभिमानाने रहित, नित्य समाधानी, परमात्मतत्त्व जाणणारा व अहंकाररहित असा होता. ॥६॥

त्यांस कुशध्वज या नांवाचा एक भाऊ होता. यास सुंदर असे तीन पुत्र व तीन कन्या होत्या. जनकराजास जानकी या नावाची एक कन्या होती व ती आपल्या बापाची अतिशय लाडकी होती. ॥७-८॥

तो जनक आपल्या बंधूसह त्याच्या संमतीने राज्य करीत असे. व त्या जनकाची आपल्या बंधूवर अतिशय प्रीति होती. ॥९॥

एकदा जनकराजाने आपल्या मनात असा विचार केला की, "आपणास सदैव सुखच व्हावे दुःख मुळीच होऊ नये. आपल्या डोळ्यांनी दुःख न पाहाता सदैव सुखच पाहावे." अशा तर्‍हेचे साधुजनांना मान्य नसलेले विचार श्रीहरीने जाणून त्यांस दुःख दाखविण्याचे ठरविले. ॥१०-११॥

एकदा दुर्दैवाने जनकाचा भाऊ कुशध्वज अकस्मात् मरण पावला. कुशध्वज हा मृत होण्याबरोबर कुशध्वजाची बायकोहि मृत झाली. ॥१२॥

ती कुशध्वजाची भार्या आपल्या मुलांचा त्याग करून परलोकांस गेली. याप्रमाणे ती पतिपत्नी आपल्या मुलांचा त्याग करून परलोकांस गेलेली पाहून राजा आपल्या बंधूविषयी व त्याच्या पत्नीविषयी शोक करू लागला. ॥१३-१४॥

हे भद्रे, या लहान बालकाना व मज वृद्धजनकाला सोडून हे मंगले, हे वरारोहे तू आपल्या पतीसह कोठे बरे गेलीस? १५ हे भामिनी, ऐशी हजार वर्षे पर्यन्त झालेले दुःखसंचयरूप अदृष्ट आज मी, (तुझ्या व तुझ्या पतीच्या मृत्युरूपाने) हे वरारोहे, तुझ्या व तुझ्या पतीच्या नि योगाने पाहात आहे. याप्रमाणे वारंवार स्मरण करून तो शोक करू लागला. ॥१६-१७॥

नंतर त्याने आपल्या बंधूचे व त्यांच्या पत्नीचे और्ध्वदैहिक कर्म सर्व केले, लहान असलेल्या, आईबापविरहित अशा त्या मुलांना आपल्या मांडीवर बसवून घेऊन तो शोक करू लागला. ॥१८॥

हे मुलांनो, मातापित्यांनी रहित अशा तुम्हांस दुःखी असे माझ्या डोळ्यांनी मी कसे बरे पाहू ? ॥१९॥

याप्रमाणे त्या मुलांच्या विचाराने व बंधूच्या मृत्युमुळे अतिशय दुःखित झाला. व त्या दुःखाने त्याने राज्यकारभार सोडला. अन्न, पाणी सुखोपभोग, झोप यांचाहि त्याग केला. ॥२०॥

त्यावेळी त्याचे सांत्वन करावे म्हणून पुरोहित, वामदेव ऋषींचे बंधु शतानंद सुदैवाने प्राप्त झाले. ॥२१॥

आपले पुरोहित आलेले पाहून राजाने त्यांचा सत्कार केला. व मुनिं हरिणाजिनावर बसले. त्यावेळी जनकराजा शतानंदास म्हणाला - हे बुद्धिमंता, शतानंदमुने, पुढे माझे काय होणार आहे बरे ? ॥२२-२३॥

मी स्वतः वृद्ध झालो आहे. अद्यापपर्यंत मुले लहान आहेत. कन्यांना अजून वर मिळत नाही माझा साहाय्यक बंधू मृत झाल्याने माझे काय होणार आहे बरे? ॥२४॥

रावण, इंद्रजित आदि पुष्कळसे शत्रू मला आहेत. ते जर युद्धास आले तर म्हातारा, असहाय्य असा मी एकटा त्यांचेबरोबर युद्ध कसे करू ? ॥२५॥

हा रावण रात्रंदिवस कोणत्या हेतूने येथे येत असतो हेहि मी, हे मुनिवर्या, जाणत नाही कारण मी दीर्घदृष्टीने विचार करण्यास असमर्थ आहे. ॥२६॥

माझ्या चिंतेचे हे एक कारण. दुसरे सांगतो ते ऐक. अत्यंत सौंदर्यवती अशा सीतेला (माझ्या मुलीला) योग्य असा सुस्वरूप पती कसा मिळेल ? तिसरे कारण सांगतो ते ऐक. माझी मुले व पतीसह माझ्या मुली दीर्घायुषी कशा होतील तिसरी चिंता होय. ह्या सर्व मुली एका राजाच्याच स्नुषा व्हाव्यात विशेषतः एका राजाचेच पुत्र असावेत ॥२७-२८-२९॥

शिवाय बंधूहीनशा माझे हे राज्य आपोआप समृद्ध असे कोणत्या साधनाने होईल ते आपण मला सांगा. ॥३०॥

याप्रमाणे जनकराजाने विचारले असता शतानंदमुनि म्हणाला कि, - हे राजा, या भूलोकामध्ये विशेष असे माहात्म्य आहे. की, जे श्रवण केले असता तुझ्या मुलीचे लग्न होईल. तुला सुख मिळेल व तुझ्या शत्रूंचा नाश होईल. ॥३१॥

ते म्हणजे भविष्योत्तरपुराणातील वैकुंठगिरीचे माहात्म्य होय. हे माहात्म्य कलियुगात पठणश्रवण केले असता सर्व दुःखाचा नाश होऊन आपले मंगल होते व आपणांस पुण्य प्राप्त होते. ॥३२॥

हे माहात्म्य श्रवण केले असता द्रव्याची इच्छा करणार्‍यास द्रव्य प्राप्ती होते. पुत्र व्हावा अशी इच्छा करणार्‍यास पुत्र प्राप्ती होते. रोगग्रस्त असणार्‍यांचा रोग परिहार होतो. ज्ञान प्राप्त व्हावे अशी इच्छा करणार्‍यास ज्ञान साधन होते. ॥३३॥

जे माहात्म्य श्रवण केल्याने सर्व लोकाधिपति ब्रह्मदेव ब्रह्मा पदवीला प्राप्त झाला. ह्या माहात्म्यश्रवणामुळे अमृतमंथनाचे वेळी समुद्रांतून निघालेल्या विषाचे पान केल्याने त्रस्त झालेले महादेव विषपीडेपासून मुक्त होऊन सुखी झाले. ॥३४॥

ज्या माहात्म्यकथा श्रवण केल्याने इंद्रास स्वर्गलोकचे राज्य प्राप्त झाले. फार काय सांगावे ? तू ज्याची ज्याची इच्छा करशील ते सर्व मनोरथ तुझे पूर्ण होतील. ॥३५॥

याप्रमाणे शतानंदांनी सांगितले असता जनक राजा म्हणाला- हे शतानंदमुने, अशा या वैकुंठगिरीचे माहात्म्य आपण मला सांगा, कलियुगात त्याचे चरित्र कशाप्रकारचे आहे ते आपण मला सांगा. ॥३६॥

याप्रमाणे राजाने विचारले असता शतानंद मुनि म्हणाला - हे राजा, या वैकुंठगिरीस कृतयुगांत वृषाचल; त्रेतायुगात अंजनाचल, द्वापारयुगात शेषाचल व कलियुगात वेंकटाचल अशी नावे प्रचलित आहेत. ॥३७॥

याप्रमाणे सांगितल्यावर जनकराजाने विचारले- या पर्वतास चार युगात चार नावे प्राप्त झालीत असे जे तू सांगितलेस त्यात कृतयुगात वृषाचल असे नाव कसे प्राप्त झाले ते तू मला सांग. ॥३८॥

याप्रमाणे जनकराजाने विचारले असता शतानंद ऋषि म्हणाला- हे राजा, पूर्वी अतिशय रुक्ष कर्म करणारा एक वृषभ या नावाचा राक्षस होऊन गेला. ॥३९॥

तो राक्षस (वैकुंठगिरी) पर्वतावर राहणार्‍या तपस्वीजनांना फारच पीडा देत असे. त्याच्या त्रासामुळे तपश्चर्येत अतिशय त्रास झाल्याने त्या वृषभ नावाच्या राक्षसाचा नाश करण्याकरिता म्हणून त्या पर्वताच्या अधिपतीला ते सर्व ऋषि शरण गेले. ॥४०॥

तेथे त्या सर्व प्राणिमात्रांना उत्पन्न करणार्‍या, भक्तांना अभय देणार्‍या, इंद्रियाभिमानी देवतांचा स्वामी अशा श्रीनिवासाचे ते ऋषि स्तोत्र करू लागले. ॥४१॥

श्रीनिवासाचे स्तवन करीत ते मुनिश्रेष्ठ प्रार्थना करू लागले. तेव्हा त्या ऋषिसमोर भगवान् श्रीनिवास प्रगट झाला. ॥४२॥

त्या श्रीनिवासांना प्रसन्न झालेला पाहून ते सर्व ऋषि म्हणाले की, - हे कमलनेत्रा भगवंता, हा वृषभ नावाचा दुष्ट राक्षस अतिशय क्रूर असून तो आमच्या तपश्चर्येमध्ये विघ्न आणीत असतो. ॥४३॥

हे देवा, त्या राक्षसाच्या भयापासून आमचे रक्षण कर. असे ऋषींनी म्हटल्यावर श्रीनिवास म्हणाला की- हे ऋषीहो, "तुम्ही काळजी करू नका. मी त्या राक्षसाचा खात्रीने वध करतो." असे सांगून श्रीनिवास राक्षसाचा पाठलाग करू लागला. ॥४४॥

हे राजा, तो राक्षस (त्या वैकुंठगिरीवर) त्या पर्वतावर असणार्‍या तुंबरु तीर्थामध्ये स्नान करून श्रेष्ठ व पुण्यकारक अशा, मुख पसरलेल्या, अधोमुख; दिव्य अशा नरसिंहशालिग्रामाची नित्य पूजा करीत असे. ॥४५-४६॥

पूजा झाल्यावर मंत्रपुष्पाचे वेळी तलवारीने आपले मस्तक तोडून ते फूल म्हणून तो राक्षस शालिग्रामशिलेस समर्पण करीत असे. (आणि चमत्कार असा की) एकदा मस्तक तोडले की, त्याचे जागी नवीन मस्तक उत्पन्न होत असे. ॥४७॥

याप्रमाणे हा कार्यक्रम सतत पाच हजार वर्षे चालू होता. त्यानंतर एकदा त्या राक्षसाच्या आपले मस्तकरूपी पुष्प समर्पण करण्यामुळे देवादिदेव, कमलनेत्र, नरसिंहानी त्या राक्षसावर प्रसन्न होऊन त्यांस दर्शन दिले. ॥४८॥

सज्जनांचा आधार व शिलान्तर्यामि भगवान नरसिंह प्रत्यक्ष प्रगट झालेले पाहून त्या वृषभ नामक राक्षसाने साष्टांग नमस्कार केला. त्या दर्शनाने त्या राक्षसाचे भानहि हरपले. थोड्या वेळाने भानावर आल्यानंतर अत्यंत आनंदाने राक्षस नरसिंहास म्हणाला ॥४९-५०॥

वृषभासुर म्हणतो- हे केशवा, अनंता, गोविंदा, देवश्रेष्ठा, श्रीनिवासा, हरे, मला स्वर्ग नको, ब्रह्मा पदवी नको, अथवा मोक्षहि नको. हे जगदाधिपते, मी तुझ्याजवळ काहीहि मागत नाही. तर मला केवळ युद्धाची भिक्षा दे. तुझ्या दहा अवतारांतील वैभव व पराक्रम हे व्यापका, मी ऐकला आहे. ॥५१-५२॥

तो सर्व पराक्रम खरा असल्याचे मला दाखव."

याप्रमाणे त्या दैत्याचे भाषण ऐकून किंचित हसत युद्ध करण्याविषयी पेटलेल्या त्या दैत्याला शत्रूचे मर्दन करणारा नरसिंह म्हणाला- "ठीक आहे युद्ध होऊ दे." यानंतर वृषभासुर व नरसिंह यांच्यामध्ये भयंकर युद्ध सुरू झाले जे जे श्रीनिवासाने केले ते ते त्या वृषभासुराने केले. ॥५४-५५॥

सर्व देव पाहात असता त्या दोघांचे अद्‌भुत असे युद्ध झाले. त्या राक्षसाचे युद्धकौशल्य पाहून श्रीनिवासाने त्या दैत्याचे अभिनंदन केले. ॥५६॥

"हे राक्षसश्रेष्ठा माझा पराक्रम पहा." असे मोठ्यांदा म्हणत मोठमोठा आकार असलेला गरुड दाखविला. ॥५७॥

त्या गरुडावर आरुढ झालेल्या, नाशरहित, हजारो बाहूंनी युक्त अशा हजारो शस्त्रे घेतलेल्या विश्वरूपी वासुदेवास सर्वत्र त्या दैत्याने पाहिले. ॥५८॥

ती श्रीहरीची माया म्हणजे प्रत्येक ठिकाई गरुड व श्रीहरी यांना पाहून त्या दैत्याने देवांना मोह उत्पन्न करणारी माया दाखविली. ॥५९॥

त्या दैत्याची माया नष्ट करण्यास समर्थ असणार्‍या हरीने "वा छान छान" असे उद्‌गार काढले. ॥६०॥

हे राक्षसश्रेष्ठा, तीक्ष्ण धार असलेल्या चक्राने, ज्याप्रमाणे पिकलेले फळ झाडावरून सहजरीत्या तोडतात त्याप्रमाणे तुझ्या देहापासून मी तुझे मस्तक तोडतो. ॥६१॥

याप्रमाणे श्रीनिवासाने म्हटले असता त्या राक्षसेश्वर वृषभासुराने श्रीनिवासास साष्टांग नमस्कार प्रणामपूर्वक त्यांचे स्तवन करीत म्हटले. ॥६२॥

वृषभदैत्य म्हणाला- हे चक्रपाणे मी तुला नमस्कार करतो. मी या चक्राचे माहात्म्य श्रवण केले आहे. या चक्राने तापविला गेलेला पुरुष मुक्तीस प्राप्त होतो यात संशय नाही. ॥६३॥

या चक्राच्या योगाने कीर्तिमान असा राजा (अंबरीष) कीर्तियुक्त झाला. तुझ्या चक्राने मी मारला गेलो तर मी निश्चयाने मुक्तीस प्राप्त होईन. ॥६४॥

याप्रमाणे तो वृषभासुर श्रीहरीच्या पायास स्पर्श करून म्हणाला, "हे परमात्मन् हा पर्वत माझ्या नावाने प्रसिद्ध व्हावा." असा वर त्याने मागितला. ॥६५॥

याप्रमाणे देवास आलिंगन देऊन त्याने आपल्या देहाचा त्याग केला. या कारणामुळे तेव्हापासून या वैकुंठगिरीस सर्वजण वृषभाचल असे म्हणू लागले. (हे सर्व ऐकल्यावर जनक राजाने प्रश्न विचारला.) जनक विचारतो- हे शतानंदमुने कृतयुगात या पर्वतास वृषभाचल असे नाव असता अंजनाचल असे का आले? ते आपण मला सांगा. ॥६६॥

याप्रमाणे जनकाने विचारले असता शतानन्दाने पुढील हकीकत सांगण्यास प्रारंभ केला. शतानंद म्हणाला- पूर्वी केसरी नामक वानराची कमलाप्रमाणे नेत्र असणारी अंजना नावाची पत्नी होती. ॥६७॥

तिला संतान नसल्याने अतिशय दुःखी होऊन ती संतान होण्यासाठी (दैवी साधन कोणती करावी हे विचारण्यासाठी) मतंग मुनीकडे आली. व त्यांना नमस्कार करून अपत्य नसल्याने दुःखी अशी पतिव्रता, डोळ्यांतून वाहात असलेल्या अश्रूंनी जिचे शरीर भिजत आहे अशी अंजना म्हणाली- हे तापसश्रेष्ठा, निपुत्रिक अशा मला पुढे कोणती गति प्राप्त होणार आहे बरे? ॥६८-६९॥

याप्रमाणे अंजनीने मंतग ऋषीस विचारले असता मतंगमुनि म्हणाल- हे अंजने, पंपा सरोवराच्या पूर्व दिशेकडे पन्नास योजनावर या भूलोकात नारसिंहाश्रम म्हणून एक आश्रम आहे. त्या नारसिंहाश्रमाच्या दक्षिणेला नारायणगिरी आहे. ॥७०-७१॥

त्यावर उत्तरेला स्वामीतीर्थ म्हणून एक सरोवर आहे. तेथे त्या स्वामीतीर्थापासून एका कोसावर आकाशगंगा या नावाचे एक तीर्थ आहे. त्याठिकाणि तू जा. ॥७२॥

हे कल्याणि तू त्या तीर्थात नित्य स्नान करून बारा वर्षे तपश्चर्या कर. त्या पुण्याने गुणांनी श्रेष्ठ असा पुत्र होईल. याप्रमाणे मतंगमुनीने सांगितले असता अंजना नारायणगिरीस आली. तेथे असलेल्या स्वामिसरोवरात स्नान करून अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा घालीत वराहरूपी परमात्म्यास नमस्कार केला. स्वामी तीर्थातील जलपान करून तपश्चर्या करण्याकरिता आकाशगंगा तीर्थावर आली. ॥७४-७५॥

तेथील ऋषींची व आपल्या पतीची अनुमति घेऊन, काहीहि भक्षण न करता नाना भोगांनी रहित होऊन तप करू लागली. ॥७६॥

तिने आपले चित्त शुद्ध ठेवून आपले शरीर लाकडाप्रमाणे निश्चल ठेवून तप करण्यास प्रारंभ केला. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला भक्षण करण्याकरिता रोज एक फळ वायु देत असे. एके दिवशी वायूने फलात आपले तेज भरून ते वीर्याने भरलेले फल, तिच्या ओंजळीत टाकले. ते सामान्य तर्‍हेचे फल आहे असे समजून भूकेजलेल्या अंजनाने ते फल भक्षण केले. ॥७७-७८-७९॥

ते फल भक्षण केल्यावर अंजना गर्भवती झाली. त्यावेळी अंजना गर्भवती झाली हे पाहून सर्व ऋषींना आनंद झाला. ॥८०॥

दहाव्या महिन्यात अंजना प्रसूत होऊन तिला एक पुत्र झाला. या मुलालाच निष्पाप असे मुनि हनुमान म्हणू लागले. ॥८१॥

अंजनेस या पर्वतावर तपश्चर्या केल्याने पुत्रप्राप्ती झाली म्हणून या पर्वतास अंजनाचल असे म्हणू लागले. त्या कारणाने हा पर्वत अतिशय प्रसिद्ध पावला. ॥८२॥

(याप्रमाणे त्रेतायुगात या पर्वताला अंजनाचल असे नाव प्राप्त झाले हे ऐकून शतानंद ऋषीस म्हणाला.

जनकराजा म्हणाला- हे शतानंदमुने, अंजनाचल हे नाव कसे प्राप्त झाले? हा इतिहास ऐकून मला अतिशय आनंद झाला. आता द्वापरयुगांत अंजनाचल हे नाव लुप्त होऊन शेषाचल असे नाव का पडले? याविषयीचा इतिहास आपण मला सांगा. ॥८३॥

(त्याप्रमाणे जनकाने विचारले असता) शतानंदमुनि म्हणतात- पूर्वी एकदा रमादेवीसह क्रीडा करणार्‍या नारायणाने वैकुंठात द्वारपाल म्हणून शेषांस नेमले ॥८४॥

त्यावेळी प्राणवल्लभ वायु, भगवान श्रीहरीच्या दर्शनाकरिता व काही आकस्मिक कारणाने प्राप्त झाला. ॥८५॥

तेव्हा सर्पराज शेषाने आपल्या हातातील सुवर्णदंडाने अडविले. तेव्हा वायु म्हणाला, "हे मूर्खा, तू मला का अडवितोस? कारण माझे काम अत्यंत जरूरीचे आहे. ॥८६॥

तेव्हा शेष म्हणाल, "मी नारायणाची आज्ञा मानणारा आहे. तू आत जाउ नकोस." याप्रमाणे शेषाचे भाषण ऐकून जगताचा प्राण असा वायु शेषास म्हणाला. ॥८७॥

अरे, पूर्वी द्वारपाल म्हणून असलेल्या व अहंकाराने युक्त अशा, जयविजयांनी परमात्म्याच्या दर्शनास अडविले म्हणूनच मुनींनी जयविजयांना शाप दिला. तेच रावण व कुंभकर्ण झाले. हे सर्व तू विसरलास आहेस. ॥८८॥

याप्रमाणे वायूचे भाषण ऐकून अगोदरच विषाने भयंकर असणारा तो सर्पांचा राजा अतिशय संतापला. ॥८९॥

कठोर भाषणाने वायूचा तिरस्कार करीत शेष म्हणाला. अरे, तू फारच उद्धटपणाने बोलत आहेस तुला जगण्याची इच्छा नाही काय ॥९०॥

ज्याप्रमाणे मोह पावलेले लोक, या भूतलावर सूर्याची गति जाणत नाहीत त्याप्रमाणे तूहि माझे सामर्थ्य जाणत नाहीस. हे वायो, तू निष्कारण उद्धट भाषण करित आहेस. ॥९१॥

माझ्यासारखा सामर्थ्यामध्ये, ज्ञानामध्ये, वैराग्यामध्ये कोणीहि नाही. सर्वदा अंतःपुरामध्ये माझे वास्तव्य असून श्रीहरीच्या पुत्रामध्ये मी श्रेष्ठ आहे. ॥९२॥

सर्व लोकांच्या कल्याणाकरिता तसेच सर्व देवांच्या कल्याणासाठी लक्ष्मीनारायणाने (वैकुंठाच्या) द्वारपालावर माझी योजना केली आहे. ॥९३॥

याप्रमाणे शेषाचे ते भाषण ऐकून त्यांस वायु म्हणाला- हे शेषा, तू जे म्हटलेस की, "मी अतिशय आवडता म्हणून मी लक्ष्मीनारायणाचा लाडका आहे." हे तुझे म्हणणे बरोबर नाही. कारण मांजर अंतःपुरात जरी लुडबुडत असले तरी त्यास दारी डुलत असलेल्या हत्तीची योग्यता नसते. ॥९४॥

एखादा नोकर स्वतः पलंगावर बसुन रत्नाच्या पलंगावर बसून झोपलेल्या राजाची सेवा करीत असतो. हे शेषा, त्या नोकरांत (तो राजाच्या पलंगावर बसला म्हणून) श्रेष्ठत्व ते काय आहे? राजाचा मुलगा दूसरीकडे झोपलेला असतो म्हणून त्याचेमध्ये कमीपणा काय असतो हे तूच सांग. ॥९५॥

याप्रमाणे शेष व वायु यांचा विवाद चालू असता महालक्ष्मीने श्रीनारायणाला जागे केल्याने नारायण उठले. ॥९६॥

(व बाहेर दारात येऊन श्रीनिवास म्हणाले.) अरे शेषा, तू कशाकरिता हा आरडाओरडा करीत आहेस? येथे दुसरा कोण आला आहे? याप्रमाणे देवाधिदेव नारायणाने विचारले असता शेष म्हणाला. ॥९७॥

अतिशय उद्धट व स्वतःला मोठा समजणारा मलयपर्वतावर राहणारा वायु निष्कारण अनिर्वाच्य बोलत आहे. त्यावेळेस त्याठिकाणी साक्षात नारायण आलेले पाहून वायूने साष्टांग प्रणाम करीत वेदवेद्य, व पुराणपुरुष नारायणाचे स्तवन केले. ॥९९॥

वायुला पाहून कमलनेत्र श्रीहरी वायूस म्हणाले- हे वायो, अतिशय मानी अशा शेषाबरोबर कोणत्या कारणासाठी बोलाचाली होत आहे? ॥१००॥

याप्रमाणे नारायणाने विचारले असता अतिशय भक्तिमान अशा वायूस आनंद झाला. (पण प्रश्न वायूस विचारला असता मध्येच) शेष म्हणाला- भगवंता, बलामध्ये, ज्ञानामध्ये, तुला प्रिय असणार्‍यामध्ये मी श्रेष्ठ आहे की नाही? ॥१०१॥

भूलोकात, स्वर्गात अथवा ब्रह्मलोकात माझ्या योग्यतेचा कोणी नाही.

या प्रमाणे शेषाचे बोलणे ऐकून त्याचे अभिनंदन करीत नारायण म्हणाला. ॥१०२॥

हे शेषा, नुसत्या बोलण्याने आपले पौरुष्य दिसून येत नाही. त्यासाठी आपण कृति करून दाखविणे हा उत्तम मार्ग होय. म्हणून इंद्रादि देव दोघांच्या बलाबलाची परीक्षा करतील. ॥१०३॥

येथून उत्तरदिशेला मेरुपर्वताचा पुत्र असा एक पर्वत आहे. त्या पर्वतास, तुझे जितके सामर्थ्य असेल त्या सर्व सामर्थ्यानिशी आपल्या देहरूपी रज्जूने बांधून विषाचे फूत्कार सोडीत हे महानागा तेथे उभा रहा.॥१०४॥

याप्रमाणे श्रीहरीचे भाषण ऐकून, आनंदाने स्वतः खरोखरीच मोठे आहोत असा भ्रम पावलेल्या शेषाने आपल्या देहरूपी दोरीने (मेरु पर्वताच्या) आनंद नामक पर्वताला बांधून तो स्थिर झाला. त्यावेळी समर्थामध्ये श्रेष्ठ अशा वायूला आव्हान दिले. ते पाहून अग्नीचा परममित्र वायु त्या आनंद पर्वताजवळ आला. ॥१०५-१०६॥

त्यावेळी श्रीहरीच्या आज्ञेने, सर्व देव पाहात असतानाच शेषाने आपल्या देहरूपी दोर्‍याने बांधला गेलेल्या त्या पर्वतास आपल्या करांगुलीने स्पर्श केला. ॥१०७॥

नंतर वायुच्या करांगुलि स्पर्शाने ढकलल्याबरोबर तो आनंद पर्वत दक्षिण दिशेला हजारो मैलावर जाऊन पडला. तेव्हा घाबरलेला मेरु (आनंदपर्वताचा पिता) पर्वत महाबलवान वायूची करूणा भाकू लागला. ॥१०८॥

मेरु म्हणतो- हे वायो, हे स्वामिन, "आपण माझ्या मुलाचे रक्षण करा. रक्षण करा." याप्रमाणे मेरुने प्रार्थना केल्यावर वायुने लगबगीने त्याठिकाणी घेऊन सुवर्णमुखरी नदीच्या उत्तरेला शेषासह त्या आनंद पर्वतास स्थापिले. ॥१०९-११०॥

(आपणास सहजासहजी वायूने दूर फेकले हे पाहून) शेषाचा उन्मत्तपणा नाहीसा झाला. त्याने वायुचे स्तवन करून "अज्ञानाने प्राप्त झालेल्या माझ्या उन्मत्तपणाबद्दल आपण मला क्षमा करा." अशी प्रार्थना केली असता वैरहीन वायूने, त्या शेषावर अनुग्रह केला. आणि तेव्हापासून द्वापरयुगात या पूर्वीच्या अंजनाचलास शेषाचल असे नाव पाले. ॥१११-११२॥

जनकराजा विचारतो की, - हे शतानंदमुने, कलियुगात या पर्वतास वेंकटगिरि असे नाव कसे प्राप्त झाले हे मला सांग.

(याप्रमाणे विचारले असता) शतानंद मुनि म्हणतो. पूर्वी सोमयाग करणारा, अग्निहोत्र व्रताचे ठिकाणी ठाम निष्ठा असणारा, सत्याचरणी असा एक पुरंदर नामक ब्राह्मण कालहस्ती नामक नगरात राहात असे. त्या ब्राह्मणाला पुत्र नव्हता तरीहि त्याने पुत्र नाही म्हणून दुःख केले नाही. ॥११३-११४॥

पुढे कालांतराने पूर्वपुण्याने सुदैवाने त्या वृद्ध ब्राह्मणांस पुत्र झाला. तेव्हा त्याने ब्राह्मण समुदायात आपल्या पुत्राचे माधव असे नाव ठेवले. ॥११५॥

तो मुलगा आपल्या पित्याच्या घरी वाढत असता योग्यवेळी त्याचे उपनयनहि झाले. तो मुलगा वेदवेदागे, शास्त्र व इतर विद्या यांत पारंगत झाला. ॥११६॥

पुढे योग्यकाली त्या मुलाचा विवाह झाला. त्याच्या पत्नीचे नाव चंद्रलेखा असे होते. तो माधव तिच्यासह संसारात पुष्कळ रमला. ॥११७॥

तो नित्य पंचमहायज्ञ करी. सिंहाप्रमाणे तेजस्वी असा, एकवीस वर्षे वयाचा जणू काही दुसरा सूर्यच आहे किंवा काय? असा तो दिसत असे. ॥११८॥

त्याची पत्नी चंद्रलेखा, पांड्यदेशील असून ज्याप्रमाणे पांडवाची भार्या ही पांडवांना प्रिय होती त्याप्रमाणे ही आपल्या पतीस प्रिय होती, आपल्या पतीचे भोजन झाल्यावर स्वतः भोजन करीत असे. पती झोपल्यावर स्वतः झोपत असे. ॥११९॥

एकदा तो कामातुर झालेला ब्राह्मणपुत्र, दिवसा आपल्या पत्नीशी संग करण्याची इच्छा करून आपल्या पत्नीजवळ येऊन म्हणाला - "हे भद्रे, हे भामिनी मला आता यावेळी तुझ्याबरोबर मीलनाची इच्छा आहे." याप्रमाणे आपल्या पतीचे भाषण ऐकून ती आपल्या पतीस म्हणाली. ॥१२०-१२१॥

ती चंद्रलेखा म्हणाली- "ज्या शरीरसुकाची आपण इच्छा करीत आहात ते शरीर, रक्त, मांस, अस्थि यांनी बरबटलेले असता एका शरीराने दुसर्‍या शरीराशी संबंध ठेवणे हे साधुजनांना असंमत आहे. ॥१२२॥

त्यातून दिवसा अशी क्रीडा करणे हे अत्यंत अयोग्य होय असे ऋषि म्हणतात. घरात मातापिता असून अग्निहोत्र आहे. ॥१२३॥

ही सूर्याची कांति पहा. आणि आपण मनातील अयोग्य काम सोडून द्या. याप्रमाणे पत्नीचे भाषण ऐकून माधव आपल्या पत्नीस म्हणाला. ॥१२४॥

तेव्हा माधव म्हणाला- हे भामिनी, तू माझ्या सौख्याविषयी तत्पर होऊन माझे मनोगत पूर्ण कर. तेव्हा आपल्या पतीचे भाषण ऐकून चंद्रलेखा म्हणाली. ॥१२५॥

"मी पाणी आणण्याकरिता नदीवर जाते. तू पुढे जा." याप्रमाणे आपल्या पत्नीचे भाषण ऐकून कुविचाराने युक्त झालेला तो माधव दर्भ आणण्याच्या निमित्ताने आपल्या घराबाहेर गेला. ॥१२६॥

चंद्रलेखाहि घागर घेऊन अरण्यात निघाली. तिच्या अगोदरच माधव दाटझाडी असलेल्या अरण्यात आला. ॥१२७॥

त्यावेळी दुसर्‍या वनामध्ये राहणारी अशी एक स्त्री एका झाडाखाली उभी होती. ती स्त्री विचित्र रूपसौंदर्याने युक्त असून पूर्ण चंद्राप्रमाणे तिचे मुख होते. तिने श्वेतवस्त्र परिधान केले असून त्यावर कमरपट्टा घातला होता. तिची नासिका सरळ असून भ्रृकुटी वक्र होत्या. तिचा स्तनभार पुष्ट होता. ॥१२९॥

तिचा केशकलाप निळा असून कुरळा होता. तिने उत्तम प्रकारची चोळी घातलेली होती व कोकिलेप्रमाणे तिचा स्वर होता. ॥१३०॥

डोळ्यांत तिने काजळ घातले होते व तिचा स्वर मंजुळ होता. गुडघ्यापर्यंत तिचे केस लांब होते. व आपल्या पायाने जमिनीवर रेघाटत होती. ॥१३१॥

याप्रमाणे असलेल्या स्त्रीला पाहून त्या माधवाला (आपली पत्नीजवळ आहे हे पाहून) थोडेसे वाईट वाटले पण लगेच थोडाचा विचार करून तो आपल्या पत्नीस म्हणाला. ॥१३२॥

"हे प्राणप्रिये तू आता घरी जा. तुझ्या प्रीतीने मी संतुष्ट झालो असून माझी इच्छा पूर्ण झाली आहे." याप्रमाणे माधवाने आपल्या पत्नीला म्हटल्यावर चंद्रलेखा म्हणाली की, ठीक आहे मी आपल्या इच्छेप्रमाणे परत घरी जाते. ॥१३३॥

याप्रमाणे आपल्या पतीची आज्ञा घेऊन चंद्रलेखा आपल्या घराकडे परतली. आपली पत्नी परत जाईपर्यंत माधव तेथेच राहिला. ॥१३४॥

कामविकाराने सारासार विवेक नष्ट झालेला तो माधव आपली पत्नी परत गेल्याचे पाहून हलके हलके त्या कन्येजवळ आला. ॥१३५॥

तो आपल्याजवळ येत आहे हे पाहून डोळे मोठे करून थोडेसे जोरात ती कन्या माधवास म्हणाली. ॥१३६॥

"मुनिश्रेष्ठा, तू माझ्याजवळ येऊ नकोस." तिचे ते म्हणणे ऐकून माधव त्या स्त्रीस म्हणाला. ॥१३७॥

हे भद्रे, तू कोण आहेस? तुझे पिता माता कोण आहेत ? हे वरानने, कोणत्या देशात तू राहातेस ? ॥१३८॥

याप्रमाणे त्यास स्त्रीस माधवाने विचारले असता त्या स्त्रीने आपली जात सांगितली. ॥१३९॥

ती कुंतला म्हणते- अरे, पापी अशा अन्त्यज जातीमध्ये उत्पन्न झालेल्या माझी चौकशी कशाकरिता करीत आहेस? माझे मातापिता अंत्यज असून मी दारू पिणे, मांस खाणे इत्यादि गोष्टी करते. वाईट मार्गाकडे आमची प्रवृत्ति असते. मी मध्य देशांतली राहणारी आहे. वेदवेदांतामध्ये पारंगत असा तू ब्राह्मण दिसतोस. वास्तविक तुझ्यासारख्याने आमचेकडे पाहूहि नये. पण तू माझी चौकशी करतो आहेस. ॥१४१॥

मला शिवून माझ्याशी क्रीडा करण्याची इच्छा करणारा तू मूर्खच आहेस. याप्रमाणे बोलणार्‍या त्या स्त्रीला अवलोकन करून माधव म्हणाला. ॥१४२॥

लोकपितामह ब्रह्मदेव नारायणापासून व्यर्थ उत्पन्न झाला. तो आंधळाच असावा असे मला वाटते. ॥१४३॥

अरण्याकरिता अशी सुंदर स्त्री त्याने उगीचच उत्पन्न केली आहे. तरीहि काही हरकत नाही. माझी बुद्धि सदैव अरण्यातल्या तुझ्यासारख्या स्त्रीचे ठिकाणी रमते. ॥१४४॥

खार्‍या पाण्याच्या समुद्रात निघालेली नानाप्रकारची रत्ने देव स्वीकारतातच. कारण (ती रत्ने कोणत्या ठिकाणी उत्पन्न झाली याला महत्त्व नसून) त्या रत्नातील तेजाला प्राधान्य आहे. ॥१४५॥

या न्यायाने तुझ्या सौंदर्यामुळे मी तुझा भोग घेणार आहे. सुस्मिते, त्यासाठी मी पूर्वजासह नरकास जाईन. ॥१४६॥

याप्रमाणे त्या ब्राह्मणाचे भाषण ऐकून तरुण अशा अरुणाप्रमाणे वर्ण असणारी ती कन्या रडत रडत म्हणू लागली. देव या ब्राह्मणश्रेष्ठास दुष्ट स्त्रीच्या संगरूपि पापापासून मुक्त करोत. ॥१४७॥

ज्या दिशांचा देवता आहेत, गणांचा स्वामी गणपति, अग्नि, चंद्र इत्यादि देवता, चराचरात्मक देवता माझे भाषण ऐकोत. "हा ब्राह्मण माझ्यासारख्या पापी स्त्रीच्या संगतीमुळे निष्कारण अधःपातरूपी मृत्यूला प्राप्त होत आहे. ॥१४८॥

याप्रमाणे ती स्त्री त्या ब्राह्मणाच्या अधःपतनाविषयी शोक करू लागली. हे ब्राह्मणा, पापी व व्याभिचारिणी अशा मला तू स्पर्श करू नकोस, कोणताहि आतुर मानव अग्नी, सर्प, वाघीण, हत्ती यांना स्पर्श करणार नाही. ॥२४९॥

परस्त्री व चांडालकन्या ही अग्नीप्रमाणे आहे. उत्तम स्थानाला प्राप्त झाला असताहि नीचच अधोगतीची इच्छा करतो. ॥१५०॥

ज्ञानी अशी तुझी बुद्धि, अधोगतीची इच्छा करणारी न होवो. हे द्विजश्रेष्ठा, परमात्म्याने पूर्वी दोन जाती निर्माण केल्या. ॥१५१॥

पुरुष व स्त्री या प्रकाराने युक्त चार वर्ण उत्पन्न केले आहेत. ब्राह्मणांस ब्रह्मयोनी आहे. बाकी वर्णांना ते ते वर्णच कारण होत. ॥१५२॥

ब्राह्मणांचा धर्मत्याग हे एक विपरीत दृश्य मी पाहात आहे. हे ब्राह्मणश्रेष्ठा, तुझे शरीर हे वेदमंत्राने पवित्र झालेले आहे. ॥१५३॥

तुझ्या मातेच्या ऋतुकालात रात्रीच्या वेळी तुझ्या पित्याकडून जो रेतोत्सर्ग झाला असेल त्यांस शास्त्रपूत गर्भाधान असे म्हणतात. ॥१५४॥

वेदमंत्राच्या योगाने तुझ्या मातेच्या उदरांत असलेल्या गर्भावर सीमन्तोन्नयन नामक संस्कार झाला असेल. दहाव्या महिन्यात तुझी माता प्रसूत झाली असेल. ॥१५५॥

मग तुझा जन्म झाल्यावर तुझ्या पित्याने तुझा शास्त्रोक्त जातकर्म संस्कार केला असेल. अन्नप्राशन, चौल, उपनयन हे संस्कार तुझ्यावर तुझ्या पित्याने केले असतील. ॥१५६॥

अग्नीच्या साक्षीने तुझा विवाह झाला असेल. तू वेदवेदांगाचे अध्ययन करून अग्निहोत्र व्रत तू ग्रहण केले असशील. ॥१५७॥

अशा तर्‍हेच्या पवित्र देहाशी माझ्यासारख्या स्त्रीशी संगति कशी बरे घडेल? हरिकथा श्रवणाच्या श्रवणाने तुझे कान पवित्र झाले असतील. तुझे नाक, परमात्म्यास समर्पण केलेल्या फूलांचा सुवास घेऊन पवित्र झाले असेल. तुझे पोट श्रीहरीस समर्पण केलेले अन्न भक्षण करून भरले असेल. ॥१५८-१५९॥

श्रीकृष्णाच्या वारंवार केलेल्या पूजनाने तुझे हात पवित्र झाले असतील. श्रीहरीच्या नामोच्चाराने तुझी जीभ पवित्र झाली असेल. ॥१६०॥

पुण्यक्षेत्री गमन करून तुझे पाय पवित्र झाले आहेत अशा प्रकारच्या पवित्र देहाचा माझ्यासारख्या स्त्रीशी होणारा संग योग्य कसा होईल? ॥१६१॥

हे ब्राह्मणा, तू माझ्या देहाचे महत्त्व वर्णन ऐक. अश्लील भाषणाने माझी जीभ नित्य जळत असते. ॥१६२॥

सुरापान, मांसभक्षण यांच्या योगाने माझे उदर भरून गेले आहे. व्यभिचारविषयक वार्तालाप ऐकून माझे कान भरून गेले आहेत. ॥१६३॥

माझे पाय जारगृहाकडे जाऊन पाषाणाप्रमाणे निर्विकार झाले आहेत. गोवध करून माझे हात यमदंडाप्रमाणे निष्ठुर झाले आहेत. ॥१६४॥

अशा तर्‍हेच्या माझ्या पापीदेहाचा संग कसा योग्य होईल. उत्तम पुरुष नीचगतीस आल्यास त्यास स्वर्गलोक कसा प्राप्त होईल? ॥१६५॥

परस्त्री बरोबर झालेल्या संगरूपी दोषाने पुष्कळजण मरण पावले आहेत. याकरिता तुझे कल्याण होवो तू या अधःपतनापासून दूर जा. मी तुझी दासी होते. ॥१६६॥

याप्रमाणे त्या स्त्रीचे भाषण ऐकून तो ब्राह्मणपुत्र माधव म्हणाला- तुझ्याशी होणारा संग. कल्याण करणारा, मुक्तिप्रद असून पुष्कळ दिवसांच्या पुण्यप्रभावाने प्राप्त झालेला आहे. ॥१६७॥

दैवयोगानेच हा योग आलेला आहे. परमात्म्याच्या प्रसादाने प्राप्त होणार्‍या पुरुषार्थाला कारण असा योग आहे. हे भामिनी तू माझी सेवा कर, मी तुझा दास आहे. तू लज्जेचा त्याग करून माझी इच्छा पूर्ण कर. ॥१६८॥

तुझ्या वियोगानेच केवळ माझे प्राण जात आहेत याकरिता मरणाभिमुख झालेल्या मला जीवदान दे. ॥१६९॥

याप्रमाणे त्या ब्राह्मणपुत्राने म्हटले असता (त्याच्या हातून सुटण्यासाठी) त्या चांडाल कन्येने उठून पळून जाण्याचा विचार केला. ॥१७०॥

स्त्री, आपल्या मनात आल्याप्रमाणे लवकर पळून जात असता माधवाने तिच्या पाठोपाठ धावत जाऊन तिला धरले. तेव्हा तिने तुला तुझ्या जनकाची, आईची, आईच्या वडिलाची शपथ आहे (तू मला स्पर्श करू नकोस) असे म्हणत ओरडणार्‍या त्या स्त्रीला, कामाने पीडित झालेला ब्राह्मणाधम माधवाने बलात्काराने धरून तिचा उपभोग घेतला. ॥१७१-१७२॥

संभोगानंतर आपल्या इच्छेप्रमाणे वागणारी ती चांडाल कन्या त्या ब्राह्मणास म्हणाली- हे ब्राह्मणा, आजपासून तू माझा पति झालास. ॥१७३॥

यज्ञोपवीताचा त्याग कर. मुंडन करून घे. तू ब्राह्मणापासून भ्रष्ट झाला आहेस. उत्तमप्रकाराने गोमांस भक्षण कर. ॥१७४॥

मद्यपान कर. आजपासून चांडाल जातीत तू आला आहेस. याप्रमाणे तिचे म्हणणे ऐकून त्याप्रमाणे त्या ब्राह्मणाने सर्व काही केले. ॥१७५॥

दुर्दैवाने प्रतारणा केला गेलेला ब्राह्मण चांडालाच्या आचाराचे पालन करीत कृष्णा व वेणा नदीच्या तीरी त्या स्त्रीसह वर्तमान तिच्या संगतीच्या मोहाने बारा वर्षेपर्यंत राहिला. पुढे मानवी शरीर हे अनित्य असल्याने कालपाशाने बांधली गेलेली, निळ्या केसाची ती कुंतला अकस्मात मरण पावली. तिच्या मृत्युमुळे तो ब्राह्मण अतिशय दुःखी झाला. त्या दुःखामुळे भ्रमिष्ट झाल्याप्रमाणे होऊन आपले निवासस्थान सोडून तो मन मानेल तसा संचार करू लागला. ॥१७६-१७७-१७८॥

त्या वेळेसच उत्तर दिशेकडील राजे यात्रा करण्याकरिता वराहपर्वताकडे जात होते. मार्गामध्ये माधवाने त्या राजांना पाहिले. ॥१७९-१८०॥

तेव्हा त्यांच्या बरोबरच माधव ब्राह्मण त्यांनी दिलेले उरलेले अन्न खाऊन त्यांच्याबरोबर संचार करीत करीत सुदैवाने शेषाचलास प्राप्त झाला. ॥१८१॥

शेषाचलास आल्यावर त्या भक्तिमान राजांनी कपिलतीर्थावर स्नान करून आदरपुर्वक स्वतःचे वपन केले. ॥१८२॥

त्या आनंदित झालेल्या राजांनी नंतर आपल्या पितृगणांना उद्देशून पिंडदान केले. त्यांच्याप्रमाणेच माधवानेहि वपन करवून कपिलतीर्थात स्नान केले व आपल्या पितृगणांना उद्देशून श्रद्धापूर्वक मातीचे पिंडदान केले. ॥१८३॥

त्याच्या पिंडदानरूपी कर्मामुळे अथवा त्याच्या सुदैवाने माधव निष्पाप झाला. ॥१८४॥

(माधवाने मातीचे पिंडदान केल्याने जर त्याचे पाप नाहीसे झाले तर) जो मानव कपिलतीर्थात भक्तिपूर्वक स्नान करून आपल्या पितृगणांचे पिंडदानपूर्वक श्राद्ध करील तो मुक्तीस योग्य होईल. त्या ब्राह्मणाने त्या प्राचीन पुण्यक्षेत्रामध्ये मृत्तिकेचे पिंडदान केले. ॥१८५॥

त्या पुरुषोत्तमाच्या तीर्थाचे वर्णन व क्षेत्राचे पुण्यदायक माहात्म्य किती वर्णन करावे? कारण माझ्याकडून परमात्म्याच्या आज्ञेने मातीचे पिंडदान केले गेले असता माझे पितृगण मुक्त झाले. ॥१८६॥

त्यानंतर दुसर्‍या दिवशी पहाट होण्याबरोबर हे राजश्रेष्ठा, सर्व राजे लोक आपल्या पुत्रमित्रबांधवासह शेषाचल पर्वतावर चढू लागले असता त्यांच्या मागून तो ब्राह्मणहि शेषगिरी चढू लागला. हे राजा, सर्व राजे लोक ठिकठिकाणी विश्रांति घेत पर्वतावर गेले तो ब्राह्मणश्रेष्ठ माधवहि त्या पर्वतावर गेला. ॥१८८॥

पर्वताच्या नुसत्या स्पर्शानेहि त्याचे पाप तापू लागले. ॥१८९॥

त्यावेळी माधवाला फारच त्रास झाला. ज्याप्रमाणे माशी पोटात गेली असता वांति होते त्याप्रमाणे त्याचे पापच वांतीच्या योगाने आजूबाजूस पसरले. पर्वताच्या महात्म्यामुळे त्याच्या शरीरात एक प्रकारचा अग्नि उत्पन्न झाला. तो अग्नी त्या, सुरापान व मांसाशन इत्यादिकांमुळे उत्पन्न झालेले पाप जाळू लागला. ॥१९०॥

त्या अग्नीतून निघालेल्या धुराच्या दुर्गंधीमुळे सर्व देवता त्रासल्या. त्यातील मतितार्थ जाणणारे ब्रह्मरुद्रादि प्रमुख देव आप आपली विमाने आकाशात प्रकाशित करीत प्राप्त झाले. त्या माधव ब्राह्मणाची ती स्थिति पाहून देवांनी आनंदाने माधवाच्या मस्तकावर पुष्पवृषि केली. ॥१९१-१९२॥

पितामह ब्रह्मदेव, त्या माधव ब्राह्मणाचे सर्व पाप नष्ट झालेले पाहून आपल्या विमानातून खाली उतरले. व ज्याप्रमाणे अजामिळाचा श्रीहरीने उद्धार केला त्याप्रमाणे पापरहित झालेल्या माधवाचा कृष्ण दयाळुपणे उद्धार करील. ॥१९३॥

याप्रमाणे विचार करीत आदरपूर्वक ब्रह्मदेव माधवाजवळ आला व त्याचे मस्तक अवघ्राण करीत त्यास म्हणाला. ॥१९४॥

हे मधवा, तू आता पापरहित झाला आहेस. तू आता स्वामितीर्थावर जाऊन त्या जलात स्नान कर. वराहरूप परमात्म्यास नमस्कार करून हे ब्राह्मणा, आपल्या देहाचा त्याग कर. ॥१९५॥

नंतर राजा होऊन निष्कंटक राज्य कर. पांडवाच्या दौहित्रकुलात सुधर्माचा पुत्र होऊन आकाशराजा या नावाने अवतीर्ण हो. दक्षिणेस नारायणपुर नामक नगरात तोंडदेशाचा राजा हो. ॥१९६-१९७॥

जगन्माता लक्ष्मी तुझी कन्या होईल व जगदाधिपति श्रीविष्णु तुझा जावई होईल. नंतर तुला वैकुंठ प्राप्त होईल. ॥१९८॥

याप्रमाणे चतुर अशा ब्रह्मदेवाने त्यास सांगितले. आणि त्या शेषाचलाचे वेंकटाचल असे नामकरण केले. ॥१९९॥

वें म्हणजे पाप व कट म्हणजे नष्ट करणे म्हणजे "पाप जाळून टाकण्याची शक्ति" या पर्वतात आहे म्हणून त्या शेषाचलास वेंकटाचल असे देव म्हणू लागले. ॥२००॥

म्हणून हा पर्वत वेंकटाचल म्हणून लोकांत ख्याति पावेल. ॥२०१॥

प्रातःकाली या पर्वताचे जो नामस्मरण करील त्याचे पुण्य फल गंगानदी स्नान, सेतुबंध, रामेश्वराची यात्रा ही एक हजार वेळा केली असता जे फल प्राप्त होईल ते फल प्राप्त होइल. ॥२०२-२०३॥

ह्या पर्वताचा चारी युगाचा इतिहास मी सांगितलेला व शतानंदाने जनक राजास सांगितलेला जे श्रवण करतील त्यांचे कल्याण होईल. ॥२०४॥

याप्रमाणे भविष्यपुराणान्तर्गत वेंकटेशमहात्म्यातील पहिला अध्याय समाप्त.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel