अध्याय नववा

शतानंद जनक राजास म्हणतो- हे राजा, ती धर्मदेवता स्वकुलामध्ये पूजित अशा देवाचे स्मरण करून पुढे बोलू लागली. अगोदर नारायण, नंतर लक्ष्मी, ब्रह्मदेव, सरस्वति, महादेव, पार्वती, इंद्र, त्या नंतर शचि, अग्नि, यम आदि सपत्नीक दिक्पाल, कुबेर, अग्नि, वायू, वरुण, वासुकी, देवर्षी, पितृगण, गंधर्व व राजश्रेष्ठ या सर्वांचे क्रमाने (तारतम्य पूर्वक) ध्यान केले. ॥१-३॥

त्यानंतर काशीक्षेत्राचा स्वामी असा विश्वनाथ, बिंदुमाधव, विष्णुपाद, प्रयाग या क्षेत्रदेवता,गोदातीरनिवासी नारसिंह, जगन्नाथ पांडुरंग, महाबळेश्वर, पंपाध्यक्ष असा विरूपाक्ष, पुण्यकर अरण्याने युक्त असा श्रीशैल पर्वत वेंकटाचलाधिपति श्रीवेंकटेश, कालहस्तीश्वर, घटिकाचलावर असलेले चतुर्भुज मुख्यप्राण, वृद्धाचलनिवासी श्रीनृसिंह, सर्व स्वर्गादि लोकांचा स्वामी वरदराज, श्वेतरूपी, रंगनाथ, कुंभकोण येथे राहणारा कुंभेश्वर, शार्ङ्गपाणी असा मथुरेत राहणारा श्रीकृष्ण, रामाने तयार केलेला सेतुबंध, अनंतशयन येथील पद्मनाभ, सुब्रह्मण्य, कुमारस्वामी, मधुसूद, शंकर, चंद्राने प्रतिष्ठापित असा चंद्रेश्वर, गोकर्णेश्वर, तुंगभद्रा नदीतीरावरील हरिहरेश्वर, या क्षेत्राधिपतींचे ध्यान केले. गंगा, गोदावरी, कृष्ना, तुंगभद्रा, मलापहा, कावेरी, कपिला, क्षीरा, सुवर्णमुखरी नदी यांचे ध्यान केले. मूकांबिका, भैरव, कालभैरव, कामाक्षि, विशालाक्षी, वरप्रद, कमलाक्षी यांचे ध्यान केले. कोल्हापुरनगरात अत्यंत श्रेष्ठ अशा हे रमादेवी, परदेशात असलेल्या माझे रक्षण कर. ॥४-११॥

याप्रमाणे अत्यंत भक्तीने सर्वांचे स्मरणपूर्वक ध्यान करून धर्मदेवता धरणीस मधुर वाणीने म्हणाली. मी या माझ्या टोपलीची व मुलाची शपथ घेऊन मी विस्ताराने जे सांगते ते श्रवण कर. ॥१२॥

बदरीनिवासी माझा पति, मातापिता, गुरु यांची व स्वतःची शपथ घेऊन मी सांगणार असलेलेल सर्व खरे आहे असे तू समज. ॥१३॥

मी खरे सांगते. मला तू वेलदोडे, लवंग, कापूर, जायफळ, सुपारी यांनी युक्त असा तांबूल दे. ॥१४॥

याप्रमाणे म्हटल्यावर तिच्यासमोर तांबूल ठेवून धरणी म्हणाली. हे महाप्राज्ञे, आमच्या दुःखनाशासाठी जे काही सांगावयाचे असेल ते खरे सांग. ॥१५॥

मी तुझ्यासमोर तीन मोत्याच्या राशीनी युक्त असे सोन्याचे सूप वायन म्हणून ठेवले आहे ते तू पहा याप्रमाणे तिचे भाषण ऐकून श्रीनिवास (धर्मदेवता) प्रसन्न झाले. ॥१६॥

प्रिय अशा लक्ष्मीला आवडणारी काठी आपल्या हातात घेऊन ती धर्मदेवता म्हणाली- तुझ्या मुलीचे अंगशोषण होण्याचे कारण काय आहे ते तुला मी सांगते ते श्रवण कर. ॥१७॥

हा ताप मदनाप्रमाणे सुंदर अशा एका पुरुषाच्या योगाने आला आहे. हे राजपुत्री, मी तुला विस्ताराने सांगते ते जाणून घे ॥१८॥

काल कोणी एक घोड्यावर बसलेल्या पुरुषास पाहून तुझी कन्या कामज्वराने पीडित होऊन मोह पावली आहे. त्यामुळे अशा तर्‍हेने तिचे अंगशोषण होत आहे. ॥१९॥

आता हे अंगशोषण थांबावे याकरिता तुझी कन्या त्या पुरुषाला दिली पाहिजे- याप्रमाणे तिचे भाषण ऐकून धरणी देवी म्हणाली- माझ्या मुलीचा अंगशोषक असा किरातरूपी पुरुष कोठे आहे? त्याचे नाव काय आहे? तुझ्या इच्छेप्रमाणे मी माझी कन्या देईन. ॥२०॥

याप्रमाणे प्रश्न विचारल्या गेलेल्य धर्मदेवीने धरणीस म्हटले-वैकुंठात राहणारा श्रीहरी वेंकटाचलावर सध्या राहतो. ॥२१॥

ज्याचा घोडा तुझ्या मुलीने मारला तोच प्रसिद्ध असा श्रीनिवास, श्रीमंत व सामर्थ्यसंपन्न असा आहे. ॥२२॥

बागेच्या तोंडाजवळच तो मेलेला घोडा पडला आहे. पाहिजे तर तुझ्या मुलीच्या मैत्रिणीला तू विचार. राजकन्या म्हणून गौरवाने तिच्या अपराधाची क्षमा त्या पुरुषाने केली आहे. ॥२३॥

मी जे सांगत आहे ते सर्व खरे आहे असे समज. जर तू या पुरुषाबरोबर तुझ्या कन्येचा विवाह लावून दिलास तर सर्वांना सुख होइल नाही तर दुःख प्राप्त होईल ही माझी वाणी व्यर्थ होणार नाही. ॥२४॥

आजपासून एका दिवसात तुझी मुलगी मृत होईल संशय नाही. याप्रमाणे धर्मदेवतेचे अमंगल भविष्य ऐकून किंचित् दुःखाने युक्त होऊन धरणी देवी म्हणाली, ॥२५॥

हे कल्याणी, अशा रीतीने माझ्या दुःखाला कारण असे कठोर बोलू नकोस. तिचे भाषण ऐकून पुलिंदकन्या धर्मदेवता म्हणाली. ॥२६॥

हे देवी, अगोदर सांगितल्यापैकि एकही गोष्ट खोटी नाही. याप्रमाणे तिचे भाषण ऐकून भ्यालेली धरणीदेवी रडत म्हणाली. ॥२७॥

वराकडून मागणी घातली गेली नसताना आम्ही आपणहून मुलगी कशी बरे देणे योग्य होईल? - याप्रमाणे चिंता करणार्‍या धरणीला धर्मदेवता म्हणाली ॥२८॥

आजच एका घटिकेनंतर कोणी एक स्त्री येईल. ती स्त्री वृद्ध असून या भुतलावर धर्म, अर्थ (व्यवहार) यात अतिशय कुशल आहे व माझ्या सांगण्यावरुन राजाला या गोष्टीची जाणीव दे. ॥२९॥

तुझ्या पतीची बंधु तोंडमान व इतर आप्तेष्ट यांना हे सांगून राजप्रिये, तू योग्य व चांगल्या मार्गाचा आश्रय कर. ॥३०॥

आणि माझ्या (देवतेसमोर) समोर "मी माझ्या कन्येचा विवाह श्रीनिवासाशी करून देईन" असा संकल्प कर. तेव्हा धरणी म्हणाली- कोणत्याहि कारणाने का होईना माझी कन्या जिवंत राहिली म्हणजे पुरे आहे. वेंकटाचलावर गुहेमध्ये राहणार्‍या त्या श्रीनिवासालाच मी माझी कन्या देईन. ॥३१॥

तेव्हा धर्मदेवी म्हणाली- असे केल्यास तुझी कन्या निश्चितच जिवंत राहील यात शंका नाही. आता मी माझा पति ज्याठिकाणी राहातो तिकडे मी जाते. ॥३२॥

तिच्या वचनाची सत्यता अजमाविण्याकरिता राणी म्हणाली- आता तू सांगितल्याप्रमाणे झाल्यास मी पुढील गोष्टीहि सत्य मानीन. तेव्हा "निश्चयाने सारे होणार" असे म्हणून गावाबाहेर जाण्यासाठी आपल्या पाठीला मूल बांधून, सूपवाण व मोत्याच्या राशी वगैरे सर्व पदार्थ व टोपली डोक्यावर घेऊन गावाबाहेर आली. हे राजा जनका, नंतर ती पुलिंद कन्या धर्मदेवी उत्तर दिशेकडे निघून गेली. ॥३३-३४॥

पुलिंदीनी निघून गेल्यावर डोळे अश्रूने भरून आलेली धरणी आपल्या खोलीत आल्यावर (आपल्या मुलीला तापाने फणफणलेली पाहून) दुःखी झालेली धरणी रडू लागली. ॥३५॥

हे मुली, मुलीला आईसारखी दुसरी मैत्रीण नाही तेव्हा तुझ्या मनात काय आहे? ते तू मला का सांगत नाहीस? ॥३६॥

आम्ही काय करावयास पाहिजे अथवा काय नको ते हे कन्ये तू मला सांग. तुझ्या मनाप्रमाणेच सर्व काही करीन. उगीचच्या उगीच (काहीहि न सांगता मनात ठेवून) देहाला ताप करून घेण्यात काय अर्थ आहे. ॥३७॥

मी महाराणी दुर्दैवी आहे. विषपान करते. याप्रमाणे आपली माता दुःखी असलेली पाहून पद्मावती अतिशय व्यथित झाली. ॥३८॥

आपल्या दुःखी मातेला पाहून ती हलके हलके बोलू लागली. पद्मावती म्हणाली- हे माते मी तुला प्रसूति वेदना होण्यास मी कारण झाली आहे कोणतेहि दुष्कर्म माझ्या हातून घडलेले नाही. ॥३९-४०॥

माझी इच्छा माझ्या तोंडाने मी कशी बरे सांगू तरीही तू माझी माता आहेस म्हणूनच माझ्या मनातील गोष्ट सांगते ते ऐक ॥४१॥

हे माते, तुझ्या आज्ञेवरून मी मैत्रिणीसह फुलाच्या बागेत गेले असता तेथे कोणी एक अनादि असा पुरुषश्रेष्ठ पुरुष आला. ॥४२॥

हे माते, मला अजूनहि कमलाप्रमाणे नेत्र असलेल्या मुखाचे स्मरण खोते. त्याच्यावाचून आता मीजगू शकणार नाही. ॥४२॥

त्या कृष्णाचे चरित्र देव आप आपल्या योग्यतेनुसार जाणतात. पापी असे मानव त्या पुरुषोत्तमाचे चरित्र जाणत नाहीत. ॥४३॥

खरोखर तोच साक्षात सर्वोत्तम असा पुरुषश्रेष्ठ आहे. ॥४४॥

त्याच्या उजव्या हातात उत्तम प्रकारचे चक्र शोभते. ॥४५॥

तसेच डाव्या हातात हंसाप्रमाणे पांढरा शुभ्र असा उत्तम शंख शोभतो ज्याच्या कंठामध्ये कौस्तुभ रत्न आहे व कानामध्ये मकराकृति कुंडले आहेत. ज्याच्या

चक्रप्रभावाने वाराणसी नगरी जळाली व ज्याच्या शांर्ग नामक धनुष्याचा टणत्कार ऐकून दैत्यादिक पळून जातात. ॥४६॥

आता मी त्यांच्या भक्तांचे लक्षण विस्ताराने सांगते. ते ऐक जे वेदशास्त्रात पारंगत आहेत व जे धर्मरूपी व्रताचरणात दक्ष आहेत. ॥४७॥

व जे वेदामध्ये (तदनुसारि स्मृत्यादिकांत) सांगितलेल्या कर्माचे आचरण करतात ते त्या पुरुषोत्तमाचे भक्त होत असे समज. ॥४८॥

जे शंख, चक्र यांचे चिन्ह आपल्या शरीरावर धारण करून ऊर्ध्व पुंड धारण करतात ॥४९॥

जे कधीहि वाईट बोलत नाहीत, जे आपल्या मातापित्यांच्या आज्ञेप्रमाणे वागतात तेच त्या पुरुषोत्तमाचे भक्त होत. अशा त्या पुरुषोत्तमावाचून कोणताहि प्राणी जगणार नाही. ॥५०॥

याप्रमाणे आपल्या मुलीचे भाषण ऐकून धरणी देवी आनंदित होऊन आपल्या मुलीस म्हणाली- हे मुली, खरे खरे सांग हा तुला ज्वराने आलेला भ्रम नव्हेना? (म्हणजे तापात तू बडबडत नाहीस ना?) ॥५१॥

तेव्हा पद्मावती म्हणाली- हे माते; मी खरे तेच सांगते. (ज्वरामुले भ्रमात बडबडत नाही.) मी तो महाप्रभूच पाहिला. त्याचे दर्शन घेण्याच्या बुद्धीने माझे देहशोषण होत आहे. ॥५२॥

शतानंद म्हणतो- हे जनका, आपल्या सुशील कन्येचे सांत्वन करून धरणी आपल्या पतीच्या खोलीमध्ये आली. आपल्या भाग्यसंपत्तीने आनंदयुक्त होऊन पाकसिद्धता करण्याची आज्ञा दिली व तिने, आपल्या कन्येच्या दुःखाने संतप्त झालेल्या आपल्या पतीस आपल्या मुलीस ताप येण्याचे कारण तसेच त्या तापाच्या शांतिसाठीच धर्मदेवीने सांगितलेला उपाय तोहि सांगितला. ॥५३-५४॥

तसेच आपल्या मुलीचे ह्रद्‌गतही आदराने सांगितले. आणि याच वेळेस बकुलेसह वर्तमान पद्मावतीच्या अभिषेकाचे सामान परत आणीत असलेल्या मैत्रिणी जगन्नाथ अशा शंकराला करून पुरोहित व इतर ब्राह्मणासह परत आल्या. ॥५५-५६॥

राजवाड्यात आल्यावर सर्व ब्राह्मण व त्या मुली अंतःपुरात गेल्या. मग आलेल्या सर्व ब्राह्मणांचे विधिपूर्वक, गंधपुष्प, अक्षता, अलंकार, भोजन, वस्त्र, दक्षिणा इत्यादिकांच्या योगाने पूजन केले. व त्यांनी दिलेल्या आशीर्वचनरूप मंत्राने व आणलेल्या अभिषेक तीर्थाने पद्मावतीस मार्जन केले. ॥५७-५८॥

नंतर ब्राह्मणाच्या अनुज्ञेने आकाशराजाने स्वतः भोजन केले. नंतर राणीहि जेवण करून अंतःपुराबाहेर आली. ॥५९॥

हे राजा, त्यावेळी तेथे नवीन असलेल्या बकुळेला पाहिल्याबरोबर तिला धर्मदेवीच्या सांगण्याचे स्मरण होऊन ती तात्काल बकुळेजवळ आली. ॥६०॥

आणि बकुळेची माहिती असलेल्या मुलीना धरणी म्हणाली- हे मुलीनो, या स्त्रीचे येथे येण्याचे कारण काय आहे? ही कोण आहे? कशाकरिता ही येथ आली आहे? ही स्त्री मला पूज्य दिसत आहे. ॥६१॥

धरणीचे भाषण ऐकून तिच्या सेविकांपैकी एक स्त्री म्हणाली- वेंकटाचलावर राहणारा वेंकटेश्वर हा माझा धनी असून आपले काम राणीकडे आहे असे ही स्त्री म्हणते म्हणून आम्ही तिला घेऊन आलो आहोत तरी तिचे कार्य कोणते ते तिला विचारा. याप्रमाणे त्या मुलींनी सांगितल्यावर धरणी बकुलेस म्हणाली हे भद्रे, या रत्नपीठावर बैस. याप्रमाणे म्हणून तिला धरणीदेवीने रत्नपीठावर बसविले. ॥६२-६५॥

नंतर स्वतःला धन्य समजणार्‍या राजपत्नी धरणीदेवीने, देवमातेस बकुलेस म्हटले. ॥६६॥

धरणीदेवी म्हणाली- हे महाभागे, तुझे स्वागत असो. तुझे स्वागत हे माझ्या पुण्यास कारण होत आहे. सज्जनांच्या सहवासाने मी स्वतःला धन्य समजते.. ॥६७॥

हे बकुलादेवी, तू कोणत्या कारणासाठी आमच्याकडे आली आहेस? हे तू मला सांग, ते मी अवश्य करीन. याप्रमाणे धरणीने विचारले असता राजभार्येस बकुला म्हणाली. ॥६८॥

हे राजभार्ये, तुझ्या मुलीला मागणी घालणे हे माझे मुख्य काम आहे. बाकीची शेकडो अवांतर कामे घेऊन काय करावयाची आहेत. याप्रमाणे मुख्यकार्य कोणते हे बकुलेने सांगितल्यावर धरणीदेवी बकुलेस म्हणाली. ॥६९॥

हे देवी, तू योग्य असे बोललीस. आम्हालाहि वराची अपेक्षा आहेच. पण वर कोण आहे? त्याचा देश कोणता? त्याचे गोत्र व नक्षत्र कोणते त्याचे मातापिता कोण? ॥७०॥

त्याचे कुल कोणते? आचार जात त्याची कोणती? हे सर्व तू सांग. याप्रमाणे धरणीने विचारले असता बकुला म्हणाली- हे राणी त्या श्रीनिवासाचे कुलनक्षत्रगोत्रादिक विस्ताराने सांगते ते तू ऐक. त्याची माता देवकी व पिता वसुदेव होय. ॥७१-७२॥

त्याचे चंद्रकुल असून त्याचे नाव कृष्ण असे आहे. वसिष्ठ गोत्रात जन्मला असून त्याचे नक्षत्र श्रवण आहे. वेंकटगिरि हे त्याचे निवासस्थान असून तो विद्वान व धष्टपुष्ट आहे. आचारसंपन्न व पंचवीस वर्षे वयाचा आहे. ॥७३-७४॥

हे त्याचे विवाहाचे वय आहे. जर तू आपली कन्या दिलीस तर सुख लागेल. फार काय सांगावे? त्याच्या दर्शनानेच तुला सुख होईल. ॥७५॥

याप्रमाणे वराची सर्व माहिती ऐकून अतिशय आनंदित झालेली धरणी म्हणाली- हे शुभे, तू सांगितलेली हकीकत ऐकून माझ्या मनात एक शंका उत्पन्न झाली आहे. ॥७६॥

वर भाग्यवान, कुलीन, बुद्धिमान, तरुण, धष्टपुष्ट, पंडित, असा, जर आहे तर आजपर्यंत त्याने आपला विवाह का करून घेतला नाही? ॥७७॥

याप्रमाणे धरणीचा प्रश्न ऐकून मनात विचार करीत धैर्याने बकुला म्हणाली- हे देवी, श्रीनिवास याचा विवाह लहानपणीच झाला होता. समुद्राने आपली कन्या दिली आहे. ॥७८॥

पण तिला मूल न झाल्याने दूसरा विवाह करण्यास उत्सुक झाला आहे. निर्दोष अशा श्रीनिवासाचे ठिकाणी कोणताहि दोष नाही असे समज. ॥७९॥

तो सर्व वृत्तांत ऐकून धरणीने भोजनादिकांच्या योगाने बकुलेचा सत्कार केला व आकाशराजास बोलावण्यासाठी आपल्या मुलांस तिने सांगितले. ॥८०॥

मुलाने राजास निरोप सांगितल्याबरोबर तो निरोप ऐकून राजा आनंदितमनाने अंतःपुरांत आला. राजा आल्याबरोबर एकांतांत राजश्रेष्ठांस म्हणाली ॥८१॥

हे राजन् पद्मावतीस मागणी घालण्याकरितां वेंकटाचलाहून बकुला नामक स्त्री आलेली आहे. तरी मुलाला पाठवून पुरोहितास आणवा. ॥८२॥

आणि नंतर वेदपारंगत अशा ब्राह्माकडून वराच्या कुलशील व विद्या इत्यादिकांचा विचार करून तसेच वधूवरांचे गोत्रनक्षत्रादि, योनि, गण, नाडी या सर्वाचा सुसंगतीने विचार करावा. सर्व गोष्टीचा विचार झाल्यावर हे प्रभो, मग कन्यादान करा. ॥८३॥

कन्येस मागणी घालण्याकरिता ती साध्वी बकुला आली आहे. व कन्येचे मनही मी जाणले आहे. ॥८४॥

तुमची कन्यासुद्धा त्याच वेंकटचलनिवासी श्रीनिवासाला इच्छिते. धर्मदेवीने सांगितलेले सर्व खरे झाले आहे तरी त्याप्रमाणे सर्व ताबडतोब करा. ॥८५॥

याप्रमाणे आपल्या पत्नीचे भाषण ऐकून राजा अत्यंत आनंदभराने म्हणाला- हे भद्रे, बकुलेच्या आगमनाने आमचे कल्याण प्राप्त झाले आहे. ॥८६॥

पूर्वपुण्याईने आमचे मंगल होत आहे. आमचे सर्व पितृगण कृतार्थ होऊन मुक्तिभागी झाले आहेत. ॥८७॥

बकुलेच्या वाक्यरुपी अमृतपानाने मला रोमांच उत्पन्न झाले आहेत. वधूवरांचे समागमरुपी कल्याण मी केव्हा पाहीन असे मला झाले आहे. ॥८८॥

आपल्या पतीसहवर्तमान राजकन्येला बांधव समूहाच्या मध्यभागी सिंहासनावर बसलेली मी केव्हा बरे पाहीन. ॥८९॥

याप्रमाणे बोलून राजा अंतःपुरात आला. नंतर दुहितृवत्सल राजा, आदराने आपल्या वाणीने पद्मावतीचे सांत्वन करीत तिला म्हणाला. ॥९०॥

हे भद्रे, आता अगदी लवकरात लवकर सर्व काही होईल पण तुझ्या मनात असलेले दुःख सोडून दे. आणि तुझ्या मनात जी इच्छा असेल ती तू सांग. ॥९१॥

म्हणजे त्याप्रमाणे मी लगेच करतो. यांत तू चिकित्सा बिलकुल करू नकोस. याप्रमाणे आपल्या पित्याचे बोलणे ऐकून पद्मावती आपल्या आईस म्हणाली. ॥९२॥

हे माते, तू तातांना सर्व हकीकत सांग. मी लज्जेने काही सांगू शकत नाही. ॥९३॥

आपल्या मुलीच्या म्हणण्यातील भावार्थ जाणून धरणी आपल्या पतीस म्हणाली - महाराज विधिपूर्वक विवाह उरका. ॥९४॥

हे शुभानना, शुभ कार्याकरिता विलंब केव्हाहि करू नये. तेव्हा आकाशराजा म्हणाला हे भामिनी, लक्ष्मीदेवीचे निवासस्थान अशा श्रीकृष्णालाच पद्मावती देऊन विवाह करून देईन. ॥९५॥

याप्रमाणे आपल्या मुलीस आश्वासन देऊन आपल्या गुरूना बोलवावे या इच्छेने त्यांना घेऊन येण्याकरिता स्वर्गाकडे आपल्या पुत्रास पाठविले. ॥९६॥

आपल्या मुलाबरोबर आपल्या मुलीची विवाह सुचविणारी पत्रिका लिहून राजाने दिली. ॥९७॥

तो राजपुत्र-वसुधान चंद्रांश असल्यामुळे अतिशय त्वरेने स्वर्गलोकांत बृहस्पति आचार्यांकडे गेला. आणि सदैव आनंदी असलेल्या इंद्रगुरु बृहस्पति आचार्यांना नमस्कार करून आपल्याजवळचे पत्र पुरुषश्रेष्ठ अशा राजपुत्राने बृहस्पति आचार्यांसमोर ठेवले. ॥९८॥

राजपुत्र पत्रिका घेऊन आलेला पाहून बृहस्पति आचार्यांनी आनंदित मनाने दोन्ही हातात पत्रिका घेऊन, हे जनका ती विवाहविषयक शुभपत्रिका वाचली. तेव्हा ती पत्रिका वाचल्याबरोबर बृहस्पति आचार्य, आकाशराजाकडे नारायणपुरास आले. ॥९९-१००॥

आपण निमंत्रण दिल्याबरोबर आपले पुरोहित आलेले पाहून राजाने यथाशास्त्र त्यांचा अर्ध्यपाद्यादिकानी सत्कार केला. त्यांना नमस्कार करून कुशल विचारल्यानंतर राजा म्हणाला- मी तुमच्या संमतीने मी माझ्या मुलीचा- पद्मावतीचा विवाह करणार आहे. हे गुरो, श्रीनिवासाशी संबंध आम्ही जुळविला आहे हे तुम्हास माहीत आहेच. श्रीनिवासाकडून कन्येस मागणी घालण्याकरिता बकुलादेवी आलेली असून गोत्र व नाव हे आम्ही जाणून घेतले आहे. तरीहि आमच्या या कार्यास तुमची संमति असेल तर मला हा विवाह पार पाडण्याविषयी अतिशय उत्साह वाटेल-याप्रमाणे राजाचे भाषण ऐकून बृहस्पति आचार्यांनी उत्तर दिले. ॥१-२-३॥

बृहस्पति आचार्य म्हणतात- हे राजन् भूलोकांत फळांनी युक्त असलेल्या वृक्षाचा आश्रय करून पुष्कळ जण जगतात. त्याप्रमाणे आम्हीहि तुझ्या भाग्यावर अवलंबून राहून आमचे जीवित जगतो. ॥४॥

मी केव्हा तरी भूतलावर येतो त्यामुळे श्रीनिवासाविषयी मी काही जाणत नाही. पण या भूतलावर शुक्राचार्य सदैव असतात. ॥५॥

ते मात्र श्रीनिवासाची परिस्थिती जाणतात. येथून पाच कोसावर शुक्राच्यांचे वास्तव्य असून व्यासतनय शुक्राचार्य श्रीनिवासाचे भक्त आहेत ॥६॥

म्हणून तू शक्य तो लवकर हे राजा त्यांना बोलाव. ॥७॥

तो शुक्राचार्य तुला श्रीनिवासाची आनंददायक माहिती सुरुवातीपासून कथन करील. ॥८॥

याप्रमाणे बृहस्पति आचार्यांनी म्हटले असता शत्रूचे दमन करणार्‍या आकाशराजाने ब्राह्मण ज्याला प्रिय आहेत अशा आपल्या तोंडमान नामक आपल्या बंधूस शुक्राचार्यांना आणण्याकरिता त्यांच्या आश्रमास पाठविले. ॥९॥

लगेच सूर्याच्या रथाप्रमाणे तेजस्वी व वायूप्रमाणे वेग असलेल्या त्या रथात बसून शुक्राचार्यांच्या आश्रमाकडे जाऊन ध्यानयोगातून जागृत झालेल्या शुक्राचार्यांचे दर्शन घेत म्हणाला. ॥११०॥

तोंडमान म्हणाला- हे तापसश्रेष्ठा, राजाचा निरोप आपण ऐकावा. रूपसंपन्न पद्मावती विवाहास योग्य झाली आहे म्हणून आकाशराजा पद्मावतीस, गुरुजनाना मान्य असणार्‍या श्रीनिवासास देण्याची इच्छा करीत आहे. या कार्याच्या युक्तायुक्त विचारासाठी राजाने बृहस्पति आचार्यांना बोलाविले ॥११-१२॥

त्याचा युक्तायुक्तविचारासाठी व हा संबंध योग्य की अयोग्य याचा विचार करुन श्रीनिवासास शूभसुचक पत्रिका लिहिण्यासाथी आकाशराजाने तुम्हास बोलाविले आहे. ॥१३॥

तरी वेळ न करता आपण आपल्या नगरास जाऊ या. त्याप्रमाणे तोंडमानाने आकाशराजाचा निरोप सांगितल्याबरोबर शुक्राचार्यांना अतिशय आनंद होऊन गडबडीने ते आपल्या जागेवरून उठले. एखाद्या वेड्याप्रमाणे आपला कमंडलू फोडला. आपल्या अंगावरचे कृष्णार्जिन फाडले. ॥१४-१५॥

आदल्या गळ्यातली मणिमाला तोडली. तो महामुनी नृत्य करू लागला. अशातर्‍हेने आनंदाने बेहोष झाले. थोड्या वेळाने अतिशय आनंदाने येणारी बेहोशी नाहीशी झाल्यावर शुक्राचार्य तोंडमानास म्हणाले. ॥१६॥

शुक्राचार्य म्हणतात. हे उदारविक्रमा, वेंकटाचलनिवासी श्रीनिवासांना तुम्ही करणार असलेले कन्यादान हे पुरुषार्थाचे साधन व सर्व लोकांना पवित्र करणारे असे आहे. म्हणून तू हे मला चांगले सांगितलेस. ॥१७॥

श्रीनिवासाच्या कृपाबलाने महादान करणारी आकाशराजाची बुद्धि दिवसेंदिवस वाढत जावो. ॥१८॥

याप्रमाणे आशीर्वाद रूपाने प्रशंसा केली. लगेच शुक्राचार्यांनी पद्मसरोवरात स्नान करून आपली माध्यान्हकालीन संध्या संपवली. आपल्या जुन्या अलंकारादिकांचा त्याग केला. ॥१९॥

नंतर शुक्राचार्यांनी नवीन दर्भ तोडून आणून त्यांचा आपल्या डोक्यावरील एक किरीट करून धारण केला. ॥२०॥

तसेच दर्भाच्या शेंड्यांनी व फुलांनी गुंफलेले कवच करून आपल्या देहावर धारण केले. कंठामध्ये तुलसीची माळ व तुलसीकाष्ठाची कर्णभूषणे धारण केली. ॥२१॥

पायापर्यंत लांब अशा हरिणाजिनाच्या कफनीने अलंकृत झालेले शुक्राचार्य, ज्ञानरूपी घोड्यावर बसून राजाच्या नगरीकडे निघाले. ॥२२॥

शुक्राचार्य आपल्या नगरीकडे येत आहेत हे पाहून चतुरंग सैन्यासह पुरोहितांना पुढे करून कुशासन अर्ध्यपाद्य फलासह आकाशराजा, शुक्राचार्यांना सामोरा आला. शुक्राचार्यांना आलेले पाहून राजा व त्या नगरीतील प्रजाजन आनंदित झाले. राजाने लगेच आपल्या वाहनांतून उतरून त्या शुक्राचार्यांना साष्टांग नमस्कार केला व शुक्राचार्यांना हत्तीवर बसवून पुरोहितासह आपल्या राजवाड्यात आणले. ॥२३-२४॥

राजवाड्यातील अंतःपुरात आल्यावर रत्नमय पीठावर बसून शुक्राचार्यांना बसवून पुजेचे विधी चांगल्या तर्‍हेने जाणणार्‍या राजाने आपले विद्यागुरु व ज्ञानगुरु शुक्राचार्य यांना नमस्कार करून पूजन केले. ॥२५॥

व बृहस्पति आचार्यांच्या समक्षच राजाने शुक्राचार्यांना आपल्या मुलीच्या लग्नाविषयी विचारले. राजा म्हणाला, ऋषिवर्या, लक्ष्मीचे निवासस्थान अशा कृष्णाला तुमच्या संमतिने माझी कन्या पद्मावती द्यावी असे मी निश्चितपणे ठरविले आहे. ॥२६॥

याप्रमाणे आकाशराजाचे भाषण ऐकून राजश्रेष्ठ अशा आकाशराजाला कृपायुक्त अशा शुक्राचार्याने राजकन्या पद्मावतीविषयी म्हटले. ॥२७॥

शुक्राचार्य म्हणतात. हे महाराजा, श्रीनिवासाला आपल्या कन्येचे दान करण्याविषयी किंचितही संशय आपल्या मनात ठेवू नकोस. हे राजा, तू धन्य झाला आहेस. तुझे कुल पवित्र झाले आहे. ॥२८॥

तुझे पितृगण स्वर्गास प्राप्त झाले आहेत. यात काही संशय नाही. हे राजा, पूर्वजन्मात तू कोणते पुण्यकर्म केले होतेस की, ॥२९॥

सज्जनांचा आधार, कमलनेत्र भगवान श्रीनिवास तुला जावई मिळाला आहे म्हणूनच तुझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. ॥१३०॥

आता तू उशीर लावून नकोस. तू हे शुभकार्य लवकर कर. हे राजा, तुझ्या संगतीने आम्ही धन्य व कृतार्थ झालो आहोत. ॥३१॥

कंद, मूल, फळे खात सर्वसंग सोडून तपश्चर्येने परमात्म्याची आराधना करूनहि आम्ही ज्या परमात्म्याला पाहात नाही. ॥३२॥

त्या लक्ष्मीसहित परमात्म्याला तुझ्या संगतीने आम्ही पाहतो म्हणून जन्मजन्मांत आम्हास तुझी कल्याणप्रद संगति घडो. ॥३३॥

याप्रमाणे आकाशराजाशी बोलून शुक्राचार्य गप्प बसले. शुक्राचार्याचे बोलणे ऐकून राजा आनंदभरित झाला. ॥३४॥

शुक्राचार्याचे भाषण ऐकून राजाने त्यांची प्रशंसा केली. तो स्वतःला कृतार्थ समजून हे व्यासपुत्रा, तुला नमस्कार असो असे म्हणाला. ॥३५॥

आता हे बृहस्पते, आपण श्रीनिवास व पद्मावती या उभयतांच्या ग्रहांची गति, योग, यांचा विचार करा. बृहस्पते, हे ब्रह्मन् नक्षत्रयोग, गोत्रयोग व ग्रहांचे बलाबल हेही आपण पहा. ॥३६॥

याप्रमाणे राजाचे भाषण ऐकून देवांचे गुरु व ज्योतिःशास्त्रात निष्णात असे बृहस्पति आचार्य बकुलेस म्हणाले. ॥३७॥

बृहस्पति आचार्य म्हणाले- हे भामिनी, वेंकटेशाचे गोत्र व त्यांचे जन्मनाव सांग. तसेच हे वरारोहे, त्याचे नक्षत्रहि सांग. असे बृहस्पति आचार्य म्हणाले. त्यावेळी बृहस्पतीने केलेला प्रश्न ऐकून किंचित् रागाने बकुला म्हणाली. ॥३८॥

सत्याने संपन्न असणारे ब्राह्मण कलियुगात खोटे बोलणारे आहेत. कारण श्रीनिवासाचे कुलगोत्रनक्षत्रादिक जाणत असूनहि हे आकाशराजा हे ब्राह्मण आपले हिताहित कोणते ते सांगत नाहीत. ॥३९॥

त्यावेळी शुक्राचार्य म्हणाले हे वरानने, क्षत्रियांच्या मनात ब्राह्मणाविषयी अविश्वास. आम्ही आपण होऊन नामगोत्रादिक सांगितले तर उत्पन्न होतो. धर्महि अधर्म होतो. ॥१४०॥

हे महाभागे, याकरिता तू हिताहित जाणणारी अशी असल्यामुळे श्रीनिवासाचे गोत्रनक्षत्रादिक सांग. तेव्हा बकुला म्हणाली - वेंकटेशाचे नक्षत्र श्रवण असून गोत्र वसिष्ठ आहे. ॥४१॥

व त्यास पुरातन लोक मत्स्यकूर्मवराह असे म्हणतात. ॥४२॥

याप्रमाणे बकुलेले श्रीनिवासाचे नक्षत्रगोत्रादिक सांगितल्यावर राजा म्हणाला - हे बृहस्पति आचार्य, आमचे गोत्र अत्रि असून मुलीचे नक्षत्र मृगशीर्ष असे आहे व पद्मावतीस सीता, सत्या असे ज्ञानी म्हणतात. याप्रमाए आकाशराजा व बकुलादेवी या उभयतांनी 'वेंकटेश व पद्मावती' या दोघांचे सांगितलेले नाव नक्षत्रादि ऐकून बुद्धिमान अशा बृहस्पति आचार्यांनी योग वगैरे जाणून आनंदित मनाने ते सांगितले. ॥४३॥

बृहस्पति आचार्य म्हणतात- हे राजा, नाडीकूट, सूत्रकूट हे सर्व उत्तम तर्‍हेने अनुकूल असून सर्व ग्रहाहि शुभकारक आहेत. ॥४४॥

याकरिता हे सर्व विचारात घेउन शुक्राचार्यांचा अभिप्राय व आप्तेष्टांबरोबर विचारविनिमय करून कन्यादान लवकर कर. ॥४५॥

याप्रमाणे बृहस्पति आचार्याचे बोलणे ऐकून विचक्षण अशा राजाने चटकन निर्णय घेतला. व परमभक्तीने युक्त होऊन आपले ज्ञातिबांधव इष्टमित्र आप्त इत्यादिकासह त्याठिकाणी बसून कन्यादानविषयक विचारविनिमय केला. ॥४६-४७॥

तेव्हा राजाचा निश्चय पाहून त्याच्या सर्व आप्तेष्टांनी त्याचे आनंदाने अभिनंदन केले. नंतर सभा भरवून रत्नसिंहासनावर तो बसला. ॥४८॥

नंतर त्या सभेमध्ये हात वर करून राजा म्हणाला- शांर्ग धनुष्य धारण करणार्‍या श्रीनिवासाला मी माझी कन्या पद्मावती हिला देत आहे. ॥४९॥

तर तुम्ही बंधुगणांनी (या विवाहात साहाय्य करण्यासाठी येऊन) माझ्यावर दया करावी. ॥५०॥

याप्रमाणे राजाने श्रीवेंकटेशास पद्मावती द्यावयाची अशाविषयी प्रतिज्ञा केली. नंतर गुरुजनांना प्रिय असणारा आकाशराजा बृहस्पति आचार्यांना म्हणाला. ॥५१॥

राजा म्हणतो हे ब्राह्मणश्रेष्ठा, यानंतर मी काय करावे? ते आपण मला सांगा. असे राजाने विचारले असता देवांचे गुरु बृहस्पति आचार्य राजास म्हणाले. ॥५२॥

बृहस्पति आचार्य म्हणतात- लक्ष्मीनिवास असलेल्या श्रीविष्णुला त्यानी विवाहासाठी यावे यासाठी सर्व हकीकतीची एक पत्रिका लिहून त्या पत्रिकेसह एका ब्राह्मणाला श्रीनिवासाकडे पाठव. ॥५३॥

याप्रमाणे गुरुचे वाक्य ऐकून राजा म्हणाला- हे विद्वन्, अप्राकृत शरीर असलेल्या श्रीनिवासाला आमच्या सारख्या प्राकृत शरीर असणार्‍यांनी काय लिहावे? तथापि हे गुरूश्रेष्ठा, कसे त्यांना लिहावयाचे आहे ते आपण मला सांगा. ॥५४॥

आकाशराजाचे बोलणे ऐकून आदरपूर्वक बृहस्पति आचार्यांनी श्रीनिवासास लिहावयाच्या पत्राचा मजकूर त्या महात्म्या आकाशराजास सांगितला. ॥५५॥

बृहस्पति आचार्यांनी सांगितल्याप्रमाणे आकाशराजाने पत्रिका लिहीली. अप्राकृत नित्य, सच्चिदानंदस्वरूपी, स्वतंत्र, अद्वितीय, अनंतरूपी, शार्ङ्ग धनुष्य धारण करणारा, भक्तप्रिय, भक्तीनेच ज्याचे स्वरूप कळते असा, योग्य असे रूप असणारा, देवाधिकांना पूज्य असा, सर्व व्यापक, लक्ष्मीस निवासभूत, वेंकटचलनिवासी असा कृष्ण त्याला; सांग व पुराण यांचे सह वेदादि आगमानीहि ज्याचे पूर्ण गुण साकल्याने कळत नाही असा जो श्रीधर त्यांस ॥५६-५७-५८-५९॥

तुझ्या चरणाविंदाच्या दर्शनाची अपेक्षा करणारा आकाशराजा, तू माझा आप्त (जावई) असल्याने अनेक आशीर्वाद, ॥१६०॥

हे माधवा, तुझ्या आश्रयाची अपेक्षा करून मी हे पत्र लिहीत आहे. पत्नी, पुत्र, बंधुजन यांसह आम्ही सर्वजण खुशाल आहोत. ॥६१॥

हे हरे, आपल्या अनुग्रहानेच या नारायणपुरात आम्ही राहात आहोत. आपणा सर्वांचे क्षेम आपण पत्राद्वारे आम्हास कळवावे. ॥६२॥

हे पत्र चैत्रशुद्ध त्रयोदशीस लिहीत आहे. माझी कन्या पद्मावती हिला तुम्हांस द्यावी अशी माझी बुद्धि आहे. ॥६३॥

हे गोविंदा, तरी या ठिकाणी येऊन विवाहविधिपूर्वक माझ्या कन्येचा स्वीकार करा. माझ्या मनातील सर्व विचार शुक्राचार्य, बृहस्पत्याचार्य हे जाणतात. ॥६४॥

हे पुरुषोत्तमा, कन्येचा स्वीकार कसा करू? असा संशय मनात आणू नका. तरी वैशाख शुद्ध दशमी शुक्रवार या मंगल दिवशी बंधुगणासह आपण येथे येऊन आनंदाने माझ्या कन्येचे पाणिग्रहण करावे व माझा उद्धार करावा. असा माझा अभिप्राय आहे. ॥६५-६६॥

हे पुरुषोत्तमा, मी तुम्हांस आणखीन जास्त काय लिहू? शुक्राचार्य जे सांगतील ते सर्व सत्य आहे असे समजून त्याप्रमाणे तुम्ही करा. ॥६७॥

हे महानुभाव, सर्व कल्याणकारण गुणांच्या सागरा, नित्य, सत्य, उत्तम सुखस्वरूपी अशा, सर्व ब्रह्माण्डास उत्पन्न करणार्‍या माहात्म्यास अनेक आशीर्वाद. ॥६८॥

पुत्रमित्र बांधव अनुयायी यांचे समक्ष आकाशराजाने ही मंगल पत्रिका लिहिली व ती पत्रिका घेऊन श्रीनिवासाकडे महान अशा शुक्राचार्यांना पाठविले. ॥६९॥

शुक्राचार्यांना एक कोसभर पोहोचवीत राजा शुक्राचार्यांना म्हणाला, कोणत्याहि प्रकाराने श्रीनिवासाचे मन वळवावे. ॥१७०॥

दहा हजार, लक्ष, कोट, दहा कोट मुद्रा (रुपये) इतकी वरदक्षिणा मी श्रीनिवासास देईन यात कोणताहि फेरबदल नाही. याप्रमाणे सांगितल्यावर शुक्राचार्य शेषाचलास निघाले. याप्रमाणे सांगितल्यावर शुक्राचार्य शेषाचलास निघाले. ॥७१॥

आणि त्याचवेळी बकुलाहि नारायणपुराहून शेषाचलाकडे निघाली. तिच्या पाठोपाठ निघालेले, वैराग्यसंपन्न व श्रीनिवासाचे दर्शनाने प्राप्त होणार्‍या आनंदात मार्ग आक्रमित शिष्यासह शुक्राचार्य सूर्य मध्यान्ही आला असता वेंकटाचलावर आले. ॥७२॥

आपली माता बकुला अजूनपर्यंत आली नाही हे पाहून आपली माता अजूनपर्यंत का आली नसावी या चिंतेत श्रीनिवास मग्न झाले असतानाच शुक्राचार्यांना येत असलेले पाहिले. ॥७३-७४॥

अंगीकृतकार्यात निश्चय झालेल्या, विशेष भक्तीने मस्तकापर्यंत हात जोडून नमस्कार करीत आलेल्या शुक्राचार्यांना पाहून आपल्या आसनावरून उठत श्रीनिवास म्हणाला. ... हे ब्राह्मणश्रेष्ठा, माझे कार्य पक्व आहे की अपक्व ते मला सांगा. ॥७५-७६॥

यात संशय नाही. अशा तर्‍हेचे शुभवाक्य ऐकून श्रीनिवासाने शुक्राचार्यांना दंडवत प्रणाम केला. ॥७७॥

नंतर श्रीनिवासाने शुक्राचार्यांना आलिंगन दिले. भक्तीने आनंदीत झालेला, नाना तर्‍हेचे चित्रविचित्र चरित्र असणारा श्रीनिवास शुक्राचार्यांना म्हणाला. ॥७८॥

मानवयोनीत जन्मलेल्या लोकांनी योग्य विवाह जुळविण्यासाठी हजारवेळा असत्य भाषण केले तरी विवाह हुळविणारे मानव माझ्या लोकांस प्राप्त होतात. तर जगत्कुटुंबी अशा माझा विवाह जमविताना असत्य भाषण केल्यास त्यांना माझा लोक प्राप्त होईल यात काय आश्चर्य? ॥७९॥

एक मानव आपली पत्नी, आपला मुलगा, आपले आप्तेष्ट, आपले घर एवढ्यांचे पालन करतो. मी मात्र ब्रह्माण्ड हे माझे भवन असून ब्रह्मदेव हा माझ्या नाभीपासून जन्मलेला माझा पुत्र आहे. जी लक्ष्मी माझी गृहिणी असून जे काही दुसरे औरस पुत्र असे चौर्‍याऐंशी लक्ष जीवगण असंख्यात आहेत.

॥१८०-८१॥

हे द्विजश्रेष्ठा, या सर्वांचे रक्षणाविषयींची दीक्षा मी घेतली आहे. ॥८२॥

अशा महाकुटुंबानी युक्त असणार्‍या माझ्या लग्न जमविण्याच्या कार्यात हे मुनिश्रेष्ठा, तू खोटे भाषण जे केलेस ते फार मोठे उपकार माझ्यावर झाले आहेत. ॥८३॥

आणि त्या उपकाराची फेड होईल अशी एकहि वस्तू तुला देण्यासारखी माझ्याजवळ नाही. तरीहि हे मुने मी तुला माझ्या शरीराचे आलिंगन देतो. ॥८४॥

माझ्या शरीरालिंगनापेक्षा काही श्रेष्ठ असल्याचे हे मुने मी जाणत नाही. याप्रमाणे सांगून श्रीनिवासाने शुक्राचार्यांना आलिंगन दिले. ॥८५॥

तुझ्या पुण्याला मर्यादाच नाही. मी दिलेले शरीरालिंगन हे तुझ्या पुण्याचे फल आहे. आता ज्याप्रमाणे मला उपयोगी पडणारे कर्म तू दिलेस त्याप्रकारचे सीतेस परत आणण्याचे कामी कपीमध्ये श्रेष्ठ व वायुचा पुत्र हनुमान याने केले होते. हे ब्रह्मन् मी त्याला संतुष्ट होऊन सहभोजन दिले व सीतेसंबंधी वार्ता आणणार्‍यास हनुमंतास सत्यलोकाचे आधिपत्य मी दिले. हे तापसश्रेष्ठा, तुला मी माझे शरीरालिंगन दिले यावरून तू केलेले कर्म वरिष्ठ होते. ॥८६-८८॥

याप्रमाणे शुभकारक अशी नाना तर्‍हेची बोलणी उभयतात होत असताना श्रीनिवास म्हणाला- तुमच्या काखेमध्ये सूर्यासारखे काय चकाकत आहे? ॥८९॥

हा प्रश्न ऐकून शुक्राचार्य म्हणतात- हे पुरुषोत्तमा, राजामध्ये श्रेष्ठ अशा आकाशराजाने तुला पत्रिका लिहिली आहे. ॥१९०॥

यातील मजकुर तर अगोदरच सांगितला आहे. याप्रमाणे शुक्राचार्यांनी म्हटल्यावर श्रीनिवासाने ती पत्रिका घेऊन आपल्या कपाळी लावली. ॥९१॥

श्रीनिवास म्हणाला- आकाशराजा, त्याची पत्नी त्यांचा महाभाग्यवान बंधु व पुत्र हे खुशाल आहेत ना? ॥९२॥

तेव्हा शुक्राचार्य म्हणतात- हे भूतभावना, त्या राजाचे सर्व प्रकाराने कुशल आहे. ॥९३॥

यानंतर श्रीनिवासाने पत्रिका वाचली. वाचत असताना श्रीनिवास आनंदित होऊन म्हणाला- ॥९४॥

हे ब्रह्मन्, मी आकाशराजास तुमच्या सांगण्याप्रमाणे आनंद वाटेल असे पत्रिकेचे उत्तर लिहिणार आहे. ॥९५॥

त्यानंतर अतिशय आनंदित मनाने ज्याप्रमाणे कृष्णावतारात रुक्मिणीला श्रीकृष्णाने पत्र लिहिले होते त्याप्रमाणेच गंभीर अर्थाचे व अतिशय आनंद देणारे पत्र लिहिले. ॥९६॥

राजे व अधिराजे यांना पूज्य असे, सुधर्मराजाचे चिरंजीव आकाशराजा यांस अतिशय भक्तीने नमस्कार करून मी ही शुभकर अर्थाने युक्त अशी पत्रिका लिहितो. राजाधिराजांच्या मस्तकावरील किरीटांनी ज्याच्या पायास स्पर्श केला आहे, आमचे बांधव होण्यास योग्य, बांधवांनी परिपूर्णत्वाने समृद्धिमान् अशा युक्त गुणपूर्णत्वाने अशा सुधर्माचे पुत्र अशा सर्वत्र कीर्तिमान अशा आकाशराजा, तुम्हास र्शांग धनुष्य धारण करणार्‍या श्रीनिवासाचा नमस्कार. बालक असा श्रीनिवास विज्ञापना करतो. ॥९७-९८-९९-२००॥

आपले पत्र आलेले पाहून मला अतिशय संतोष झाला. आपण पत्रात लिहिल्याप्रमाणे वैशाख शुद्ध दशमी शुक्रवार रोजी विवाहमहोत्सवात हे राजेन्द्रा, तुमची कन्या पद्मावती हिचा स्वीकार मी करतो. पूर्वी समुद्र आपली कन्या मला देऊन कीर्तीस पावला त्याप्रमाणे तूहि आपली कन्या मला देऊन बहुत कीर्ति पावशील. ज्याप्रमाणे कपिलाने शाप देऊन भस्मसात केलेल्या सागर राजपुत्राचा भगीरथ राजाने गंगा नदी स्वर्गातून आणून उद्धार केल्याने भगीरथराजा कीर्तिमान झाला त्याप्रमाणे हे राजश्रेष्ठा, तुझी सुस्वरूप कन्या मला देऊन तुझे पूर्वीचे पितृगण व पुढील वंशज यांचा उद्धार कर व त्यामुळे इतरांना दुर्लभ पुष्कळ कीर्ति तुला प्राप्त होईल. ॥१-२-३-४-५-६॥

हे नृपश्रेष्ठा, मी आपणास विशेष असे काय लिहू? धर्मात्मा अशा आपणांस सर्व काही ज्ञात आहेच व तसेच शुक्राचार्य सर्व जाणतातच. ॥७॥

याप्रमाणे नम्रतापूर्वक माझी विज्ञापना जाणावी. ॥८॥

याप्रमाणे शुभ अशी पत्रिका लिहून वेंकटेशाने शुकमुनींना, इंद्रास पूज्य अशा नृपश्रेष्ठ आकाशराजाच्या नगरीस पाठविले. ॥९॥

त्यावेळी श्रीनिवास म्हणाला, हे शुक्राचार्य, कुल, गोत्र, राहाण्याचे स्थान वगैरे काहीही माहीत नसताना, हे ब्रह्मन, आकाशराजा आपली कन्या मला कशी देतो? तेव्हा शुक्राचार्य म्हणतात, हे श्रीनिवासा, तुला कुल, गोत्र, जन्ममृत्यु हे नाहीतच. ॥२१०॥

वृद्धावस्था, वाढ, स्थान, आश्रय हे तुला नाहीतच. हे गोविंद, हे सर्व विकार असल्यासारखे दाखवितोस ते सर्व विडंबनमात्र आहेत. ॥११॥

जगतपति अशा तुझ्या कुलगोत्राची अपेक्षा लोकात बिलकुल नाही. आकाशराजाने माझ्या म्हणण्याला मान देऊन तुला आपली कन्या दिली. ॥१२॥

हे जगन्नाथा, माझ्या म्हणण्यानुसार आकाशराजावर दया करून हे गोविंदा तुझ्याकडून आकाशराजाच्या या कन्येचा स्वीकार केला जावा. ॥१३॥

याप्रमाणे शुक्राचार्याने श्रीनिवासाचे स्तवन केले व श्रीनिवासाच्या अनुज्ञेने श्रीनिवासाच्या दर्शनाने आनंदित झालेले शुक्राचार्य नारायणपुरास परत गेले. ॥१४॥

शुक्राचार्य निघून गेल्यावर भक्तवत्सल श्रीनिवासाने प्रवासाने थकलेल्या वयस्क अशा मातेला पाहिले. ॥१५॥

बकुलेला नमस्कार करून श्रीनिवास म्हणाला- हे कमलानने, तुला इकडे परत येण्यास वेळ लागला? नारायणपुरात काय वर्तमान घडले ते मला सांग.

॥१६-१७॥

तेव्हा बकुळा म्हणाली- हे पुरुषोत्तमा मी पुष्कळ प्रयत्नाने मी कन्या मिळविली. पण याबाबत प्रयत्नापेक्षा दैवच प्रबल कारण होय असे मी मानते. ॥१८॥

हे कृष्णा, बदरिकाश्रमापासून एक सुमंगल अशी धर्मदेवी दैवयोगाने राजवाड्यात आली होती. ॥१९॥

हे रमापते, त्या धर्मदेवीने "ती कन्या तुलाच देणे योग्य आहे" असे सांगितले व ती कन्याहि पण तुझ्यावाचून इतरांशी लग्न करून घेण्याची इच्छा करीत नाही. ॥२०॥

याप्रमाणे धर्मदेवीचे व कन्येचे म्हणणे ऐकून तुला कन्या देण्याचे राजाने मान्य केले. व "या माझ्या कन्येला, वेंकटाचलनिवासी श्रीनिवासाला देतो" ॥२१॥

अशा तर्‍हेचा संकल्प राजाने आनंदाने सभेमध्ये केला. हे सर्व तुझ्यामुळेच झाले आहे कारण तुझ्यापेक्षा दैव काही श्रेष्ठ नाही. ॥२२॥

याप्रमाणे आपल्या मातेचे भाषण ऐकून किंचित हसत श्रीनिवासाने बकुलेचे अभिनंदन केले. नंतर विचार करीत श्रीनिवास म्हणाला. ॥२२३॥

याप्रमाणे भविष्योत्तरपुराणातील वेंकटेशमाहात्म्याचा नववा अध्याय समाप्त

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel