त्यांच्या या आर्थिक आणि राजकीय मीमांसेशीं सर्वांनांच एकमत होणे शक्य नसणार. विशेष अनुभवानें स्वतःचे विचार बदलण्याची तयारी धर्मानंदजींमध्यें नेहमींच दिसून येई. पण येथील सर्व विवेचनांत साधुचरित धर्मानंद कोसंबीची जनहिताची तळमळ, निस्पृहता, सांप्रदायिक अभिनिवेशाचा अभाव आणि परम कोटीची सत्यनिष्ठा हे गुण प्रामुख्यानें दिसून येतात.
कोणताही धर्म घ्या, त्याला ऐहिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठीं त्याच्या अनुयायांनी त्याचे धिंडवडे काढलेच आहेत. या बाबतीत सनातनी, बौद्ध, जैन, मुसलमान, ख्रिस्ती; कोणतेच धर्म अपवादात्मक नाहींत. समाजवाद, साम्यवाद आणि गांधीवाद याही पंथांच्या अनुयायांत हे दोष शिरले नाहींत किंवा शिरणार नाहींत असें म्हणतां यावयाचें नाहीं. धर्मानंद कोसंबीनीं स्वतः बौद्ध आहोंत म्हणून त्या पंथाला कोठेही संभाळून घेतलें नाहीं.
महावीरांनी पार्श्वनाथांच्या चातुर्याम धर्माचा विस्तार केला. पार्श्वनाथाचा संप्रदाय आज कोठेंही स्वतंत्रपणें दिसत नसल्यामुळें त्याच्या चातुर्याम धर्माची सांप्रदायिक विकृति उपलब्ध नाहीं, म्हणूनच कदाचित् धर्मानंदजींना पार्श्वनाथांच्या चातुर्याम धर्माचें विशेष आकर्षण वाटलें असेल.
पार्श्वनाथांचा चातुर्याम धर्मच महावीराच्या पंचमहाव्रतांत परिणत झाला आहे. तोच धर्म बुद्धाच्या अष्टांगिक मार्गांत आणि पातंजल योगाच्या यमनियमांमध्यें प्रगट झाला आहे. गांधींच्या आश्रमधर्मांत देखील चातुर्याम धर्मच प्रधानपणें दृगगोचर होत आहे. स्वराज्य मिळेतोंपर्यंत सबंध राष्ट्राला सत्य आणि अहिंसेची दीक्षा द्यावी आणि स्वराज्य मिळाल्यानंतर अस्तेय आणि अपरिग्रहमूलक समाजव्यवस्था स्थापन करावी आणि अशा रीतीनें ऐहिक आणि पारमार्थिक मोक्ष प्राप्त करून देणारा सर्वोदय साधावा अशी गांधींची कार्यपद्धति दिसते.
वेदान्ताच्या मुळाशी देखील चातुर्याम धर्म आहेच. तसें पाहिलें तर चातुर्याम धर्म म्हणजे मनुष्यानें स्वतःच्या असामाजिक वृत्ति दूर करून विश्वकुटुंब स्थापन करण्याची पूर्व तयारी करणारा समाजधर्म होय. समाजवाद घ्या किंवा साम्यवाद घ्या, लोकशाही घ्या किंवा अराजकवाद घ्या; सत्य, अहिंसा, अस्तेय आणि अपरिग्रह या चार सामाजिक सद्गुणांवाचून कोणतीही समाजरचना स्थिरपणें सिद्ध होऊं शकणार नाहीं. या चार यामांबरोबर निदान संयमाच्या रूपांत ब्रम्हचर्य हा पांचवा याम वाढविलाच पाहिजे आणि या सर्वांच्या मुळाशीं आत्मौप्यम वृत्ति बाळगून त्या वृत्तीचा विश्वात्मैक्यापर्यंत विकास केलाच पाहिजे; ही गोष्ट पटावयास वेळ लागणार नाहीं.
जुने धर्म जर भविष्यकाळांत टिकवावयाचे असतील तर त्यांच्या भोंवती जमलेली संकुचिततेची अधार्मिक जाळी दूर केलीच पाहिजे, आणि मग सध्यां मनुष्यजातीपुढील महान आणि बिकट प्रश्न सोडविण्याची शक्ति या धर्मांच्या सिद्धान्तांमध्यें आहे असे सिद्ध करून दिले पाहिजे. जैनांनी आपला अहिंसा धर्म कुत्र्या मांजराचे जीव वाचविण्यांत आणि बटाटे वांगी न खाण्यांत संपूर्ण होतो असें न मानतां विश्वव्यापी आर्थिक पिळणूक, असमानता, अन्याय आणि अत्याचार यांचा प्रतिकार करण्यांत अहिंसा कशी वापरावयाची आणि ती कशी यशस्वी करून दाखवावयाची या कसोटीवर त्यांनीं आपला अहिंसा धर्म कसून दाखविला पाहिजे. महात्मा गांधीनीं हें करून दाखविलें म्हणूनच अहिंसा धर्म जगांत सजीव आणि प्रतिष्ठित झाला. धर्मज्ञ लोकांनीं धर्माची चर्चा व्याकरण आणि तर्कांच्या शास्त्रार्थांतून बाहेर काढून आणि क्षुद्र रूढीच्या बचावाचे प्रयत्न सोडून देऊन व्यक्ति आणि समाज यांच्या समग्र जीवनाच्या भूमिकेवर करून दाखविली पाहिजे. धर्मानंद कोसंबीनीं या दिशेनें केलेला हा पहिलाच आणि म्हणून विशेषपणें अभिनंदनीय प्रयत्न आहे.