ठाण्यातल्या ओवळा परिसरात एक आखीव बंगला होता. त्याच्या पुढे मस्त मशागत करून फुलवलेली बाग होती. हा बंगला आज ही या सिमेंटच्या गर्दीत उठून दिसत होता. या बंगल्याचे नाव होते ‘समृद्धी’. या बंगल्याचे मालक कमिश्नर राजेंद्र दाते हे ठाण्यातले एक प्रतिष्ठीत व्यक्तीमत्व होते. त्यांना दोन मुलं होती. रवी आणि चंद्रकांत. चंद्रकांत दाते त्यांच्या वेळचे व्ही.जे.टी.आय. कॉलेजचे मकॅनिकलचे गोल्ड मेडलिस्ट होते. त्यांनी पुढचे शिक्षण अमेरिकेत बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पूर्ण केले आणि आपल्या बायका मुलांबरोबर ते तिथेच स्थायिक झाले. राजेंद्र यांचा दुसरा मुलगा रवीनी वडिलांच्या पावलावर पाउल ठेवून पोलिसात जायचे ठरवले होते. त्यांनी एम.पी.एस.सी.ची स्पर्धा परीक्षा दिली होती. ते आता ठाणे शहराचे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यभार सांभाळत होते.
रवीची बायको आशा हि ठाण्याच्या मॅजिस्ट्रेट कार्यालयात कामाला होती. कमिश्नर दाते यांची बायको देवाघरी गेल्यापासून ते आपलं मन बागेत रमवू लागले होते. त्यांनी बंगल्याच्या परसदारी केळी, अळू, कर्दळ, अशी झाडं लावली होती. तिथेच एका ठिकाणी कंपोस्टसाठी खड्डा केला होता. त्यातून त्यांना बंगल्याच्या पुढे लावलेल्या गुलाब, झेंडू, जाई-जुई, मधुमालती, कुंद, चाफा, पारिजात, इत्यादी फुल झाडांसाठी वापरायला खत मिळायचे. त्यांनी पुढे कुंपणाच्या भोवतीने नारळ आणि सुपारी लावली होती शिवाय आत थोडी लिंबू, डाळिंब, पेरू अशी फळ झाड पण लावली होती. त्या खतामुळे झाडं छान तरारली होती. त्यांनी ठाण्यासारख्या शहरात इतकं सुंदर आणि टूमदार घर व बाग तयार केली होती. या घरात ते आणि रवीचं कुटुंब आंनदाने नांदत होते.
रवीला आणि आशाला लग्नानंतर बरीच वर्ष आपत्य नव्हतं. रवी आणि आशाने बदलापूरच्या मुळगावच्या खंडोबाला नवस केला होता. लग्नाच्या बऱ्याच वर्षांनी त्यांना एक गोंडस बाळ झालं. इतक्या वर्षांनी घरात लहान बाळाचे वावरणे होत होते. राजेंद्रनी त्याला सांभाळण्याची जबाबदारी आपल्यावर घेतली. त्यांनी बाळांच नाव सागर ठेवलं होतं. ते सागरला आपल्याबरोबर घेऊन असायचे. त्यांच्यामुळे लहानपणीच सागरला झाडांच्या मशागतीची चांगलीच ओढ लागली होती. तो आपल्या आजोबांसोबत असायचा.