वर्षामागून वर्ष गेली. सगळं काही अलबेल चालू होतं परंतु, कदाचित नियतीला हे मान्य नव्हतं. सागर सुरुवातीची दोन वर्षे सामान्य मुलांसारखाच वागायचा. तो आता दहा वर्षाचा झाला होता. त्याचं वागणं मात्र चार वर्षाच्या लहान मुलाप्रमाणे होतं. रवी आणि आशाला हे आता जाणवू लागलं होतं की, यातून बाहेर पडण्याचा मार्ग नाही. इतक्या वर्षात त्यांच्या कामाच्या गडबडीत रवीला किंवा आशालाही हे कधी जाणवलं नाही. सागर सहा वर्षाचा असल्यापासून त्यांनी या गोष्टी गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली होती. त्यांची मागची चार वर्ष सगळ्या डॉक्टरांचे उंबरठे झिजवण्यात गेली होती. अगदी सरकारी दवखान्यापासून ते भारतातल्या चांगल्या न्युरोसर्जनचं मत त्यांनी विचारात घेतल होतं. अमेरिकेतल्या चंद्रकांतने त्याच्या जवळच्या डॉक्टरांना हि विचारलं होतं. पण त्यांना यावर उपाय सापडला नाही.
डॉक्टरांच्या मते सागर हा स्पेशल चाईल्ड होता. त्याच्या मेंदूची वाढ अतिशय कमी गतीने झाली होती. या सगळ्याचा मानसिक त्रास आशाला झाला होता. रवी आणि आशासारख्या हुशार माणसांच्या पदरी हे असं मुल पडेल याची तिने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. ती स्वतःच्या संगोपनावर शंका घेऊ लागली होती. आजार आधी लक्षात आला असतां तर त्यावर काहीतरी उपाय केले असते असे हि विचार तिच्या भाबड्या मनात येऊन गेले. सगळे प्रयत्न फोल गेले होते. आशा आणि रवीला त्यांच्या नोकऱ्यांमुळे सागरला वेळ देता येणार नव्हता.सागरला सांभाळायला एक मावशी आशाने कामाला ठेवल्या होत्या.
सागरला घरातच शिकवणी लावण्यात आली होती. सागरचे फार मित्र-मैत्रिणी नव्हते. त्याची एकच मैत्रीण होती. तिचं नाव प्रिया. प्रिया तीन वर्षाची असल्यापासून सागरबरोबर खेळायला यायची. प्रियाची आई मेघना आशाच्या ऑफिसमध्ये काम करायची. प्रियाचं कुटुंब आधी ठाण्यात मानपाड्याला राहत होतं. माधव आणि मेघना प्रियाबरोबर रवीच्या घराशेजारच्या सोसायटीमध्ये शिफ्ट झाले होते.