**प्रयोगशाळा**
हंसरेखा पुन्हा एकदा तेव्हा चकित झाली जेव्हा बाहेरून जेमतेम पाचशे चौरस वीत वाटणारी प्रयोगशाळा आतमध्ये बरीच मोठी होती. आतमध्ये खूप मोठा हॉल होता जो त्या उपग्रहापेक्षाही मोठा वाटत होता.
त्या हॉलच्या भिंतींवर जागोजागी हवेत नाचणारी होलोग्राफिक चित्र दिसत होती. त्या स्क्रीन्सवर वेगवेगळी सिनेमासदृश वेगवेगळे सीन दिसत होते. कुठे उगवणारे रोपटे, कुठे सुपरनोव्हाचा स्फोट आणि त्याचे कृष्णविवरात होणारे रुपांतर तर काही ठिकाणी अणूच्या केंद्रकात नाचणारे इलेक्ट्रोन, प्रोटोन आणि न्यूट्रोन अशी वेगवेगळी मनोरंजक दृश्य दिसत होती.
“हि तर कोणत्याही प्रकारे मला प्रयोगशाळा वाटत नाही. उलट हे एखादे सिनेमा थेटर किंवा मल्टीप्लेक्स वाटतय जिथे शेकडो सिनेमे एकाच वेळेस एकाच हॉल मध्ये दाखवले जात आहेत.” हंसरेखा.
“हे सिनेमे नाहीत तर वास्तविक घटना आहेत ज्या मल्टीव्हर्सच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात खरोखर घडत आहेत. या सर्वांचा माझ्या प्रकल्पाशी संबध आहे.” अजातरिपू
“पण तू मला या प्रकल्पाबद्दल आधी कधी सांगितले नाहीस.”
“ आता मी सांगतोय न. खरतर मी या प्रयोगशाळेत एक विश्व बनवतोय. एक वेगळंच जग! या जगाचा मी निर्माता असणार आहे. म्हणजेच इथला देव.”
अजातरिपूचे म्हणणे ऐकून हंसरेखा स्तिमित झाली आणि त्याच्याकडे विस्मयचकित होऊन पाहू लागली.
“ हे तू काय बोलतोयस? हे कसं काय शक्य आहे?”
“ मी तुला सगळं उलगडून सांगतो. आपल्या ग्रहावरील वैज्ञानिकांनी अनेक वर्षांपूर्वी या सगळ्याचा शोध लावलेला आहे कि आपण सर्व एका अशा जगात राहतो जे एका मल्टीव्हर्सचा एक भाग आहे. म्हणजे आपण ज्या एका युनीव्हर्समध्ये राहतो अगदी तशाच अगणित युनिव्हर्स आहेत. उकळत्या पाण्यात जसे बुडबुडे निर्माण होतात त्याप्रमाणे या मल्टीव्हर्समध्ये अगणित युनिव्हर्स बुडबुड्याप्रमाणे निर्माण होत असतात आणि जसे बुडबुडे नष्ट होत असतात तशाच या युनिव्हर्स प्रत्येक क्षणी नष्ट होत असतात.”
“अशा अनेक युनिव्हर्सचे निर्माण क्वांटम फ्ल्क्चुएशनद्वारा सुरु होते आणि सोबत निर्माण होतात भौतिक शास्त्राचे काही नियम जे पैदा होणाऱ्या युनिव्हर्स मधील भविष्यात कोणत्या घटना घडतील याचे निर्धारण करतात. बऱ्याचशा युनिव्हर्स निर्माण होताच लगेच नष्ट होतात तर काही युनिव्हर्स अरबो वर्ष अस्तित्त्वात राहतात. इतकेच नाही या युनिव्हर्स मध्ये तारे, ग्रह, उपग्रह आदी निर्माण होतात त्यावर जीवन निर्माण होते. जोपर्यंत युनिव्हर्स अस्तित्त्वात असतात तोपर्यंत त्यांचा विस्तार बुडबुड्याच्या वेगाने होत राहतो. आपली युनिव्हर्स सुद्धा अशीच वेगाने पसरत असते....”
“...पण तुझे प्रोजेक्ट....!” हंसरेखेने त्याला मध्येच टोकले.
“ तेच तर सांगतोय. मी या माझ्या प्रयोगशाळेत कृत्रिम क्वांटम फ्ल्क्चुएशन निर्माण करून त्याला नियंत्रणात ठेवण्यात मी यशस्वी झालो आहे. याच क्वांटम फ्ल्क्चुएशन मुळे नवीन युनिव्हर्स निर्माण होत असतात. थोडक्यात मी मला हवी तेव्हा, मला हव्या तशा युनीव्हर्स मी निर्माण करू शकतो. अशा युनिव्हर्स जेथील भौतिक शास्त्राचे नियम मी ठरवणार. थोडक्यात मी त्या युनिव्हर्स मध्ये निर्माता अर्थात देव असेन.”
“ अजातरिपू तू खूपच ग्रेट आहेस रे...” हंसरेखा पुढे सरसावली आणि त्याला बिलगली.
इतक्यात हंसरेखाचा फोन वाजला. तिने फोन पहिला. तिच्या वडिलांचा फोन होता.
“ हंसरेखा, कुठे आहेस? लगेच माझ्याकडे निघून ये. मला तुझ्याशी महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे.” एवढं बोलून तिच्या वडिलानी फोन ठेवला.
“ मला जावं लागेल. तुझ्या प्रकल्पाबद्दल मी नंतर समजून घेईन.” हंसरेखा.
“ बाय हंसरेखा. पण ह्या प्रोजेक्टबद्दल इतर कोणाला प्लीज बोलू नकोस.” अजातरिपू
“ माझ्यावर विश्वास ठेव मी कोणाला काहीच सांगणार नाही.”
क्रमश: