एक भिकारी व त्याचा कुत्रा एका सरदाराच्या बंगल्यासमोर बसले होते. स्वैपाकीण बाईने काही भाकरीचे तुकडे बाहेर आणून टाकले. इतक्यात त्या सरदारांच्या बरोबर बसून नेहमी जेवणार्‍या एका गरीब आश्रिताचे लक्ष तिकडे जाऊन, तो ते काय करतात हे पाहण्यासाठी क्षणभर थांबला. इकडे त्या भुकेल्या अधाशी भिकार्‍याने त्यातले काही तुकडे स्वतः खाल्ले व बाकीचे तुकडे आपल्या निरनिराळ्या मुलांसाठी वाटे करून ते आपल्या धोतराच्या पदरात बांधून घेतले. एक अगदी वाळलेला लहानसा भाकरीचा तुकडा त्याने आपल्या कुत्र्याला दिला. तो प्रकार पाहून सरदाराचा आश्रित आपल्याशीच म्हणाला, 'या कुत्र्याच्या नि माझ्या स्थितीत कितीतरी साम्य आहे ! आपणास काहीतरी खायला मिळेल, या आशेनं हा कुत्रा आपल्या मालकाच्या तोंडाकडे पाहत बसतो आणि सरदार मला एखादी नोकरी देतील, या आशेनं मी त्यांच्यावर अवलंबून राहतो. परंतु या भिकार्‍याला आपल्या कुटुंबातल्या माणसांचा चरितार्थ अगोदर चालवावा लागत असल्यामुळे आपल्या कुत्र्याला पोटभर खाऊ घालणं त्याला जसं जमत नाही, तसं आपल्या नातेवाईकांना आधी नोकरी द्यायची असल्यामुळे, माझी सोय सरदारांना अर्थातच करता येत नाही.'

तात्पर्य

- प्रत्येक माणुस आपल्या जवळच्या नातेवाईकांची जितकी काळजी घेतो, तितकी आश्रितांची किंवा मित्रांची घेत नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel