एका घुबडानं पाणी पित असताना सहज आपले प्रतिबिंब पाण्यात पाहिले. तेव्हा स्वतःच्या सौन्दर्याबद्दल अभिमान वाटून तो आपल्याशीच म्हणाला, 'माझ्या सारखीच सुंदर मुलं मला देवानं दिली तर किती चांगले होईल ? रात्रीच्या वेळी सगळ्या आमराया निर्जीव झाल्या असता आम्हीच त्याला शोभा आणतो. मला बायको न मिळाल्यामुळे जर आमची जात जगातून नष्ट झाली तर केवढी वाईट गोष्ट घडेल. माझ्याबरोबर जिचं लग्न होईल ती खरोखरच भाग्यवान !' असे मनोराज्य करत असताच त्याला एक कावळा भेटला. तेव्हा तो कावळ्याला म्हणाला, 'मित्रा, मला लग्न करण्याची इच्छा आहे तर तू गरुडमहाराजांकडे जाऊन त्यांच्या मुलीला माझ्यातर्फे मागणी घाल.' कावळा म्हणाला, 'अरे वेड्या, ही सोयरीक कशी जमेल ? ऐन दुपारी सूर्याकडे टक लावून पाहणारा गरुड तुला दिवाभीताला आपली मुलगी कधी देईल का ?' घुबडाला कावळ्याचे हे बोलणे आवडले नाही. त्याने कावळ्याला फार आग्रह केला. त्याच्या आग्रहामुळे कावळ्याने त्याची मध्यस्थी स्वीकारली.
कावळा गरुडाकडे गेला व त्याने घुबडाची मागणी त्याला कळविली. घुबडाची विनंती ऐकून गरुडास फारच हसू आले, पण तितक्यात तो कावळ्याला म्हणाला, 'अरे, तू त्या घुबडाला माझा निरोप सांग की, उद्या भर दुपारी उंच आकाशातून तू माझी भेट घेऊन मागणी केलीस तर मी माझी मुलगी तुला देईन.' त्या मूर्ख व डौली घुबडाने ही गोष्ट कबूल केली व दुसरे दिवशी दुपारी तो आकाशात उडाला, पण डोळ्यांना एकदम अंधारी आल्यामुळे चक्कर येऊन एका खडकावर पडला. तेव्हा पक्ष्यांनी त्याच्यावर हल्ला केला. त्यावर कसाबसा जीव घेऊन घुबड एका जुन्या झाडाच्या ढोलीत शिरला.
तात्पर्य
- पोकळ डौलाचे प्रायश्चित्त म्हणजे फजिती होय.