वीर सावरकरांचे या बाबतीत झणझणीत विचार आहेत. ते लिहितात.. ‘मायासृष्टीत जोवर मनुष्य आहे आणि गाय, बल पशू आहे, तोवर माणसाने त्याच्याहून सर्व गुणांत हीन असलेल्या पशूस देव मानणे म्हणजे मनुष्यास पशूहून नीच मानण्यासारखे आहे. गाढवाने पाहिजे तर त्याहून श्रेष्ठ पशू असलेल्या गाईस देव मानावे; मनुष्याने तसे मानण्याचा गाढवपणा करू नये. ..कोणत्याही गोष्टीत ती धर्म आहे असे पोथीत सांगितले आहे, म्हणूनच तसे डोळे मिटून मानण्याची पोथीनिष्ठ आंधळी भावना आता झपाटय़ाने मावळत आहे आणि ती मावळत जावी हेच आता मनुष्याच्या प्रगतीस अत्यंत आवश्यक आहे.
एक वेळ राष्ट्रात थोडी गोहत्या झाली तरी चालेल, पण उभ्या राष्ट्राची बुद्धिहत्या होता कामा नये. यास्तव गाय वा बैल हे पशू आपल्या कृषिप्रधान देशात मनुष्यहितास अत्यंत उपकारक आहेत इतकेच सिद्ध करून, आणि त्या पशूचा उपयोग राष्ट्रास ज्या प्रमाणात, नि ज्या प्रकारे होईल, त्या प्रमाणात नि त्या प्रकारे पशू म्हणूनच जोपासना करू म्हणाल, तरच ते राष्ट्राच्या निभ्रेळ हिताचे होईल. पण त्या हेतूने गाय ही देव आहे कारण पोथीत तिची पूजा करणे हा धर्म आहे इत्यादी थापा माराल, तर त्यावर जरी राष्ट्राने यापुढेही विश्वास ठेवला नि गोरक्षण थोडेसे अधिक झाले, तरीही त्या पोथीजात प्रवृत्तीला उत्तेजन देण्याचे जे अपकार्य त्यायोगे करावे लागते त्याचे परिणाम राष्ट्राची शतपटीने अधिक हानी करील.’ (संपादित लेख – ‘गाय- एक उपयुक्त पशू’: वि. दा. सावरकर )
एक माकड महासंमेलन आणि दुसरे भाकड महासंमेलन
सावरकरांनी चालवलेल्या जात्युच्छेदन चलवळीने अस्वस्थ झालेल्या ब्राह्मणांनी लोणी येथे झालेल्या सनातनी परिषदेत सावरकरांना 'धर्मद्रोही' ठरवून 'त्यांना पेशवाई असती तर हत्तीच्या पायाखाली दिले गेले असते' असा ठराव मांडला.त्यावर ३००० ब्राह्मणांनी सह्या केल्या. सावरकरांनी त्यावर 'शिवशाहीत अथवा, पहिल्या बाजीरावाच्या पेशवाईत आमच्यासारख्या हिंदू संघटकांना हत्तीच्या पाठीवरील अंबारीत मिरवले जाण्याचाच संभव अधिक होता' असे सडेतोड उत्तर दिले.मायबोली २००८च्या हितगुज दिवाळी अंकात डॉ. चिन्मय यांच्या मांडणीप्रमाणे, 'भटशाही' संपवण्यासाठी पूजा, पाठ, गौरी, गणपती, सोयरसुतक, संक्रांत, दिवाळी, दसरा, द्वादशी या धार्मिक कार्यक्रमांना भटांना बोलावणे बंद करून 'भटशाही' संपवावी असे मत मांडले. "त्यासोबतच काशीतील ब्राह्मण महासंमेलनाची तुलना त्यांनी माकडांशी केली. त्यात 'काशीत दोन महासंमेलने भरली - एक माकड महासंमेलन आणि दुसरे भाकड महासंमेलन. माकडे परिवर्तनीय तरी आहेत. पण सनातनी तर काळ, वेळ, परिस्थिती या गोष्टीच बघत नाहीत. अशा वागण्यामुळे निदान काशीच्या भाकड महासंमेलनातील पंडित हे तरी माकडांची विकसित श्रेणी नसून तेथील माकडेच त्या पंडितांची विकसित श्रेणी आहे हे म्हणणे क्रमप्राप्त आहे' असे लिहित त्यांची विकेट घेतली.
सात बेड्या
सावरकरांनी अतिशय स्पष्ट शब्दात जातिव्यवस्थेवर हल्ला केला. अनुवंशात जातीचे मूळ आहे. त्या मुळावरच सावरकरांनी हल्ला चढवत अनुवंश हा आचरटपणा आहे, जर ब्राह्मणाच्या घरी 'ढ' जन्मला तर त्याला 'ढ'च म्हटले पाहिजे आणि जर शूद्रांत 'ज्ञ' निघाला तर त्याला 'ज्ञ'च म्हटले पाहिजे, मग त्याचा बाप, आजा अथवा पणजा 'ढ' असो की 'ज्ञ' असो. सावरकरांनी हल्ला करताना 'आपले हिंदुत्वाचे समर्थक दुखावतील' वगैरे फाजील भीती न बाळगता त्यांचे प्रबोधन केले. सावरकर म्हणतात की 'आज आमच्या हिंदू समाजात पोथीत तसे लिहिले आहे ते सोडून इतर कोणत्याही लक्षणाने सहज विभिन्नत्व विविध जातींमध्ये दिसून येत नाही. जात मानणे ही मूळ चूक! त्यात महादेवाच्या जटेपासून ही जात निघाली आणि ब्रह्मदेवाच्या बेंबीपासून अमुक जात निघाली इत्यादी उपरत्या अक्षरशः खऱ्या मानून त्या त्या जातींच्या अंगी ते ते गुण उपजतच आहेत हे मानणे ही घोडचूक!! अन् तो गुण त्या जातीच्या संतानात प्रकट झाला नसला तरी तो आहेच समजून तशी उच्च-नीचता त्या संतानास भोगावयास लावणे ही पहाड चूक.
जातिव्यवस्था मोडण्यासाठी त्यांनी सात बेड्या मोडायला हव्यात हे सांगितले. त्या लेखात ते म्हणतात, पोथीजात जातिभेद हा मनाचा रोग आहे. मनाने तो मानला नाही की झटकन बरा होतो. त्यानंतर त्या सात बेड्या म्हणजे १)वेदोक्तबंदी {स्वतःच्या क्षत्रियादिक धर्मबंधूंनासुद्धा वेदोक्ताचा अधिकार नाही असे म्हणणारी भटबाजी यापुढे चालणार नाही.-सावरकर}२) व्यवसायबंदी ३) स्पर्शबंदी ४) सिंधूबंदी ५) शुद्धीबंदी ६) रोटीबंदी ७) बेटीबंदी. आपल्याकडे अजूनही बेटीबंदी मोठ्या प्रमाणात आहे. सावरकरांनी आंतरजातीय विवाहांना समर्थनच दिले नाही तर स्वतः आंतरजातीय विवाह लावले.[