दार उघड बये दार उघड म्हणत
ललकारले तू तुझ्याच संस्कृतीला
बाबासाहेबांचे नाव घेत,
संविधानाचा जयजयकार करीत
मोडली तू मंदिरातल्या गभा-यातली प्रवेशबंदी.
पण...
बये काय तू तोडलीस तुझ्याच मनाची गुलामगिरी ?
दगडाच्या आदिशक्तीला वंदन करण्यासाठी.
तिची ओटी भरण्यासाठी
चाललेली तुझी झुंज पाहून
तुला विचारावेसे वाटते ,
काय तू भेदू शकलीस
मनुस्मृतीची अभेद्य तटबंदी ?
तू उसन्या आणलेल्या आवसानालाच मी विचारतेय !
ती आदिमाया, तुही तिचेच प्रतिरूप ,
मग कशाला हवी
तुझ्यात नि तिच्यात तुमच्याच विटालांची हि दरी.
तिनेच बहाल केलेल्या स्त्रीत्वाचा जयघोष करीत
जा न तुझ्या गर्भाशयाच्या अस्तरासकट तिच्यासमोर
आणि भर तिची ओटी.
तुझ्यातल्या सनातन वात्सल्याने ,
घे शोध ! तुझ्या अस्तित्वाचा ,
घे शोध ! तुला गुलाम बनविणा-या पहिल्या पुरुषाचा.
शोध उगमस्थान तुला जखडना-या साखल दंडाचे
खणून काढ तुझी मातृसत्ताक पाळेमुळे.
दमछाक होईल, धाप लागेल.
तुला तुझाच इतिहास उकरताना.
पुन्हा गच्च मिटून घेशील तू
तुझ्या मनाची कवाडे.
तुझ्या नागवलेल्या देहांचे सांगाडे बघून
मग पुकारेल तुला
तू जन्माला घातलेली तुझीच लेक.
दार उघड बये दार उघड म्हणत
तुझ्या अस्तित्वातून बाहेर पडून थाटेल तिचे नवे बि-हाड
ती घेईल ज्योतिबाच्या सावित्रीचा वसा
आणि गिरवेल नव्या इतिहासची बाराखडी.
दार उघड बये दार उघड म्हणत
शोधेल ती तिचे स्त्रीत्व.
कवीयत्री - सुरेखा सोडे. (उल्हासनगर)