दि. १ ते ७ डिसेंबर हा काळ आंतरराष्ट्रीय एड्स सप्ताह म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने पुण्याच्या संवाद एच. आय. व्ही.-एड्स हेल्पलाइनने दिलेली नेहमीच्या प्रश्नांची ही उत्तरं ! ती पुन:पुन्हा द्यावी लागतात, कारण हे प्रश्न अजूनही पुन:पुन्हा विचारले जातात. प्रश्न १. चुंबनातून एड्स होतो का ?
उत्तरं - चुंबनातून एच.आय.व्ही. ची बाधा होत नाही. कारण लाळेमध्ये एच.आय.व्ही.चे प्रमाण नगण्य असते.
प्रश्न २. HIV ची लक्षणं कोणती आहेत ?
उत्तरं- एच.आय.व्ही. ची बाधा झाली की लगेचच लक्षणे दिसतात, असं होत नाही. एच.आय.व्ही. ची बाधा झाल्यामुळे व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू कमी होते आणि त्यामुळे विविध संधिसाधू आजारांना ती बळी पडते. सर्वसाधारणपणे ८ ते १0 वर्षांपर्यंत कुठल्याही प्रकारची लक्षणं दिसत नाहीत.
प्रश्न ३. कामाच्या ठिकाणी बाधित व्यक्तीच्या शरीराशी सतत संपर्क आल्यास एच.आय.व्ही. चा धोका आहे का ?
उत्तरं- हा संसर्गजन्य आजार नाही. एच.आय.व्ही. बाधित व्यक्तीच्या घामातून, स्पर्शातून हा आजार पसरत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीबरोबर काम करणं सुरक्षित आहे.
प्रश्न ४. रक्तदान केल्याने संसर्ग होतो का?
उत्तरं- रक्तदान करण्यामध्ये एच.आय.व्ही. चा धोका नाही. इथे आपण आपले रक्त देत असतो. यासाठी वापरली जाणारी सर्व उपकरणे ही नवीनच (डिस्पोजेबल) वापरली जातात.
प्रश्न ५. हस्तमैथुनातून एच.आय.व्ही./गुप्तरोग होतो का?
उत्तरं- हस्तमैथुनातून एच.आय.व्ही. गुप्तरोग होत नाही. ही पूर्णपणे नैसर्गिक, सुरक्षित क्रिया आहे. हस्तमैथुनामध्ये व्यक्ती स्वत:च्या हाताने स्वत:च्या लैंगिक अवयवांना उत्तेजना देऊन आनंद मिळवते. इथे इतर व्यक्तींच्या लैंगिक अवयवांबरोबर /स्रावाबरोबर संबंध येत नाही त्यामुळे या आजारांचा धोका नाही.
प्रश्न ६. समलिंगी संबंधातून एच.आय.व्ही. चा धोका होतो का?
उत्तरं- समलिंगी संबंधामध्ये जोडीदारापैकी कोणालाही एच.आय.व्ही.चा धोका झालेला असेल व संबंधामध्ये कंडोमचा वापर नसल्यास एच.आय.व्ही. चा धोका होऊ शकतो. ज्याप्रमाणे स्त्री-पुरुष संबंधामध्ये असुरक्षित संबंध झाल्यास एच.आय.व्ही. चा धोका असतो. त्याचप्रमाणे स्त्री-स्त्री अथवा पुरुष-पुरुष संबंधातही एच.आय.व्ही. चा धोका असतो.
प्रश्न ७ . एकाच संबंधातून एच.आय.व्ही.चा धोका होऊ शकतो का?
उत्तरं- लैंगिक जोडीदारापैकी कोणासही एच.आय.व्ही. ची बाधा झालेली असेल, कंडोमचा वापर झालेला नसेल तर एच.आय.व्ही.चा धोका हा कुठल्याही संबंधातून होऊ शकतो.
प्रश्न ८. एका पेक्षा जास्त जोडीदाराबरोबर संबंध ठेवल्यानेच एच.आय.व्ही. होतो का?
उत्तरं- एका पेक्षा जास्त जोडीदारांबरोबर लैंगिक संबंधांमध्ये कंडोमचा वापर झालेला नसल्यास एच.आय.व्ही. चा धोका वाढू शकतो. जितकी जोडीदारांची संख्या अधिक तेवढा एच.आय.व्ही. किंवा गुप्तरोगाचा धोका वाढतो, कारण प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या लैंगिक वर्तनाची खात्री देऊ शकते; पण इतरांच्या लैंगिक वर्तनाची खात्री देता येत नाही.
प्रश्न ९. एच.आय.व्ही. चा धोका हा स्त्रियांना जास्त आहे की पुरुषांना ?
उत्तरं- स्त्री व पुरुष दोघांनाही एच.आय.व्ही. चा धोका सारखाच असतो.
प्रश्न १०. गुदमैथुनामुळे/ मुखमैथुनामुळे एच.आय.व्ही. चा धोका होतो का?
उत्तरं- गुदमैथुनामध्ये एच.आय.व्ही. चा धोका जास्त असतो. कंडोम न वापरता संबंध झाल्यास निश्चित धोका वाढतो. तर मुखमैथुनामध्ये तुलनेने धोका अत्यंत कमी आहे. पण तो नाकारता येणार नाही. कोणाकडेही बघून ती व्यक्ती बाधित आहे की नाही हे ओळखता येत नाही म्हणूनच सर्वच प्रकारच्या लैंगिक संबंधांमध्ये सगळीकडेच कंडोम वापरणे हिताचे राहते.
प्रश्न ११. गुप्तरोग म्हणजे काय? गुप्तरोग झाला म्हणजे एच.आय.व्ही. झाला का?
उत्तरं- लिंगसांसर्गिक आजारांना गुप्तरोग असे म्हणतात. असुरक्षित संबंधामधून हे आजार पसरतात. गुप्तरोग झालेला असल्यास तिथे एच.आय.व्ही. चा धोका वाढतो. पण गुप्तरोग झाला म्हणजे एच.आय.व्ही.चा संसर्ग झाला असं नाही.
प्रश्न १२. ART Treatment म्हणजे काय? ती कुठे मिळते?
उत्तरं- ART म्हणजे Anti-Retroviral Therapy एच.आय.व्ही. या विषाणूची वाढ रोखणे, त्याच्यावर नियंत्रण ठेवणे यासाठी ही औषधे सुरू केली जातात. एच.आय.व्ही. बाधित व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती CD4 पेशींची संख्या जेव्हा २५0 पेक्षा कमी होते तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्याने ती सुरू केली जातात. निवडक सरकारी जिल्हा रुग्णालयामधून औषधे मोफत मिळतात किंवा काही सामाजिक संस्थांमधून ती सवलतीच्या दरात घेता येतात.
प्रश्न १३. काही त्रास झाल्यास अठढ बंद करावी का?
उत्तरं- काहीही त्रास झाल्यास ART डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच निर्णय घ्यावेत. लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेणे जरुरीचे असते. पण कोणत्याही स्थितीत स्वत:च्या मनाने ART बंद करू नये. कारण अठढ बंद केल्यास विषाणूंची संख्या वेगाने वाढू शकते. विषाणू स्वरूप बदलू शकतात व या औषधांचा प्रभाव नाहीसा होतो. म्हणजेच विषाणूला ती औषधे नियंत्रणात ठेवू शकत नाही, त्यामुळे त्या व्यक्तीला त्या विशिष्ट प्रकारची औषधे तसेच त्या गटांतील सर्व औषधे लागू पडत नाहीत, असे होण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे त्या व्यक्तीला दुसर्या गटांतील महाग औषधांचा आधार घ्यावा लागतो. ही दुसर्या गटांतील औषधे सरकारी दवाखान्यातून मोफत मिळत नाहीत. त्यामुळे व्यक्तीला स्वत:च औषधांचा खर्च करावा लागेल. त्याच सोबत ती दुसर्या गटांतील औषधे NMP + च्या केंद्रात उपलब्ध होतील का, औषधांच्या दुकानातून उपलब्ध होणार नाहीत याचाही विचार करावा लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या व्यक्तीचे ज्या ज्या व्यक्तींशी असुरक्षित लैंगिक संबंध होतील त्या सर्वच व्यक्तींना अफळ ची औषधे लागू पडणार नाहीत. त्यामुळे त्याच प्रमाणात खर्च वाढत जाणार असतो. ART बंद केल्यावर ती व्यक्ती वारंवार आजारी पडण्याची, तसेच व्यक्तीला संधिसाधू आजार होण्याची शक्यता वाढत जाते व हे आजार जिवाला धोका निर्माण करणारेही असू शकतात. कारण रोगप्रतिकारक शक्ती आजाराविरुद्ध लढा देण्यास सक्षम नसते. या सर्व धोक्यांचा विचार करून ART ची औषधे सुरू करत असतानाच (करण्याआधी) काळजीपूर्वक निर्णय घेणे व्यक्तीच्या हिताचे असते.
प्रश्न १४. इतर आजारांवर औषधोपचार चालू असताना अठढ सुरू होते का? किंवा ती तशीच चालू ठेवावी का?
उत्तरं- इतर आजारांवर औषधोपचार चालू असताना त्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती खालावलेली असू शकते. आजारांशी लढा देऊन CD4 पेशींची संख्या कमी झालेली असते. CD4 चा रिपोर्ट पाहून जर ART सुरू करायची असेल, तर इतर आजारांमुळे CD4 कमी झालेला असेल ही शक्यता लक्षात घेऊन करावी लागते. पण त्या व्यक्तींची शारीरिक स्थिती, आजाराचे स्वरूप, इ. चा ही विचार करावा लागतो. कारण हे आजार AIDS ची स्थिती दर्शविणारे (AIDS Defining illnesses) असतील तर त्या व्यक्तीचा CD4 न करता त्यांना ART सुरू केली जाते. एच.आय.व्ही. च्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अशावेळी हिताचे असते. म्हणजे ते डॉक्टर ART सुरू करावीत किंवा नाही या विषयी योग्य तो सल्ला, मार्गदर्शन करू शकतील. त्या व्यक्तीने स्वत: अठढ सुरू करण्याविषयी डॉक्टरांना आग्रह करू नये. ART सुरू असताना इतर आजारांवर औषधोपचार घ्यावे लागत असतील तरीही अठढ कधीच बंद करू नये. अठढ तशीच चालू ठेवावी.
प्रश्न १५. ART Adherance चे महत्त्व काय?
उत्तरं- ART मध्ये सातत्य असेल तरच ती औषधे लागू पडतात व विषाणूंची संख्या नियंत्रणात ठेवतात. या औषधांचा परिणाम ठरावीक तासांपुरताच र्मयादित असतो. ही औषधे विषाणूंची संख्या वाढू नये म्हणून बारा तास प्रभावी असतात. बारा तासानंतर ती औषधे निष्प्रभ किंवा काम करेनाशी होतात. त्याच वेळी दुसर्या औषधांचे काम सुरू होणे आवश्यक असते. म्हणजे दुसरा डोस बरोबर बारा तासांनी घेतला जावा. जर हा पुढचा डोस घेतला गेला नाही तर किंवा उशिरा घेतला गेला तर त्या व्यक्तीच्या शरीरातील विषाणू त्याचे स्वरूप बदलण्याची शक्यता असते. नंतर ही वाढलेली विषाणूंची संख्या पुन्हा नियंत्रणाखाली आणणे अवघड असते.
प्रश्न १६. ART Adherence मध्ये कुटुंबाचा सहभाग का महत्त्वाचा असतो?
उत्तरं- एकदा ART सुरू केली की, त्या व्यक्तीला ती औषधे नियमितपणे, सातत्याने, आयुष्यभर घ्यायची असतात. काही व्यक्तींमध्ये सातत्य टिकविले जाते. पण काही व्यक्तींमध्ये सुरुवातीला टिकून राहील; पण नंतर त्या व्यक्तीवरील इतर जबाबदार्या, कौटुंबिक, सामाजिक भूमिका व त्या व्यक्तीचा प्राधान्यक्रम निराळा असू शकतो. प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यास उत्सुक असतेच असे नाही. बरेचदा, विशेषत: ART सुरू झाल्यानंतर आजार र्मयादेत आहे, त्रास नाही अशा वेळेला ART चा कंटाळा येऊ शकतो व ती व्यक्ती औषधे घेण्यास चालढकल करण्याची शक्यता असू शकते. अशा वेळी कुटुंब जर ज्या व्यक्तीच्या देखभालीमध्ये असेल तर ती व्यक्ती ART चे सातत्य अधिक चांगले टिकवून ठेवू शकेल.
(संवाद एच. आय. व्ही.-एड्स हेल्पलाइन, पुणे 0२0-२६३८-१२३४. सकाळी ९.३0 ते सायंकाळी ८.३0)
लेखं - दै. लोकमत