माझे आजोळ
त्या दिवषी पेपरमध्ये वाचले की गांधीजी नेहेमी म्हणत, "खेड्याकडे चला".
मला माझा भूतकाळ आठवला. तो काळ असावा साधारण १९५० ते १९६० दरम्यानचा. माझ्या मामाचे गांव म्हणजे पहूरजिरे. खामगांवपासून ३५ किलोमीटरवर. परीक्षा आटोपल्या म्हणजे आम्हाला वेध लागायचे ते पहूरला जाण्याचे. एक उन्हाळ्याच्या व दुसऱ्यांदा दिवाळीच्या सुटीत.
आम्ही दोघी बहीणी, माझे दोन भाऊ व आई जळगांव जामोदहून खामगांवपर्यंत एसटी ने आणि तेथून खुटाळ्याला मामा बैलगाडी म्हणजे दमणी घेवून यायचे. ती आजूबाजूला हिरवीगार झाडी, निळे डोंगर, झुळझुळ वाहाणारी नदी, पक्ष्यांचा सुमधूर आवाज. वाहनांचा कर्कश आवाज नाही. अगदी निरव शांतता.
दिवाळीच्या सुटीत तर आजुबाजूला ज्वारीची आणि कापसाची पिके दिसत. सर्व सृष्टी हिरवीगार. जणू काही वनदेवतेने हिरवा शालू पांघरलेला आहे, असे वाटायचे. लाल, गुलाबी, शेंद्री, जांभळी अशी विविधरंगी फुले दिसत.
पहूरजिरे म्हणजे एक खेडे. तेथे तेव्हा बस जात नव्हती. ग्रामपंचायत होती. आमच्या आजोबांचा मोठा वाडा होता. समोर बैठकखोली. आजोबा म्हणजे मोठे जमिनदार. बैल, गायी म्हशी यांनी गोठा नेहेमी भरलेला असे. घरात आजोबांचे दोन भाऊ, त्यांच्या बायका, एक बालविधवा बहीण, भावांची मुले, आजोबांची मुले, सूना असे एकंदर पंधरा-सोळा जणांचे कुटूंब होते. आमचे आजोबा सर्वात मोठे. त्यामुळे त्यांच्यावर शेतीची व घरची सगळी जबाबदारी असे.
रम्य सकाळ :
रोज सकाळी आजोबा पाच वाजता उठत. एक नोकर गायी म्हशीचे दुध काढी. आजोबांचे भाऊ दूध मोजून घेत व ते खामगांवला डेअरीत पाठवत. आजी सकाळी अंगणात शेणाचा सडा टाकून रांगोळी काढीत असे. आंघोळ झाल्यावर आजोबा जांभळ्या रंगाचे सोवळे नेसून पूजा करीत. त्यांची बहीण रोज देवाच्या फोटोला हार घालून पूजा करीत असे. नंतर आजी लसणाची चटणी, ज्वारीची भाकरी आणि लोणचे बांधून शेतावरच्या गड्यांसाठी देई. नंतर आजोबा चहा घेवून गावातल्या मळ्यात जात. आजी एका खांबाला लाकडी रवी बांधून ताक बनवीत असे. नंतर त्यातले काही ताक शेजारी व काही गडी माणसांना दिले जाई...
....गावाजवळच्या विहिरीच्या मळ्यात भाजीपाला, पेरू, केळी लावलेली होती. रोज ताजी फुले व भाजीपाला नोकर घरी घेवून येत. त्याजवळील मारुती मंदिरात सकाळी सकाळी सनईचे सूर वाजत असत. प्रत्येक घरापुढे सडा आणि रांगोळी काढलेली असे. "साध्याही विषयात आशय बहू आढळे.... " या कविवर्य केशवसूतांच्या कवितेची आठवण जरुर होते. मोलकरीण नदीवर कपडे धुण्यास जाई तेव्हा आम्ही दोघी बहिणी तिच्या सोबत जात असू. सकाळची वेळ, झुळझूळ वाहाणारे पाणी. ते दिवसच काही वेगळे.
आजोबांकडे आंबे घरचेच असायचे. एका मोठ्या खोलीत आंबे पिकायला घालायचे. गोटी आंबा, शेपू आंबा, दोडी, शेंद्री, कलमी इत्यादी. त्यामुळे आंबे खाण्याची खुप मजा येई. सगळ्या प्रकारच्या आंब्यांची चव चाखायला मिळे.
सणाला केळीचे पान, पुरणपोळी, तुपाच्या छोट्या वाट्या असत. हिरव्यागार केळीच्या पानावर पांढऱ्या शुभ्र दाणेदार भाताची मूद, त्यावर पिवळेधमक वरण, त्त्यावर शुद्ध गावरान तुपाची धार, दोन भाज्या, लिंबाची फोड आणि मसालेदार कढी असा सगळा मामला होता.
दिवाळीनंतर मळ्यात हुरडा पार्टी व्हायची. तो हिरवागार लुसलुशीत हुरडा बघून तोडाला पाणी सुटायचे. तो भाजून त्यावर तीळ आणि मीठ किंवा साखर. अहा हा! काय वर्णावे!
संध्याकाळी आम्ही सगळे लहान मुले रामरक्षा म्हणत असू. आमची आजी कष्टाला मागे पुढे बघायची नाही. तीला कामचा आळस नव्हता. घरात मोठी असल्याने तीच्यावर जबाबदारी जास्त. घरात कुणाला काय हवे काय नको ते बघणे, पाहुण्यांचे स्वागत, नोकरांकडून कामे करवून घेणे, त्यांच्या अडीअडचणी जाणणे, त्यांना पैशांही मदत करणे. एक प्रकारे ते व्यवस्थापन कौशल्य होते. त्याही काळात आजी कोणत्याही अभ्यासक्रमाशिवाय, न शिकता उत्तम व्यवस्थापन करत असे. तीच्यात त्याग वृत्ती, कष्टाळूपणा, सदाचरण हे गुण दिसून येत.
परत गावाला जायहे म्हणजे आजी बैलगाडीजवळ यायची व आम्हाला गहिवरून म्हणायची, "लवकर या बरं का बाळांनो. "
आता आजी आजोबा हयात नाहीत.
आता एकत्र शेती नाही.
एकत्र कुटूंब नाही. मामांचे मुले, नातू शहरात नोकरी करतात.
पण खरी लक्ष्मी खेड्यातच!