तो काळ होता १९७५ सालचा. ह्यांची बदली भंडारा जिल्ह्यात 'दवडीपार' येथे झाली होती. हे त्या खेड्यात पशुधन पर्यवेक्षक होते. त्या वेळेस घडलेली एक घटना आजही मला आठवते. मन गलबलून येते. पण घडणाऱ्या गोष्टी कुणीही टाळू शकत नाही हेच खरे. त्यावेळेस माझी मुलगी दिड वर्षांची होती. तीला खेळवायला रोज शेजारची एक मुलगी यायची. तीचे वय साधारण दहा-अकरा वर्षे. तीचे नाव मंदा. तीची शाळा सुटली की ती आमचेकडे येत असे, माझ्या मुलीला खेळवत असे. एक दिड तास ती मुलीला खेळवत असे. माझी मुलगी सुद्धा तिच्याकडे छान खेळायची. मी ही तीला रोज काहीना काही खाऊ देत असे. एखादेवेळेस मंदी आली नाही तर आम्हाला कसेसेच व्हायचे. मुलगी सुद्धा ता ता दा दा असे आवाज करून तीची आठवण काढी. माझ्या मुलीला तीच चांगलाच लळा लागला होता. पण नियती बरेचदा अतिशय छुपे आणि क्रूर खेळ खेळते. ते आपल्याला समजत नाहीत.
त्या दिवशी शनिवार होता. मंदाची सकाळची शाळा होती. ती अकरा वाजता शाळा सुटल्यावर सरळ माझेकडे आली. माझे बाळ आनंदले. तीच्याशी खेळू लागले. ती खेळेपर्यंत मी माझा स्वयंपाक आटोपला. माझा पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत ती थांबली हे विशेष. मी त्या दिवशी केली होती गवाराच्या शेंगांची भाजी. मी तीला जेवायचा खुप आग्रह केला. ती म्हणाली, "अहो मावशी, माझ्या आईने माझेसाठी स्वयंपाक करून ठेवेलेला आहे. तीचे कपडे धुवून होईपर्यंत मी जावून येते असे मी तीला सांगितले. आता मला जायलाच हवं. " पण नियतीच्या मनात काय होते?
मी म्हणाले, " अगं, आता जेवणाची नाट लावू नकोस. मी वाटीभर गवाराच्या शेंगांची भाजी देते. ती मात्र घेवून जा. "
ती म्हणाली, "ठीक आहे. मी येते पुन्हा मावशी, संध्याकाळी. बरं का! " माझी मुलगी रडायला लागली. मी तीची समजूत घातली.
नियती मात्र बरेचदा वेगळाच विचार करत असते. ती सरळ साधा असा विचार करत नाही.
एका तासानंतरची गोष्ट. वर गच्चीवर आमची दुपारची जेवणं आटोपली होती. गावरान गवारची भाजी अतिशय स्वादिष्ट झाली होती. मी मुलीला झोपवले. बाजूला खाली अचानक मोठ्याने रडण्याचा आवाज येवू लागला. मी गच्चीतून खाली बघू लागले. मंदाची आई मोठमोठ्याने रडत होती. बरेच लोक जमले होते. गर्दीमुळे नीट दिसत नव्हते. आम्ही खाली गेलो आणि तेथे जावून बघितले. विश्वास बसणार नाही असे दृश्य दिसले. मंदीला खाटेवर झोपवलेले होते. तीच्या तोंडातून पांढरा फेस येत होता. बैलांच्या गोठ्यात तीने खेळण्यातला संसाराचा पाट मांडलेला होता. ती तडफडत होती आणि क्षणात गतप्राण झाली. खेळण्यातला संसार सुद्धा अपूर्ण राहीला. बैलांच्या गोठ्यात सापाचे बीळ होते आणि सापाने तीला दंश केलेला होता. ती माझेच कडे जेवली असती तर? वेगळे घडले असते का? नियतीने क्रूर थट्टा केलेली होती. असे का होते?
तीस वर्षे उलटली आता. आजही गवाराच्या शेंगांची भाजी केली की तो दु:खद प्रसंग आठवतो आणि डोळे पाणावतात.