अर्जुन व कौरव यांच्या युद्धप्रसंगाची तिथि व पक्ष स्पष्ट्पणे सांगितलेलीं नाहीत. दुर्योधनाने म्हटले की त्रिगर्ताच्या स्वारीची तिथि सप्तमी ठरली होती. कौरव दुसऱ्या दिवशी चालून आले म्हणजे त्या दिवशी अष्टमी होती. पूर्वी स्पष्ट केल्याप्रमाने कृष्णपक्ष चालू होता. ऋतु ग्रीष्म होता. अर्जुनाने शमीच्या झाडावरून शस्त्रे काढून घेतली हे खरे पण काहींच्या समजुतीप्रमाणे ही विजयादशमी नव्हती! महिना दुसरा अधिकमास चालू होता. द्यूत अनुद्यूताच्या प्रसंगाची तिथिहि सांगितलेली नाही त्यामुळे या दिवशी तोच महिना व तीच तिथि नव्हतीच ही वस्तुस्थिति थोडीशी नजरेआड होते. पांडवांच्या दृष्टीने ही बाब अडचणीची होती म्हणून ती हेतुपूर्वक झाकली आहे काय असा प्रश्न पडतो. भीष्माने पांडवांनी केलेला हिशेब उलगडून दाखवला पण त्याचे उघडपणे समर्थन केव्हाच केलेले नाही. इतर कुणीहि नाही. दुर्योधनाने या प्रसंगी व नंतर अखेरपर्यंत पण पुरा झाल्याचे कधीच मान्य केले नाही. युद्धापूर्वी अखेरचा प्रयत्न म्हणून कृष्णाने कौरवदरबारात पांडवांची बाजू मांडली तेव्हा त्यानेहि ’पण पुरा केल्याचा पांडवांचा दावा आहे’ एवढेच म्हटले त्याचे समर्थन केले नाही. धृतराष्ट्र, गांधारी व इतर अनेकांनी दुर्योधनाला युद्ध टाळ असा उपदेश केला पण ’पांडवांचा पण पुरा झाला आहे तेव्हा त्यांचे राज्य परत दिलेच पाहिजे’ असे कोणीहि म्हटले नाही! युद्धात तुझा सर्वनाश होईल अशी भीति घातली. दुर्योधनाला माहीत होते कीं केव्हातरी पांडवांशी लढावे लागणारच आहे व त्यालाहि खुमखुमी होतीच. यावेळी पांडवांची बाजू कच्ची असल्यामुळे भीष्म-द्रोण-कृप-अश्वत्थामा उघडपणे त्यांची बाजू घेण्याची शक्यता कमी होती. इतर राजांना समजावून आपल्या बाजूला वळवण्याची शक्यता होती. प्रत्यक्षात तसेच झाले. राजेलोकांनी जी बाजू पटली ती घेतली! भीष्माची पंचाईत झाली. पांडवांच्या बाजूला सरळ मिळणे कठीण होते. द्रुपद हा पांडवांचा प्रमुख पाठीराखा असल्यामुळे द्रोणाला कौरवांची बाजू घेणे प्राप्तच होते. कृप व अश्वत्थामा दुसरे काय करणार? बलरामाने कृष्णाला सरळच सांगितले की ’पांडवांच्या दुर्दशेला युधिष्ठिर स्वत:च जबाबदार आहे. आपल्याला दोन्ही पक्ष नातेसंबंधाने सारखेच आहेत तेव्हा आपण दूर राहणे योग्य!’ युद्ध अटळ आहे असे दिसल्यावर बलराम उद्विग्न होऊन यात्रेला निघून गेला. कृष्णाला बलरामाशी मतभेद नको असल्यामुळे पांडवांच्या बाजूने प्रत्यक्ष युद्धात उतरणे शक्यच नव्हते! ’ न धरी शस्त्र करी मी’ यामागचे खरे कारण हे आहे! अर्जुनाचे सारथ्य करण्यालाहि बलरामाने आक्षेप घेऊ नये यासाठी आपले सैन्य त्याने दुर्योधनाला दिले! कोणत्याही परिस्थितीत बलराम कौरवपक्षाला मिळणे परवडणारे नव्हते! सौरमान की चांद्रमान या वादात शास्त्र पांडवांचे बाजूने होते असे आज आपणाला वाटेल. पण जनव्यवहार चांद्रमानानेच चालत होता. भारतात हिंदु सत्ता आजतागायत चालू राहिली असती तर आजही कदाचित चांद्रवर्ष मान्यताप्राप्त असते. रविवार ऐवजी चतुर्थी-एकादशीच्या सुट्या घेतल्या असत्या व दर २९ महिन्यानी आपण एक अधिक पगार घेतला असता! तेव्हा दुर्योधनाचा राज्य देण्यास नकार हा पूर्णपणे अन्यायाचा म्हणता येईल काय? प्रश्नच आहे! पांडवांना शक्य झाले असते तर त्यानी सहा अधिक महिने पुरे केले असते हे नक्की. मात्र तरीहि दुर्योधनाने राज्य परत दिले नसतेच कारण तो त्याचा प्रथमपासूनचा ठाम बेत होता. मात्र मग कदाचित युद्ध एका बाजूस पांडव, पांचाल, विराट, कदाचित कृष्ण व यादव, शल्य व दुसऱ्या बाजूस कौरव, कर्ण, द्रोण, कृप, अश्वत्थामा व शकुनि असे झाले असते! पहिल्या भागात उपस्थित केलेल्या काही प्रष्नांची उत्तरे याप्रकारे मिळतात असे म्हणतां येईल.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel