जेव्हा हनुमान सीतेला शोधत शोधत बिभिषणाच्या महालात गेला, तिथे बिभिषणाच्या महालावर रामाचे चिन्ह अंकित असलेले पाहून तो प्रसन्न झाला. तिथे त्याची भेट बिभीषणाशी झाली. बिभीषणाने त्याला त्याचा परिचय विचारला आणि त्याने स्वतः रामाचा भक्त अशी ओळख करून दिली. हनुमान आणि बिभीषण यांच्यात बराच वेळ चर्चा झाली आणि हनुमानाच्या लक्षात आले की ही कामाची व्यक्ती आहे.यानंतर जेव्हा श्रीराम लंकेवर स्वारी करण्याची तयारी करत होते त्यावेळी बिभीषणाचा रावणाशी वाद चालू होता. शेवटी बिभीषण महाल सोडून रामाला भेटण्यासाठी आतुर होऊन समुद्राच्या या बाजूला आला. वानरांनी बिभीषणाला येताना पहिले तेव्हा त्यांनी ओळखले की हा शत्रूचा कोणीतरी खास दूत आहे. त्यामुळे कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही.सुग्रीव म्हणाला, "रघुनाथ जी, रावणाचा भाऊ आपल्याला भेटायला आला आहे." त्यावर प्रभू म्हणाले, "मित्रा, तुला काय वाटते?" तेव्हा वानरराज सुग्रीव म्हणाला, "हे नाथ! राक्षसांची माया ओळखता येत नाही. हा इच्छेनुसार रूप बदलणारा कोणत्या हेतूने इथे आला असेल काय सांगावे?" अशा वेळी हनुमानाने सर्वांना दिलासा दिला, आणि रामाने देखील सांगितले की शरणागताचे भय हरण करणे हे माझे प्रण आहे. अशा प्रकारे हनुमानामुळेच श्रीराम आणि बिभीषण यांचे मिलन होऊ शकले.