यानंतर युधिष्ठिराला युवराजपद मिळाले. दुर्योधनाची निराशा व जळफळाट होणे स्वाभाविकच होते. धृतराष्ट्राने पांडवाना दूर करण्यासाठी वारणावतास जाऊन राहण्यास सांगितले. दुर्योधनाचा बेत अर्थात वेगळाच होता. पांडव आणि द्रोण यांचे संबंध येथून पुढे हळूहळू दुरावत गेलेले दिसतात. वारणावतात पांडवाना लाक्षागृहात जाळून मारण्याचा दुर्योधनाचा बेत विदुराने त्याना वेळीच सावध केल्यामुळे व मदत केल्यामुळे तडीस गेला नाही. पांडव जिवानिशी वाचले पण पुढे दीर्घकाळ जिवाच्या भीतीने परागंदा व्हावे लागले. हस्तिनापुरात, पांडव व कुंती जळून मेले असाच समज झाला. त्यांची उत्तरक्रियाहि झाली. धृतराष्ट्र नावाचा राजा, दुर्योधन सर्वसत्ताधीश व भीष्म निवृत्त, अशी अवस्था झाली. मात्र दुर्योधनानेहि द्रोणाला दूर केले नाही. द्रोणहि अश्वत्थाम्यासह हस्तिनापुरातच कौरवांच्या आश्रयाने राहिला. पांडवाना सारेच विसरून गेले.
द्रुपदाचा पांडवानी पराभव केला पण त्याने द्रोणावरचा राग सोडून दिलेला नव्हता. त्याने यज्ञ करून द्रौपदी व धृष्टद्युम्न या आपल्या मुलाना राजकुळात सामील करून घेतले. तीं द्रुपदाचीं वन्य जमातीच्या स्त्रीपासूनचीं अपत्ये असा माझा तर्क आहे. (यज्ञातून मुले जन्माला येतात हे मला पटत नाही!)  धृष्टद्युम्नाने आपल्या मातृकुळाकडून युद्धविद्या प्राप्त केली असावी. द्रोणाने त्याला शिकवले असे क्वचित कोठे सूचित केले आहे पण ते मला खरे वाटत नाही. कौरव-पांडवांनंतर द्रोणाने इतर कुणाला शिकवलेले नाही. धृष्टद्युम्नानेहि द्रोणाला कधी गुरु म्हणून मान दिलेला नाही.
पांडव लाक्षागृहातून वांचले होते अशी शंका यादवाना व द्रुपद-दृष्टद्युम्नाला होती असा महाभारतात उल्लेख आहे. पण ते कोठे गेले हे कोणालाच माहीत नव्हतें. द्रुपदाने द्रौपदी व धृष्टद्युम्न यांचा राजकुळात समावेश करून घेतला हे पांडवाना माहीत नव्हते. पांडव अनेक ठिकाणी भटकून अखेर एकचक्रा नगरीत लपून राहिले होते. भीमाने तेथे बकासुराचा वध केला. ते ऐकून कदाचित काहीना भीमाची आठवण आलीहि असेल! काही काळाने द्रुपदाने कन्येचे स्वयंवर जाहीर केले. पण लावला होता तो असा अवघड कीं जणूं अर्जुन कोठे जिवंत असेल तर त्यालाच तो जिंकतां येईल! तो नाहीच प्रगट झाला पण इतर कोणा वीराने पण जिंकला तर तोहि द्रोणाविरुद्ध  मदतीला येईलच असा त्याचा हेतु दिसतो. स्वयंवराची बातमी पांडवांना कळलीच आणि त्याना तेथे जावे असे वाटूं लागले. केव्हातरी अज्ञातवासातून बाहेर पडायचे तर द्रौपदी प्राप्त झाल्यास द्रुपदासारखा प्रबळ सासरा मदतनीस मिळणार होता. कुंतीनेहि त्याना संमति दिली. पांडव ब्राह्मणवेषात स्वयंवराला गेले. अनेक लहानमोठे राजे व वीरपुरुष आले होते. स्वयंवराचा पण ऐकल्यावर कोणी धाडस करीना! कर्ण पुढे झाला तेव्हा लगेच द्रौपदीने स्पष्टपणे ‘मी सूतपुत्राला वरणार नाही असे म्हटले.’ कृष्ण-बलरामानी ब्राह्मणवेषातील पांडवाना ओळखले. अपेक्षेप्रमाणे अखेर अर्जुनानेच पण जिंकला. पांडवांच्या इच्छेप्रमाणे पांचहि भावांची द्रौपदी पत्नी झाली.
या स्वयंवराला भीष्म वा द्रोण उपस्थित होते का? महाभारतात स्पष्टपणे काही म्हटलेले नाही. बहुधा नव्हते. पांडव जगले हे ऐकून भीष्माला आनंद झाला असणारच पण आपण पूर्वी दुर्लक्ष केले होते हेहि जाणवले. पांडवांचा द्रुपदकन्येशी विवाह झाल्यामुळे द्रोण आणि पांडव यांच्यातील संबंध मात्र निश्चितच बदलले! द्रोणाला जाणवले असणार कीं येथून पुढे कधी द्रुपदाशी युद्धप्रसंग आल्यास पांडव आपले नव्हे तर द्रुपदाचे समर्थक असतील. द्रोण व पांडव यांच्यातील या बदललेल्या संबंधाची छाया यापुढे प्रत्येक प्रसंगीं जाणवते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel