५१.

आला आला रुखवत, त्यात होता फवा,

विहीणबाईन पातळ धुतल मायणीचा तलाव बांधला तवा.

५२.

आला आला रुखवत, त्यात होती आंगठी,

जानूबाई असली वंगाळ तर नवरदेव तुमची करील चेचून दामटी.

५३.

आला आला रुखवत, त्यात होती पणती,

आमची विहीणबाई बेडकावाणी कणती.

५४.

आला आला रुखवत, त्यात होती काडी,

विहीणीच्या डोक्यावरुन गेली आगीनगाडी.

५५.

मांडवाच्या दारी यीन यूवायान विचार केला, मिळून गारदौंडचा बाजार केला, धारण पहिली कोल्हापूरी, माप केल सोलापूरी, द्ळण केल पंढरपूरी, पेठ महाडात, बाजार केला भोरात, तिरीथ केल यिहीनीन, डोल दावल पुण्यात, दिवाळी दावली मुंबईत, इनीला नव्हती साडी, इवाय मुंबईच तिकीट काढी, बसाय कुई बावडी उतराय उप्पर माडी, बाजार कराया लालवाडी, हिंडाय फिराय मुंबईची चाळ, काम कराय ठकसाळ इनसाब कराया सन्‌सार, म्हागली बावनचाळ, इतक्यांचा केला ठाव, इसलामपुरावर सोडली नाव, गावाच नाव कोडीत, खिडक्या तिनशेसाठ, येरवड आणल ओढीत, झांज चाले सोन्याचा लोट, जावून सांगी तानाजीच्या कानी गोष्ट, भाजी घेतली भिंगरात, परकार केल पेठ नगरात, यिरवडात पाणी महाडात, बैठक पिसवडात, तांदूळ घेतले, पुण्यासी धुतले, पेठेसी आदण ठेवल गडावरी, चुळा भरल्या जुरीवरी यीन

रुखवत आला वाघूलीवरी, काय सांगू यीनबाय, मानापान घेतल पानवाडी, विडे केले खांदवाडी, चुना लावला महमंद वाडी, कुरवल्या दोनी भावल्या लोणी, जळगावात वहात पाणी, भिवर तिची न्हाणी, बोटवे तोडले वंगपूरी, पानाच पिंपळ झोक्याच लिंबगाव, करकंब कोरेगात, दगडाच वडगाव, गेंदाच कुलगाव, उदास चोराची मावशी, कुरवाय कुरली, सांगलीत शिरली, लोहकळी मोहकळी, वांगज, सरड लाट कुठ ? कांबळी सराच लिंबूर मोठ, ताडमाड मोत्यांचा वर माळा गोठ, खरच सांगा ईनीबाय गावाच नाव हित सांगू का म्होर कुठ? दादा, माझ्या गावाच नाव मिरकरोळ, भन भन करत नेवर, नांदोर उठून पळत, माकडाच म्हाळूंग, अजी करी, नकटी पाळखांबी संसार करी, अडयाल तोंडल, पडयाल बोंडल मदी, एक द्सूर कोंडल, कलदाने मायनी, आताच्या कलीयुगात पुरुषापरास स्त्री निघाली शानी, वजवाडी भुंडवी, आताच्या कलीयुगात स्त्री पुरुषाला वेड लावी, आडव कातरखटाव, घोड द्टाव, आताच्या कलीयुगात पुरुषापरीस स्त्री निघाली शिराव, खर सांगा यीनबाय गावाच नाव? हित सांगू दादा माझ्या गावाच नाव? का म्होर जावाव? आंबेगाव पाडेगाव अरकली भारी गिरविला ईचारनी सारी, घेऊनिया मका पिकती भारी, हिचा इकरा हुतो फलटणावरी, बाल्याल केळ, परित्याला पान मळ, कुरगाव कुमट सातार एकट, जळगाव जळत, लसूरन वलवल करत, घटात पडली माळ, माळाला देती गाठी, शिलंगणांनी केली गाठी, शिलंगणाच सोन, दिवाळीबाईन केल येण, दिवाळीची पंती, सट झाली नेणती, सटीच वांग, संक्रान्त आली संग, नव्या संक्रान्तीच सुगड, पुनवेची लोंबी, शिपनाचा खेळ झोंबी, शिमग्याची पोळी होळीच्या पोटी, शिंपन्यान केली दाटी, शिपन्याचा पाडवा आला जबर दंग, पाडण्याची उभारती गूडी, आखईन टाकली उडी, आखीतीची पूजती पाच कळस, बारा सणांचा आंबरस, कोण घेती तान्ही.........पाटलांची राणी.

५६.

आला आला रुखवत पंढरीच्या ठाय, विठ्‌ठ‌ल करी आंघोळ रुक्मीणी धुती पायी, नऊ लाखाचा पितांबर नेसली नवरदेवाची आई.

५७.

आला आला रुखवत रुखवतावर तुरी, रुखवत उघडून बघा आत रावण मंडोधरी.

५८.

आला आला रुखवत, रुखवतावर मका, रुखवत उघडून बघा आत थेरचा सोपानकाका.

५९.

आला आला रुखवत, रुखवतावर दींड, आत उघडून बघा महादेवाची पिंड.

६०.

आला आला रुखवत, रुखवतावर हारला, रुखवत पंढरीत करला, वैरागीत दुरडीत भरला, बार्शीत मिरविला, इंदापूरात आता आला, जमखंडीत लागला खटला, गोतवडीत घरोघर वाटला, तितन ईन उठली, म्हमई रानात बसली, म्हमई रानात भरला बाजार, माल पडला तीनशे हजार, दस्तूरी कल्याणचा शेजार, येताना ईनबाई रुपये हजार घेती, मांडवात भांडण खेळण्या जाती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel