२४.

इकडून आली तार तिकडून तार

भामाचा नवरा मामलेदार.

२५.

तुझ्या घरी माझ्या घरी आहे बिंदली सरी

फुगडी खेळताना बाई नको तालीवारी

२६.

एवढासा पाटा बाई जिरीमिरी वाटा

छोट्या सुधेचा ठमकारा मोठा

२७.

आमच्या चुलीवर सांडगा सांडगा

लिलूचा नवरा लांडगा लांडगा

२८.

आपण दोघी मैत्रिणी जोडीच्या जोडीच्या

वेण्या माळूं फुलांच्या, फुलांच्या.

२९

आज मला ऐतवार , उद्या मला सोमवार

जोडवी झनकार, बिरूद्या कणखार,

दारी होती मेख , मी कदमांची लेक

 

३०.

चिकी बाई चिकी परातभर चिकी

सारवल्या भिंती आम्ही देसायांच्या लेकी.

३१.

चुनाबाई चुना परातभर चुना

सारवल्या भिंती आम्ही पवारांच्या सुना.

३२.

पत्रीबाई पत्री रानमाळ पत्री

जेजुरीच्या खंडोबाला सोन्याची छ्त्री.

३३.

लाहीबाई लाही मक्याची लाही

मुक्यांनी फुगडी शोभत नाही.

३४.

तवाबाई तवा लोखंडी तवा

भारुच्या लग्नात बेंडबाजा लावा

तुझ्या माझ्या घरांत उदबत्यांचा वास

आपण दोघी मैत्रीणी फायनल पास.

३५.

सहाण बाई सहाण , कुरंजी सहाण

मी पडले लहान, पण तुला टाकीन गहाण.

३६.

गोण बाई गोण , भाताच गोण

तू मला गहाण टाकणारी आहेसच कोण ?

३७.

लोणी बाई लोणी , ताकावरल लोणी

तुला गहाण टाकीन अस अग म्हटलच कोणी ?

३८.

पावसाच पाणी कौलात ग कौलात

x x x मुली तुम्ही डौलात ग डौलात

३९.

फुगडी फुलती दोघी बोलती

चौरीखालन साप गेला चौरी डुलती.

४०.

आलंगडीवर पलंगडी पलंगडीवर हार

आज माझी मंगळागौर बोलू नका फार.

४१.

काळा कासोटा भुई लोळतो

जेजूरीचा खंडोबा चक्र खेळतो.

४२.

समुद्रांतली वाळू चाळनीने चाळू

आपण दोघी मैत्रीणी गंजीफानी खेळू.

४३.

हार बाई हार गुलाबाचा हार

अण्णांनी बायको केली नाजूक नार.

४४.

खारिक बाई खारिक साखरी खारीक

दादांनी बायको केली आपल्यापेक्षा बारिक.

४५.

चुना बाई चुना परातभर चुना

पोत पेट्या घालू आम्ही किर्लोस्करांच्या सुना.

४६.

चिपाड बाई चिपाड जोंधळ्याच चिपाड

अण्णांनी बायको केली आपल्यापेक्षा धिप्पाड.

४७.

वरी बाई वरी डोंगरी वरी

आमच्या गौरीला सोन्याची सरी.

४८.

आपट्याच पान माझ्या झपाट्याखाली

काळ्यांच्या मुली माझ्या डाव्याहाताखाली.

४९.

तुझी माझी फुगडी वनांत ग

हाजाराची कुडी माझ्या कानात ग

५०.

कौल बाई कौल काचेचा कौल

आमच्या विहीणबाईना श्रीमंतीचा डौल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel