या चित्रपटाच्या जशा जाहिराती बघून उत्कंठा व अपेक्षा वाढत होती, त्याच प्रमाणे चित्रपट अपेक्षा पूर्ण सुद्धा करतो असे माझे मत आहे.
सगळ्यात आधी हे नमूद करावेसे वाटते की हा चित्रपट कोणत्याही जातीच्या, भाषेच्या, प्रांताच्या आणि धर्माच्या विरोधात मुळीच नाही. तर, तो आहे कुणाही व्यक्तीत असू शकणाऱ्या न्यूनगंडाच्या भावनेच्या विरोधात. मग ती भावना कोणत्या ही कारणाने का आली असेना!
महेश मांजरेकरने अतिशय छान कथा लिहिली आहे. तसेच त्याचा अभिनय आणि संवादफेकही अतिशय छान, प्रभावी आणि प्रेरक! शिवाजी महाराजांचे आडनांव भोसले, म्हणून तेच आडनांव मुद्दाम या सिनेमात वापरले आहे. उणीवा आणि फरक कळून येण्यासाठी.
सचिन खेडेकरने साकारलेला भोसले हा खरोखरच दाद देण्याजोगा आहे. त्याच्या अभिनयाबद्दल तर कसलेच दुमत नाही. या चित्रपटाचे जरी "लगे रहो मुन्नाभाई" आणि "रंग दे बसंती" शी साम्य वाटत असले तरी हा चित्रपट वेगळा आहे.
कथा थोडक्यात सांगायची झाली तर :
भोसले आडनावाचा हा माणूस (जो कोणत्याही मराठी मध्यमवर्गाचा प्रतिनिधी असू शकतो) जवळ जवळ आत्मविश्वास गमावून बसला आहे. ९ ते ५ बँकेतली नोकरी करतो. कुणी काही अपमानास्पद बोललं तरी तो गप्प बसतो. उलटून उत्तर देत नाही. घोसालीया नावाचा बिल्डर त्याच्या मुंबईत असलेल्या वडीलोपार्जीत घरावर डोळा ठेवून असतो. तो साम, दाम, दंड आणि भेद या सगळ्या प्रकारांचा अवलंब करून ते घर बळकावण्याचा प्रयत्न करतो. भोसले दाद देत नाही, तेव्हा जीवावरही उठतो.....
भोसलेच्या मुलाला कॉंप्युटर इंजिनियर व्हायचे आहे पण ऍडमिशनसाठी पैसे नसतात. भोसले मुलासोबत त्याच्या कॉलेजमित्राला भेटतो (जो आता एक मोठा राजकारणी आणि शिक्षण सम्राट झालेला असतो) पण तो म्हणतो, " अरे, समजा मी तुझ्या मुलाला फुकटात ऍडमिशन देईलही, पण नंतरचा खर्च तूला परवडणार आहे का? त्यापेक्षा बी. एस. सी कर! " .....
त्याच्या मुलीलाही बॉलीवूड मध्ये अभिनेत्री बनायचे अस्ते, पण भोसले आडनावा मुळे फक्त तीला प्रवेश देण्याचे डायरेक्टर गीडवानी (उर्फ गायकवाड - कसे काय? ते चित्रपटातच बघा! ) नाकारतो. बँक मॅनेजरही त्याला मराठी माणसाने अंथरून पाहून हात-पाय पसरावे असा एकदा सल्ला देतो.....
अशा प्रकाराने कंटाळलेला व उबग आलेला भोसले एकदा दारू पिऊन बार मालकाशी हमरी तुमरीवर येतो. ( तो बरेच पदार्थ मागवत असतो तेव्हा वेटर त्याला म्हणतो की आधी मेनू कार्ड बघा, अर्थात मराठी मध्यमवर्गीय माणूस महाग पदार्थ खावू शकत नाही हा वेटरचा समज)
त्यामुळे त्याची पिटाई होवून तो बाहेर फेकला जातो. मग त्या रात्री स्वप्नात तो सगळ्या ऐतिहासिक महापुरुषांच्या पुतळ्यांजवऴ आपली व्यथा व्यक्त करतो आणि मोठ्ठ्याने ओरडतो, " मला मराठी म्हणून जन्मल्याची लाज वाटते... "
आणि हा आवाज जातो प्रतापगडावरच्या शिवाजी महाराजांच्या कानांवर.. त्यांना हे सहन होत नाही... ते भोसलेला उचलून नेतात. भोसले परप्रांतियांविरोधातले रडगाणे गातो, पण शिवाजी महाराज त्याला म्हणतात की ते लोक जे करतात ते करायला तूला कुणी मना केलं होतं? तू ही काढ होटेल... वगैरे वगैरे.
येथून सुरू होतो... न्यूनगंडीत भोसलेचा पावरफुल भोसलेपर्यंतचा प्रवास. तो पडद्यावरच बघण्यात मजा आहे.
मग तो त्याच्या मुलाच्या एडमिशनचा प्रश्न, मुलीच्या बॉलीवूड प्रवेशाचा, तसेच घराचा प्रश्न कसा सोडवतो ते बघण्यात मजा आहे.
"वेडात दौडले वीर मराठे सात! फक्त सातच? बाकीचे कुठे गेले? " हा डायलॉग सुपर हीट.
शिवाजी महाराज दर वे़ळेस पडद्यावर दिसताच थिएटरमध्ये टाळ्यांचा गडगडाट आणि शिट्ट्या....
मकरंद अनासपुरेंच्या एकेक वाक्याला पुन्हा टाळ्या आणि शिट्ट्या....
सचिन खेडेकरच्या डायलॉग्स लाही टाळ्या आणि शिट्ट्या...
सगळीकडे हाऊस फुल...
सुखविंदर सिंगचे "हे राजे" हे गीत खुपच छान. भरत जाधव वर चित्रीत केलेला पोवाडा ही छान....
हा चित्रपट मराठी माणसांच्या उणिवा दाखवून देतो. त्या पटतातही. त्याचबरोबर तो योग्य उमेदवाराला मत देण्याचे महत्त्व पटवून देतो. भ्रष्टाचारावरही प्रहार करतो. बऱ्याच गोष्टींवर पुन्हा पुन्हा विचार करायला लावतो. चित्रपट पाहील्यावरही एकेक प्रसंग आठवून आपण नव्याने नवा विचार करतो. हे या चित्रपटाचे यश.

एकच गोष्ट या चित्रपटात मात्र खटकते : भोसले ने निवडणूक लढवण्याचे ठरवल्यावर जसे इतर लोकांचा त्याचेवरचा विश्वास उडतो, तसाच शिवाजी महाराजांचा ही का उडतो? उलट, शिवाजी महराजांनी त्याला राज्य करण्यास उद्युक्त करायला हवे होते.

एकून चित्रपट खुपच छान. याबद्दल लिहावे तेवढे थोडेच. अगदी मेहेनत घेवून या चित्रपटाची पटकथा महेशने लिहिलेली दिसते. त्याचे शतशः अभिनंदन.
सगळ्यांनी चित्रपट जरूर बघावा... असे मला वाटते.
आपल्या या चित्रपटावरच्या प्रतिक्रिया अपेक्षीत आहेत.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel