१ दक्षिणावर्ती (उजवा) शंख
ज्या शंखाचा पृष्ठभाग स्वत:कडे करून देवाकडे त्याचे अग्र केले म्हणजे त्याच्या पन्हाळीची पोकळी उजव्या बाजूला येते असा शंख म्हणजे दक्षिणावर्ती (उजवा) शंख. दक्षिणावर्ती शंख दुर्मिळ असल्याने त्याच्या किमती अधिक असतात. शंखाची योग्य ती परीक्षा करूनच तो खरेदी करावा. दक्षिणावर्ती शंखाचे पुन्हा वजन व आकारावरून नर व मादी असे भेद होतात.
अथर्ववेदामध्ये सात मंत्रांनी युक्त अशा ‘शंखमणिसूक्ता’मध्ये दक्षिणावर्ती शंखाची महती वर्णन केली आहे. दक्षिणावर्ती शंख अंतरीक्ष वायू, ज्योतिमंडल आणि सुवर्णाने युक्त आहे. समुद्रमंथनातून निर्माण झालेला हा शंख राक्षसी, वाईट शक्तींचा नाश करणारा आहे. रोगनिवारण करून आरोग्यसंपन्न आयुर्मान देणारा, जीवनाचे रक्षण करणारा तसेच अज्ञान व अलक्ष्मीस दूर करून ज्ञान व अखंड स्थिर लक्ष्मी देणारा आहे.साक्षात लक्ष्मीचा सहोदर असणार्या दक्षिणावर्ती शंखाची पूजा ज्या घरात होते, तेथे कायम मंगलमय वातावरण राहते.देवपूजेपूर्वी शंखाची पूजा करण्याचा प्रघात आहे. देवपूजेकरिता लागणारे सर्व साहित्य शुद्ध करण्यासाठीदेखील शंखातील पाणी सिंचन केले जाते. दीर्घकाळ शंखात राहिलेले पाणी पूजेच्या समाप्तीनंतर विष्णूवर शिंपडल्यास त्या पाण्याच्या स्पर्शाने पूजकाच्या अंगाला चिकटलेली ब्रह्महत्येसारखी घोर पातकेसुद्धा नाहीशी होतात.पांढाराशुभ्र, कांतिमान, गुळगुळीत असा दक्षिणावर्ती शंख ‘अष्टमी’ किंवा ‘चतुर्दशीस’ विधिवत पूजनाने आपल्या देव्हार्यात किंवा तिजोरीत स्थापन करावा. राज्य, धन, कीर्ती, आयुष्य, शत्रूवर जय, कोर्टकचेर्यांमध्ये यश, पती-पत्नी नातेसंबंध यापैकी अपेक्षित फलप्राप्तीकरिता दिवसाच्या विशिष्ट नियोजित प्रहरामध्ये शंखपूजन करण्यास सांगितले आहे.
२. वामावर्ती (डावा) शंख.
ज्या शंखाच्या पन्हाळीची पोकळी डाव्या बाजूला येते असा शंख म्हणजे वामावर्ती (डावा) शंख.