‘ अंते मतिः सा गतिः ’ असे एक वचन आहे. जन्माचे खरे कारण शोधून पाहिले तर हेच आढळेल की, वासनेमुळे जन्माच्या फेर्‍यात आपण सापडलो. जन्माच्या पाठीमागे मरण हे ठेवलेलेच असते. जन्ममरणाचा ओघ सतत चाललेला आहे. वासना आधी का जन्म आधी, या वादात पडणे म्हणजे बीज आधी का झाड आधी यासारख्या, जगाच्या अंतापर्यंत कधी न सुटणार्‍या प्रश्नाबद्दल काथ्याकूट करणे होय. आपल्याला नडते कुठे ते पाहावे. विषयांतच आम्ही गुंतून राहतो, ते सोडावे. असत्यातूनच सत्य कसे जाणता येईल ते पाहावे. इथून कुणीतरी गेले, असे सावलीवरुन आपण म्हणतो. त्याप्रमाणे ही जगतरुप सावलीच आहे. तिला असणारे खर्‍याचे अधिष्ठान जो ईश्वर, त्याला आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करु या. आपल्या डोळ्यांवर विषयाची धुंदी असल्यामुळे, सर्व ठिकाणी भरलेला भगवंत आपल्याला नाही पाहता येत. त्याला पाहण्यासाठी दृष्टी निराळी लागते. आपण आपले अंतरंग साफ केले तर तशी दृष्टी येते. आपण कोणा स्त्रीकडे पाहू लागलो तर आपली जशी वृत्ति असेल तशी ती दिसते; कामी असेल त्याला ती तशी दिसू लागेल, आणि सात्त्विक असेल त्याला ती मातुःश्रीच दिसू लागेल. म्हणून काय, की जोपर्यंत आपले अंतःकरण शुद्ध नाही तोपर्यंत आपल्याला सर्वत्र भगवंत दिसणार नाही. भगवंत सर्व ठिकाणी पाहताना, तो आपल्यातही आहे हे पाहिले पाहिजे. जोपर्यंत भगवंत आपल्यात आहे हे दिसून येत नाही, तोपर्यंत तो इतरांत असलेला आपल्याला दिसणार नाही. म्हणून भगवंत सदासर्वकाळ आपल्यात आहे हे पाहू लागले पाहिजे.
सदगुरु सांगेल तसे वागावे. त्यामुळे आपला अभिमान नाहीसा होतो. संतांचा थोडासा कटाक्ष जो कर्ममार्गावर आहे तो याचकरिता की, कर्म करण्याने अभिमान येतो, आणि त्याउलट, गुरुआज्ञेत वागल्याने तोच अभिमान नाहीसा होतो. इथे अशी शंका वाटेल की, गुरु तरी नामस्मरण करायलाच सांगतात, म्हणजे कर्म आहेच ना ! वैद्याने एका रोग्याला सांगितले की तू काही खाऊ नकोस. त्याला वैद्याने औषधाच्या तीन पुड्या दिल्या, आणि या तीन वेळा घे म्हणून सांगितले. त्यावर तो रोगी म्हणाला, “ तुम्ही काही खाऊ नका म्हणता, आणि या पुड्या घ्या म्हणून सांगता हे कसे? ” त्यावर वैद्याने सांगितले की, “ पूर्वी जे अजीर्ण झाले आहे त्याचा नाश करण्यासाठी या पुड्या उपयोगी आहेत. ” त्याप्रमाणे, गुरु आपल्याला नामस्मरण करायला सांगतात ते पूर्वीचा विषयाचा अनुभव नष्ट करण्यासाठी. जो आपली विषयवासना कमी करुन आपल्यामध्ये नामाचे प्रेम उत्पन्न करील तोच खरा सदगुरु होय.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel