१५ ऑगस्ट २०१७: डी.सी.पी. शिवाजी देशमुख - डोंबिवली स्टेशनजवळील पोलीस ठाण्याचे डी.सी.पी. शिवाजी देशमुख यांना मुंबईमध्ये दहशतवादी आल्याची बातमी आदल्या रात्रीच मिळाली होती. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना मुंबई येथे जाणे शक्य नसले तरी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याची त्यांची मनोमन इच्छा होती.

"स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब, चहा घ्या." चहावाला त्यांच्या टेबलावर चहाचा छोटा ग्लास ठेवत म्हणतो.

"नाही, नको." देशमुख म्हणतात.

"बरं नाही वाटत का साहेब? चेहरा उतरलेला दिसतोय तुमचा." चहाचा ग्लास पुन्हा ट्रेमध्ये ठेवत चहावाला म्हणतो.

"काही नाही, रात्री झोप नाही झाली." असं म्हणून देशमुख मोबाईलवर बातम्यांचे अपडेट्स बघतात.

"अस्सं ना! मग घ्या कि चहा, सगळी सुस्ती निघून जाईल." चहावाला ग्लास ठेवून निघून जातो.

सकाळपासून जवळपास १०० वेळा तरी त्यांनी बातम्यांचे अपडेट्स बघितले असतील, दहशतवाद्यांची कोणतीही बातमी फ्लॅश झाली नव्हती. संपूर्ण भारत देशात स्वातंत्र्य दिन कसा साजरा केला जात आहे, या विषयीच्या बातम्या होत्या.

दहशतवादी हल्ला होऊ नये, हाच विचार त्यांच्या डोक्यात चालू होता. २६/११ च्या हल्ल्यात त्यांना काही करता आलं नाही हे त्यांना सतत खुपत होतं, दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याच्या आता आलेल्या संधीचं सोनं करणंदेखील त्यांना शक्य नव्हतं. कोणतीही केस पेंडींग नसून देखील त्यांना मनस्ताप होत होता, केबिनबाहेर पोलीस स्टाफमध्ये बरीच कुजबुज चालू होती. दहशतवादी आल्याची बातमी त्यांना माहिती नव्हती. मात्र त्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले होते. १५ ऑगस्ट असल्याने त्यांना हे नेहमीचंच आहे, असं वाटलं होतं. पण जेव्हापासून पोलीस मुख्यालयातून सतत अपडेट्स येत होत्या, आणि त्यांच्या पोलीस चौकीमध्ये अत्याधुनिक बंदुका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या, तेव्हापासून काहीतरी गडबड होणार असल्याची कुजबुज सुरु झाली होती.

दहशतवादाविरोधी चालू असलेल्या मोहिमेचा भाग होण्याची देशमुखांची मनोमन इच्छा होती. पण नियमांमुळे त्यांना ते शक्य नव्हते. इतर कुणालाही या मोहिमेची माहिती नसल्याने त्यांना याविषयी कुणाशीही बोलता येत नव्हते.

विचार करत असताना बऱ्याच वेळाने त्यांचे लक्ष टेबलावर ठेवलेल्या चहाकडे जाते. ते ग्लासला हात लावून बघतात. चहा अजूनही थोडा गरम असतो. चहा पीत ते आपल्या जागेवरून उठून खिडकीच्या दिशेने जातात. त्यांचे विचारचक्र चालूच असते. दहशतवाद्यांनी शस्त्र सोबत आणली नाहीत, याचा अर्थ ती आधीच भारतात आली असावी, आमच्यापेक्षा ते एवढे पुढे कसे?

काही वेळाने बाहेरून एक कॉन्स्टेबल धावत त्यांच्या केबिनमध्ये येतो.

"सर, मुंबई विद्यापीठामध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे." कॉन्स्टेबल म्हणतो आणि देशमुख सरांच्या मोबाईलवर बातमी फ्लॅश होते, 'मुंबई विद्यापीठावर दहशतवादी हल्ला.' पोलीस स्थानकामध्ये असलेले सगळे फोन वाजू लागतात.

सर्व पोलीस चौका एकमेकांना अपडेट्स देत होत्या. देशमुख सर देखील त्यांना जॉईन होतात. पोलीसांसाठी सामान्य नागरिकांना दहशतवाद्यापासून दूर नेणे हे सर्वात मोठे काम होते. बातमी कन्फर्म होताच सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या मोबाईलमध्ये असलेल्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बातमी फॉरवर्ड करतात. पोलीस कॉलसेंटरद्वारे हल्ल्याविषयी बल्क मेसेजेस पाठवले जातात, मोबाईल कंपन्यांना सूचना देऊन त्यांना ताबडतोब सर्व ग्राहकांना मेसेज पाठवण्याची सूचना दिली जाते. आपण दहशतवादाविरोधी अॅक्शन झोनमध्ये आहोत, याबाबत देशमुख सर समाधानी असतात.

बातमी वाऱ्याच्या वेगाने भारतभर पसरते. देशातील इतर प्रमुख शहरांची सुरक्षा आणखी कडेकोट केली जाते. जो तो मिळेल त्या ठिकाणी लपण्याचा प्रयत्न करत होता. प्रत्येक जन मोबाईल, टी.व्ही., रेडियोच्या सहाय्याने मिळणाऱ्या अपडेट्स सतत तपासत होते. जवळजवळ सगळेच आपापल्या नातेवाईकांना फोन करून ते 'सेफ आहेत ना!' असे विचारत होते. संपूर्ण भारतभर नेटवर्क जॅम झाले होते. देशमुख सर त्याला अपवाद नव्हते.

"हॅल्लो, कुठे आहात?" देशमुख सरांची पत्नी.

"पोलीस चौकीमध्ये आहे." देशमुख सर.

"बातमी कळली का?"

"हो."

"मी काय म्हणतेय? बाहेर पडू नका. हाताखाली कोणी असेल तर त्यांना जाऊ द्या काय ते करायला. एकदा माझा विचार करा, आपल्या मुलांकडे बघा."

"हो, ठेव आता आणि मला माझं काम करू दे." एवढं बोलून देशमुख सर फोन कट करतात.

"सर, दहशतवादी कल्याणला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढले आहेत." एक कॉन्स्टेबल म्हणतो.

"काय बोलतोस? बातमी खरी आहे?" देशमुख सरांना आश्चर्याचा धक्का बसतो.

"हो सर, त्यांनी दादर स्टेशनवर हल्ला केला आणि ट्रेन न थांबता कल्याण स्टेशनच्या दिशेने न्यायला सांगितली आहे." तो कॉन्स्टेबल म्हणतो. देशमुख सर कंट्रोल रूमला फोन करतात.

कंट्रोल रूममधून त्यांच्या चौकीतील ३० हवालदार आणि अधिकाऱ्यांना ताबडतोब कल्याण स्टेशन गाठायला सांगतात. देशमुख आणि इतर ४० कॉन्स्टेबल डोंबिवलीमध्येच थांबतील अशी सूचना करण्यात येते.

देशमुख सर स्वतः कल्याणला जाण्याची विनंती करतात. पण ते प्रमुख असल्याने त्यांना डोंबिवलीमधील हालचालींवर लक्ष ठेवायला सांगतिले जाते. कल्याण स्थानकावर आधीच पोलीसांची भलीमोठी फौज असल्याने देशमुख सरांना डोंबिवलीत थांबण्याशिवाय पर्याय नसतो.

ते आपल्या सहकाऱ्यांना ताबडतोब कल्याण स्थानकाच्या दिशेने पाठवतात. डोंबिवली रेल्वे स्थानकावरील रेल्वे सुरक्षा बलला रेल्वे स्थानक रिकामे करायचे आदेश दिले जातात.

दहशतवाद्यांनी भरलेली ट्रेन न थांबता कल्याणच्या दिशेने जाणार आहे, ही बातमी कळताच डोंबिवली स्थानकावर एकच गर्दी होते. आपल्याला काही होणार नाही, असा विचार करून सगळे स्थानकावर गर्दी करून होते. दूरवरुन ट्रेन येताना दिसताच सगळे आपापले मोबाईल, कॅमेरे चालू करतात. काही अतिउत्साही तर फेसबुक लाईव्ह स्टेटस अपडेट करतात. कोणीही रेल्वे सुरक्षा बलाकडे लक्ष देत नाही आणि जवळ येत असलेल्या ट्रेनचं चित्रीकरण करतात. ट्रेनची गती हळू हळू कमी होत आहे हे कुणाच्याही लक्षात येत नाही, आणि ट्रेन थांबण्याच्या आतच दहशतवादी गोळीबार करायला सुरुवात करतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel