जंगलचा राजा सिंह व इतर पशू यांची एकत्र अशी एके दिवशी एक सभा भरली.

या सभेत सिंह व इतर पशू यात एक करार झाला. सर्वांना एक विचाराने चालावे व जे काही मिळेल ते सारखे वाटून घ्यावे असे ठरले.

एके दिवशी सिंह, कोल्हा, लांडगा व तरस या चौघांनी मिळून एक हरिण मारले व त्याचे कोल्ह्याने चार सारखे वाटे केले. त्यावेळी सिंह पुढे होऊन त्यातील एका वाट्याकडे बोट दाखवून म्हणाला, 'अरे, हा माझा वाटा मी कर म्हणून घेणार, दुसराही वाटा माझाच, कारण तुम्ही जो पराक्रम केलात तो सर्व माझ्या बळावरच नाही का ?'

मग तिसर्‍या भागाकडे पाहून व मान हलवून सिंह पुढे म्हणाला, 'ज्या अर्थी तुम्ही माझी प्रजा व मी तुमची राजा आहे, त्या अर्थी तुम्ही हा वाटा मला भक्तीने अर्पण करालच म्हणजे तोही माझाच व चौथा तर माझाच वाटा.'

पुढे आपले प्रजेविषयीचे प्रेम व्यक्त करीत व राजेपण दाखविण्यासाठी सिंह म्हणाला, 'परंतु हा चौथा वाटा मी जतन करून ठेवणार आहे कारण सैन्यासाठी अन्नसामग्री अशी नाही व ती असणं आवश्यक आहे. अडचणीच्या वेळी ती उपयोगी पडेल. पुढे येणार्‍या अडचणीची आधी सोय करणं ही राजनीतीला धरून आहे, नाही का ? मी काय म्हणतो ते समजलं असेलच अन् ते जर तुम्हाला मान्य असेलच अन् ते जर तुम्हाला मान्य नसेल तर त्यात तुमचाच नाश आहे.'

तात्पर्य

- दुर्बल व शक्तिमान यांची एकी फार दिवस टिकणे शक्य नाही. कारण एकत्र येताना बलवान लोक ज्या शपथा घेतात त्या शक्तीच्या जोरावर मोडूसुद्धा शकतात. अशा वेळी दुर्बलांनी त्यांच्याशी संबंध ठेवणेच वेडेपणाचे होय.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel