बळाची उपासना
रामचरित्राचा संदेश समर्थांनी दिला आणि हनुमान उभा केला. गावोगावी हनुमानाची स्थापना केली. बळाची उपासना. हृदयात ऐक्य हवे व दंडात बळ हवे. ठायी ठायी आखाडे गजबजू लागले. दंड थोपटले जाऊ लागले. बळ व बळाबरोबर संघटना होऊ लागली. परंतु हे हनुमंताचे बळ. हे बळ रामाच्या सेवेत अर्पायचे. जो महान पुढारी उभा राहील, जनतेतून पुढे येईल त्याच्या चरणी ही शक्ती अर्पण करा. ठायी ठायी प्रबळ तरूणांची संघटना करून ती महान नेत्याला नेऊन द्या.
नैराष्य भेदणारा राम-महिमा
समर्थांनी रामायणातील युद्धकांडावरच भर दिला. बाकीच्या कांडावर त्यानी फार लिहिले नाही. युद्धकांडावर सारा जोर. ही मराठीतील ठणठणीत युद्धकांडे सर्वत्र खणखणीत भाषेत घोषविली जाऊ लागली. रामकथेचा प्रचंड महिमा नैराश्य भेदून आत जाऊ लागला.
जनतेत संघटनेचे, संयमाचे, एकजुटीचे, शिस्तीचे विचार कोणी पसरायचे? समर्थांनी प्रचंड संघटना आरंभिली. ठिकठिकाणी जी बुद्धिमान व तेजस्वी मुले दिसतील त्यांना ते संघटनेत ओढू लागले. “तीक्ष्ण बुद्धीची, सखोल।” अशी मुले जी दिसतील ती आमच्याकडे पाठवा. “मग त्यांचा गावा। आम्ही उगवू।।” मग त्यांच्या मनातील गोंधळ आम्ही दूर करू, त्यांना ध्येय देऊ, असे समर्थ आपल्या शिष्यांना सांगत आहेत. मनाचे सोपे सुटसुटीत श्लोक केले. हे श्लोक फकीरांच्या साक्याप्रमाणे, दोह-यांप्रमाणे म्हणता येतात. समर्थांचे शिष्य हे श्लोक म्हणत, नवविचार देत हिंडू लागले. आपण स्वतंत्र होऊ, जरा धारिष्ट करू या, असे हे तेजस्वी प्रचारक सांगू लागले.
नव-संदेश
“उत्कट भव्य ते घ्यावे। मिळमिळत अवघेचि टाकावे।” हा संदेश समर्थांनी दिला.
“मराठा तितुका मेळवावा।”
“शहाणे करून सोडावे। सकल जन।।”
असेही संदेश त्यांनी दिले. ही प्रचंड जागृती होऊ लागली. परंतु जनतेतील जागृतीला स्वातंत्र्याच्या ध्येयाकडे कोण नेणार? जनतेच्या आशा, आकांक्षा, उद्योग, या सर्वांना एका ध्येयाभोवती कोण असणार? परिस्थिती परिपक्क होती. कोणीतरी महान नेता येणार असे वाटत होते. चळवळीची प्रचंड लाट उचंबळत होती.
“धीर धरा धीर धरा तकवा।
हडबडू गडबडू नका।।”
असे समर्थन विद्युद्वाणीने सांगत होते.
शाहीरही निर्माण होऊन एक तुणतुणे हाती घेऊन बहुजन समाजाला स्फूर्ती द्यायला ठायी ठायी हिंडू लागले होते. अरूणोदय होत होता. पक्षीवृंद गाऊ लागला. उडू लागला. चालना देणारा प्रतापी सूर्यनारायण येणार अशी श्रध्दा वाटू लागली.
लाटेतून स्वच्छ फेस निर्माण होतो, त्याप्रमाणे जनतेतील लाटेतून तेजस्वी महापुरुष उत्पन्न होतो. जनतेच्या हृदयांतील वेदनांतून तो निर्माण झालेला असतो. योग्य परिस्थिती महापुरूषाला जन्म देते.