सैन्य न उरल्यामुळें लढाई थांबवून नेपोलियननें लेयॉन येथून सर्व वृत्त पॅरिसला कळविलें व नंतर २१ जून रोजी पॅरिसमध्यें गेला, व कोरनो, फूशे, रेनो, लुसीन वगैरेंचा सल्ला त्यानें विचारला. प्रतिनिधिसभेची (चेंबर ऑफ डेप्युटीज) बैठक भरविण्यांत आली. "राष्ट्र संकटात आहे. यावेळीं जो आमची सभा बरखास्त करण्याचा प्रयत्न करील तो राष्ट्रद्रोही समजला जाईल, व त्यास त्या गुन्ह्याचें शासन मिळेल. लष्करी अम्मलदार, परराष्ट्रीय वकील व राष्ट्रांतले अधिकारी यांनीं एकदम येथें जमावें अशी आम्ही आज्ञा करतो " असा ठराव सभेनें करून तो नेपोलियनकडेहि पाठविला. पुन्हां भरलेल्या बैठकींत स्वत: हजर न राहतां नेपोलियननें लुसीन बोनापार्टला लढाईची हकीकत सांगण्यास पाठविलें. सभेनें पुढील सूचना करण्याकरितां पांच जणांची कमिटि नेमली. त्यांच्या सूचना आल्यावर दुसर्या दिवशीच्या बैठकींत " नेपोलियन बादशहास आपल्या राज्यचा राजीनामा देण्यास सुचवावें " असा ठराव केला.
त्याप्रमाणें नेपोलियननें राजीनामा लिहून दिला तो :- " माझें राजकीय जीवित संपलें, आणि आतां मी आपल्या मुलास ' दुसरा नेपोलियन ' या नांवानें फ्रान्सचा बादशहा जाहीर करतों. ' स्वतंत्र राष्ट्र ' असें राहतां यावें व्हणून सर्वांच्या संरक्षणाकरितां एकदिल व्हा ". इत्यादि राजीनामा झाल्यावर चेंबर्स सभांनीं तात्पुरत्या मंत्रिमंडळाकडे राज्यकारभार सोंपविला. मंत्रिमंडळानें दोस्तांच्या पॅरिसवर चाल करून येणार्या सरदारांस तह करण्याची विनंति केली; तिला ब्लूचरनें उत्तर दिलें कीं, " नेपोलियनला धरून माझ्या सैन्यामध्यें सर्व शिपायांदेखत फांशीं दिल्याशिवाय मी कांहींएक ऐकणार नाहीं ".
ही परिस्थिति पाहून नेपोलियननें अमेरिकेंत जाण्याचें ठरविलें. समुद्रावर ब्रिटिश आरमार पहारा करीत होतें. त्याच्या मेटलंड नांवाच्या अधिकार्यास ब्रिटिश सरकारकडून अमेरिकेस जाण्याचा परवाना देण्याबद्दल विचारलें. परवान्याचें नक्की न सांगतां मेटलंडनें नेपोलियनला इंग्लंडांत नेण्याचें कबूल करून आपल्या जहाजावर नेपोलियन व त्याच्या मंडळीस घेतलें. ब्रिटिश किनार्याजवळ आल्यावर ब्रिटिश सरकारनें इंग्लंडांत उतरण्याची परवानगी न देतां नेपोलियनला कैदी म्हणून सेंट हेलिना बेटांत ता. १६ नोव्हेंबर, १८१५ रोजीं नेऊन ठेविलें. सर हडसन लो नांवाचा लष्करी अम्मलदार बेटाचा गव्हर्नर नेमला. फ्रान्स, आस्ट्रिया व रशिया यांनीहि एकेक कमिशनर नेमला होता. ते सर्व नालायक असल्यामुळें नेपोलियननें कोणाचीहि भेट घेतली नाहीं.
नेपोलियनला खर्चाकरितां सालीना ८००० पौंडांची नेमणूक होती. तेथें बरट्रांड, गोरगोड, लास कासेस, माँथोलोन वगैरे ५१ माणसें होतीं. नेपोलियननें तेथें आपलें आत्मचरित्र व इतर कांहीं विषयांवर लेख लिहिले व शेवटीं एक मृत्युपत्रहि लिहिलें. तेथून पळून जाण्याचें त्यानें कधीं मनांतहि आणलें. सेंट हेलिनाला गेल्यापासूनच त्याची प्रकृति खालावत जाऊन अखेर तो ता. ५ मे, स. १८२१ रोजीं मरण पावला. त्याचे मृत शरीर फाडून कोथळा व काळीज शस्त्रवैद्याकडून हडसन लो यानें बाहेर काढवलें व नंतर त्याच्या शवाचे दफन त्या बेटांतच केलें. पुढें एकोणीस वर्षांनीं नेपोलियनचें तें शव मोठ्या समारंभानें पॅरिस येथें नेऊन पुरण्यांत आले.