भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती ।
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ॥१॥
महाबली प्राणदाता सकळां ऊठवी बळें ।
सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका ॥२॥
दिनानाथा हरिरूपा संदरा जगदंतरा ।
पातालदेवता हंता भव्यशेंदूरलेपना ॥३॥
लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना ।
पुण्यवंता पुण्यशीला पावना परतोषका ॥४॥
ध्वजांगेंऊचली बाहो आवेशें लोटला पुढें ।
काळाग्नी काळरुद्राग्नी देखतां कांपती भयें ॥५॥
ब्रह्मांडें माइली नेणों आवळे दंतपंगती ।
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळें ॥६॥
पुच्छ तें मुर्डिलें माथां किरीटी कुंडलें वरी ।
सुवर्णकटिं कासोटी घंटा किंकिणि नागरा ॥७॥
ठकारे पर्वताऐसा नेटका सडपातळू ।
चपलांग पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी ॥८॥
कोटिच्या कोटि उड्डाणें झेंपावे उत्तरेकडे ।
मंदाद्रिसारिखा द्रोणू क्रोधें उत्पाटिला बळें ॥९॥
आणिला मागुती नेला आला गेला मनोगती ।
मनासी टाकिलें मागें गतीसी तुळना नसे ॥१०॥
अणूपासूनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे ।
तयासी तुळणा कोठें मेरू मंदार धाकुटे ॥११॥
ब्रह्मांडाभोंवते वेढे स्वपुच्छें घालवूं शके ।
तयासी तुळणा कैची ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥१२॥
आरक्त देखिलें डोळां गिळिलें सूर्यमंडळा ।
वाढतां वाढतां वाढे भेदिलें शून्यमंडळा ॥१३॥
भूत प्रेत समंधादी रोगव्याधी समस्तही ।
नासती तूटती चिंता आनंदें भीमदर्शनें ॥१४॥
हे धरा पंधरा श्लोकीं लाभली शोभली भली ।
दृढ देहोनिसंदेहो संख्या चंद्रकळा गुणें ॥१५॥
राम दासीं अग्रगणू कपिकुळासि मंडणू ।
रामरूपीं अंतरात्मा दर्शनें दोष नासती ॥१६॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel