चपळ ठाण विराजतसे बरें ।
परम सुंदर तें रूप साजिरें ।
धगधगीत बरी उटि सिंदुरें ।
निकट दास कपी विरं हें खरें ॥१॥
कपीवीर जेठी उडे चारि कोटी ।
गिरी द्रोण दाटी तळाथें उपाटी ।
झपेटी लपेटी करी पुच्छवेटी ।
त्रिकुटाचळीं ऊठवी वीर कोटी ॥२॥
रघुविरा समिरात्मज भेटला ।
हरिजनां भजनांकुर फूटला ।
कपिकुळें सकळें मिनलीं बळें ।
रिपुदळें विकळें वडवानळें ॥३॥
कपीवीर तो लीन तल्लीन जाला।
प्रसंगचि पाहोनिं सन्मूख आला।
हनूमंत हें पावला नाम तेथें ।
महीमंडळीं चालिले सर्व येथें ॥४॥
नव्हे सौम्य हा भीम पूर्ण प्रतापी ।
देहो अचळातुल्य हा काळरूपी ।
पुढें देखतां दैत्यकूळें दरारा ।
भुतें कांपती नाम घेतां थरारा ॥५॥
सिमा सांडिली भीमराजें विशाळें।
बळें रेंटिले दैत्य कृत्तांतकाळें ।
गजामस्तकीं केसरीचा चपेटा ।
महारुद्र तैसा विभांडी त्रिकूटा ॥६॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.